रविवार ‘शब्दगंध’ : नाशिककरांचा प्रवास सुखकर होवो!

- एन. व्ही. निकाळे
रविवार ‘शब्दगंध’ : नाशिककरांचा प्रवास सुखकर होवो!

नाशिक (Nashik) महानगराला सक्षम बससेवेची गरज होती. ती गरज पूर्ण करण्याच्या दिशेने मनपाने (Nashik NMC) टाकलेले पाऊल आशादायक आहे. नाशिकच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत व एका उपनगरातून दुसर्‍या उपनगरापर्यंत सहजपणे पोहोचता यावे या दृष्टीने मनपाने लक्ष पुरवल्यास मनपा बससेवेला (NMC Bus Service) प्रवाशांचा प्रतिसाद आणखी वाढू शकेल. प्रवाशांच्या गरजेनुसार आणि मागणीप्रमाणे बससेवेत लवचिकता ठेवली गेली तर तोट्याचे वाटणारे मार्गदेखील फायद्याचे ठरू शकतील. तसे झाल्यास सार्वजनिक वाहतूकसेवेचा वापर करण्याकडे लोकांचा कल वाढेल.

एसटी महामंडळाने नाशिकच्या शहर बससेवेतून अंग काढून घेतल्यानंतर नाशिककरांना बससेवा पुरवण्याचे आव्हान नाशिक मनपाने स्वीकारले. मनपाची बहुचर्चित बससेवा चालू वर्षी 8 जुलैस सुरू झाली. ‘सिटी लिंक’ (Citilinc) नावाने सुरू झालेल्या या सेवेला नुकतेच तीन महिने पूर्ण झाले आहेत. ही सेवा हळूहळू बाळसे धरू लागली आहे.

पहिल्या टप्प्यात 12 मार्गांवर 51 बसेस सुरू करण्यात आल्या. त्याला नाशिककरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद पाहून 1 सप्टेंबरपासून बसेसची संख्या वाढवण्यात आली आहे. आणखी 4 नव्या मार्गांवर बससेवा उपलब्ध करण्यात आली आहे.

लोकार्पणानंतर पहिल्या दिवशी पंधराशे प्रवाशांनी बससेवेचा लाभ घेतला होता. प्रवासी संख्येत आता दिवसेंदिवस वाढ होत आहे. दररोज 20-21 हजार प्रवासी ‘सिटी लिंक’ला मिळत असल्याचा दावा नाशिक महानगर परिवहन महामंडळाने केला आहे. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता मनपाचे धाडस सार्थकी लागण्याची सकृतदर्शनी चिन्हे आहेत.

ते पाहून नाशिक मनपालाही हायसे वाटत असेल. टप्प्याटप्प्याने बससेवा वाढवून मार्ग विस्ताराचे शिवधनुष्य नाशिक महानगर परिवहन महामंडळ पेलण्याचा प्रयत्न करीत आहे. नाशिककरांना सेवा पुरवताना मनपा बससेवेने अल्पावधीत बरीच मजल गाठली असे म्हटले पाहिजे.

नाशिकची शहर बससेवा तोट्यात असल्याने एसटी महामंडळाला ती परवडत नव्हती. ही सेवा लवकरात लवकर ताब्यात घ्या, असा लकडा एसटीने नाशिक मनपाकडे बऱ्याच काळापासून लावला होता. मात्र हा भार स्वीकारायला मनपा राजी नव्हती. नाशिक मनपात सध्या भाजपची सत्ता आहे. नाशिकचे पालकत्व घेतलेल्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मनपाला बससेवा सुरू करण्यात पुढाकार घेण्याचा निर्देशवजा आदेश दिला होता.

तो मनपाला टाळता आला नाही. अखेर शहरात बससेवा चालवण्यासाठी नाशिक मनपाने कंबर कसली. कंत्राटी पद्धतीने सेवा सुरू करण्यासाठी परवान्यापासूनचे सर्व सोपास्कार पूर्ण करता-करता आणि प्रत्यक्ष सेवारंभाला 2021 साल उजाडले.

बससेवा सुरू करायला आधी 2020 मध्ये 1 एप्रिलचा मुहूर्त ठरला होता, पण तो टळला. मग महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त ठरवला गेला, पण तोही वाया गेला. त्यानंतर चालू वर्षीच्या प्रजासत्ताकदिनाची तारीख ठरवली गेली होती. तरीही मनपा बससेवा सुरू होऊ शकली नाही.

भल्या-भल्यांना करोनाचा फटका बसला. त्यातून मनपा बससेवाही सुटली नाही. अखेर 8 जुलैची तारीख नक्की झाली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते बससेवेचे लोकार्पण झाले. त्याच दिवशी दुपारपासून मनपाच्या बसेस शहरात धावू लागल्या.

सुरूवातीला 9 मार्गांवर सुरू झालेली ही सेवा अल्पावधीत विस्तारली आहे. बसेस संख्याही वाढवण्यात आली आहे. याचा अर्थ सुरू केलेल्या बससेवेबाबत मनपा आशावादी आहे असे दिसते. मनपाच्या ‘सिटी लिंक’ बसेस सीएनजीवर धावत आहेत. त्यामुळे डिझेल दरवाढीच्या भारापासून ही सेवा वाचली आहे.

नाशिक मनपाची बससेवा सुखासुखी सुरू झालेली नाही. कारण मुंबई-पुणे आदी मनपांचा बससेवेचा अनुभव फारसा सुखद नाही. त्या-त्या मनपांना वर्षानुवर्षे बससेवा नफ्यात चालवता आलेल्या नाहीत. त्यामुळे काहीशा अनिच्छेनेच मनपा बससेवेसाठी तयार झाली हे जगजाहीर आहे.

पालक-मुख्यमंत्र्यांचा आदेश पडत्या फळाची आज्ञा मानून बससेवेची जबाबदारी मनपाला स्वीकारावी लागली. नाशिककरांनी मनपाच्या या धाडसी उपक्रमाला अनुकूल प्रतिसाद द्यायला सुरूवात केली आहे. प्रवाशांच्या गर्दीच्या वेळा आणि वेगवेगळ्या मार्गांवरील प्रतिसाद लक्षात घेऊन त्यानुसार बसेस सोडल्या जात आहेत.

उगाचच रिकाम्या बसेस रस्त्यावर धावल्या पाहिजेत हा अट्टाहास बागळला जात नाही. इंधनभार नाहक वाढणार नाही आणि फेर्‍याही तोट्याच्या ठरणार नाहीत याची पुरेपूर काळजी नाशिक महानगर परिवहन महामंडळ घेत आहे ते योग्यच आहे.

महानगर परिवहन महामंडळाकडून नव्या मार्गांवर बसेस सुरू करण्यात येत आहेत. सध्या 20 मार्गांवर बसेस धावत आहेत. दैनंदिन 20 हजार प्रवाशांचा टप्पा पार करण्यात ही सेवा यशस्वी ठरली आहे. नाशिक परिसरातील विविध उपनगरांमधील प्रवाशांकडून बससेवा सुरू करण्याची मागणी होत आहे.

इतर मनपा बससेवांबाबत आलेल्या कटू अनुभवाला नाशिक मनपा अपवाद ठरण्याची शक्यता आहे. तसे झाले तर फायद्यात शहर बससेवा चालवणारी मनपा आणि परिवहन महामंडळ म्हणून नाशिक मनपा व नाशिक महानगर परिवहन महामंडळाला मान मिळू शकेल.

एसटी महामंडळासह अनेक मनपांसमोर नवा आदर्श नाशिक मनपाला ठेवता येईल. मात्र त्यासाठी मनपा प्रशासन, महानगर परिवहन महामंडळ, पदाधिकारी यांची भूमिका आणि प्रवासी वाहतुकीबाबत चालक-वाहक यांची झोकून काम करण्याची तयारी यावर बरेच काही अवलंबून असेल.

नाशकात धावणार्‍या मनपा बसेस नव्याकोर्‍या, अत्याधुनिक व आकर्षक आहेत. त्यात तंत्रज्ञानाचा यथायोग्य वापर करण्यात आला आहे. शिवाय बसेस स्वच्छ आणि चकचकित आहेत. या बसेस प्रवाशांचे आकर्षण ठरल्या आहेत. आतापर्यंत एसटीच्या लाल रंगाच्या शहरी बसेस पाहायला मिळत होत्या. मात्र त्याजागी आता मनपाच्या हिरव्या आणि निळ्या रंगातील बसेस धावू लागल्या आहेत.

नेहमीच्या ओळखीच्या रंगाच्या बसेस नसल्याने प्रवासी संभ्रमात पडत आहेत. तथापि बसमध्ये बसल्यावर आपापल्या भागातील बसफेर्‍यांबाबत प्रवासी वाहकांकडे चौकशी करताना आढळतात.

एसटीप्रमाणेच मनपाच्या ‘सिटी लिंक’ बसेसमधून प्रवास करण्यासाठी लहान मुले, विद्यार्थी, अंध-अपंग तसेच नियमित प्रवाशांना विशेष सवलतीही देऊ केल्या आहेत. टप्प्याटप्प्याने बससंख्येत वाढ करून त्या अडीचशेपर्यंत वाढवण्याचे नियोजन मनपाने केले आहे. यथावकाश पूर्णक्षमतेने बससेवा मिळू लागल्यावर नाशिककरांचा प्रवास अधिक वेगवान, सुखकर आणि सुलभ व्हायला मदत होऊ शकेल.

नाशिक महानगराला सक्षम बससेवेची गरज होती. ती गरज पूर्ण करण्याच्या दिशेने मनपाने टाकलेले पाऊल आशादायक आहे. नाशिकच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत व एका उपनगरातून दुसर्‍या उपनगरापर्यंत सहजपणे पोहोचता यावे या दृष्टीने मनपाने लक्ष पुरवल्यास मनपा बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद आणखी वाढू शकेल. नाशिकमध्ये आजही असे काही भाग आहेत की, तेथील नागरिकांना नाशकात येण्यासाठी रिक्षा किंवा खासगी वाहनांचा आसरा घ्यावा लागतो.

प्रवाशांच्या गरजेनुसार आणि मागणीप्रमाणे बससेवेत लवचिकता ठेवली गेली तर तोट्याचे वाटणारे मार्गदेखील फायद्याचे ठरू शकतील. तसे झाल्यास लोकांना स्वत:ची दुचाकी वा चारचाकी वाहने रस्त्यावर आणण्याची गरज पडणार नाही.

सार्वजनिक वाहतूकसेवेचा वापर करण्याकडे लोकांचा कल वाढेल. साहजिकच रस्त्यांवरील वाहनांची गर्दी आणि त्यामुळे चौकाचौकांत होणारी वाहनकोंडी कमी होईल, अशी अपेक्ष करता होईल. तसे झाले तर केवळ प्रतिष्ठेसाठी रस्त्यावरील वाहनांच्या वर्दळीत भर घालणाऱ्यांचा दृष्टिकोनही बदलू शकेल.

मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक महानगरांत मनपा बससेवा सुरू आहेत. मात्र तेथील मनपांचा त्याबाबतचा अनुभव फारसा उत्साहवर्धक नाही. तेथील सेवा तोट्यातच असल्याचे सांगितले जाते. ही उदाहरणे डोळ्यांसमोर असतानासुद्धा नाशिक मनपाने आता पाण्यात उडी घेतलीच आहे.

त्यामुळे हातपाय तर हलवावे लागणारच! बससेवा तोट्यात जावू नये व ते ओझे मनपाला डोईजड होऊ नये यासाठी नाशिक महानगर परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक योग्य ती खबरदारी घेतील यात कोणाला शंका नसावी.

मर्यादित उत्पन्नात नागरिकांना सोयी-सुविधा पुरवण्यासाठी मनपाला तारेवरची कसरत करावी लागते. शहर बससेवा चालवणे नाशिक मनपाला पांढरा हत्ती पोसण्यासारखे ठरेल का? असा सवाल केला जात आहे. शहर बससेवेचा भार मनपाला किती पेलवेल? या प्रश्नाच्या उत्तरासाठी किमान काही वर्षांचा काळ तरी जावा लागेल. त्यानंतरच शहर बससेवा सुरू करण्याचा मनपाने घेतलेला निर्णय किती फायद्याचा वा आतबट्ट्याचा ठरला ते स्पष्ट होईल.

नाशिक महानगर परिवहन महामंडळाने बससेवेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाशिक शहरालगतच्या ओझर, सिन्नर, गिरणारे, पिंपळगाव आदी भागात तेथील प्रवाशांच्या मागणीनुसार नुकतीच बससेवा सुरु केली आहे. मात्र या सेवेला एसटी महामंडळाच्या एका कामगार संघटनेने आक्षेप घेतल्याच्या बातम्या वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाल्या आहेत.

विशेषतः नाशिक-सिन्नर मार्गावर नुकत्याच सुरू झालेल्या मनपा बससेवेला विरोध केला जात आहे. या मार्गावर एसटी महामंडळाच्या सिन्नर आगाराला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते असे म्हटले जात आहे. मनपा बससेवेमुळे हे उत्पन्न घटण्याची भीती व्यक्त होत आहे. साहजिकच बससेवा पुरवण्यावरून मनपाचे नाशिक महानगर परिवहन महामंडळ आणि एसटी महामंडळ यांच्यात नवा तंटा उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एसटी महामंडळाला गेल्या वर्षी करोना संकटाचा जबर फटका बसला. बससेवा बंद ठेवावी लागल्याने मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले. एसटी सेवकांचे पगार रखडले होते. आता उत्पन्नवाढीसाठी एसटी महामंडळ प्रयत्नशील आहे. एसटी महामंडळ राज्य शासनाचा उपक्रम आहे. नाशिक मनपादेखील निमशासकीय संस्था आहे.

या दोन्ही संस्थांमध्ये तंटा उभा राहणे योग्य नाही. दोन्ही संस्थांचे पदाधिकारी आणि अधिकारी यांनी परस्पर समन्वयातून सन्मान्य तोडगा काढण्याची आवश्यकता आहे. ’एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ’ या भूमिकेतून दोन्ही संस्थांनी काम केले तर त्यातून प्रवाशांचे भले होईल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com