रविवार शब्दगंध : सबकी फतेह, सबको खुशी

- एन. व्ही. निकाळे
रविवार शब्दगंध : सबकी फतेह, सबको खुशी

गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत 156 जागा जिंकून भाजपने आजवरच्या विजयाचे सर्व विक्रम मोडीत काढले. हिमाचल प्रदेशात काँग्रेसला सत्ता मिळाली तर दिल्ली मनपा निवडणुकीत ‘आआपा’ने भाजपची 15 वर्षांची सत्ता खालसा केली. तीन राज्यांतील मतदारांनी भाजप, काँग्रेस आणि ‘आआपा’ला एकेक विजय मिळवून देऊन समान न्याय केला आहे. कोणा एकाला डोक्यावर न घेता सर्वांना समान संधी देऊन खूश केले आहे. यानिमित्ताने पुन्हा भारतीय लोकशाहीचाच विजय झाला आहे...

भाजपची सत्ता असलेल्या गुजरात, हिमाचल प्रदेश आणि दिल्ली मनपा निवडणुकांकडे सार्‍या देशाचे लक्ष लागले होते. आधी हिमाचलची निवडणूक झाली. नंतर गुजरातमध्ये दोन टप्प्यात मतदान पार पडले. याचदरम्यान दिल्ली मनपा निवडणुकीचीही धामधूम सुरू होती. गुरुवारी मतमोजणी होऊन निकाल आले. गुजरातमध्ये सर्व शक्ती पणाला लावल्याचा फायदा भाजपला झाला. 182 पैकी 156 जागा जिंकून भाजपने गुजरातमधील विधानसभा आजवरच्या विजयाचे सर्व विक्रम मोडीत काढले. ऐतिहासिक महाविजयाला गवसणी घातली. भाजपपुढे तगडे आव्हान उभे करणारा ‘आआपा’ आणि काँग्रेसचा दारूण पराभव झाला. काँग्रेसची 77 जागांवरून 16 जागांवर घसरण झाली. ‘आआपा’ला जेमतेम पाच जागा जिंकता आल्या.

गुजरातमधील देदीप्यमान विजयाचा आनंदोत्सव सर्वत्र साजरा करून हिमाचलमधील पराभवाचे दुःख विसरण्याचा सफल प्रयत्न केला जात आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी गुजरातचा गड राखण्यात यश मिळाल्याने भाजप नेते भारावले आहेत. हिमाचल प्रदेश आणि दिल्ली मनपात अनुक्रमे काँग्रेस व ‘आआपा’ने भाजपचा पराभव केला. एकावेळी दोन सत्ता भाजपच्या हातून निसटल्या आहेत, पण गुजरातच्या महाविजयात तो दुहेरी पराभव तूर्तास झाकोळला आहे. ताजे निवडणूक निकाल भाजपसाठी ‘एका डोळ्यात हसू आणि दुसर्‍या डोळ्यात आसू’ आणणारे आहेत.

गुजरातमध्ये काँग्रेसला मोठे अपयश आले असले तरी हिमाचल प्रदेशने मात्र काँग्रेसला सत्तेसाठी साथ दिली आहे. हिमाचलात 68 पैकी 40 जागा जिंकून काँग्रेसने आपल्याकडील राज्यांमध्ये आणखी एकाची भर घातली आहे. खुद्द भाजप पक्षाध्यक्षांचे गृहराज्य असूनही तेथे भाजपला पराभूत करून सत्ता काबीज केली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेचा हा सुपरिणाम असेल का? गुजरात निवडणूक जिंकण्यासाठी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांनाच कंबर कसून प्रचारात उतरावे लागले. गुजरातमध्ये तरी मोदींची जादू अजूनही कायम असल्याचे या निवडणुकीत दिसून आले, पण मोदींचा हा करिष्मा हिमाचल प्रदेश आणि दिल्ली मनपा निवडणुकीत का दिसला नाही? भाजप नेतृत्व याचा विचार करीलच.

काँग्रेसला खिजगणतीत न धरता गुजरातमध्ये आपली टक्कर थेट भाजपशी असल्याचे ‘आआपा’ नेते सांगत होते. गुजरातची जमीन ‘आआपा’साठी नवी असली तरी ‘आआपा’ने तेथे चांगली वातावरण निर्मिती केली होती. त्यामुळे भेदरलेल्या सत्ताधारी भाजप नेत्यांची भलतीच पळापळ झाली. ‘आआपा’ नेत्यांना दिल्लीतच अडकवून ठेवण्यासाठी व गुजरातमध्ये येण्यापासून रोखण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न केले गेले, पण ‘आआपा’ नेते त्याला बधले नाहीत. ‘आआपा’च्या काही प्रमुख नेत्यांवर तपास यंत्रणांकडून कारवाया केल्या गेल्या. त्यामुळे ‘आआपा’ची प्रतिमा मलीन होऊन मतदारांच्या मनातून तो पक्ष उतरेल आणि मतांचा ओघ भाजपकडे वळेल, असा कयास बांधला गेला, पण मनपातील भाजपची सत्ता वाचू शकली नाही. कुठल्याही पद्धतीचा अतिरेकी वाटणारा वापर त्याचा प्रभाव गमावून बसतो हेच कदाचित केंद्र सरकारलाही लक्षात आले असेल.

‘आआपा’ने दिल्लीत सरकार स्थापन केल्यानंतर दिलेल्या आश्वासनांची अल्पावधीतच पूर्तता केली. तो प्रामाणिकपणा दिल्लीकरांना मनापासून भावला आणि भाजपची मनपातील 15 वर्षांची सत्ता उद्ध्वस्त करून मनपा निवडणुकीतही त्यांनी ‘आआपा’ला पूर्ण बहुमत दिले. मनपा निवडणुकीत दिल्लीची स्वच्छता आणि कचर्‍याचे ढीग हा कळीचा मुद्दा ठरला. ‘आआपा’ने तोच प्रचाराचा मुद्दा बनवला. त्याचा मतदारांवर चांगला प्रभाव पडला. दिल्लीतील मतदारांनी ‘आआपा’ला कौल देऊन विधानसभेपाठोपाठ मनपातही भाजपला निराश केले आहे.

‘आआपा’ने आतापर्यंत चौथी निवडणूक जिंकली आहे. दिल्ली विधानसभेपासून मनपापर्यंत आता ‘आआपा’चीच छाप पडली आहे. केंद्रात सत्ता असली तरी राष्ट्रीय राजधानीतील सत्तेपासून भाजपसाठी अजूनही ‘दिल्ली दूरच’ राहिली आहे. दिल्ली, पंजाबमध्ये विकास होऊ शकतो, मूलभूत सोयी-सुविधा मिळू शकतात तर देशातही ते होऊ शकते, हा विश्वास देशवासियांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केजरीवाल करत आहेत. भाजप आणि काँग्रेसला समर्थ पर्याय म्हणून ‘आआपा’ वेगाने पुढे जात आहे, यादृष्टीनेच ‘आआपा’च्या दिल्लीतील विजयाकडे पाहिले पाहिजे. भाजपकडे पंतप्रधान मोदींचा लोकप्रिय चेहरा आहे तर ‘आआपा’कडे अरविंद केजरीवाल यांचा आश्वासक चेहरा आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ची घोषणा करून विकास करण्याची ग्वाही भाजप देत आहे. तरीसुद्धा ‘आआपा’ने केलेला विकासाचा दावा दिल्लीकरांना जास्त विश्वासार्ह वाटत आहे.

गुजरात निवडणुकीसोबत दिल्ली मनपा निवडणूक जाणून-बुजून जाहीर करून ‘आआपा’ची ताकद विभागली जावी म्हणून अशा तर्‍हेचे चक्रव्यूह तयार करण्यात आले आहे, पण आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत. मला चक्रव्यूह तोडता येतो, असे केजरीवाल यांनी ठासून सांगितले होते. सर्व अडचणी आणि आव्हाने पेलताना दिल्ली मनपा निवडणूक जिंकून केजरीवाल यांनी ते खरोखरच झुंजार अभिमन्यू असल्याचे सप्रमाण सिद्ध केले आहे. दिल्ली मनपा निवडणूक प्रचारात सत्ताधार्‍यांकडून ढिलाई झाली आणि केजरीवालांची सरशी झाली. दिल्ली मनपातील 250 पैकी 134 जागा जिंकून 15 वर्षांची भाजप सत्ता ‘आआपा’ने खालसा केली.

दिल्लीतील पराभवाने भाजप गोटात कमालीची शांतता पसरली होती. दुसर्‍या दिवशी गुजरातचे निकाल आले. काँग्रेस आणि ‘आआपा’चा धुव्वा उडवणारा महाविजय भाजपला मिळाला. मात्र दिल्ली आणि हिमाचलमध्ये झालेला भाजपचा पराभव नजरेआड करता येणारा नाही. दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याचा रिवाज बदला, असे आवाहन हिमाचलच्या जनतेला भाजपने प्रचार सभांमध्ये केले होते. ‘राज रहेगा, रिवाज बदलेगा’ असा नाराही दिला गेला होता, पण 37 वर्षांचा राज्याचा रिवाज न बदलता तो कायम ठेऊन मतदारांनी राजा बदलला. भाजपला नाकारून काँग्रेसला कौल दिला. प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने हिमाचल निवडणुकीचे आव्हान स्वीकारले व ते समर्थपणे पेलले.

गुजरात निवडणुकीत नरेंद्रचा विक्रम मोडीत काढा, असे आवाहन करताना भूपेंद्र पटेल यांना तो विक्रम मोडीत काढण्यासाठी मी मदत करीन, असे पंतप्रधान मोदी जाहीर सभेत म्हणाले होते. मोदींवर जीवापाड प्रेम करणार्‍या गुजराती जनतेने त्या आवाहनास मनापासून प्रतिसाद दिला. भरभरून मतदान करून भाजपला निर्विवाद बहुमतासह पुन्हा निवडून दिले. अर्थात काँग्रेस आणि ‘आआपा’चे त्यात अप्रत्यक्ष योगदान मिळाले, हेही दुर्लक्षिता येणार नाही. कारण काँग्रेस नेतृत्वाने गुजरात निवडणुकीची जबाबदारी यावेळी प्रामुख्याने स्थानिक नेतृत्वावर सोपवली होती.

‘आआपा’ने गुजरात जिंकण्याच्या निर्धाराने आक्रमक पवित्रा घेतला होता, पण तिरंगी लढतीत काँग्रेसच्या मतांचे विभाजन होऊन ती मते ‘आआपा’ उमेदवारांना मिळाली. ‘आआपा’च्या जवळपास 30 ते 40 उमेदवारांना दुसर्‍या क्रमांकाची मते मिळाल्याच्या बातम्या आहेत. याचा अर्थ भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत झाली असती तर भाजपला ही निवडणूक जड गेली असती. पंतप्रधानांच्या गृहराज्यातील सत्ता कोणत्याही परिस्थितीत टिकवणे भाजपसाठी आवश्यक होते. साहजिक गुजरातची निवडणूक प्रतिष्ठेची केली गेली. सगळे लक्ष गुजरात निवडणुकीवर केंद्रित करण्यात आले. त्यामुळे हिमाचलमधील बंडखोर उमेदवारांवर भाजपला पुरेसा वचक बसवता आला नसावा. गुजरातेतील महाविजयाला अप्रत्यक्षपणे ‘आआपा’चा हातभार लागला तर हिमाचलमधील काँग्रेसच्या विजयात भाजपच्या बंडखोरांनी महत्त्वाची भूमिका निभावली.

आठ बंडखोरांपैकी तीनजण निवडून आले आहेत. इतर पाच जणांनी चांगली मते खेचल्याने काँग्रेस उमेदवारांचा विजय सुकर झाला असावा. भाजपला मात्र किमान आठ जागा गमवाव्या लागल्या. काँग्रेसलाही बंडखोरीचा फटका बसला, पण मिळालेल्या यशामुळे तो धुवून निघाला आहे. गुजरातमधील अभूतपूर्व विजयोत्सवात सर्वच भाजप नेते मग्न आहेत. काँग्रेसचा मोठा पराभव झाल्याने जुन्या प्रतिस्पर्ध्याला चितपट केल्याच्या आनंदात ते आहेत, पण दिल्ली मनपा आणि हिमाचलातील सत्ता त्यांच्या हातून निसटली आहे. पहिल्याच प्रयत्नात पाच जागा जिंकून ‘आआपा’ने गुजरात विधानसभेत प्रवेश केला आहे. ‘आआपा’ला भलेही अपेक्षित यश मिळाले नसले तरी 13 टक्के मते मिळाल्याने पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला. हे यश ‘आआपा’ नेते आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारे आहे. गुजरात, हिमाचल प्रदेश व दिल्ली या तीन राज्यांतील मतदारांनी भाजप, काँग्रेस आणि ‘आआपा’ला प्रत्येकी एकेक विजय मिळवून देऊन समान न्याय केला आहे. कोणा एकाला डोक्यावर न घेता सर्वांना समान संधी देऊन खूश केले आहे. यानिमित्ताने पुन्हा भारतीय लोकशाहीचाच विजय झाला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com