रविवार ‘शब्दगंध’ : इकडे-तिकडे चोहीकडे, खड्डेच खड्डे वेडेवाकडे!

- एन. व्ही. निकाळे
रविवार ‘शब्दगंध’ : इकडे-तिकडे चोहीकडे, खड्डेच खड्डे वेडेवाकडे!

रस्त्यांची (Roads) दुर्दशा झाल्याची किंवा रस्त्यांवर खड्डे (Road Pathholes) पडल्याची ओरड आजकाल गावागावांतून तसेच शहरी भागातूनही होत आहे. वृत्तवाहिन्या व वृत्तपत्रांतून त्याबाबत सचित्र बातम्या प्रसिद्ध होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग (Public Works Department), पालिका वा मनपांकडे रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत लोक तक्रारी करीत आहेत. लोकप्रतिनिधींनाही जाब विचारत आहेत. लोकांच्या तक्रारींनी हैराण झालेल्या काही लोकप्रतिनिधींवर रस्ते सुधारणेकडे लक्ष पुरवण्याबाबत सरकारी यंत्रणांना इशारा देण्याची वेळ आली आहे...

दोन वर्षांपासून पर्जन्यराजा महाराष्ट्रावर (Maharashtra) प्रसन्न आहे. यंदा सलग तिसर्‍या वर्षी समाधानकारक पाऊस बरसत आहे. बहुतेक सर्वत्र जलाशय जवळपास तुडुंब भरले आहेत. राज्यात जलसमृद्धी आली आहे. अतिवृष्टी वा ढगफुटीसदृश घटनांनी अनेक भागात पूरस्थितीचे संकट उद्भवले. घरेदारे पाण्याखाली गेली. अनेकांचे व्यवसाय, शेतीवाडीचे अमाप नुकसान झाले.

चालू वर्षी आणखी एका नुकसानीला संततधार पावसाने हातभार लावला. ती म्हणजे बहुतेक ठिकाणचे लहान-मोठे रस्ते, राज्यमार्ग आणि महामार्गांवरसुद्धा खड्ड्यांची नक्षी तयार झाली आहे. ‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ते?’ या प्रश्नाच्या उत्तराबाबत यंदा शंका राहिलेली नाही.

गावापासून तालुक्यापर्यंत, तालुक्यापासून जिल्हा ठिकाणांपर्यंत आणि महानगरांपासून राज्याच्या राजधानी-उपराजधानीपर्यंत सर्वत्र ही समानता आढळत आहे. रस्त्यांची दुरवस्था तशी दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसांत नजरेस पडते. ‘नेमिचि येतो पावसाळा’प्रमाणे पावसाळ्यात रस्त्यांचे डांबर उखडून आतील खडी बाहेर येते.

जागोजागी खड्डे पडतात. अर्थात रस्त्यांच्या दुरवस्थेला केवळ पावसाला बोल लावून चालणार नाही. ग्रामीण भागात रस्त्यांवर खड्डे नेहमीचेच! रस्ताकामानंतर अथवा दुरुस्तीनंतर अल्पावधीत पडणारे खड्डे त्याच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह लावतात. अर्थात हजारोंचा रोजगार त्या खड्ड्यांमुळेच चालू राहतो हेही खरे!

रस्त्यांची दुर्दशा झाल्याचे वा रस्त्यांवर खड्डे पडल्याची ओरड आजकाल गावागावांतून आणि शहरी भागातूनही होत आहे. वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांमधून त्याबाबतच्या सचित्र बातम्या प्रसिद्ध होत आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभाग, पालिका अथवा मनपांकडे रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत लोक तक्रारी करीत आहेत. लोकप्रतिनिधींना जाब विचारत आहेत. लोकांच्या तक्रारींनी हैराण झालेल्या काही लोकप्रतिनिधींवर रस्त्यांच्या सुधारणेकडे लक्ष पुरवण्याबाबत सरकारी यंत्रणांना इशारा देण्याची वेळ आली आहे. डोंबिवलीतील एक घटना ताजी आहे.

तेथील रस्त्यावर पडलेला खड्डा वाहनचालकांच्या लक्षात यावा व त्यांचा संभाव्य अपघात टळावा म्हणून एका जागरूक नागरिकाने त्या खड्ड्यात झाडाची कुंडी ठेवली होती. मात्र दुर्दैवाने ती कुंडी कोणा वृक्षप्रेमीने उचलून गेली. त्या खड्ड्यामुळे एका दुचाकीस्वाराचा अपघात होऊन तो जखमी झाला. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी देशातील रस्ते अपघातांबाबतची आकडेवारी दिली आहे.

खड्ड्यांमुळे 2020 मध्ये 3,564 अपघात घडले, त्यात 3,500 लोकांचा बळी गेला, असे ते म्हणतात. केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाच्या एका अहवालात मुंबईतील अपघातांबाबत (Accidents) माहिती दिली गेली आहे. मुंबईत रस्त्यांतील खड्ड्यांमुळे 2016 ते 2019 या कालावधीत अपघात होऊन 10 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे त्यात नमूद आहे.

रस्त्यांतील खड्डे किती जीवघेणे ठरू शकतात याचा अंदाज यावरून येतो. अपघाताला इतरही अनेक कारणे असली तरी रस्त्यांवरचे खड्डे त्यापैकी एक महत्त्वाचे कारण आहे. म्हणून खड्डे पडू नयेत इतके उत्तम रस्ते बनवता येत नाहीत तोपर्यंत खड्ड्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

आजकाल प्रमुख मार्ग तसेच महामार्गांचे काम आणि त्यांच्या देखभालीसाठी बीओटी पद्धत अवलंबली जाते. रस्ताकाम अथवा उड्डाणपुलावर झालेला खर्च भरून काढण्यासाठी ठिकठिकाणी टोलनाके उभारले गेले आहेत. रस्त्यांवरून येणार्‍या-जाणार्‍या प्रत्येक वाहनावर टोल आकारला जातो. टोल देणार म्हटल्यावर चांगल्या रस्त्यांची अपेक्षा लोक ठेवणारच!

रस्त्यांच्या दुरवस्थेकडे पालिका, मनपा किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग आदींचे लक्ष वेधण्यासाठी नागरिक वेळोवेळी आंदोलने करतात. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनाही बिनपगारी रोजगार मिळतो. मोर्चे आणि आंदोलनांची रेलचेल होते. काही कल्पक कार्यकर्ते रस्त्यांवरील खड्ड्यांत झाडे लावतात.

कोणीतरी रांगोळी काढून खड्डेच सजवून संबंधित यंत्रणेचे त्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. अशा क्लृप्त्या कधी-कधी कामी येतात. रस्त्यांची दुरुस्ती क्वचित-क्वचित तातडीनेही केली जाते. खड्डे बुजवले जातात. आंदोलन सत्कारणी लागल्याचे समाधान नागरिक वा पक्ष कार्यकर्त्यांना मिळते.

तथापि बर्‍याचदा आंदोलने होऊनसुद्धा रस्त्यांची सुधारणा होत नाही. रस्त्यांच्या दुर्दशेकडे दुर्लक्ष केले जाते. खड्डे बुजवले न गेल्यास त्यांची संख्या आणि आकारसुद्धा वाढत जातो. असे खड्डे अपघाताला कारण ठरून जीवघेणे ठरतात.

शहरी भागात रस्त्यांची दुरुस्ती पालिका वा मनपा प्रशासनाकडून यथावकाश केली तरी जाते, पण गावांकडील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी लोकांना पिढ्यान् पिढ्या प्रतीक्षा करावी लागते. दोन गावांना जोडणार्‍या रस्त्यांवर खड्डे पडले असतील तर त्या रस्त्यांवरून वाहने चालवणे कसरत करण्यासारखेच असते. खड्डे चुकवून वाहने चालवणे एखाद्या दिव्यापेक्षा कमी नसते.

रुग्णांना दवाखान्यात घेऊन जाणे, लहान मुले, गरोदर स्त्रिया किंवा वयोवृद्धांना खड्ड्यांच्या रस्त्यांवरून नेणे म्हणजे त्यांच्या सुटकेची तत्पर व्यवस्थाच करणे होय. खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होते. खड्डे चुकवण्याच्या नादात वाहने एकमेकांवर आदळतात. वाहनांचे नुकसान होते.

त्यातील चालक आणि प्रवासी जखमी होतात. प्रसंगी एखाद्याच्या जीवही जातो. रस्ताकामांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी विशिष्ट व्यवस्था आहे, रस्त्यांची कामे दर्जेदार व्हावीत यावर ती व्यवस्था देखरेख करते, असे सांगितले जाते, पण त्याचा अनुभव लोकांना क्वचितच येतो. देखरेख यंत्रणा असूनही रस्त्यांची दुर्दशा का होते? रस्त्यांवर खड्डे कसे पडतात? असे प्रश्न लोकांना पडत राहतात.

रस्ते चांगले असल्यावर वाहने भरधाव चालवली जातात, त्यातून अपघातांची शक्यता वाढते, असे सांगून खराब रस्त्यांमुळे वाहनांचा वेग मर्यादित राहून अपघात टळू शकतात, असे समर्थनही काही महाभाग करीत असतात. मात्र ते मूळ प्रश्नाला बगल देणारे ठरते.

राज्यात महत्त्वाकांक्षी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग निर्मितीचे काम वेगात सुरू आहे. राज्यातून जाणार्‍या इतरही काही जलदगती महामार्गांची (एक्स्प्रेस वे) कामेही प्रस्तावित आहेत. महानगरांमध्ये उड्डाणपूल, प्रशस्त रस्ते, सर्व्हिस रोड, वर्तुळाकार मार्ग (रिंगरोड) आदी कामांना प्राधान्य दिले जात आहे.

पुणे तसेच नागपूर येथे मेट्रो सुविधा होत आहेत. इतर शहरांसाठीही मेट्रोची घोषणा झाली आहे. लोकांचा प्रवास जलद, सुरक्षित आणि सुखकर व्हावा यासाठीच हा सगळा प्रपंच सुरू आहे ना? मग अस्तित्वातील रस्ते बारमाही सुस्थितीत व खड्डेरहित राहतील यासाठी योग्य ती खबरदारी का बाळगली जाऊ नये?

वाहनचालकांना सुरक्षिततेसाठी रस्ते वाहतुकीबाबत अनेक नियम घालून देण्यात आले आहेत. त्या नियमांचे काटेकोर पालन प्रत्येक वाहनचालकाने करावे, असा आग्रह धरला जातो. तो रस्तही आहे. स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षेसाठी नियमपालनाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. त्याबद्दल आक्षेप घेण्याचे कारण नाही.

अपघाताला फक्त वाहनचालकाचा हलगर्जीपणा अथवा बेजबाबदारपणाच कारणीभूत असतो असे नाही. खड्ड्यांकडे सतत दुर्लक्ष करणार्‍या संबधित सरकारी यंत्रणा व सेवकही त्याला जबाबदार नाहीत का? चालकाने सर्व नियम पाळूनसुद्धा कधी-कधी अपघात घडतात. रस्त्यांची स्थिती चांगली नसणे हे अपघातांच्या कारणांपैकी एक प्रमुख कारण ठरते.

एखादा रस्ता तयार केल्यावर पाऊस अथवा वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे त्या रस्त्यावर किमान पाच वर्षे तरी कोणताही परिणाम होणार नाही किंवा त्यावर खड्डे पडणार नाहीत, अशा तर्‍हेचे अत्याधुनिक तंत्रज्ञान रस्ताकामांसाठी प्रगत देशांत विकसित झाले आहे.

ते तंत्रज्ञान भारतात आणून गावांपासून राजधानीपर्यंतच्या रस्त्यांचा टप्प्याटप्प्याने कायापालट करण्याचा देशव्यापी कार्यक्रम हाती का घेतला जाऊ नये? खराब रस्त्यांमुळे होणारे अपघात, हकनाक जाणारे बळी, आर्थिक नुकसान, मन:स्ताप हे सर्व कायम असणे नव्या भारताच्या स्वप्नसुंदर चित्राला कितपत सुसंगत ठरेल?

लोकांचे दैनंदिन जीवन सुलभ व्हावे म्हणून त्यांना चांगले रस्ते उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. लोकांनी निवडून दिलेल्या राज्यकर्त्यांची ती जबाबदारी आहे. देशाला नवी दिशा दाखवणारे राज्य म्हणून महाराष्ट्राचा लौकिक आहे. दर्जेदार रस्त्यांबाबत एखादी द्रूतगती योजना आखली गेली व त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिल्यास राज्यातील दळणवळण आहे त्यापेक्षा गतिमान होईल. राज्याच्या प्रगतीला ते पूरक ठरेल.

Related Stories

No stories found.