Sunday, April 28, 2024
Homeब्लॉगरविवार ‘शब्दगंध’ : भाजपची महालाट, आआपाचा झंझावात!

रविवार ‘शब्दगंध’ : भाजपची महालाट, आआपाचा झंझावात!

लोकसभा निवडणुकीआधी (Election) भाजपला (BJP) उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) घेरण्याचे विरोधकांचे मनसुबे आपसातील स्पर्धेने तूर्त तरी उधळले आहेत. एकजुटीचा नारा देता-देता 5 राज्यांच्या निवडणुका आल्या आणि पराभव देऊन गेल्या, पण समर्थ पर्याय देण्याच्या दिशेने विरोधकांचे पाऊल पडलेच नाही. आगामी लोकसभा निवडणूक कोणाच्या नेतृत्वात लढायची याच प्रश्नाभोवती विरोधकांच्या ऐक्याचा अश्वमेध अडखळत आहे.

लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) ‘रंगीत तालीम’ समजल्या गेलेल्या उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल (Results of Assembly elections in 5 states) नुकतेच घोषित झाले आहेत. सत्ता असलेल्या चारही राज्यांत भाजपने (BJP) विजय मिळवला. उत्तर प्रदेशात सत्ताधारी पक्ष सलग दुसर्‍यांदा विजयी होत नाही, हा 37 वर्षांचा इतिहासही भाजपने बदलला.

- Advertisement -

मोदी आणि योगी यांच्या दुहेरी नेतृत्वात उत्तर प्रदेशची निवडणूक भाजपने पुन्हा जिंकली व सत्ता राखली आहे. पंजाबात मात्र काँग्रेस (Congress), भाजपसह सर्व पक्षांना पराभवाची धूळ चाखावी लागली. किंबहुना त्या सर्वांची धूळधाण झाली. आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) चमकदार कामगिरी नोंदवली आहे. पाचपैकी एकाही राज्यात काँग्रेस पक्ष कमाल दाखवू शकला नाही.

विजयाचा चौकार मारणार्‍या भाजपला पंतप्रधान मोदींच्या चेहर्‍याने पुन्हा तारले आहे. गेल्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात 312 जागांचे मजबूत बहुमत भाजपने मिळवले होते. यावेळी भाजपला 255 जागा मिळाल्या. म्हणजे 57 जागा घटल्या आहेत. समाजवादी पक्षाने भाजपला चांगली टक्कर दिली.

छोट्या पक्षांना सोबत घेण्याचा अखिलेश यादव यांचा मुत्सद्दीपणा पक्षाच्या जागा दुपटीने वाढवणारा ठरला. गेल्या वेळी 47 जागा जिंकणार्‍या समाजवादी पक्षाला यावेळी 111 जागा मिळाल्या आहेत. उत्तराखंडमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा सरळ मुकाबला झाला. त्यात भाजप सरस ठरला, पण मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी पराभूत झाले. ‘गड आला, पण सिंह गेला’ या वाक्प्रचारची आठवण भाजपला देणारा हा निकाल ठरला आहे. मणिपुरात (Manipur) भाजपने स्वबळावर विजय मिळवला आहे.

मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज सर्वच पक्षांनी नेहमीप्रमाणे चुकीचे ठरवले. तरीसुद्धा जनादेशाच्या सर्वसाधारण कलाचे संकेत त्यातून दिले गेले होते. पंजाबात (Punjab) आआपाला बहुमत मिळण्याचा अंदाज खरा ठरला. मात्र त्या अंदाजापेक्षा घवघवीत यश आआपाने मिळवले. 2017 साली सर्वाधिक जागा जिंकणार्‍या काँग्रेसच्या गाफिलपणाचा लाभ उठवून गोव्यात सरकार स्थापन करणारा भाजप यंदा स्वबळावर 20 जागा मिळवून बहुमताजवळ पोहोचला आहे.

गोव्यात (Goa) भाजपला 33.3 टक्के मते मिळाली. भाजपविरोधात लढणार्‍या काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस या 3 पक्षांच्या मतांची एकत्रित बेरीज 35.5 टक्क्यांवर जाते. म्हणजेच हे तिन्ही पक्ष तडजोडीने एकत्र लढले असते तर गोव्यातील चित्र बदलले असते. मात्र हेवेदावे, वर्चस्ववाद आणि स्वबळ आजमावण्याच्या विरोधकांच्या अट्टाहासाने भाजपचा विजय सुकर झाला.

तृणमूल काँग्रेसने गृहराज्य पश्‍चिम बंगालमध्ये प्रतिस्पर्ध्यांना अस्मान दाखवले, पण गोव्यात तृणमूलची डाळ शिजली नाही. ४ राज्ये जिंकणाऱ्या भाजपला पंजाबच्या जनतेने मात्र साफ नाकारले. अवघ्या 2 जागांवर समाधान मानावे लागले. अकाली दलाला 3 जागा मिळाल्या. आआपाने स्वबळावर 92 जागा जिंकल्या. मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान 58 हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले. 2017 मध्ये आआपाने पंजाबात 20 जागा जिंकल्या होत्या. तेव्हा तो राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष बनला होता.

आता आआपा सत्तेवर स्वार होणार आहे. गेल्या निवडणुकीत 77 जागा जिंकून सत्ता मिळवणार्‍या काँग्रेसची 18 जागांवर घसरण झाली. मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी दोन्ही मतदारसंघांतून पराभूत झाले. पक्षांतर्गत कलह आणि नेत्यांच्या बेदिलीने पंजाबची सत्ता काँग्रेसने गमावली आहे.

उत्तर प्रदेशसह 4 राज्यांच्या निवडणुकांत भाजपची महालाट उसळली तर पंजाबात आम आदमी पक्षाचा झंझावात पाहावयास मिळाला. काँग्रेस, भाजप, अकाली दल आदी प्रस्थापित पक्षांची ‘झाडू’न सफाई करून दिल्ली निवडणुकीची आठवण आआपाने करून दिली आहे. दिल्ली सरकारची कामगिरी आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलेली आश्वासने पंजाबमधील जनतेला भावली.

केजरीवाल आणि त्यांच्या नेते, कार्यकर्त्यांनी सकारात्मक प्रचारावर भर दिला. जनादेश मिळाल्यास पंजाबात कोणता बदल घडवणार याचा स्पष्ट संदेश जनतेपर्यंत पोहोचवला. केजरीवाल फक्त आश्वासने देत नाहीत तर ती कसोशीने पाळतात हे दिल्लीतील जनता सध्या अनुभवत आहे. म्हणूनच केजरीवालांच्या शब्दावर पंजाबी जनतेनेसुद्धा विश्‍वास दाखवून आआपाला भरभरून जनादेश दिला असावा. भाजपच्या विजयोत्सवात आआपाचा हा महाविजय दुर्लक्षित राहू नये. गोव्यातसुद्धा आआपाने यशाची पायाभरणी केली आहे.

दिल्लीसारख्या मर्यादित अधिकारांच्या राज्यात केजरीवाल सरकारने उल्लेखनीय कामगिरी करून दिल्लीकरांची मने जिंकली आहेत. जनतेसाठी विकास कार्यक्रम राबवण्यास पंजाबच्या रूपाने पुरेपूर स्वातंत्र्य आणि मोकळे मैदान आआपाला मिळेल, अशी आशा पंजाबी जनतेकडून आता व्यक्त होत असेल. दिल्लीत आआपा सत्तेत असूनसुद्धा सरकारच्या कारभारात सतत केंद्राची लुडबुड होत राहिली. आता पंजाबात चांगले काम करून दाखवण्याची आआपाला पुरेपूर संधी आहे. केजरीवाल त्या संधीचे नक्कीच सोने करतील, असा विश्वास पंजाबी जनतेला वाटला असावा.

एकजुटीच्या बाता मारणार्‍या सर्वच विरोधी पक्षांनी अहंकार न सोडता एकमेकांच्या पायात पाय अडकवून अपयश ओढवून घेतले. पंतप्रधान मोदी आणि भाजप यांना समर्थ पर्याय देण्यासाठी भाजपविरोधात महाआघाडी उभारण्याचा निर्धार तृणमूल काँग्रेससह अनेक पक्षांनी व्यक्त केला व तो अयशस्वीही ठरवला. उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुका आल्यावर सर्वांनाच त्याचा विसर पडला. उत्तर प्रदेशात मागील निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने आघाडी केली होती. मात्र ती आघाडी तेव्हा सफल होऊ शकली नाही. यावेळी निवडणुकीला सामोरे जाताना भाजपपुढे अनेक आव्हाने उभी होती.

शेतीविषयक वादग्रस्त कायदे, लखीमपूर खेरीत केंद्रीय मंत्रीपुत्राकडून आंदोलक शेतकर्‍यांना चिरडण्याची घटना, महिलांवरील अत्याचार, करोना काळात राज्यात उडालेला आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा आदी अनेक गोष्टी भाजपचा प्रभाव कमी करणार्‍या आणि जनमत प्रभावित करणार्‍या होत्या, पण तेथील मतदारांना या घटना वा प्रश्न तेवढे गंभीर वाटले नसावेत.

बहुचर्चित लखीमपूर जिल्ह्यातील 8 पैकी 8 जागांवर भाजपला विजय मिळाला. हाथरस, उन्नाव आदी ठिकाणी घडलेल्या व देशभर गाजलेल्या महिलांवरील अत्याचारांच्या घटनांचा कोणताही परिणाम मतदारांवर झाला नाही हा एक चमत्कारच! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर सदर मतदारसंघातून एक लाखावर मतांनी शानदार विजय मिळवला. एक प्रबळ नेतृत्व म्हणून योगी आदित्यनाथ यांचा उदय झाला आहे. उत्तर प्रदेशात घवघवीत यश मिळवल्यानंतर पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणूनही त्यांच्या नावाची चर्चा आता होऊ लागली आहे. भाजपला दुसर्‍यांदा मिळालेले यश हा मोदीनामाचा चमत्कार की योगीराजांच्या नेतृत्वाची कमाल?

सर्वाधिक मताधिक्याने उमेदवार विजयी होण्याचा उच्चांक या निवडणुकीत नोंदवला गेला. तसाच 50 ते 1000 इतक्या कमी मतांनी विजयी होण्याचा विक्रमही नोंदवला गेला. गोव्यात काही विजयी उमेदवार आणि दुसर्‍या क्रमांकावरच्या उमेदवारांमध्ये जेमतेम 70 ते 100 मतांचा फरक दिसून आला. म्हणजे गोव्यात भाजपविरोधात लढण्यासाठी उतरलेल्या काँग्रेससह इतर पक्षांमध्येच मतविभाजन होऊन त्याचा भाजपला फायदा झाला. 10 मतदारसंघांत भाजपचे उमेदवार अवघ्या 76 ते 716 मताधिक्याने विजयी झाले.

विरोधकांची भाऊगर्दी भाजपला तारक ठरली. उत्तर प्रदेशातही तेच घडले. तेथे 15 मतदारसंघांत जय-पराजयाचे अंतर अवघ्या 1,000 मतांचे आहे. भाजपला तगडी टक्कर देण्यात सर्वात पुढे असलेल्या समाजवादी पक्षाला काँग्रेस, बसपसह इतर विरोधी पक्षांनी साथ देऊन बळ दिले असते तर मतविभाजन टळून समाजवादी पक्षाला 200 जागांचा पल्ला गाठणे कदाचित शक्य झाले असते. उत्तर प्रदेशच्या निवडणूक रणांगणात उतरलेल्या सर्व विरोधी पक्षांना भाजप हाच प्रमुख प्रतिस्पर्धी वाटत होता, पण भाजपला शह देण्याच्या नादात सर्वच विरोधी पक्षांनी भाजपच्या यशाला अप्रत्यक्षपणे खतपाणी घातले.

विरोधी पक्षांच्या पारंपरिक मतांची मोठ्या प्रमाणात विभागणी झाली. साहजिक भाजपचे उमेदवार कमी मतांच्या फरकाने का होईना, पण विजयी झाले. राष्ट्रीय पक्ष म्हणवल्या जाणार्‍या काँग्रेसला फक्त 2 जागा मिळाल्या. बसपच्या पदरात 1 जागा पडली. इतर पक्ष दिसेनासे झाले. लोकसभा निवडणुकीआधी भाजपला उत्तर प्रदेशात घेरण्याचे विरोधकांचे मनसुबे आपसातील स्पर्धेने तूर्त तरी उधळले आहेत.

एकजुटीचा नारा देता-देता 5 राज्यांच्या निवडणुका आल्या आणि पराभव देऊन गेल्या, पण समर्थ पर्याय देण्याच्या दिशेने विरोधकांचे पाऊल पडलेच नाही. भाजपचे कट्टर विरोधक असूनही अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेससह इतर विरोधकांसोबत जाणे कटाक्षाने टाळले आहे. आगामी लोकसभा निवडणूक कोणाच्या नेतृत्वात लढायची याच प्रश्नाभोवती विरोधकांच्या ऐक्याचा अश्वमेध अडखळत आहे. आता तरी एकजुटीच्या मुद्द्यावर आत्मचिंतनाची भूमिका सर्व विरोधी पक्ष घेऊ शकतील का?

आताच्या दारुण पराभवाचा धडा न घेता एकमेकांच्या पायात पाय अडकवण्याचा विरोधकांचा खेळ पुढेही चालू राहिला तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सलग तिसर्‍या विजयाची नोंद करण्यापासून भाजपला कोणीही रोखू शकणार नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या