
हिंसक घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढता आहे. शिक्षण हे अहिंसेच्या आणि विवेकाच्या वाटेने चालण्यासाठी आहे. वर्तमानातील शिक्षण मुलांच्या मनात विचारांची पेरणी करण्यात कमी पडत आहे का? पालकही मार्कांच्या स्पर्धेत माणूसपणाचे संस्कार करण्यात कमी पडत आहेत का? याचा आजच गंभीरपणे विचार केला नाही तर भविष्य अधिक अंधारमय होण्याची शक्यता आहे. याचा विचार आता करायलाच हवा.
संदीप वाक्चौरे, शिक्षणतज्ज्ञ
दिब्रुगड येथील नवोदय विद्यालयातील शिक्षिकेने पाल्याची पालकांकडे गुणवत्तेच्या संदर्भाने तक्रार केली म्हणून 40 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी एकत्रित येत शिक्षकेवर हल्ला केला. वर उल्लेखिलेल्या अशा सर्व हिंसक घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग आहे. कधीकाळी परदेशात शाळेत गोळीबार, शिक्षकावर हल्ला, मुलांना मारहाण अशा घटना घडत होत्या. त्यावेळी आपल्याकडे असे घडणार नाही. आपली संस्कृती, आपले संस्कार असे म्हणत आपण दुर्लक्ष करत होतो. पण आता ती हिंसा आपल्या घरांपर्यंत पोहोचली आहे. शिक्षण हे अहिंसेच्या आणि विवेकाच्या वाटेने चालण्यासाठी आहे. वर्तमानातील शिक्षण मुलांच्या मनात विचारांची पेरणी करण्यात कमी पडत आहे का? पालकही मार्कांच्या स्पर्धेत माणूसपणाचे संस्कार करण्यात कमी पडत आहेत का? याचा आजच गंभीरपणे विचार केला नाही तर भविष्य अधिक अंधारमय होण्याची शक्यता आहे.
शिक्षणातून मूल्यांची पेरणी केली जाते. अभ्यासक्रम विकसित करताना गाभाघटक, जीवनकौशल्य, मूल्य आणि आता 21 व्या शतकासाठी कौशल्यांचा विचार केला जातो. त्यातून सुजाण नागरिक निर्मितीची अपेक्षा आहे. कोणत्याही देशाचा विकासाचा मार्ग शिक्षणाच्या महाद्वारातून जात असतो असे म्हटले जाते. या घटना पाहिल्या म्हणजे आपण नेमके काय पेरतो आहोत, असा प्रश्न पडतो.
वर्तमान पाहिले तर भोवतालामध्ये निश्चितच हिंसा भरलेली आहे. कधीकाळी प्रौढांमध्ये असलेली हिंसा आता शाळापातळीवर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली आहे. हे पाहिल्यावर शिक्षण शांतता पेरते आहे, असे तरी कसे म्हणावे? समाजात निर्माण होणारी इर्षा, जीवघेणी स्पर्धा, हरवलेली संवेदनशीलता हे सारे चिंता करण्यास भाग पाडणारे आहे. रस्त्यावर अपघातात जखमी झालेली व्यक्ती विव्हळत असते आणि भोवतालची गर्दी मदतीला येण्याऐवजी मोबाईल शूटिंगसाठी हात पुढे करत असते. वर्तमानपत्रात रोज येणार्या हिंसेच्या विविध प्रकारच्या बातम्या पाहिल्या की आपण माणसे आहोत याबद्दलच शंका येऊ लागते. सर्वत्र जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. माणसे मारली गेली तरी दुःखाचा आवेग फारसा निर्माण होत नाही. ज्यांनी राष्ट्रबांधणीसाठी पुढे यायचे त्यांनाही राष्ट्रनिर्मितीचा विचार महत्त्वाचा वाटत नाही का? माणसांचे मोल कमी होत आहे. माणसे छोट्या छोट्या कारणांवरून एकमेकांच्या जीवावर उठू लागली आहेत. या सर्व गोष्टी अशांततेचे निदर्शक आहेत. जे शिक्षण शांततेच्या निर्मितीसाठी आहे, मात्र शिकलेली माणसे अधिक अशांत आहेत आणि शिकलेला समाजही अधिक हिंस्त्र बनत असल्याचे चित्र आहे. शिकलेल्या समाजातच अधिक मानसिक रुग्ण आहेत. शिक्षणातच अशांतता असेल तर शांतता कशी पेरली जाणार हा खरा प्रश्न आहे.
जगात शांतता निर्माण व्हावी म्हणून शिक्षणाचा विचार पुढे येतो. शिक्षणातून नेमकेपणाने पेरणीसाठी अभ्यासक्रमाची रचना केलेली असते. त्याअनुषंगाने प्रत्येक विषयातून शांततेचा विचार पेरला जाणे अपेक्षित आहे. शांततेसाठीचे शिक्षण ही तर निरंतर प्रक्रिया आहे. हिंसेपासून दूर जाणे, हिंसा मनात निर्माण होणार नाही यादृष्टीने पेरणी करण्याकरता पाठ्यपुस्तकांत विविध संतांचे विचार, राष्ट्रपुरुषांच्या विचारांची पेरणी केली जाते. अनेकदा विविध धर्मांचा विचार अधोरेखित केला जात असतो. जे का रंजले गांजले..त्यासी म्हणे जो अपुले..तोचि देव ओळखावा..देव तेथिची जाणावा.. यातून भेदभाव संपुष्टात आणताना गरिबांविषयी प्रेम निर्माण करणे, सहानुभूती, करुणा निर्माण करण्यासाठी संतांचे विचार रुजवण्याचा प्रयत्न आहे. साने गुरुजींची ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ ही प्रार्थना म्हणताना आपण काय पेरू पाहतो हे अधोरेखित होते. प्रार्थना पाठ्यपुस्तकात येते, परिपाठात म्हटली जाते. त्यातून प्रेमाचा विचार पुढे जातो. त्यातच शांतता पेरणीचा विचार आहे. प्रेम कधीच हिंसाचारी नसते. त्याचा मार्ग समृद्धतेचा, आनंदाचा, विकासाचा आणि अहिंसेचा असतो. जगातील कोणत्याही धर्मात मानवी उन्नतीचा विचार सामावलेला आहे. शिक्षणातून विचार तर पेरले जातात, पण रुजताना दिसत नाहीत. केवळ वरवरची पेरणी केली तर उगवणे शक्य नाही. त्यासाठी शिक्षणातून मनाची मशागत करावी लागेल. वेळोवेळी उगवणारे अविवेकाचे तण उपटून दूर सारावे लागेल. शेतातील बीज उत्तम उगवण्याकरता आपण खत आणि पाण्याची व्यवस्था करत असतो त्याप्रमाणे येथेही खत आणि पाण्याची व्यवस्था करावी लागेल. ती व्यवस्था शिक्षणातूनच उभी राहते. वर्गात आपण काय पेरणार आहोत ते केवळ सांगून चालणार नाही. वर्गात जे समोर ठेऊ तेच उगवणार आहे. वर्ग, घर, परिसरात हिंसा होणार असेल आणि अहिंसेचा विचार प्रतिपादन केला जाणार असेल तर विचार रुजण्याची शक्यता नाही. अंतःकरणात जे असेल तेच पेरले जाते. शिक्षणातून शांततेचा विचार रुजला तर समाजात शांतता उगवण्याची शक्यता आहे.
देशातील एका सर्वेक्षणानुसार शाळेच्या आवारातच हिंसा पेरली जाते असे म्हटले आहे. 20 टक्क्यांच्या आसपास विद्यार्थ्यांच्या मनात शाळेतून हिंसेचा विचार पेरला जातो, ही बाब समोर आली आहे. शाळेत एखादी चूक विद्यार्थ्याने केली तर ती आरंभी शांततेत समजून घेणे, विचाराच्या प्रक्रियेतून बदलवण्याचा प्रयत्न करण्याची गरज असते. वर्गात जितके लोकशाहीयुक्त वातावरण असेल तितक्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी हिंसेपासून दूर जाणार आहेत. विचारांची प्रक्रिया अहिंसेच्या दिशेने पुढे जाणारी हवी. विचारच आंतरीक बदल घडवतात. माणसांमध्ये जोवर आंतरीक बदल घडत नाही तोपर्यंत परिवर्तनाच्या दिशेन जाण्याची पाऊलवाट निर्माण करता येणार नाही.
आज वरवर माणसे शांत आहेत, पण त्याच माणसांकडून होणारी हिंसाच अधिक अस्वस्थ करून जाते. शाळेच्या वातावरणात जशी हिंसेची बीजे आहेत त्याप्रमाणे घर आणि परिसरातही हिंसेची बीजे आहेत. शालेय स्पर्धांमध्ये प्रत्येक मुलाला वरचा क्रमांक मिळायला हवा, ही मानसिकता निर्माण केली जात आहे. त्या स्पर्धेत निकोपता असेल तर प्रश्न नाही.. पण तुला जास्त मार्क मिळायलाच हवेत, तूच पहिला आला पाहिजे, पुढे असलेल्या विद्यार्थ्यापेक्षा कोणत्याही परिस्थितीत यश मिळवायला हवे हा विचार पेरला जातो. यातून इर्षा पेरली जाणार असेल तर शेवट हिंसेत होणार. या स्पर्धेत प्रेमाचा संदेश असेल तर ठीक आहे पण प्रेमात कधीच स्पर्धा नसते, हे लक्षात घ्यायला हवे. आपण सारे समान आहोत. त्यातून एकमेकाला हात देत एकमेकाची प्रगती साधण्यासाठी पुढे येणे वेगळे आणि एकमेकाला मदत न करता वरचा क्रमांक मिळवण्यासाठी एकट्याने प्रयत्न करत इतरांना दूर सारणे वेगळे. ही निकोपता नाही. घरी दोन भावंडांमधील तीव्र स्पर्धा जीवनात स्पर्धा निर्माण करेल पण प्रेमाचा भाव त्यातून आटेल, हेही लक्षात घ्यायला हवे.
वास्तवतः हिंसा, वादविवाद, ताण, आक्रमकता आढळून येते तेव्हा त्या परिस्थितीत सामोरे जाण्यासाठीचे शहाणपण आणि विवेकशीलता विद्यार्थ्यांमध्ये विकसित करण्याची गरज आहे. मूल्ये, दृष्टिकोन रुजवण्याचे प्रयत्न शिक्षणातून होण्याची गरज आहे. शिक्षणातून हिंसेवर मात करण्याच्या उपायांचा विचार केलेला असतो. अशा परिस्थितीत शिक्षण प्रक्रियेची प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणी झाली तर शांततेसाठीचा प्रवास सुरू होईल.
जग शांततेच्या दिशेने प्रवास करू पाहत आहे आणि त्याचवेळी विविध कारणांनी संघर्षाची बीजे पेरली जाताहेत. एकीकडे शांततेची भाषा आणि दुसरीकडे संघर्षाची, युद्धाची भाषा अशा परिस्थितीत शिक्षणाने योग्य दिशेने प्रवास सुरू ठेवण्याची गरज आहे.