Thursday, April 25, 2024
Homeब्लॉगरविवार शब्दगंध : आणखी एक साथसंकट

रविवार शब्दगंध : आणखी एक साथसंकट

महाराष्ट्रावरील (Maharashtra) करोना (corona) संकट निवळल्याने राज्यातील जनता आणि सरकारने सुटकेचा नि:श्‍वास टाकला होता. मात्र आता गोवर (Measles) साथीचे नवे आव्हान देशापुढे, विशेषत: महाराष्ट्रात उभे ठाकले आहे. मुंबईसह (Mumbai) राज्यात ६२ ठिकाणी गोवरचा उद्रेक झाल्याचे आरोग्य विभागाच्या (Health Department) पाहणीत दिसून आले आहे. लसीकरणाबाबत (Vaccination) आजही पुरेशी सार्वत्रिक जागरुकता आढळत नाही. त्यामुळेच कदाचित गोवरसारख्या साथींचा उद्रेक पुन:पुन्हा झाल्याचे पाहावयास मिळते. करोनाचे महासंकट निवळत असताना गोवर साथीचा उद्रेक होणे ही राज्यासाठी धोक्याची घंटाच म्हटली पाहिजे.

महाराष्ट्रावरील करोना संकट निवळल्याने राज्यातील जनता आणि सरकारने सुटकेचा नि:श्‍वास टाकला होता. मात्र आता गोवर साथीचे नवे आव्हान देशापुढे, विशेषत: महाराष्ट्रात उभे ठाकले आहे. करोनाचा शिरकाव आधी पुण्यात, नंतर मुंबईत व त्यानंतर त्याचा राज्यभर वेगाने प्रसार झाला होता. गोवरचे बालरुग्ण आढळण्याची सुरुवात मुंबईत झाली. नंतर नाशिक आणि मालेगावपर्यंत गोवरची साथ पसरली. मालेगावात 50हून जास्त रुग्ण आढळले आहेत.

- Advertisement -

सुरुवातीला मुंबईनंतर नाशिक जिल्ह्यात मालेगावमध्ये गोवर रुग्ण आढळून आले होते, पण नाशकात एकही रुग्ण नसल्याचा दावा तेव्हा नाशिक मनपाकडून करण्यात आला होता. तथापि नाशकातही संशयित रुग्ण सापडले आहेत. राज्यात मुंबईसह 62 ठिकाणी गोवरचा उद्रेक झाल्याचे आरोग्य विभागाच्या पाहणीत दिसून आले आहे. 12 हजारांहून जास्त संशयित बालरुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत 18 बालकांचा मृत्यू झाला आहे. मुंबई आणि परिसरात गोवर संसर्ग वेगाने पसरत आहे. आतापर्यंत जीव गमावलेल्या 13 बालकांमध्ये मुंबई, भिवंडी आणि वसई-विरार भागातील रुग्णांचा समावेश आहे. मृत्युमुखी पडलेल्या त्या बालकांना गोवर प्रतिबंधक लस दिली गेलेली नसल्याची माहिती उजेडात आली आहे.

गोवरचा उद्रेक होण्याची ही काही पहिली वेळ नाही. 2019 मध्ये त्याचा उद्रेक झाला होता. त्यावेळी 1,300 हून जास्त संशयित रुग्ण आढळले होते. 2020 आणि 2021 मध्येसुद्धा शेकडो बालकांना गोवर संसर्ग झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे, पण करोनाकाळात तो संसर्ग झाल्याने गोवरचे गांभीर्य पुरेसे लक्षात आले नाही. बालकांच्या परिपूर्ण लसीकरणाबाबत पालकांकडून होणारी दिरंगाई गोवरसारख्या साथींना आमंत्रण देणारी ठरते. बालकांच्या लसीकरणाबाबत सरकारी आरोग्य व्यवस्था सक्षम आहे, असे म्हटले जात असले तरी आरोग्यसेवकांच्या जनसंपर्कातील कमतरता आणि इतर त्रुटी अशा परिस्थितीत उठून दिसतात.

वेळापत्रकाप्रमाणे लसी न दिल्या गेल्याने गोवर साथीने उचल खाल्ली ही बाब नाकारता येईल का? बालकांचे वेळेवर लसीकरण न होण्याला केवळ त्यांच्या पालकांना जबाबदार धरता येणार नाही. पालकांकडून होणार्‍या दुर्लक्षामागे काही कारणे असू शकतात, पण ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रात बालकांची लसीकरणासाठी नोंद झाली आहे तेथील आरोग्यसेवकांनी देखील याबाबत संबंधित पालकांना जागे करण्याची आवश्यकता आहे.

बालकांना लस देऊन घेण्याबाबत विरोधी भूमिका घेणार्‍या त्यांच्या पालकांना राजी कसे करायचे हा आरोग्य यंत्रणेपुढचा गहन प्रश्‍न आहे. जीवावर बेतू शकणार्‍या आजारापासून बालकांना संरक्षण देण्यासाठी लसीकरण किती गरजेचे आहे ते पालकांच्या मनावर बिंबवणे, हेही मोठे आव्हानच आहे. पालकांच्या प्रतिसादाशिवाय गोवर साथ नियंत्रणात आणणे जवळजवळ अशक्य आहे. दर निवडणुकीत मतदानाबाबत नागरिकांमध्ये उदासीनता दिसते. तशीच ती लसीकरणाबाबतही दिसून येत आहे.

गोवरचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्याच्या आरोग्य विभागाने बालकांना अतिरिक्त लसमात्रा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 6 ते 9 महिने आणि 9 महिने ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. याशिवाय अतिरिक्त लसीकरणानंतरदेखील नियमित लसीकरण वेळापत्रकानुसार करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. संसर्गबाधित बालकांना एक महिन्यानंतर लसमात्रा दिली जाईल, असे सांगण्यात आले आहे. गोवर संसर्गवाढीचे प्रमाण ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात जास्त असल्याचे वास्तव आरोग्य विभागाच्या पाहणीत आढळले आहे.

ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून बालकांसाठी सरकारी लसीकरण कार्यक्रम राबवला जातो. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांकडून बालकांच्या मातांशी संवाद ठेवला जातो. सर्व प्रकारच्या लसीकरणाचे वेळापत्रक असलेले कार्ड प्रत्येक बाळासाठी दिले जाते. त्यानुसार लसीकरण केले जाते. बालकांच्या लसीकरणाबाबत ग्रामीण भागात जागरुकता निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील गोवर संसर्गाचे प्रमाण कमी असावे. मग शहरी भागात उद्रेक होण्यामागे नेमके कारण काय असेल?

बालकांना जन्मापासून वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत विविध प्रकारच्या प्रतिबंधक लसी दिल्या जातात. त्याचे वेळापत्रक ठरलेले आहे. नवव्या महिन्यानंतर दिली जाणारी गोवरवरील लस त्यापैकी एक महत्त्वपूर्ण लस आहे. लसीकरणाने विविध आजारांपासून बालकांचे संरक्षण होते. कोणत्याही आजारापासून संरक्षण मिळवण्यासाठी आणि त्यापासून वाचण्यासाठी लसीकरण हा सर्वोत्तम उपलब्ध उपाय आहे. घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, क्षयरोग, गोवर, पोलिओ हे आजार लहान मुलांचे कर्दनकाळ मानले जातात.

निर्धारित वेळापत्रकानुसार बालकांचे लसीकरण करून घेणे आणि आजारांपासून त्यांना सुरक्षाकवच मिळवून देणे हे प्रत्येक माता-पित्याचे कर्तव्य आहे. ते कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले गेले तर त्याचा समाजाला लाभ होतो. लहान मुलांच्या लसीकरणाबाबत सरकारी पातळीवर सतत जनजागृती केली जाते. लसीकरणाचे महत्त्व लोकांना पटवून दिले जाते, पण तरीही लसीकरणाचे वेळापत्रक पालकांकडून पाळले जात नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे आवश्यक असलेल्या लसींपासून अनेक बालके वंचित राहण्याची शक्यता असते.

लसीकरण करून घेण्याविषयी आजही पुरेशी सार्वत्रिक जागरुकता आढळत नाही. त्यामुळेच कदाचित गोवरसारख्या साथींचा उद्रेक पुन:पुन्हा झाल्याचे पाहावयास मिळते. करोना संपुष्टात आल्याचे समजून त्याबाबत आज गाफीलपणा सार्वत्रिक दाखवला जात आहे, पण करोनाचा नवा अवतार कधी येईल आणि आक्रमक होईल ते सांगता येत नाही. चीनमध्ये सध्या करोनाचा धुमाकूळ नव्याने सुरू आहे. निदान त्यापासून बोध घेऊन तरी भारतीय नागरिकांनी वेळीच सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

करोना उद्रेक वाढला तेव्हा कोणत्याही देशात प्रतिबंधक लस उपलब्ध नव्हती. काळाची गरज म्हणून भारतासह अनेक देशांनी प्रतिबंधक लसींची निर्मिती युद्धपातळीवर केली. व्यापक लसीकरण कार्यक्रम राबवला. गोवर साथीच्या उद्रेकात प्रतिबंधक लस उपलब्ध असणे दिलासादायक बाब आहे. गोवर साथीचा वेग करोनाच्या पाचपट जास्त असल्याचे सांगितले गेले आहे. फैलावाबाबत सध्या तरी गोवरने करोनालाही मागे टाकले आहे. म्हणून या धोक्याकडे पुरेसे लक्ष देण्याची गरज आहे. मात्र जनतेची उदासीनता त्याला कारण आहे, असे म्हणण्याची संधी सरकारी आरोग्य यंत्रणेला मिळू नये.

करोनाच्या दुसर्‍या लाटेवेळी बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले होते. त्यावेळी भीतीपोटी का होईना, पण लोकांनी लसीकरणाला प्राधान्य दिले होते. त्यानंतर मात्र लसीकरणाबाबतची उदासीनता वाढत गेली. पहिली लसमात्रा घेतल्यानंतर दुसर्‍या लसमात्रेकडे बर्‍याच लोकांनी पाठ फिरवली होती. शेवटच्या टप्प्यात बूस्टर डोसही दिला गेला. त्यालाही लोकांचा कमी प्रतिसाद मिळाला. एकही लस घेतली नसल्याची फुशारकी मारणारे अनेक लोक समाजात आढळतात. सुदैवाने लहान बालकांना करोनाची फारशी बाधा झाली नव्हती. मात्र ती कसर आता गोवरची साथ भरून काढत असेल का?

गोवरचा धोका आणि तो जीवघेणा असल्याची भीती लक्षात घेता बालकांचे पालक आणि भविष्यात आई-बाबा होण्याच्या बेतात असलेल्या जोडप्यांनीसुद्धा बालकांच्या लसीकरणाचे महत्त्व वेळीच लक्षात घ्यायला हवे. गोवरचा राज्यातील वाढता प्रकोप लक्षात घेऊन साथ नियंत्रणात आणण्यासाठी माजी आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली कृतिदल स्थापला जाणार आहे. तसे निर्देश राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत.

गोवर साथीनिमित्त डॉ.साळुंखे यांनी राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर बोट ठेवले आहे. गोवरचा वाढता संसर्ग हा ढासळत्या आरोग्य व्यवस्थेचा निदर्शक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आरोग्य व्यवस्थेने लसीकरणाकडे गांभीर्याने पाहिले नसल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला आहे. करोनाचे महासंकट आताशी कुठे निवळत असताना गोवर साथीचा उद्रेक होणे ही राज्यासाठी धोक्याची घंटाच म्हटली पाहिजे.

- Advertisment -

ताज्या बातम्या