रविवार शब्दगंध : पुढची संधी कोणाला?

- एन. व्ही. निकाळे
रविवार शब्दगंध : पुढची संधी कोणाला?

लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections)येईपर्यंत देशाच्या राजकारणात काय उलथापालथ होईल? लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना मतदारांचा (Voters)कल नेमका कसा असेल? देशाची सूत्रे कोणत्या पक्षांच्या अथवा नेत्यांच्या हाती मतदार देऊ इच्छितात? देशाचे नवे पंतप्रधान (Prime Minister)म्हणून कोणत्या नेत्याला पाहायला मतदारांना आवडेल ते आज सांगणे अवघड आहे. तरीसुद्धा पंतप्रधानपदासाठी आतापासूनच वेगवेगळ्या नावांची चर्चा वेगाने सुरू झाली आहे. काही नेते स्वत:च पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहू लागले आहेत.

2024 च्या लोकसभा निवडणुकीला वर्षभराचा अवधी आहे. सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांच्या दृष्टीने ही निवडणूक अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे. लोकशाहीवर नितांत श्रद्धा आणि विश्‍वास बाळगणार्‍या देशवासियांनी भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) सलग दोन निवडणुकांत देशाच्या नेतृत्वाची संधी दिली. त्याआधी काँग्रेस नेतृत्वातील संयुक्त पुरोगामी आघाडीवरसुद्धा (यूपीए) मतदारांनी विश्‍वास दाखवून 10 वर्षे देशाची सत्ता त्यांच्याकडे सोपवली होती. भारतीय मतदारांनी आलटून-पालटून दोन्ही आघाड्यांना कौल देऊन न्यायाचे पारडे समतोल राखले आहे. मतदारांची ही न्यायशीलता दखल घेण्यासारखी आणि उल्लेखनीयही आहे. आश्‍वासनांच्या जुमलेबाजीत मतदारांना सहज गुंडाळता येईल, असे मानणार्‍या राजकीय पक्षांनी याची नोंद जरूर घेतली पाहिजे.

लोकसभा निवडणुकीआधी चालू वर्षात जवळपास 10 राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. त्यापैकी काही राज्यांत भाजप व मित्रपक्षांची तर काही राज्यांत काँग्रेससह इतर विरोधी पक्षांची सत्ता आहे. लोकसभा निवडणुकीची 'उपांत्य फेरी' म्हणूनही या निवडणुकांकडे पाहता येईल. गेल्या 9 वर्षांत भाजप नेतृत्वातील रालोआने मतदारांना किती खूश ठेवले? दिलेल्या आश्‍वासनांपैकी किती आश्‍वासनांची पूर्तता झाली? कर्तव्य आणि जबाबदार्‍यांपासून सरकारने विचलित होऊ नये अथवा जनहितापासून ढळू नये म्हणून विरोधी पक्षांनी किती सजगता बाळगली? सरकारच्या कारभारावर किती लक्ष ठेवले? जनतेच्या ज्वलंत प्रश्‍नांवर किती आवाज उठवला? या सगळ्या गोष्टींचा हिशोब मतदारांकडे तयार असेल.

लोकसभा निवडणूक येईपर्यंत देशाच्या राजकारणात काय उलथापालथ होईल? लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना मतदारांचा कल नेमका (मूड) कसा असेल? देशाची सूत्रे कोणत्या पक्षाच्या, पक्षांच्या अथवा नेत्यांच्या हाती मतदार देऊ इच्छितात? देशाचे नवे पंतप्रधान म्हणून कोणत्या नेत्याला पाहायला मतदारांना आवडेल ते आज सांगणे अवघड आहे. तरीसुद्धा पंतप्रधानपदासाठी आतापासूनच वेगवेगळ्या नावांची चर्चा वेगाने सुरू झाली आहे. काही नेते स्वत:च पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहू लागले आहेत.

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेला राज्या-राज्यांतील लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे माध्यमांतील सचित्र बातम्यांमधून स्पष्ट होत आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांबरोबरच समाजाच्या विविध थरांतून अबालवृद्ध, स्त्री-पुरुष, कलावंत, विचारवंत, निवृत्त अधिकारी या यात्रेत स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहेत. जनसामान्यांमध्ये जाऊन राहुल त्यांच्याशी संवाद साधत आहेत. त्यांचे प्रश्‍न, त्यांच्या वेदना जाणून घेत आहेत. ‘भारत जोडो’ यात्रेचा आता शेवटचा टप्पा सुरू आहे.

लोकसभा निवडणूक जवळ येत असताना विरोधी पक्षांच्या एकजुटीच्या प्रयत्नांना वेग देण्याची गरजही व्यक्त केली जात आहे. त्यासाठी काँग्रेसनेच पुढाकार घ्यावा, असेही काहींकडून सुचवले जात आहे. ‘भारत जोडो’ यात्रेच्या समारोपानिमित्त सर्व विरोधकांना काश्मीरमध्ये एका व्यासपीठावर एकत्र आणण्याचा निर्धार काँग्रेसने कदाचित त्यामुळेच केलेला असावा. येत्या 30 जानेवारीला श्रीनगरमध्ये होणार्‍या समारंभास देशातील समविचारी 21 विरोधी पक्षांच्या अध्यक्षांना पत्र लिहून निमंत्रित करण्यात आले आहे. विरोधी पक्षांच्या एकजुटीची रंगीत तालीम यानिमित्त घडवून आणण्याचा काँग्रेसचा प्रयत्न दिसतो. भारत जोडो’ यात्रेनिमित्ताने राहुल यांची जिद्द आणि निर्धार पाहून काँग्रेसजनांसोबत सर्वच पक्षांचे लोक थक्क झाले आहेत. राहुल यांच्या भूमिकेचे समर्थन आणि कौतुक विरोधी पक्षांचे अनेक नेते करीत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि तृणमूल काँग्रेस नेते खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी राहुल यांच्याबाबत नुकतीच सूचक विधाने केली आहेत. ‘

भावी पंतप्रधान’ म्हणून नितीशकुमार यांचे प्रतिमासंवर्धन जदयू नेते करीत आहेत. 2024 ची लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन नितीशकुमार यांनी भाजपशी फारकत घेऊन राजदशी हात मिळवणी केली, असे बोलले जाते. तरीही आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे नितीशकुमार पुनःपुन्हा सांगत आहेत. राहुल गांधी केवळ विरोधी पक्षांचा चेहरा असतील असे नव्हे तर ते पंतप्रधानपदाचे उमेदवारसुद्धा असतील, असे विधान मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते कमलनाथ यांनी नुकतेच केले. त्यावर नितीशकुमार यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे.

राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील तर आम्हाला काही अडचण नाही, मी स्वत: पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, असे सांगून राहुल यांच्या पंतप्रधानपदाच्या दावेदारीला त्यांनी अप्रत्यक्षपणे पाठबळच दिल्याचे जाणवते. भाजपपुढे सक्षम पर्याय उभा करण्याकरता विरोधी पक्षांची एकजूट करण्याच्या निर्धाराने तृणमूल काँग्रेस नेत्या व पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गेल्या वर्षी जोरदार प्रयत्न सुरू केले होते. दिल्लीच्या अनेक वार्‍याही त्यांनी केल्या. विरोधी पक्षांतील काही नेत्यांच्या भेटीही घेतल्या. काँग्रेसशी मतभेद असूनही ममता यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल यांची भेट घेतली होती. पश्‍चिम बंगालमध्ये भाजपचे पानिपत करून पुन्हा सत्तारूढ झाल्यापासून ममता यांना राष्ट्रीय राजकारणाचे वेध लागल्याचे बोलले जाते. पंतप्रधान होण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली नसली तरी त्यांच्या भाजपविरोधी आक्रमक भूमिकेतून ते लक्षात येते. मध्यंतरी शत्रुघ्न सिन्हा यांना तृणमूल काँग्रेसने राज्यसभेवर पाठवले. त्याच सिन्हा यांनी राहुल यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचे मुक्तकंठाने केलेले कौतुक चकित करणारे आहे.

विरोधी पक्षांच्या छावणीत राहुल गांधी पंतप्रधानपदासाठी आघाडीवर आहेत, लाखो लोक त्यांच्या समर्थनार्थ पुढे येत आहेत, आपल्या नेतृत्वाची गुणवत्ता त्यांनी सिद्ध केली आहे, लोकांनी त्यांना आपला नेता मानले आहे, अशी स्तुतीसुमने सिन्हा यांनी उधळली आहेत. सिन्हा यांच्या या विधानांनी अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांच्या नेत्यांनी ‘भारत जोडो’ यात्रेचे राज्यात आपुलकीने स्वागत केले. यात्रेतही ते सहभागी झाले. साहजिक महाराष्ट्रातूनसुद्धा राहुल यांच्या नेतृत्वाबाबत अनुकूल स्थिती जाणवते. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचाही आधी विरोधी पक्षांच्या आघाडीचे व नंतर देशाचे नेतृत्व करण्याचा मनसुबा आहे. आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही पंतप्रधान होण्याची इच्छा लपून राहिलेली नाही. भाजपचे ते कट्टर विरोधक असले तरीसुद्धा विरोधी पक्षांसोबत न जाता भाजपशी थेट मुकाबला करण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारला आहे.

विरोधी पक्षांच्या गोटातून अशी सगळी लगबग सुरू असताना भाजपही सावध झाला आहे. 2014 ला देशात 'मोदी लाट' आल्याचे बोलले गेले होते. 2019 मध्ये विरोधी पक्षांतील बेदिलीचा लाभ मिळून मोदींच्या चेहर्‍यावर भाजपची पुन्हा सरशी झाली होती. गुजरातमधील भाजपचा ताजा ऐतिहासिक विजय पाहता आजही पंतप्रधान मोदी हेच भाजपचे मुख्य बलस्थान आहे. येती लोकसभा निवडणूक त्यांच्याच नेतृत्वात लढून तिसर्‍यांदा देशाची सत्ता मिळवण्याचा भाजपचा विचार आणि प्रयत्न असेल. भाजपला केंद्रसत्तेतून पायउतार करण्यासाठी विरोधी पक्ष सरसावले आहेत, पण त्यांची एकजूट खरेच होईल का? एकजूट होण्यात विरोधी पक्ष अपयशी ठरले तर देशाची सत्ता तिसर्‍यांदा गाजवण्याचा भाजपचा मार्ग सुलभ होऊ शकतो.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com