Friday, April 26, 2024
Homeब्लॉगकवितेचे वय... सजग झालेली निरामय अस्वस्थता

कवितेचे वय… सजग झालेली निरामय अस्वस्थता

आपलं आयुष्य म्हणजे निसर्गाला स्फुरलेली एक नितांतसुंदर कविता. कधी मुक्ततेचा श्वास घेणारा अभिजात छंद तर कधी गेयतेच्या अलंकारात सूत्रबद्ध नटलेला प्रासादिक बंध. वैराण वाळवंटात तहानलेल्या जीवाला सापडणारं ओॲसिस. काळ्या कसदार जमिनीतून उगवणाऱ्या नवलाईचा हिरवागार आशय.

आकाशाच्या निळ्याशार ‘वृत्ता’ला निर्मितीच्या काळ्याभोर ‘मात्रां’चा स्पर्श होताच कोसळणारा धुँवाधार पाऊस. अरण्याच्या घनदाट अंतरंगातील प्रगाढ शांतता. पहाडांच्या माथ्यावर कोरलेली लयबद्ध लावण्यलेणी. आकाशाच्या पार्श्वभूमीवर उमटलेले पक्ष्यांच्या पावलांचे अमीट ठसे. नदीचा अवखळ आवेग. स्वरांच्या आवर्तनातून अखंडपणे पाझरणारा विश्वव्यापी ॐकार. जीवनाचा एकेक पापुद्रा गळून पडताना आतल्या निराकाराच्या चाहुलीने सजग झालेली निरामय अस्वस्थता म्हणजे विशुद्ध कविता.

- Advertisement -

आडवं तिडवं वाचता वाचता कधीतरी कवितेने अलगद उचलून घेतलं. छातीशी धरलं. माझ्या प्राक्तनाचं अवघ्राण केलं. ती माझी आई झाली. तिने आयुष्याला नवा आशय प्रदान केला. तिचं बोट धरून समजून घेतलं जीवनाला. तिने जाणीव करून दिली खाचखळग्यांची, संकटांची. अडचणींचा डोंगर ओलांडताना तिने धैर्याचा मार्ग दाखवला. स्वाभिमानाचा नितळ प्रवाह रक्तात अलगदपणे मिसळून दिला. चुकांवर पांघरूण घालताना ती कधीतरी मोठी बहीण झाली. तिच्या आदरयुक्त दराऱ्याने जीवनाला शिस्तीचा लगाम घातला. प्रलोभनांच्या भाऊगर्दीत म्हणूनच पुढचा प्रवास विवेकपूर्ण झाला. ती मैत्रीण झाली आणि जीवनाचा कृष्णधवल पडदा रंगीत झाला. मग नाचू लागले मनमोर. उन्हात चांदणं सांडल्याचे भास झाले. त्या स्वप्नांना वास्तवाचा आकार देताना ती पत्नी झाली. प्रेमाच्या, मायेच्या प्रकाशात आयुष्य उजळून निघालं. आईच्या ममतेची कविता पत्नीच्या निरपेक्ष प्रेमात विलीन झाली. आयुष्याच्या संक्रमणाचं एक वर्तुळ पूर्ण झालं.

जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर कवितेने अनेक रूपं बदलली. त्यामुळे मी नेहमीच संभ्रमीत झालो. मग ती नेमकी कोण? ती मोठी की मी मोठा? तिच्यामुळे मला प्रतिष्ठा मिळाली की माझ्यामुळे तिला? लोक कवितेमुळे मला ओळखतात की माझ्यामुळे तिला? मग ही वाहवा कुणाची होते? कुणासाठी वाजतात या टाळ्या? अशा अनुत्तरीत प्रश्नांच्या रांगेत जाऊन मी नाईलाजाने उभा राहतो. उत्तरे देणारी खिडकी काळाने भलंमोठं कुलूप घालून बंद केलेली असते. कविसंमेलनाला जाताना कुणी कुणाचं बोट धरून जावं याचाही गोंधळ असतो डोक्यात. ओळख करून देताना मी तिची ओळख करून द्यावी की तिने माझी? अशा प्रातिनिधीक प्रश्नांच्या पाठीवर स्वार होऊन मी निघून जातो निबिड अरण्यात. परंतु तिथेही उत्तरांची श्वापदे मारण्याला कायद्यानुसार प्रतिबंध असतो. मग मी सहजच आजवर जगलेल्या आयुष्यातून न जगलेलं आयुष्य वजा करतो. तर उरलेल्या बाकीएवढी माझी कविता प्रौढ झालेली असते. सगळ्या प्रश्नांची उत्तरं चुटकीसरशी मिळतात. हा तर माझ्याच मनाचा खेळ असतो. मीच द्युताचा डाव मांडून मलाच हरवत असतो. मग कविता असते कुठे? तर तिने आपली स्वतःची ओळख मातीखाली गाडून माझ्या परिचित व्यक्तिमत्त्वाचं झाड अखंडपणे तोलून धरलेलं असतं.

कविता मनात आकार घ्यायला लागली. ही कविता लिहिताना मी माझाच अंश कागदावर उतरवून ठेवत होतो. त्यामुळे कवितेतला मी आणि माझ्यातील कविता या अभिन्नतेने ‘कवितेचे वय’ला नेमकी वाट सापडली. कविता लिहून झाली त्या दरम्यान कविमित्र संदेश ढगे सहजच भेटायला म्हणून शहापूरहून शिर्डीला आलेला होता. गप्पांच्या ओघात नवी रचना म्हणून ‘कवितेचे वय’ त्याला ऐकवली. त्याला ती विलक्षण आवडली. चांगल्या नियतकालिकासाठी पाठव असा त्याने सल्लाही दिला. परतल्यावर मुंबई भेटीत त्याने कविमित्र अरूण म्हात्रेंकडे त्या कवितेचं गुणगान केलं. अरूणदादा त्यावेळी केवळ कवितेला वाहिलेलं ‘अक्षर चळवळ’ नावाचं नियतकालिक चालवत असे. लगोलग त्याचं पत्र आलं. त्याने लिहिलं होतं….

“अचानक माझे पत्र पाहून तू चक्रावून जाशील. तशी आपली भेट अनेकदा झालीय. एकदा कोपरगावला. एकदा शिर्डीला. आणि कार्यक्रमात अनेकदा. गेल्या आठवड्यात संदेश आला होता. तो त्याच्या अलीकडच्या दौऱ्यात तुला भेटला. त्याने तू एक ‘ग्रेट’ कविता लिहिली असल्याचे सांगितले. मी पटकन म्हंटले, ‘अक्षर चळवळ साठी पाठवायला सांगायचे!’ त्यावर तो म्हणाला – ‘इतकी चांगली कविता अक्षर चळवळ साठी नाही. जरा बऱ्या ठिकाणी पाठवणार आहे.’ हे तुझे उद्गार की संदेशचा आगाऊपणा. समजले नाही. पण खूप वाईट वाटले. अगदी आता या क्षणाला वाईट वाटते आहे. अक्षर चळवळ विषयी वाईट बोलला किंवा कविता पाठवणार म्हणून नव्हे तर एकूण आपण सर्वजन अक्षर चळवळ पासून दूर दूर जाता आहात म्हणून. चांगल्या कविता मला आवडतात. संपादक या नात्याने रसिकत्वाच्या पुढे एक संपादकीय अधाशीपणाही असतो. त्यात, मी पडलो एक साधा प्राणी. त्यामुळे मला कवी आणि कविता ह्या दोन्ही व्यक्तिमत्त्वांना लोंबकळावेसे वाटते. बऱ्याचदा ते जमत नाही. खैर. त्यामुळे मनात असूनही खूपदा मोकळे होता आले नाही. आणि दिवसांची पुटं इतक्या वेगानं आपल्या ‘वाटण्या’वर चढतात की कित्येक कविता आणि त्यामागची माणसं, प्रदेश अस्पर्शच राहतात. कदाचित तसेच काहीसे आपल्या बाबतीत झालेय. म्हणून म्हंटलं तुला लिहावं. कवितेसाठी नाही. किंवा समर्थनाच्या पत्रासाठी नाही. एका कविमित्राच्या अत्यंत ओळखीच्या, अगत्याच्या, ओल्याशार संवादासाठी. अडखळलेल्या शब्दासाठी….”

‘कवितेचे वय’ अक्षर चळवळच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विशेषांकात दिमाखात प्रसिद्ध झाली. विशेषांक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्यामुळे त्या कवितेने मला खूप मोठी ओळख मिळवून दिली. त्यानंतर ‘ताटातुटीचे वर्तमान’ या माझ्या कवितासंग्रहात तिचा अंतर्भाव झाला. संग्रह वाचल्यानंतर सुप्रसिद्ध अनुवादक डॉ. विद्या सहस्त्रबुद्धेंना ‘मेरी कविता की उम्र’ या नावाने तिचा हिंदीत अनुवाद करावासा वाटला. अनुवाद इतका सरस झाला की ती त्यांची हिंदीतील स्वतंत्र कविताच वाटली.

कवितेला वय नसतं. नसते लिंग, नसते जात आणि धर्मही. ती चराचराचा आवाज असते. लिपी कुठलीही असो ती हृदयाचीच भाषा बोलत असते. ओळख दृढ करण्याच्या या आततायी काळात ती गाडून घेते स्वतःला. पुसून टाकते माझ्या ‘मी’पणाची ओळख. ‘कवितेचे वय’ दिक्कालाच्या विशाल पटलावर कालातीत होत जाते.

कवितेचे वय

मला ठाऊक नाही

माझ्या कवितेचे वय किती ?

त्यामुळे कुठल्याही संमेलनात जाताना

तिला नेसवावी जरीकाठाची साडी

की न्यावे तिला परकर पोलक्यात

अशा अनुत्तरीत प्रश्नांच्या रांगेत

मी जाऊन राहतो उभा

मला ठाऊक असते

उत्तरे देणारी खिडकी

वेळेचे कुलूप घालून

काळाने केव्हाच बंद केलेली

मी सोडून देतो तिच्या पोषाखाचा नाद.

आता घरातून निघताना

तिचे बोट धरून जावे

की तिला बोटाला पकडून न्यावे

आणि इच्छित स्थळी पोहोचल्यानंतर

ओळख करून देताना

मी तिची ओळख करून द्यावी की तिने माझी

अशा प्रातिनिधीक प्रश्नांच्या पाठीवर

स्वार होऊन

मी निघून जातो निबिड अरण्यात

जेथे उत्तरांची श्वापदे मारणे

हा कायद्यानुसार गुन्हा असतो.

कविता वाचताना मिळणारी ठराविक दाद

अथवा

वाचल्यानंतर मोजून पडणाऱ्या यंत्रवत टाळ्या

यापैकी कोणतेच प्रमाण ठरवू शकत नाही

माझ्या कवितेचे वय.

परतताना रस्त्यावरून

मी मुद्दामच जाऊ देतो प्रश्नांचा काफिला पुढे

आणि सहजच आजवर जगलेल्या आयुष्यातून

वजा करतो न जगलेलं आयुष्य

तर उरलेल्या बाकीएवढी

प्रौढ झालेली असते माझी कविता.

आता कुठल्याही संमेलनात जाताना

मला सतावत नाही तिचा पोषाख

तिच्या बोटाला धरणं

अथवा तिचं बोट पकडणं

माझ्या परिचित व्यक्तिमत्त्वाचं झाड

तिनेच तर तोलून धरलेलं असतं

आपली स्वतःची ओळख मातीखाली गाडून.

-शशिकांत शिंदे

९८६०९०९१७९

- Advertisment -

ताज्या बातम्या