Friday, April 26, 2024
Homeब्लॉगरविवार विशेष : करोना छायेतील पर्यटन

रविवार विशेष : करोना छायेतील पर्यटन

साधारणत: उन्हाळा, दिवाळी व नाताळच्या सुट्यांमध्ये लोक पर्यटनासाठी (Tourism) निघतात. मात्र टाळेबंदी (Lockdown) आणि करोनाविषयक (Covid-19) निर्बंधांमुळे लोकांना गेल्या दीड-एक वर्षात पर्यटनासाठी बाहेर पडता आले नाही. रेल्वे (Railway), विमानसेवा (Airlines), रस्ते वाहतूक (Road transport) तेव्हा बरीच नियंत्रित झाली होती. म्हणून लोकांचाही नाईलाज होता. दुसरी लाट (Covid-19 Second Wave) ओसरल्याचा मोका साधून लोक आता निर्भीडपणे पर्यटनासाठी घराबाहेर पडत आहेत. दरवर्षी 27 सप्टेंबरला ‘जागतिक पर्यटनदिन’ (World Tourism Day) साजरा केला जातो. तथापि निर्बंध-नियम धाब्यावर बसवून आणि जीव धोक्यात घालून लोक पर्यटनस्थळी दर आठवड्याला पर्यटनदिन साजरा करीत असतील का?…

केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार।

- Advertisement -

शास्त्र ग्रंथ विलोकन करता, मनुजा चातुर्य येतसे फार॥

प्राचीन मराठी कवी मोरोपंत यांनी देशाटनाचे, म्हणजे पर्यटनाचे महत्त्व आपल्या या काव्यपंक्तीतून नेमकेपणे सांगितले आहे. पर्यटन करणे उपयुक्तच आहे. पर्यटनातून अपरिचित ठिकाणांची ओळख होते. परिचित ठिकाणे वा प्रेक्षणीय स्थळांबाबतची माहिती नव्याने समजते.

नेहमीच्या धावपळीतून निर्माण झालेले वा होणारे ताणतणाव कमी व्हायला आणि मरगळ दूर होऊन मन उल्हसित व्हायला मदत होते. कुटुंबातील सदस्य किंवा मित्रमंडळींसोबत काही क्षण निवांत घालवता येतात. मोकळेपणे फिरता येते. पर्यटनातून मिळालेला उत्साह घेऊन नित्याच्या कामकाजाला लागल्यावर कामाचा ताण हलका होतो.

म्हणून नोकरी, कामधंदा अथवा व्यावसायिक जबाबदार्‍या पेलताना पर्यटनासाठी काही वेळ काढायला हवा. प्रवासाची संधी मिळेल तेव्हा प्रत्येकाने पर्यटनाचा आनंद जरूर घ्यावा यादृष्टीने देशोदेशीची सरकारेसुद्धा आपापल्या नागरिकांना उद्युक्त करीत असतात. तथापि सध्याची परिस्थिती पर्यटनाला अनुकूल नाही. कारण जगाला वेठीस धरणार्‍या करोना महामारीचा प्रभाव अजून कायम आहे.

एरव्ही पर्यटनाचे आणि पर्यटकांचे स्वागतच केले जाते, पण परिस्थिती सर्वसाधारण असेल तर! सध्याचा करोनाकाळ पर्यटनाला अजिबात अनुकूल नाही. राज्य सरकारने (Maharashtra State Government) दैनंदिन गरजांच्या पूर्तीसाठी काही सवलती जरूर दिल्या आहेत. निर्बंधांत शिथीलता आणली आहे. याचा अर्थ निर्बंधांचे उल्लंघन करून मनमानी करणे असा होत नाही.

मात्र गेले वर्ष-दीड वर्ष करोना नियंत्रणासाठी लादलेली टाळेबंदी, घातलेले निर्बंध यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळीच माणसे घरात बंदिस्त राहून उबगली आहेत. दुसरी लाट ओसरू लागताच राज्य सरकारने निर्बंध शिथील केले आहेत. मात्र पर्यटन अजून खुले केलेले नाही. पर्यटनस्थळी गर्दी करायला तूर्तास मनाई आहे.

तरीही अतिउत्साही लोक शनिवार-रविवारच्या संचारबंदीला न जुमानता नियम-कायदे धाब्यावर बसवून पर्यटनस्थळी गर्दी करू लागले आहेत. नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागातील पर्यटनस्थळी पर्यटकांना मज्जाव करण्यात आला आहे. तरीही नाऊमेद न होता पर्यटकांच्या झुंडी आणि जत्थे जवळपासचे धबधबे, गड-किल्ले, नदीकाठ, धरणे आदी ठिकाणी पावसाळी पर्यटनासाठी धाव घेत आहेत.

पर्यटन ठिकाणांवर लोकांनी जाऊ नये म्हणून जाण्याच्या मार्गांवर पोलिसांनी नाकाबंदीचा प्रयत्न करीत आहेत. मात्र पोलिसांची नजर चुकवून पर्यटनाची मजा लुटणार्‍यांना कोणताही खेद वा खंत का वाटत नसेल?

नियमांची चाकोरी बंदिस्त पिंजर्‍यासारखी असावी की त्यातही मनुष्य स्वभावाला अनुरुप अशा काही पायवाटा उपलब्ध असाव्यात? महाराष्ट्रात शनिवार-रविवारची सुटी सार्थकी लावण्यासाठी करोनाचे भय झुगारून पर्यटनाला पसंती देणार्‍या हौशा-नवशांची संख्या वाढली आहे.

पर्यटनबंदीची उपेक्षा करून लोक स्वत:ला, कुटुंबातील सदस्यांना आणि आजूबाजूच्या लोकांना करोना संकटात ढकलत आहेत. त्याची त्यांना अजिबात जाणीव नसेल का? सर्व बंधने झुगारण्याकडे माणूस का प्रवृत्त होतो? गेल्या दीड वर्षाच्या बंधनांच्या जंजाळाचे माणसावर झालेले परिणाम किती काळ दुर्लक्षित ठेवणार? केवळ नियम, कायदे आणि किंवा दंडात्मक कारवाया हेच याचे उत्तर ठरते का? ज्या गोष्टींवर निर्बंध अथवा बंदी घातली जाते त्या गोष्टी करून बघण्याची प्रवृत्ती होणे हा मनुष्य स्वभाव आहे.

नियम-कायद्यांतून पळवाटा शोधून आपापला आनंद शोधण्याची संधी माणसे घेणारच! अतिउत्साही पर्यटकांना कसलीही भीती वाटत नसावी, अशाही घटना काही पर्यटनस्थळांवर घडतात. करोना अजून संपुष्टात आलेला नाही याचेही भान बाळगले जात नसावे. गारवा अनुभवण्यासाठी अनेक लोक हिमाचल प्रदेशातील कुलू-मनाली, धर्मशालासारख्या उंच ठिकाणांकडे धाव घेत आहेत.

पर्यटकांच्या झुंडी आणि गर्दीची छायाचित्रे आणि चित्रफिती प्रसिद्ध झाल्यावर स्थानिक अधिकारी आणि नागरिकांना चिंतेने धडकी भरली आहे. काही ठिकाणी सरकारकडूनदेखील काही वेगळे निर्णय सहेतूकपणे घेतले जात असावेत का? कावड यात्रेवर उत्तराखंड सरकारने बंदी घातली आहे तर उत्तर प्रदेशात परवानगी दिली गेली आहे. उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात एकाच पक्षाची सरकारे असूनसुद्धा परस्परविरोधी धोरण सरकारे कशी अवलंबतात?

काळजी वाटणारे चित्र महाराष्ट्र अथवा हिमाचल प्रदेशापुरते मर्यादित नाही. कमी-अधिक प्रमाणात देशात सर्वत्र त्याचा प्रत्यय येत आहे. लोक बेसावध, बेफिकीर आहेत आणि त्या-त्या ठिकाणची सरकारेदेखील करोनाछायेतील पर्यटनाबाबत फारशी कठोर दिसत नाहीत.

तथापि सरकारने बाजारपेठा खुल्या केल्या आहेत. दैनंदिन व्यवहार सुरळीत झाले आहेत. लोक प्रवास करीत आहेत. नियमांच्या चौकटीत विविध समारंभ होत आहेत. बाजारांत तुडुंब गर्दी उसळत आहे. रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागत आहेत. बँका, पोष्ट कार्यालयांत ग्राहकांची गर्दी होत आहे.

राजकीय नेत्यांचे दौरे, लग्नसोहळे, बस आणि रेल्वे स्थानके आदी ठिकाणी होणार्‍या गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पोलिसांना कोण पार पाडू देत नसावे; हाही संशोधनाचा विषय आहे. अशा गर्दीमुळे करोना पसरणार नाही का? त्यामुळे संसर्गाचा धोका वाढत नाही का? मग पर्यटनावरच बंदी का? असा सवालसुद्धा नियमांना तिलांजली देऊन पर्यटनाचा आनंद घेऊ पाहणारे विचारूही शकतील.

सोमवार ते शुक्रवार व्यवहार खुले ठेऊन शनिवार-रविवारी मात्र बंद ठेवले जातात. म्हणजे फक्त शनिवार-रविवारीच करोना जोर करतो का? इतर दिवशी तो निद्रिस्त असतो का? असाही प्रश्न लोकांना पडला असेल.

दुसरी लाट अजून पुरेशी ओसरलेली नाही. तिसरी लाट येण्याचा अंदाज तज्ञांनी बांधला आहे. मात्र वेगवेगळ्या तज्ञांचे जाहीर होणारे वेगवेगळे अंदाज सामान्यजनांची दिशाभूल करण्यास कारण ठरत नसतील का? करोनाविषयक नियमांना न जुमानता पर्यटनाचा आनंद लुटणार्‍यांबद्दल पंतप्रधानांनीसुद्धा नाराजी प्रकट केली आहे.

मात्र परवाच वाराणसीत येत्या निवडणुकीचे शिंग फुंकणार्‍या प्रचंड सभेचा त्यांच्याच सल्ल्याला अपवाद का केला जातो हाही प्रश्न जनतेला पडल्याशिवाय कसा राहील? कर्नाटकचा अपवाद वगळता महाराष्ट्रासह विरोधकांची सत्ता असलेल्या 6 राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधानांनी संवाद साधला. परिस्थितीचा आढावा घेऊन राज्यांना सावध केले. केंद्रीय आरोग्य खात्याचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी करोनाबाबत लोकांच्या बेफिकिरीबद्दल केलेले भाष्य बोलके आहे.

हवामानाचा अंदाज पाहून लोक पर्यटनाचे बेत आखतात. पाऊस सुरू होण्याआधी फिरून येऊ, नंतर पाऊस बाहेर पडू देणार नाही, असा विचार केला जातो. करोनाबाबतही लोक हाच विचार करीत असावेत. दोन वर्षे घरात बसलो. आता तिसरी लाट येण्याआधी फिरू येऊ, असे म्हणून लोक पर्यटनस्थळांवर गर्दी करीत आहेत.

तिसर्‍या लाटेचा इशारा गांभीर्याने घेत नाहीत. परिणामी तिसर्‍या लाटेला पोषक वातावरण निर्मिती होऊ पाहत आहे. तो धोका टाळण्यासाठी लोकांनी मुखपट्टी वापराची सवय करून घेतली पाहिजे, असेही अगरवाल यांनी बजावले आहे. अगरवाल यांचे हे परखड निरीक्षण सर्वांचे डोळे उघडणारे आणि सावध करणारे आहे, पण ते गांभीर्याने कोणी घेईल का? पण हे सगळे नियम काही विशिष्टांच्या बाबतीत का लागू होत नसावेत?

साधारणत: उन्हाळा, दिवाळी व नाताळच्या सुट्यांमध्ये लोक पर्यटनासाठी निघतात. मात्र टाळेबंदी आणि करोनाविषयक निर्बंधांमुळे लोकांना गेल्या दीड-एक वर्षात पर्यटनासाठी बाहेर पडता आले नाही. रेल्वे, विमानसेवा, रस्ते वाहतूक तेव्हा बरीच नियंत्रित झाली होती. म्हणून लोकांचाही नाईलाज होता.

दुसरी लाट ओसरल्याचा मोका साधून लोक आता निर्भीडपणे पर्यटनासाठी घराबाहेर पडत आहेत. दरवर्षी 27 सप्टेंबरला ‘जागतिक पर्यटनदिन’ साजरा केला जातो. तथापि निर्बंध-नियम धाब्यावर बसवून आणि जीव धोक्यात घालून लोक पर्यटनस्थळी दर आठवड्याला पर्यटनदिन साजरा करीत असतील का?

टाळेबंदी करणार्‍या अनेक राज्यांनी आता निर्बंध हटवून ‘नवे सामान्य’ (न्यू नॉर्मल) जनजीवन सुरू करायला प्रारंभ केला आहे. महाराष्ट्र सरकारने मात्र निर्बंध न उठवता शिथील करून सावध भूमिका घेतली आहे. करोनाची तिसरी लाट जगातील अनेक देशांत आल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) केला आहे.

पंतप्रधान तसेच मुख्यमंत्र्यांनीदेखील लोकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. करोनाचे दुसरे शिखर उतरून जगाची तिसर्‍या शिखराच्या दिशेने वाटचाल सुरू झाली, असे आता म्हणावे लागणार का? सरकार पूर्ण तिसर्‍या लाट थोपवण्याबाबत पूर्ण तयारीत असल्याचेही अधिकारवाणीने सांगितलेही जात आहे. तथापि व्यवस्थेतील कमतरतेचे खापर राज्य सरकारांवर फोडण्याची दक्षताही केंद्र सरकार (Central Government) सावधपणे घेत असते.

प्राप्त परिस्थिती पाहता आणि विविध इशार्‍यांचा विचार करता पर्यटनाच्या मानसिकतेला तथाकथित पर्यटक मुरड घालतील का ते ठरवणे अवघड आहे. सोयीनुसार परस्परविरोधी सल्ले देण्याची खबरदारी सर्व संबंधित घेत आहेत. त्यातून होणारा जनतेचा भ्रमनिराससुद्धा त्या बदलत्या प्रवृत्तीचे कारण असू शकेल का? केंद्र सरकारच्या या धोरणात उत्तर प्रदेश सरकारकडून निघणारे सरकारी धोरणाचे धिंडवडेसुद्धा ‘अभूतपूर्व’ म्हणून गौरवले जातात हाही अभूतपूर्व चमत्कारच नव्हे का?

- Advertisment -

ताज्या बातम्या