Thursday, April 25, 2024
Homeब्लॉगशिक्षकदिन विशेष : भारतीय तत्वज्ञानाचे प्रवक्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

शिक्षकदिन विशेष : भारतीय तत्वज्ञानाचे प्रवक्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

वैभव सुरेश कातकाडे

विद्यार्थी, शिक्षक, कुलगुरू, राजदूत, उपराष्ट्रपती आणि स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती असलेले भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (Dr. Sarvapalli Radhakrishnan) यांची आज (5 सप्टेंबर) जयंती. यानिमित्र सर्वत्र शिक्षकदिन साजरा केला जातो…

- Advertisement -

भारतीय संस्कृतीला लाभलेला वारसा आणि तिचा आवाका प्रचंड मोठा आहे. वेदांतापासून ते महर्षी व्यास, चार्वकापर्यंत पुढे शंकराचार्यपासून ते आधुनिक काळातील स्वामी विवेकानंदांपर्यंत या संस्कृतीत अनेक नररत्नांनी सदोदित भर घातली आहे.

न ही ज्ञानेनं सदृशं, पवित्रमिहं विद्यते !

ज्ञानाशिवाय पवित्र असे काहीही नाही. या उदात्त तत्वावर या विशाल संस्कृतीचा डोलारा उभारलेला आहे. ज्ञान हाच या संस्कृतीचा मूळ गाभा आहे आणि म्हणूनच एका शिक्षकाने देशाचे सर्वोच्च पद भूषवावे यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. या निमित्ताने ज्ञानाचा सर्वोच्च सन्मान झाल्याचे उदाहरण निर्माण झाले.

डॉ राधाकृष्णन हे याच संस्कृतीचा अस्सल भारतीय चेहरा आहेत. विद्यार्थी, शिक्षक, कुलगुरू, राजदूत, उपराष्ट्रपती आणि स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती असे अनेक पदे त्यांनी भूषविली आणि आपल्या कार्यातून त्यांनी त्या त्या पदांची उंचीच वाढविली; मात्र भारतीय तत्वज्ञानाचा प्रवक्ता अशी त्यांची विशेष ओळख सांगता येईल.

राधाकृष्णन यांचा जन्म तत्कालीन मद्रास प्रांतातील तिरुतानी या गावात 5 सप्टेंबर 1888 रोजी झाला. त्यांचे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण मद्रास येथील मद्रास ख्रिश्चन कॉलेज येथे झाले.

त्यांचे पहिले पुस्तक ‘ द फिलॉसॉफी ऑफ रवींद्रनाथ टागोर’ हे 1918 मध्ये प्रसिद्ध झाले. त्यांनी दोन खंडात लिहिलेल्या भारतीय तत्वज्ञान या पुस्तकाने आधुनिक जगाला भारतीय विचारांची आणि भारतीय तत्वज्ञानाची नवी ओळख करून दिली.

स्वातंत्र्योत्तर 1949 ते 1952 या कालावधीत ते सोव्हिएत रशियात भारताचे राजदूत म्हणून गेले. 1952 साली त्यांनी देशाच्या उपराष्ट्रपती पदाची सूत्रे हाती घेतली. तर 1962 साली ते देशाच्या राष्ट्रपती या सर्वोच्चपदी निवडून गेले. हे सर्व करत असताना भारतीय संस्कृती आणि भारतीय तत्वज्ञान यांवरील त्यांचे प्रेम वाढतच राहिले.

माणसाकडे जिज्ञासा, चिकित्सा पाहिजे. यातून नीतिमत्ता आणि श्रद्धेच्या कल्पना जन्माला येतात आणि प्राचीनता आणि नवता यांचा सुरेल संगम होऊन निर्माण होणारा माणूस तयार करण्यासाठी शिक्षण हवे.

डॉ. राधाकृष्णन शिक्षकही होते आणि तत्वज्ञही. यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देशभरात शिक्षकदिन साजरा होतो. त्यांच्या ऋषितुल्य, तपस्वी व्यक्तिमत्त्वामुळे शिक्षक हे पद भूषणावह ठरते.

स्वामी विवेकानंद म्हणतात की, जा साऱ्या जगाला मंगलमय स्वरात सांगा की, पुण्यमय, प्राचीन भारतभू पुन्हा एकदा जागी होत आहे. याच त्या मंगलमय स्वरांचे प्रतिनिधी डॉ. राधाकृष्णन आहेत असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये.

त्यांना विनम्र अभिवादन..!

- Advertisment -

ताज्या बातम्या