Thursday, April 25, 2024
Homeब्लॉगBlog : स्वामी विवेकानंद : युवकांची प्रेरणाज्योत

Blog : स्वामी विवेकानंद : युवकांची प्रेरणाज्योत

स्वामी विवेकानंदांच्या मते जीवन म्हणजे गतिमानता! जो आयुष्यात थांबला त्याची प्रगती थांबली! 200 वर्षांपूर्वी यासारखे मूलमंत्र त्यांनी दिले. ते आजही प्रेरक आणि उपयुक्त आहेत. आज स्वामींची जयंती! त्यानिमित्त त्यांच्या विचारांचे स्मरण करूया!…

आज दि.12 जानेवारी, स्वामी विवेकानंद यांची जयंती! हा दिवस ‘राष्ट्रीय युवादिन’ म्हणून साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद हे अतिशय कुशाग्र बुद्धीचे आणि प्रतिभावंत व्यक्तिमत्व होते. देशाचे भविष्य उज्ज्वल करायचे असेल तर ते करणे युवकांच्या हाती आहे. युवकांना आधी आत्मनिर्भर, दृढनिश्चयी, जबाबदार आणि चारित्र्यसंपन्न बनवले पाहिजे, हे ते जाणून होते.

- Advertisement -

विवेकानंदांनी ३९ वर्षांच्या आयुष्यात आपल्या अलौकिक प्रतिभेची ओळख जगाला करून दिली. अवघ्या काही वर्षाच्या कालावधीत ते थोर तत्वज्ञ, धर्मनिरपेक्षतावादी, अध्यात्मिक गुरु, समाजसुधारक आणि उत्तम विद्यार्थी म्हणून जगासमोर आले. विशेषता: युवकांना सक्षम बनवण्यासाठी त्यांनी यशाचे, कर्माचे, धर्माचे आणि एकात्मतेचे अनेक मूलमंत्र दिले.

मोठे कार्य साध्य करायचे असेल तर दृढनिश्चय, असीम धैर्य आणि पराकोटीचे प्रयत्नांशिवाय पर्याय नाही. उठा! जागे व्हा!आणि धैर्य प्राप्त होईपर्यंत कुठे थांबू नका! यासारखी शिकवण देऊन त्यांनी युवकांना कार्यप्रवृत्त केले.

विवेकानंदांच्या मते जीवन म्हणजे गतिमानता! जो आयुष्यात थांबला त्याची प्रगती थांबली! 200 वर्षांपूर्वी यासारखे मूलमंत्र त्यांनी दिले. ते आजही प्रेरक आणि उपयुक्त आहेत. आजचा युवक दिशाहीन होताना दिसतो. त्याला सफलता प्राप्त करायची असेल व ध्येय गाठायचे असेल तर या मंत्राचा नक्कीच अवलंब करावा. त्यांनी एकाग्रतेचे महत्त्व पटवून दिले. एकाग्रतेच्या सामर्थ्याने धेय्यपूर्ती साध्य करता येते, याचे अनेक दाखले दिले.

विवेकानंदांचा एक प्रसंग नमूद करावासा वाटतो. विद्यार्थीदशेत असतानाही ते किती एकाग्र व प्रतिभावंत होते याची त्यातून प्रचिती येते. एकदा परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत १२० प्रश्न दिले गेले होते. त्यापैकी कोणतेही शंभर सोडवा, असे अपेक्षित होते. विवेकानंदांनी १२० पैकी १२० प्रश्न सोडवले व कोणतीही १०० उत्तरे तपासा, असे लिहून दिले.

यावरून ते किती आत्मविश्वासू आणि अभ्यासू होते ते लक्षात येते. शिक्षणाविषयी विवेकानंदांचे विचार उत्कृष्ट होते. त्यांच्या मते शिक्षण म्हणजे व्यक्तीमधील पूर्णत्वाचा अविष्कार! व्यक्तीतील सुप्त गुणांचा आविष्कार म्हणजे शिक्षण! शिक्षणाचा उद्देश म्हणजे मानवाचा विकास! माणसातले माणूसपण जपणे! आजच्या काळात ते अत्यंत गरजेचे आहे.

आजकाल माणूस इतका स्वार्थी झाला आहे की, त्याच्यातले माणूसपण कुठेतरी नाहीसे झाले आहे. माणसातले माणूसपण जपण्याचे सामर्थ्य केवळ शिक्षणातच आहे. चारित्र्याचा विकास आणि विश्वबंधुत्व जोपासणेदेखील शिक्षणाचे ध्येय आजच्या परिस्थितीत साधणे गरजेचे आहे.
शिक्षण म्हणजे केवळ माहिती मिळवणे नव्हे तर विचारांची शुद्धता आणि आत्म्याचे पावित्र्य जपणे होय. कार्याला समर्पित करून आत्मविश्वासाने पुढे जाणे होय.

शिक्षणाने व्यक्तींची संकुचित वृत्ती दूर होऊन त्याने जगाच्या कल्याणाचा विचार केला पाहिजे. देशांदेशांतील नागरिकांबद्दल आपलेपणाची भावना वाढायला हवी. सर्वात महत्वाचे म्हणजे स्वप्रकटीकरण, स्वजाणीव, स्वतःच्या उणीवा यांची ओळख होणे. ही सर्व ध्येये साध्य करणे म्हणजे खऱ्या अर्थाने शिक्षण घेणे होय.

आजच्या युवकांनी शिक्षण घेताना केवळ पदवी व माहिती प्राप्त न करता, त्याच्या गुणांचा आविष्कार, त्यांच्या चारित्र्याचे संवर्धन, विश्वबंधुत्वाची जाणीव आणि स्वतःच्या बलस्थानाची ओळख करून घेतली तर खऱ्या अर्थाने आजच्या युवकांना विवेकानंद ज्ञात झाले, असे म्हणता येईल. त्या पलीकडे जाऊन केवळ त्यांना ज्ञात करून चालणार नाही तर विवेकानंदांना आचरणात आणावे लागेल.

मग या देशाचा प्रत्येक युवक हा एकाग्र आत्मनिर्भर, आत्मविश्वासू व प्रतिभासंपन्न व्हायला वेळ लागणार नाही. आजच्या मूल्यविरहीत व विखुरलेल्या समाजाला आणि राष्ट्राला एक नव्हे तर हजारो-लाखो विवेकानदांंची गरज आहे.

त्यांच्या तत्त्वज्ञानाची मूल्यांची व प्रतिभेची गरज आहे. ही पूर्तता केवळ आजचा युवक करू शकतो. म्हणूनच सर्व युवकांना आवाहन आहे की, उठा! जागे व्हा! आणि ध्येय प्राप्तीत सफलता प्राप्त होईपर्यंत थांबू नका. कारण तुमच्या यशावरच देशाचे उज्ज्वल भविष्य अवलंबून आहे.

– प्रा. आशा भिमराव ठोके-पाटील, उपप्राचार्या, अशोका शिक्षणशास्त्र महाविद्यालय, नाशिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या