Friday, April 26, 2024
Homeब्लॉगBlog : शिक्षणदिन विशेष : पालकच बनले शिक्षक!

Blog : शिक्षणदिन विशेष : पालकच बनले शिक्षक!

नाशिक | नागोराव येवतीकर

‘करोना’चा प्रादुर्भाव वाढल्याने सर्वच क्षेत्रात बरेच मोठे बदल पाहावयास मिळाले. शैक्षणिक क्षेत्र त्याला अपवाद कसे असणार? मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भारतात संचारबंदी लागू झाली. ‘संचारबंदी’ वा ‘लॉकडाऊन’ ही काय गोष्ट आहे याची शाळकरी मुलांना माहिती नव्हती….

- Advertisement -

शाळकरी मुलेच काय; अनेक लोकांनादेखील त्याबद्दल माहिती नव्हती, पण ‘करोना’ने ‘लॉकडाऊन’ शब्दासोबत कॉरंटाईन, पॉजिटिव्ह, निगेटिव्ह, कंटेंटमेंट अशा शब्दांचीही ओळख झाली. अगदी सुरुवातीला हा प्लेगसारखा काहीतरी संसर्गजन्य महामारीचा रोग आहे आणि त्यापासून वाचण्यासाठी घरी राहणे हाच सुरक्षित उपाय आहे याची खात्री पटली होती. म्हणून सुरुवातीच्या काळात सर्वांनी ‘लॉकडाऊन’चे सर्व नियम पाळले.

सरकारला सहकार्य केले. म्हणूनच प्रारंभीच्या काळात ‘करोना’बाधितांची संख्या कमी होती. मात्र पुढे-पुढे ‘करोना’विषयीची लोकांच्या मनातील भीती कमी होऊ लागली असावी. म्हणून सुरुवातीला एका महिन्यात जेवढे ‘करोना’बाधित झाले तेवढे रुग्ण आज एका दिवसात सापडत आहेत. बाधितांच्या संख्येत भारत देश तिसर्‍या क्रमांकावर आला आहे.

हा क्रमांक चिंताजनक स्थिती दर्शवितो. ‘करोना’चा अनेक गोष्टींवर त्याचा परिणाम झाला. उद्योगधंदे बंद झाले. बस आणि रेल्वेसेवा बंद झाल्या. शाळा महाविद्यालयेदेखील बंद झाली. एप्रिल महिन्यात शाळकरी मुलांच्या परीक्षा होणार होत्या. त्या सर्व रद्द झाल्या. परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रविष्ट करण्यात आले.

उन्हाळी सुट्टीदेखील संपली. जून महिना सुरू झाल्यावर शाळेला सुरुवात होईल असे वाटले, पण सरकार कोणताही धोका पत्करायला तयार नव्हते आणि पालक मुलांना शाळेत पाठवायला राजी नव्हते. असे करता-करता ऑगस्ट महिनादेखील संपला, पण शाळा सुरू होण्याची काही चिन्हे दिसत नाहीत.

गुरुविना शिक्षण आजपर्यंत कोणी विचारात घेतले नव्हते, पण ‘करोना’ने गुरुविना शिक्षण घेण्यास सर्वाना मजबूर केले. या काळात पालक हेच विद्यार्थ्यांचे खरे गुरू बनले. शाळेत जाता येत नाही तर घरात बसून अभ्यास करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली. त्यावेळी पालकांना त्यांचे शिक्षक बनणे गरजेचे झाले. शिक्षक मुलांना शाळेत कसे सांभाळतात? याची प्रचिती पालकांना नक्कीच आली असेल.

शिक्षित, अशिक्षित, जागरूक असलेल्या किंवा नसलेल्या अशा सर्वच पालकांना ‘करोना’ काळात आपल्या मुलांसाठी थोडा वेळ द्यावाच लागत आहे. अनेक घरांतून मुलांविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारीचे सूर ऐकायला मिळत आहेत. काही ठिकाणी पालक मुलांकडून चांगले काम करवून घेत आहेत. शिक्षक मंडळी नेहमी म्हणत की, शाळेतील वातावरण आनंदी, प्रसन्न आणि खेळीमेळीचे ठेवण्यासाठी शिक्षक प्रेमळ असणे आवश्यक आहे. हेच तत्व आज घरासाठी लागू पडत आहे.

घरातील वातावरण हसत-खेळत ठेवण्यासाठी पालक प्रेमळ असणे आवश्यक आहे; तरच मुले आनंदात राहू शकतात. अन्यथा त्यांचे मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून मुलांच्या भावना लक्षात घेऊन त्यांच्याशी प्रेमळपणाने वर्तन ठेवून त्यांच्याकडून अभ्यासाचे काम करवून घ्यावे लागते.

त्यांच्या शरिराला चांगली सवय लावणे आवश्यक आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपी जाईपर्यंत त्यांचे स्वतःचे एक वेळापत्रक तयार करणे आवश्यक आहे. शाळेचे एक वेळापत्रक असते. त्यानुसार घरातील शाळेचे वेळापत्रक तयार करून आई-बाबांनी मुख्याध्यापक व शिक्षकांच्या भूमिकेतून त्याची अंमलबजावणी केली तर निश्चितच फायदा होऊ शकतो. सकाळची वेळ वाचनासाठी उत्तम असते.

म्हणून दोन तास मुलांना वाचन करण्यास प्रवृत्त करावे. त्यातदेखील रोजचा विषय ठरवून दिल्यास सर्व विषयांना न्याय देता येईल. सकाळी दहा ते एक हा वेळ ‘ऑनलाईन’ अभ्यासासाठी राखीव ठेवावा. ‘ऑनलाईन’ हे एक मृगजळ आहे. त्याऐवजी मुलांना स्वयंअध्ययनाची प्रेरणा दिली तर ते लाभदायक ठरेल. कारण मोबाईलचा वापर कमी करणे मुलांच्या दृष्टीने हितकारक आहे. एक ते चार या वेळात मुलांना त्यांच्या आवडीचे काम करण्याची मुभा द्यावी. जसे टीव्ही पाहणे किंवा अन्य काही खेळ खेळणे! सायंकाळी चार ते सहा ही वेळ लेखनक्रियेसाठी द्यावी. सायंकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत काही मैदानी खेळ घराच्या परिसरात खेळण्यास द्यावेत. रात्री दहाला झोपी जावे.

असे वेळापत्रक पालकांनी आपल्या मुलांना तयार करून दिल्यास मुलांचा नित्यनेमाने अभ्यास होऊ शकतो. पालकांनी मुलांना नुसते ‘अभ्यास कर’ असे म्हणून चालणार नाही; तर प्रत्येक पालकांनी या काळात त्यांचे शिक्षक बनणे आवश्यक आहे. आपल्या मुलांना शिकण्यात काही अडचणी येत असतील आणि ती अडचण आपण सोडवू शकत नसाल तर त्यांच्या शिक्षकांना किंवा आपल्या ओळखीच्या जाणकार व्यक्तीला त्याबाबत चर्चा करावी. मुलांच्या अभ्यासातील अडचण दूर करणे हे प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे.

‘मुलांकडे लक्ष द्यायला माझ्याकडे वेळ नाही’ असे एखादे पालक म्हणत असतील तर त्यांच्या मुलांना या काळात शिकण्यासारखे काहीच मिळणार नाही. प्रत्येक पालकाने ही बाब लक्षात ठेवणे आवश्यक आहे. म्हणून सध्या विद्यार्थ्यांचे खरे शिक्षक पालकच आहेत. ‘करोना’ काळात शिक्षक झालेल्या पालकांना ‘शिक्षकदिना’च्या हार्दिक शुभेच्छा!

लेखक हे कन्या शाळा धर्माबाद, जि. नांदेड येथे शिक्षक आहेत

- Advertisment -

ताज्या बातम्या