रविवार ‘शब्दगंध’ : यशवंतांच्या बहुआयामी यशोगाथा

jalgaon-digital
8 Min Read

यंदाच्या यूपीएससी परीक्षा निकालात (UPSC Exam Result) मुलींचाच चमकदार प्रभाव दिसून आला. गुणवत्ता यादीत पहिले तीन क्रमांक मुलींनी पटकावले आहेत. महाराष्ट्रातून (Maharashtra) प्रथम येण्याचा मानही मुलीनेच मिळवला आहे. यूपीएससी (UPSC) परीक्षार्थींच्या अशा कितीतरी बहुआयामी यशकथा असतील. यथावकाश त्या माध्यमांत प्रसिद्ध होतील. मात्र प्रत्येक यशाचे रूप वेगवेगळे आणि प्रेरणादायी आहे. सधन कुटुंबापासून ते साधारण स्थिती असलेल्या कुटूंबांतील मुलामुलींच्या यशाने सारेच थक्क झाले असतील.

कोणताही माणूस जीवनात सहजासहजी यशस्वी होऊ शकत नाही. दुर्दम्य आशावाद, प्रबळ इच्छाशक्ती, अखंड प्रयत्न, कष्टाची तयारी आणि प्रतिकूलतेवर मात करण्याची जिद्द त्याकरता अंगी असावी लागते. आयुष्यात आपल्याला काय मिळवायचे आहे? नेमके कुठे पोहोचायचे आहे? ते ठरवणे आवश्यक असते. मोठी स्वप्ने पाहावी लागतात. तसा प्रत्येक माणूस स्वप्नाळू असतो.

प्रत्येकाची स्वप्ने वेगळी असतात, पण नुसती स्वप्ने पाहून भागत नाही. स्वप्ने साकारण्यासाठी प्रयत्नांना कठोर परिश्रमांची जोड द्यावी लागते. प्रयत्न केल्याखेरीज कोणतीही गोष्ट साध्य होऊ शकत नाही. त्याशिवाय पाहिलेली स्वप्ने पूर्णत्वास जाऊ शकत नाहीत. ‘प्रयत्नांती परमेश्वर’ हा वाक्प्रचार त्यातूनच प्रचलित झाला असावा.

दरवर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) सनदी अधिकारीपदाची परीक्षा लाखो उमेदवार मोठ्या उमेदीने देतात, पण खूप कमी जण त्यात यशस्वी होतात. सर्वात कठीण परीक्षांपैकी एक म्हणून ही परीक्षा मानली जाते. केंद्रीय लोकसेवा आयोगाने गेल्या वर्षी 749 जागांसाठी परीक्षा घेतली. पूर्व, मुख्य आणि नंतर मुलाखत अशा तीन टप्प्यांत परीक्षार्थीची गुणवत्ता क्षमता आजमावली गेली.

त्यानंतर परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला. यशस्वी उमेदवारांमध्ये अभियांत्रिकी व व्यावसायिक अभ्यासक्रमांचे पदवीधर असणार्‍यांचा भरणा अधिक आहे. परीक्षेत यशवंत ठरलेल्या उमेदवारांच्या यशाची अनेक रूपे विविध माध्यमांतून पुढे येत आहेत. ती विस्मयकारक आणि कल्पनेपलीकडील आहेत.

काही जण सधन तसेच सनदी नोकरदार कुटुंबांतील आहेत. काही जण गरीब, सर्वसाधारण तर काही मध्यमवर्गीय कुटुंबांतीलसुद्धा आहेत. यश मिळवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्नांची शिकस्त केली. पास झालेल्यांमध्ये 6 ते 10 वेळा परीक्षा देऊन नशीब आजमावणारेदेखील आहेत. सावित्रीच्या लेकींनी आयोगाच्या यादीत पहिल्या पाचांत स्थान मिळवून यशाची कमान उत्तुंग राखली आहे.

यंदाच्या यूपीएससी परीक्षा निकालात मुलींचाच चमकदार प्रभाव दिसून आला. गुणवत्ता यादीत पहिले तीन क्रमांक मुलींनी पटकावले आहेत. महाराष्ट्रातून प्रथम येण्याचा मानही मुलीनेच मिळवला आहे. मूळची उत्तर प्रदेशातील आणि सध्या दिल्लीत राहणार्‍या श्रुती शर्माने (Shruti Sharma) प्रथम क्रमांक पटकावला. दुसरा क्रमांक अंकिता अग्रवाल (Ankita Agarwal) तर तिसरा क्रमांक गामिनी सिंगला (Gamini Singla) यांनी मिळवला.

अव्वलस्थान पटकावणार्‍या श्रुतीने यूपीएससी परीक्षेत (UPSC Exam) यश कसे मिळवले? याबद्दल सर्वांना उत्सूकता असणे स्वाभाविक आहे. अभ्यासाचे दडपण घेऊन अभ्यास करण्याकडे बहुतेकांचा कल असतो, पण श्रुतीच्या मते अभ्यासात किती तास घालवले ते महत्त्वाचे नाही. भाराभर पुस्तकांच्या गर्दीपेक्षा नेमकी आणि मोजकी पुस्तके, स्वत:ची टिपणे (नोटस्), दररोजचे वृत्तपत्र वाचन आणि उत्तरलेखनाचा सराव ही चतु:सूत्री तिच्या यशाचे गमक असल्याचे श्रुती सांगते.

यशाचा आणि तोही देशात प्रथम येण्याचा आनंद किती मोठा असतो ते माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या श्रुतीच्या हसर्‍या चित्रांतून दिसतो. दुसरा क्रमांक पटकावणारी अंकिता अग्रवाल बिहारची रहिवासी आहे. तिचे वडील व्यावसायिक आहेत. २०१९ मध्ये अंकिताने यूपीएससी परीक्षेत यश मिळवले होते, पण त्यात ती समाधानी नव्हती.

त्यापेक्षा जास्त मोठ्या यशाची महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या अंकिताने २०२१ ला पुन्हा परीक्षा दिली आणि अखेर मनाजोगते यश मिळवले. तिसरा क्रमांक मिळवणारी गामिनी सिंगला हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्याची रहिवासी आहे. आई आणि वडील डॉक्टर असलेल्या गामिनीला कुटुंबातून प्रेरणा व प्रोत्साहन मिळाले. बराच काळ केलेल्या प्रयत्नांचे फळ तिला अखेर मिळाले. उत्तर प्रदेशातील बिजनोर जिल्ह्याच्या स्मृती भारद्वाज आणि शुमायला चौधरी या दोन कन्यांनी यशाला गवसणी घातली आहे.

शुमायला एमबीबीएस पदवीधर आहे. डॉक्टर झाल्यानंतर तिने नागरी सेवा परीक्षेकडे मोर्चा वळवला. तीन प्रयत्नानंतर यशही मिळवले. पहिल्या आलेल्या श्रुतीची ती मैत्रीण आहे. बँक अधिकार्‍याची मुलगी असलेल्या स्मृतीने इलेक्ट्रॉनिकमध्ये अभियांत्रिकी पदवी मिळवली आहे. एका मुलीची आई असलेल्या आणि सासरच्या छळाला कंटाळून माहेरी आलेल्या उत्तर प्रदेशातील हापूडच्या शिवांगी गोयलने कठीण परिस्थितीत यूपीएससी परीक्षा देण्याचे ठरवले.

सनदी अधिकारी व्हायचे तिचे स्वप्न आधीपासूनच होते. दोनदा तिने परीक्षाही दिली होती, पण लग्न झाल्याने तिचे प्रयत्न अर्ध्यावर थांबले. माहेरी आल्यावर वडिलांनी तिला परीक्षेसाठी प्रोत्साहित केले. तिने मनापासून अभ्यास सुरू केला. त्या प्रयत्नांना आता यशाचे मधूर फळ आले आहे. सासरच्या छळाने नाराज झालेल्या शिवांगीने नशिबाला दोष न देता इच्छाशक्तीच्या बळावर यशस्वी होऊन स्वतःचे भविष्य घडवले.

आईचे पाठबळ, शिक्षकाचे प्रोत्साहन आणि आर्थिक पाठबळामुळे विशालचे यूपीएससी परीक्षा पास होण्याचे स्वप्न साकार झाले. 484 व्या क्रमांकाने तो पास झाला. उत्तर प्रदेशातील मुजफ्फरपूरचा तो रहिवासी आहे. विशालला कठीण परिस्थितीत शिक्षकांनी वेळोवेळी केलेल्या आर्थिक मदतीमुळे तो अभियांत्रिकी पदवी शिक्षण पूर्ण करू शकला. एक दिवस माझा मुलगा मोठा माणूस बनेल, असे त्याचे वडील म्हणत. पित्याचे ते स्वप्न विशालने त्यांच्या मृत्यूपश्चात साकार केले आहे.

झारखंडमधील महत्वाकांक्षी श्रुती राजलक्ष्मीने आयटी क्षेत्रातील चांगली नोकरी सोडून यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. अभ्यासात लक्ष घातले. आई-वडिलांसह आजी-आजोबांनी तिला प्रोत्साहित केले. निर्धाराने ती परीक्षेला सामोरी गेली आणि 25 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. परीक्षेची तयारी करताना स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवला पाहिजे, असे ती म्हणते.

यूपीएससी परीक्षेत यश मिळवण्यासाठी तासन तास अभ्यासात गढून घ्यावे लागते, असा बहुतेकांचा समज आहे, पण दिल्लीतील ऐश्वर्य वर्माने तो भ्रम खोटा ठरवला. अभ्यासात थोडा वेळ काढून तो क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळत असे. त्यामुळे मनावरचा अनावश्यक ताण कमी व्हायला मदत झाली. ‘परिश्रम करीत राहा, परिणामाची चिंता करू नका’ हा आपल्या यशाचा मंत्र असल्याचे ऐश्वर्य सांगतो.

महाराष्ट्रातून दरवेळी किमान 100 तरुण-तरुणी यूपीएससी परीक्षेत यश मिळवतात. यावर्षी ते प्रमाण घसरून 60 वर आले आहे. तरीसुद्धा पहिल्या शंभर यशवंतांत महाराष्ट्रातील 5 उमेदवार आहेत. प्रियंवदा म्हाडळकरने राज्यात पहिले स्थान पटकावले. अभियांत्रिकी, एमबीए ते इन्व्हेस्टमेंट बँकिंगपर्यंतचा प्रवास तिला मोठ्या बँकांपर्यंत घेऊन गेला खरा, पण सनदी अधिकारी होण्याचे तिचे स्वप्न होते.

सहा वर्षे बँकेत नोकरी करणार्‍या प्रियंवदाने स्वप्न पूर्ण करण्यासाठी नोकरी सोडून अभ्यासावर लक्ष केंद्रीत केले. स्वयंअध्ययनावर तिचा भर होता. त्याचा तिला फायदा झाला. निश्‍चय दृढ असेल तर कोणतेही आव्हान स्वीकारता येते आणि यश खेचून आणता येते, हा महत्वाचा संदेश 13 प्रयत्नांनंतर यश मिळवणारे व सध्या समाजकल्याण अधिकारी असणारे अलीगडचे रिंकू सिंह, तसेच नेत्रहीन असताना डोळसपणे अभ्यास करून यूपीएससी परीक्षेत 7 वा क्रमांक मिळवणाऱ्या सम्यक जैनसारखे यशस्वी तरुण देतात.

परीक्षेत यश मिळवलेल्या यशस्वीतांचे सध्या कोड-कौतुक सुरू आहे. त्याचवेळी बरीच मेहनत घेऊनसुद्धा यशाने हुलकावणी दिलेले उमेदवारसुद्धा आहेत. यूपीएससी परीक्षेत 10 वेळा प्रयत्न करून, 6 वेळा मुख्य परीक्षा पास होऊन आणि 4 वेळा मुलाखती देऊनसुद्धा यशाला गवसणी घालता न आलेल्या जिद्दी तरुणाची कहाणी मनाला भिडणारी आहे. ’एवढे प्रयत्न करूनही निवड झाली नाही, नशिबात काय लिहिले ठाऊक नाही’, असे ट्विट करून कुणाल विरलकरने भावनांना वाट मोकळी करून दिली.

त्याला अनेकांनी प्रतिसाद देत प्रयत्न जारी ठेवण्याचा सल्ला दिला आहे. सिव्हील इंजिनिअर असलेल्या रजत संब्याल नामक तरुणानेसुद्धा गुणपत्रिका ट्विट करून परीक्षेतील अपयशाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. दहा वर्षांचे प्रयत्न व्यर्थ ठरले. 6 वेळा परीक्षा दिली. 3 वेळा पूर्वपरीक्षेत आणि 2 वेळा मुख्य परीक्षेत अपयशी ठरलो. अखेरच्या प्रयत्नात मुलाखतीत 11 गुण कमी पडल्याने पास होता आले नाही. तरीही मी पुढे जाईन, असा आत्मविश्वास त्याने व्यक्त केला आहे.

यूपीएससी परीक्षार्थींच्या अशा कितीतरी बहुआयामी यशकथा असतील. यथावकाश त्या माध्यमांत प्रसिद्ध होतील. मात्र प्रत्येक यशाचे रूप वेगवेगळे आणि प्रेरणादायी आहे. सधन कुटुंबापासून ते साधारण स्थिती असलेल्या कुटूंबांतील मुलामुलींच्या यशाने सारेच थक्क झाले असतील.

श्रुतीपासून शिवांगी आणि पुढे विशालपर्यंतची उदाहरणे यूपीएससीत यशाचे झेंडे रोवण्याचे मनसुबे रचणार्‍या व तसे प्रयत्न करणार्‍या ध्येयवादी तरुण-तरुणींचा उत्साह वाढवणारी आहेत. अशा कितीतरी यशकथा वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या आणि समाज माध्यमांवर वाचावयास मिळत आहेत. यूपीएससीकडे कल असणार्‍या आणि परीक्षेची तयारी करणार्‍या तरुण-तरुणींसाठी या यशकथा प्रोत्साहन देत राहतील.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *