रविवार शब्दगंध : लोकसंख्यावाढ संकट की संधी?

- एन. व्ही. निकाळे
रविवार शब्दगंध : लोकसंख्यावाढ संकट की संधी?

संयुक्त राष्ट्रसंघाच्या (United Nations) ताज्या अहवालानुसार लोकसंख्येच्या (Population) बाबतीत का होईना, चीनी ड्रॅगनला भारत (India) पीछाडीवर टाकणार आहे. लोकसंख्यावाढीत जगात अव्वलस्थान गाठणे ही काही तशी भूषणावह बाब नाही. उलट लोकसंख्यावाढीतून निर्माण होणार्‍या अनेक प्रश्‍नांचे आव्हान भारतापुढे आहे. लोकसंख्या डोईजड न वाटता उपयुक्त ठरावी म्हणून प्रत्येक बेरोजगाराच्या (Unemployed) हाताला काम देण्याचे आव्हान देशाच्या राज्यकर्त्यांना पेलावे लागेल. तरच देशाची मोठमोठी स्वप्ने साकारणे शक्य होईल.

‘प्रपंच’ नावाचा मराठी चित्रपट 1961 सालात चित्रपटगृहांत झळकला होता. चित्रपटाचे कथानक दमदार होते. गाणीही अवीट होती. मुख्य म्हणजे कुटुंबकल्याणासारखा (जुना शब्द कुटुंब नियोजन) विषय हाताळणारा आणि आटोपशीर कुटुंबाचे महत्व सहज सांगणारा हा चित्रपट त्या काळी बराच गाजला होता. घरात खाणारी तोंडे जास्त असल्यावर आणि कमाईला फारसा वाव नसल्यावर कुटुंबाची कशी परवड होते याबद्दल नेटके भाष्य त्यात करण्यात आले होते.

लोकसंख्यावाढीचा प्रश्न भेडसावत असल्याच्या काळात आलेला हा चित्रपट प्रबोधक ठरला. मनोरंजनातून जनप्रबोधन करणारा हा चित्रपट 14 भाषांमध्ये अनुवादीत (डब) करण्यात आला. चीनमध्येही ‘प्रपंच’ चांगलाच लोकप्रिय ठरला होता. चीन सरकारने चिनी भाषेत अनुवादीत करून हा चित्रपट देशभर प्रदर्शित केल्याची माहिती महाजालावर (इंटरनेट) वाचावयास मिळते.

‘प्रपंच’ चित्रपटाचा उल्लेख विषयाच्या सुरूवातीला करण्यामागे कारणही तसे विशेष आहे. जागतिक लोकसंख्या दिन नुकताच (14 नोव्हेंबर) साजरा झाला. ते औचित्य साधून संयुक्त राष्ट्रांनी जागतिक लोकसंख्येबाबतचा वार्षिक अहवाल प्रकाशित केला. या अहवालात लोकसंख्यावाढीबाबतचे काही धक्कादायक अंदाज वर्तवण्यात आले आहेत. जगाच्या लोकसंख्येने 800 कोटींचा टप्पा गाठल्याची विशेष नोंद अहवालात आहे. 2100 सालापर्यंत जगाची लोकसंख्या 1,040 कोटींवर पोहोचेल, असेही त्यात नमूद आहे.

लोकसंख्यावाढीबाबत काही निरीक्षणेही नोंदवण्यात आली आहेत. जगाची लोकसंख्या 700 कोटींवरून 800 कोटींवर पोहोचण्यासाठी 12 वर्षे लागली. 900 कोटींचा टप्पा गाठण्यासाठी 15 वर्षांचा काळ जावा लागेल, त्यासाठी 2037 साल उजाडावे लागेल, असे सांगून जागतिक लोकसंख्यावाढीचा वेग मंदावल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे.भारताला विश्‍वगुरू बनवण्याच्या गर्जना जागतिक व्यासपीठावर वरचेवर केल्या जात असताना लोकसंख्यावाढ अहवालात भारताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण नोंद करण्यात आली आहे.

चीन हा भारताचा सख्खा शेजारी असला तरी तो भारताला स्वतःचा कट्टर प्रतिस्पर्धी मानतो. काहीतरी खुसपट काढून भारताला डिवचायचे हा तर त्या देशाचा जणू आवडता छंदच बनला आहे. असा हा शेजारी जगावर राज्य करण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहे. निदान आजपर्यंत सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून तो जगाच्या नकाशावर चमकत आहे. लोकसंख्येच्या बाबतीतसुद्धा त्याने भारताला पुढे जाऊ दिले नाही, पण त्याची ती सद्दी आता पुढील काळात संपण्याचा संभव वाढला आहे.

भारताच्या लोकसंख्येत सुमारे 18 कोटींची वाढ झाली आहे. 2023 मध्ये भारत चीनला मागे टाकून लोकसंख्येत अव्वलस्थान गाठण्याची शक्यता अहवालात वर्तवण्यात आली आहे. 2022 मध्ये भारताची लोकसंख्या 141.2 कोटी तर चीनची लोकसंख्या 142.6 कोटी आहे. 2050 पर्यंत भारताची लोकसंख्या 166.8 कोटी तर चीनची लोकसंख्या 131.7 कोटी होईल, असे भाकित वर्तवण्यात आले आहे.

स्वत:ला जगातील महासत्ता समजणारा चीन आंतरराष्ट्रीय सीमेवर सतत भारताच्या खोड्या काढतो. त्याला मागे रेटण्याचा प्रयत्न भारताकडून ताकदीने सुरू आहे, असे छातीठोकपणे सांगितले जाते, पण चीन काही मागे हटायला राजी नाही. लोकसंख्येच्या बाबतीत का होईना, चीनी ड्रॅगनला भारत पीछाडीवर टाकणार आहे. लोकसंख्यावाढीत जगात अव्वलस्थान गाठणे ही काही तशी भूषणावह बाब नाही. उलट लोकसंख्यावाढीतून निर्माण होणार्‍या अनेक प्रश्‍नांचे आव्हान भारतापुढे आहे. वर्षानुवर्षे लोकसंख्यावाढीचे ओझे घेऊन विकसनशील भारताची प्रगतीच्या मार्गावर चालण्यासाठी धडपड सुरू आहे.

अशा परिस्थितीत भविष्यातील लोकसंख्यावाढीचे संकेत भारतासाठी फारसे आशादायक म्हणता येणार नाहीत. ‘मुलगाच हवा’ ही पुरातन मानसिकता देशातील लोकसंख्यावाढीला काही प्रमाणात हातभार लावणारी ठरत होती. गरिबी, दारिद्रय आणि बेरोजगारीतून लोकसंख्यावाढीला अप्रत्यक्ष खतपाणी मिळत होते. लोकसंख्यावाढ नियंत्रणात आणण्यासाठी भारत सरकारने कुटुंब नियोजन कार्यक्रम राबवला. प्रत्येक कुटुंबाचा आकार मर्यादित राहावा म्हणून लोकप्रबोधन मोहिमा राबवण्यात आल्या. स्वेच्छेने कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया करणार्‍या स्त्री-पुरुषांना आर्थिक प्रोत्साहनही दिले.

‘हम दो, हमारे दो’, ‘छोटे कुटुंब, सुखी कुटुंब’ यासारखी घोषवाक्ये गावोगावी, जागोजागी झळकू लागली. देशात शिक्षणाचा प्रसार होऊ लागला. साक्षरतेचे प्रमाण वाढल्यावर छोट्या कुटुंबाचे महत्त्व लोकांना पटू लागले. एकच मुलगा अथवा मुलगी असावी, असा दृष्टिकोन बाळगणार्‍यांचा सध्याचा काळ आहे. हे चित्र प्रामुख्याने शहरी भागात आढळते. मात्र त्याचे प्रमाण तसे खूप कमी आहे. ग्रामीण भागातसुद्धा दोन अपत्यांनंतर कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया करून घेण्याचा विचार मूळ धरत आहे. आर्थिक परिस्थितीशी झगडताना दोन अपत्यांचे पालन-पोषण आणि त्यांचे शिक्षण योग्य प्रकारे व्हावे हा आग्रह धरणार्‍या पालकांची वाढती संख्या हे चित्र आशादायक आहे.

लोकसंख्येबाबतचा जागतिक अहवाल प्रसिद्ध झाला त्याचवेळी इंडोनेशियातील बाली येथे ‘जी-20’ परिषद सुरू होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या विकासाची गाथा या परिषदेत गायली. 2014 आधीचा आणि आताचा भारत यात जमीन-अस्मानाचा फरक पडला आहे. आजचा भारत प्रचंड वेगाने विकास करीत आहे. भारत आता छोटी-छोटी नव्हे तर मोठमोठी स्वप्ने पाहत आहे, असे सांगून एकविसाव्या शतकात भारत हा जगासाठी आशेचा किरण आहे, असा आत्मविश्‍वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला.

स्वदेशाविषयीचा अभिमान त्यांच्या भाषणात शब्दा-शब्दांतून प्रकट होत होता. विकसित भारताचे स्वप्न ‘जी-20’ परिषदेत मांडले गेले. तथापि, प्रगतीला बाधा ठरणारी कितीतरी आव्हाने आणि प्रश्‍न भारतापुढे आवासून उभे आहेत. ही त्या स्वप्नामागील काळोखी बाजू आहे हेही विसरून चालणार नाही. लोकसंख्यावाढ हा विकासाच्या मार्गातील मोठा अडथळा असतो. दुर्दैवाने लोकसंख्येच्या बाबतीत भारत जगात दुसर्‍या क्रमांकावर आहे. मोठ्या लोकसंख्येच्या मूलभूत गरजांची पूर्तता करताना देशाचा पैसा आणि शक्ती मोठ्या प्रमाणात खर्च होते. तरीही भारताचा विकासरथ धावत आहे, ही पंतप्रधानांची ग्वाही त्यातल्या त्यात अभिमानाची बाब आहे.

सर्वांना रोजगार, चांगले शिक्षण, आरोग्य, वाहतूक आदी मूलभूत सेवा-सुविधा उपलब्ध करणे ही आधुनिक काळातील शासन-प्रशासनापुढील खूप मोठी आव्हाने आहेत. भारतापुढे ती पूर्वी होती, आजही आहेत आणि भविष्यातही राहणार आहेत. मोठ्या लोकसंख्येला अन्नसुरक्षा देणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. दोन वर्षे थैमान घालणार्‍या करोना महामारीने जगाला हादरून सोडले होते. सदृढ अर्थव्यवस्था असलेल्या प्रगत देशांमध्येही सार्वजनिक आरोग्यसेवेतील उणिवा त्या काळात उघड झाल्या होत्या. भारताची परिस्थिती याहून वेगळी नव्हती.

करोनाला पायबंद घालण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या दीर्घ टाळेबंदीमुळे करोना तर लवकर आटोक्यात आला नाही, पण सर्वच क्षेत्रे बंद पडल्याने भारतीय अर्थव्यवस्थेचे चाक मात्र चिखलात रुतल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. रोजगार बुडालेल्या लाखो लोकांचे तांडे आपापल्या गावांकडे, प्रांताकडे परतण्यासाठी पायपीट करीत होते. त्यांच्या हालापेष्टा कल्पनेपलीकडच्या होत्या. करोनासंकटाचे ढग निवळले असले तरी हवामान बदलाचे दुष्परिणाम जगभर तीव्रतेने जाणवू लागले आहेत.

अतिवृष्टी आणि महापुराच्या संकटांनी भारतातील शेतशिवारांची धूळधाण होत आहे. अन्नधान्य पिकांचे मोठे नुकसान होत आहे. अन्नधान्यात भारत स्वयंपूर्ण असला तरी आदिवासी आणि दुर्गम भागातील बालकुपोषण कमी झालेले नाही. लग्नकार्ये आणि इतर मोठ्या समारंभांतून पंचपक्वान्नाच्या भोजणावळी उठताना दिसतात. त्यात अन्नाच्या नासडीचे प्रमाण बरेच मोठे आहे. अन्नसुरक्षा मोहीम राबवली जाताना देशातील लाखो लोकांना आजही एकवेळच्या जेवणाची भ्रांत आहे. या सर्व प्रश्‍नांतून मार्ग काढण्यासाठी लोकसंख्या नियंत्रणात आणण्याचा मुद्दा दुर्लक्षिता येणार नाही.

लहान कुटुंबाचे महत्त्व जनमानसावर बिंबवण्याचा प्रयत्न सरकारी यंत्रणा करीत असताना जादा मुले जन्माला घालण्याचे अनाहूत सल्ले देऊन काही तथाकथित धर्ममार्तंड त्याविरोधी भूमिका घेत आहेत. देशात जन्माला येणारे प्रत्येक मूल सुदृढ असावे, त्याचे योग्य ते पालनपोषण व्हावे, प्रत्येक मुलाला चांगले आणि दर्जेदार शिक्षण मिळावे, त्यातून उद्याचे चांगले नागरिक घडावेत यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी विशेष कार्यक्रम राबवण्याची आवश्यकता आहे. ‘छोटे कुटुंब, सुखी कुटुंब’ हा मूलमंत्र घरोघरी पोहोचवला पाहिजे. तरच ‘सर्वाधिक लोकसंख्येचा देश’ या नकोशा बिरूदापासून देशाला वाचवता येईल.

कोणतेही संकट संधी म्हणून पाहावे, असे पंतप्रधान सांगतात. त्या न्यायाने सर्वाधिक लोकसंख्या संकट मानले तर त्याकडेसुद्धा संधी म्हणून पाहायला हवे. देशाच्या विकासात अधिकाधिक लोकांचे योगदान वाढवून लोकसंख्यावाढीच्या संकटावर मात करण्याचे मार्ग शोधावे लागतील. भारतातील 68 टक्के लोकसंख्या 15 ते 64 वयोगटातील आहे. विकासकार्यात यातील जास्तीत जास्त लोकसंख्येला गुंतवून घेता येईल.

सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनचे उदाहरण त्याबाबतीत डोळ्यांसमोर आहे. लोकसंख्या डोईजड न वाटता उपयुक्त ठरावी म्हणून प्रत्येक बेरोजगाराच्या हाताला काम देण्याचे आव्हान देशाच्या राज्यकर्त्यांना पेलावे लागेल. तरच देशाची मोठमोठी स्वप्ने साकारणे शक्य होईल. लोकसंख्यावाढ हे संकट नसून विकासाची संधी आहे याचा वस्तूपाठ भारताला जगासमोर ठेवता येईल. मग विश्वगुत्वावरचे भारताचे स्थान जगातील अन्य देशही खुशीने मान्य करतील. जगात सर्वत्र आपणच तसे सांगण्याचा मोह आपोआप आवरला जाईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com