रविवार ‘शब्दगंध’ : सत्तासंघर्षाचा भूकंप!

- एन. व्ही. निकाळे
रविवार ‘शब्दगंध’ : सत्तासंघर्षाचा भूकंप!

शिवसेना (Shivsena) आणि फुटीर गट यांच्यात वर्चस्वावरून संघर्ष पेटला आहे. महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) प्रतिष्ठा आणि सरकारचे अस्तित्व त्यात पणास लागले आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्तासंघर्ष आता कायदेशीर लढ़ाईकडे झुकला आहे. राजकीय संघर्षात महाविकास आघाडी सरकार टिकणार का? पाच वर्षांची कारकीर्द पूर्ण करणार का? फुटीरांचे बंड यशस्वी होईल का? आघाडी सरकार जाऊन नवे सरकार येणार का? असे अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. त्याची उत्तरे नजीकच्या काळात मिळतील...

भूकंप ही नैसर्गिक आपत्ती आहे. ती कधी आणि कुठे येईल याचा भरवसा नसतो. भूकंप हानिकारक असतात. धक्के जास्त तीव्र असतील तर मोठी हानी होऊ शकते. नैसर्गिक भूकंप घडतात तसे राजकीय भूकंपही घडतात. राजकीय भूकंपातून राजकीय पक्षांची हानी अटळ असते. भारतीय राजकारण आणि सत्ताक्षेत्रे राजकीय भूकंपांबाबत हल्ली जास्त संवेदनशील झाली आहेत. गेल्या 6-7 वर्षांत भारतात राजकीय भूकंपांचे प्रमाण बरेच वाढले आहे.

असाच एक मोठा भूकंप महाराष्ट्राच्या राजकारणात नुकताच घडला. महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व करणार्‍या शिवसेनेतील काही आमदारांनी स्वपक्षाविरोधात बंड पुकारून वेगळी चूल मांडली आहे. जवळपास आठवडाभरापासून सुरू झालेले शिवसेना आमदारांचे बंड थांबण्याच्या स्थितीत नाही. बंडखोर गट स्वपक्षालाच आव्हान देत आहे. आपलाच गट खरी शिवसेना असल्याचे दावेही बंडखोरांच्या म्होरक्याकडून केले जात आहेत.

परिणामी आघाडी सरकार अडचणीत सापडून डळमळू लागले आहे. सरकारच्या स्थिरतेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अडीच वर्षांपूर्वी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक झाल्यानंतर महाविकास आघाडीची सत्तास्थापनेची जुळवाजुळव सुरू असताना भल्या पहाटे वेगळ्याच युती सरकारचा शपथविधी झाल्याचा धक्का मराठी जनतेला बसला होता. त्या राजकीय भूकंपानंतर पुन्हा राज्यात एखादा राजकीय भूकंप येईल आणि आघाडी सरकारला हादरा बसेल, असे कोणाला वाटले नसेल.

करोना संकटकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाराष्ट्रातील जनतेला कुटुंबप्रमुखासारखा आधार दिला. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’सारखे त्यांचे उपक्रम आणि ‘फेसबुक लाईव्ह’मधून वेळोवेळी साधलेल्या संवादातून त्यांनी जनतेला धीर दिला. संकटाशी झुंजण्याचा व त्यावर मात करण्याचा विश्‍वास निर्माण केला. केंद्र सरकारकडून (Central Government) पुरेसे सहकार्य मिळत नसतानासुद्धा राज्य सरकारने स्वत:च्या हिंमतीवर करोना उपचार केंद्रे तसेच प्राणवायू प्रकल्प उभे केले.

प्राणवायू उपलब्धतेत राज्याला स्वयंपूर्ण केले. लसीकरणात देशात आघाडी मिळवली. राज्यातील जनतेच्या विश्‍वासासोबत भरभरून प्रेम मिळवले. देशातील पहिल्या पाच लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचे स्थान टिकून राहिले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना राज्य कारभार व्यवस्थितपणे सांभाळता येईल का? अशा अनेक शंकाकुशंका तेव्हा उपस्थित करण्यात आल्या होत्या. मात्र विधिमंडळात ठाकरे यांचा वावर मुरब्बी नेत्यांनाही लाजवणारा होता. स्पष्टवक्तेपणा आणि परखडपणातून त्यांनी विधिमंडळाची अधिवेशने गाजवली. तीन पक्षांच्या आघाडीचे नेतृत्व त्यांनी व्यवस्थितपणे केले. सरकारचे नेतृत्वही चोखपणे सांभाळले.

आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर हे सरकार फार काळ टिकणार नाही, लवकरच पडेल, अशी अपशकून करणारी अनेक भाकिते असंतुष्टांकडून केली जात होती, पण सरकार मजबुतीने पुढे जात होते. आमचे सरकार पाचच नव्हे तर पुढील पंचवीस वर्षे सत्तेवर राहील, असे सत्ताधारी नेते ठासून सांगत होते, पण सत्तेत परतण्याची स्वप्ने पाहणार्‍या उताविळांनी वेळोवेळी वेगवेगळ्या चाली खेळल्या. सरकार पडत नाही म्हणून केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा सत्ताधारी पक्षांतील ठराविक नेते, मंत्री, आमदार, त्यांचे नातलग आणि निकटवर्तीयांच्या मागे सुरू झाला.

मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीयही त्यातून सुटले नाहीत. ईडीसारखी तपास यंत्रणा अधिक सक्रिय झाली. सरकारमधील दोन मंत्र्यांना वेगवेगळ्या आरोपांखाली तुरूंगात जावे लागले. तरीही सरकार डळमळीत होत नसल्याने अखेर सरकारमधील असंतुष्टांचा शोध सुरू झाला. राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकांची संधी साधली गेली. पुरेसे संख्याबळ नसताना प्रत्येकी एक जागा जिंकून विरोधकांनी सरकारला आश्‍चर्याचा धक्का दिला.

राज्यसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडी अधिक सावध होऊन विधानपरिषद निवडणुकीला सामोरी गेली, पण विरोधकांना आधीच वश झालेल्या घरभेद्यांनी सरकारचा पराभव घडवून आणला. 'आम्हीच जिंकू' असे विरोधी पक्षाचे नेते याच असंतुष्टांच्या जोरावर आत्मविश्‍वासाने सांगत होते ते आता स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडी मजबूत आणि अभेद्य आहे, असे आघाडीचे नेते सांगत होते, पण आघाडीला सुरूंग लावण्याचा डाव टाकला जात आहे याचा अंदाज त्यांना वेळीच का आला नाही? विधानपरिषद निवडणूक निकाल आल्यानंतर आघाडीतील मतांची फाटाफूट झाल्याचे दिसून आले.

त्यानंतर अडीच वर्षांपूर्वी झालेल्या ‘रात्रीस खेळ चाले’ नाट्याचा दुसरा अंक सुरू झाला. सरकारचे नेतृत्व करणार्‍या शिवसेनेलाच खिंडार पाडले गेले. बंडखोर आमदारांना महाराष्ट्रातून सुरतला नेणे, तेथे विशिष्ट हॉटेलात त्यांना पोलीस बंदोबस्तात ठेवणे, सुरतेत असुरक्षित वाटल्यावर बंडखोरांना विमानातून आसामातील गोहाटीत घेऊन जाणे, तेथे त्यांची बडदास्त ठेवणे हा सगळा प्रकार पूर्वनियोजनाशिवाय होणे कसे शक्य आहे? हा सर्व घटनाक्रम पाहता पडद्यावर दिसणार्‍या कळसूत्री बाहुल्यांना पडद्यामागे कोणीतरी सूत्रधार कुशलतेने नाचवत आहे याचा अंदाज आल्याशिवाय राहत नाही.

असंतुष्ट गटासोबत किती आमदार आहेत याचे वेगवेगळे आकडे दररोज सांगितले जात आहेत. ‘महाविकास आघाडीतून बाहेर पडा, काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडा, भाजपसोबत सरकार स्थापन करा’ असे निरोप मुख्यमंत्री असलेल्या पक्षप्रमुखांना समाज माध्यमे आणि वृत्तवाहिन्यांवरील बातम्यांमधून बंडखोरांकडून धाडले जात आहेत. बंडखोर जी भाषा करीत आहेत ती पाहता त्यांचा बोलावता धनी कोण? हे समजणे फारसे कठीण नाही. बंडखोरांपैकी काहींना ‘ईडी’ (ED) चौकशीला सामोरे जावे लागले. काहींना ईडीची भीती घातली गेल्याच्या बातम्या आहेत.

‘ईडी’च्या भीतीने काहींची रात्रीची झोप सध्या उडाली असावी. रात्री शांत झोप लागावी म्हणून स्वपक्षापासून फारकत घेण्याचा टोकाचा पर्याय त्यांनी अवलंबला असेल का? असंतुष्ट गटातून दोन आमदार कसे-बसे निसटून मुंबईत परतले. नितीन देशमुख यांनी माध्यमांसमोर सांगितलेली आपबिती भयावह आहे. सुरतेतून गोहाटीत पाठवणी झालेल्या बंडखोरांपैकी किती जण स्वेच्छेने गेले असतील याबद्दलही शंका व्यक्त केली जात आहे.

एकूणच हे सगळे प्रकरण साधे-सरळ नाही. मोठ्या कारस्थानाचा तो भाग असावा. कोणाकडे जास्त आमदार आहेत? कोणता गट खरा? अधिकृत गटनेता कोण? या सगळ्या गोष्टी यथावकाश स्पष्ट होतीलच, पण विरोधी पक्षांच्या स्थिर सरकारांमध्ये फूट पाडून व ती अस्थिर करून सत्ता काबीज करण्याचा कर्नाटकापासून सुरू झालेला सत्तेचा खेळ आता महाराष्ट्रापर्यंत येऊन ठेपला आहे.

संकटात सापडलेले सरकार वाचवण्यासाठी सत्ताधार्‍यांची प्रतिष्ठा पणास लागली आहे. शरद पवारांसारखे ज्येष्ठ मार्गदर्शक आघाडीकडे आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सरकार आलेल्या संकटातून तरते का? ते येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एकजुटीने उभे राहिलेल्या विरोधी पक्षांसाठी महाराष्ट्रातील आघाडी सरकारवर ओढवलेले संकट धक्कादायक आहे.‘सरकार स्थिर आहे, सरकार पडणार नाही’ असे मुख्यमंत्र्यांसह आघाडीचे नेते छातीठोकपणे सांगत होते.

महाविकास आघाडी एकसंघ आणि मजबूत आहे, असा दृढविश्वास व्यक्त केला जात होता. सरकार कोसळत नसल्याने विरोधकांमधील अस्वस्थता दिवसेंदिवस वाढत होती. म्हणून मग सरकारचे नेतृत्व करणार्‍या शिवसेनेलाच खिंडार पडण्याची नियोजनबद्ध रणनीती आखली गेली. त्या जाळ्यात शिवसेनेचे काही आमदार वेगवेगळ्या कारणाने अडकले. सत्ताधारी पक्षांकडे बहुमत असताना राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत विरोधी पक्षाचा उमेदवार विजयी होण्यामागील रहस्य त्यावेळी उलगडले. विधानपरिषद निकाल लागला त्याच रात्री शिवसेनेतील फूटनाट्य सुरू झाले.

शिवसेना आणि फुटीर गट यांच्यात वर्चस्वावरून संघर्ष पेटला आहे. आघाडीची प्रतिष्ठा आणि सरकारचे अस्तित्व त्यात पणास लागले आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आता कायदेशीर लढ़ाईकडे झुकला आहे. राजकीय संघर्षात महाविकास आघाडी सरकार टिकणार का? पाच वर्षांची कारकीर्द पूर्ण करणार का? फुटीरांचे बंड यशस्वी होईल का? आघाडी सरकार जाऊन नवे सरकार येणार का? असे अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. त्याची उत्तरे नजीकच्या काळात मिळतील. त्यावरच महाराष्ट्रातील राजकारणाची पुढील दिशा ठरू शकेल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com