रविवार 'शब्दगंध' : 'जीवना'साठी आजीवन संघर्ष

- एन. व्ही. निकाळे
रविवार 'शब्दगंध' : 'जीवना'साठी आजीवन संघर्ष

वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांनी त्र्यंबकेश्वरच्या (Trimbakeshwar) खरशेत गावातील (Kharshet) रहिवाशांच्या जीवनसंघर्षाला वाचा फोडली. माध्यमांनी खरशेतच्या व्यथा मांडल्यावर त्याची भरपूर चर्चा झाली. सरकारी यंत्रणा जाग्या झाल्या. यथावकाश तेथे नदी ओलांडण्यासाठी लोखंडी पूल होईल, पाण्याची सोय होईल, पण नाशिक जिल्ह्यात (Nashik District), राज्यात आणि देशात अशी कितीतरी दुर्लक्षित गावे असतील. तेथील रहिवाशांच्याही काही समस्या असतील, पण माध्यमांचे प्रतिनिधी वा वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे त्यांच्यापर्यंत अजून पोहोचले नसतील.

विकासाच्या बाजारगप्पा भरपूर मारल्या जातात. निवडणुकांवेळी मते मिळवण्यासाठी राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून आश्वासनांची वळवाच्या पावसापेक्षाही भरघोस खैरात केली जाते, पण निवडणुकीत (Election) यश मिळणारे लोकप्रतिनिधी ती आश्वासने सहसा विसरून जातात. विकासाचा गाजावाजा केला जातो, पण तो विकास खेडोपाडी आणि दुर्गम भागात खरोखर पोहोचतो का? आदिवासींसाठी (Tribal) खंडीभर सरकारी योजना आहेत. स्वतंत्र आदिवासी विकास विभागही आहे. प्रत्येक अर्थसंकल्पात हजारो-करोडोंची तरतूद केली जाते.

योजनांसाठी कोट्यवधी रुपये खर्च सरकारी जमाखर्चात नमूद केलेला आढळतो. तरीसुद्धा आदिवासी भागाची आणि तेथील रहिवाशांची किती प्रगती झाली? विकास झाल्याचे सांगितले जाते, पण तो कोणत्याच वाटेने गेलेला दिसत नाही. वाटेतील खड्डे आदिवासींच्या नशिबी मात्र कायमचेच! स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव झाला तरी परिस्थितीत फार फरक पडलेला नाही.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरशेत गावाचे वास्तव पाहिल्यावर तेथील ‘विकास’ अद्याप तरी बेपत्ताच आहे. एखाद्या गावात प्रथमच वीज पोहोचल्याने तेथील लोकांचे जीवन प्रकाशमान झाल्याचे ऐकावयास-वाचावयास मिळते, पण विजेचा तो प्रकाश गावातील एका खांबावरच थांबलेला असतो. एखाद्या दुर्लक्षित गावात पहिल्यांदाच एस. टी. बस पोहोचते. त्या सोयीमुळे गावातील लोकांना झालेला आनंद अवर्णनीय असतो. बिचारे आदिवासी विकासाच्या त्या छोट्याशा छायेनेसुद्धा समाधान मानतो. छोट्या-छोट्या गोष्टींतही समाधान मानणारे लोक अवती-भोवती पाहणारा थक्क होतो.

पाण्याला (Water) जीवन संबोधले जाते. दुष्काळी गावांतील लोकांना, खास करून बाया-बापड्यांना पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी दूरपर्यंत वणवण करावी लागते. ग्रामीण भागातील अनेक गावांच्या नशिबी वर्षानुवर्षे दुष्काळ आणि टँकरची वाट पाहण्याचेच दुर्भाग्य असते. भर पावसाळ्यातही टँकरचेच पाणी तेथील रहिवाशांना प्यावे लागते. अशा दुष्काळी गावांतील महिलांना आजही डोक्यावर हंडे घेऊन पाण्यासाठी भटकंती करावी लागते.

पाण्यासाठी चाललेली धडपड, पायपीट आणि ओढाताण यातून सुटका होणे शक्य नाही, असा कायमचा समज त्यामुळे झालेला आहे. ‘धरण उशाला, कोरड घशाला’ अशी परिस्थिती काही गावांच्या बाबतीत दिसते. आदिवासी भागातील चित्र तर आणखी कठीण असते. गावाजवळून नदी वाहत असली तरी पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना वाळूत केलेल्या खोल झर्‍यांचाच आसरा घ्यावा लागतो.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरशेत गावाची व्यथासुद्धा पाणीप्रश्नाशी निगडीत आहे. या गावाचा पाणीप्रश्न सध्या चांगलाच गाजत आहे. नाशिकपासून हा परिसर तसा फार दूर नाही. गावातील महिलांना झर्‍यातून पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी ‘तास’ नदी ओलांडावी लागते. खरशेतमधील महिलांची व्यथा आणि गावाच्या पाणीप्रश्नाची दाखल बहुतेक वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या आणि समाज माध्यमांनी घेतली आहे. खरशेतची लोकसंख्या चार हजारांपेक्षा जास्त आहे.

गावाच्या आसपास डझनभर पाडे आहेत. हरसूलकडून येणारी ‘तास’ नदी काळ्या पाषाणाच्या सुमारे 50 फूट खोल दरीतून वाहते, पण ती छोटी नदी ओलांडण्यासाठी योग्य रस्ता नाही. म्हणून मग नदीच्या दुथडीवर लाकडी बल्ल्या टाकण्याचा जुगाड करून पैलतीर गाठण्याची सोपी क्लुप्ती गावातील रहिवाशांनी केली. एका बल्लीचा आधार घेऊन दुसर्‍या बल्लीवर पाय ठेऊन पुढे जायचे; पाय घसरला तर खोल दरीत कोसळण्याची भीती! त्या भीतीवर मात करून ये-जा करण्याचे येथील लोकांच्या कायम नशिबी आहे.

गावातील विद्यार्थी-विद्यार्थिनी हरसूल, पेठ भागातील शाळांमध्ये शिकायला जातात तेही याच बल्लीवरून, नदी पार करून! पिण्यासाठी पलीकडील झर्‍याचे पाणी आणायला डोक्यावर दोन-दोन हंडे घेऊन याच ‘राजमार्गा’चा (?) वापर महिलांना करावा लागतो. नदी ओलांडताना जीवावर उदार व्हावे लागते. महिलांची कसरत बघणार्‍याच्या अंगावरसुद्धा काटा आल्याशिवाय राहत नाही. जीवनमृत्यूच्या या खेळात खरशेतच्या लोकांना दररोज मृत्यूला हुलकावणी द्यावी लागते.

देशातील गोरगरीब आजही कशा परिस्थितीत जगतात त्याची माहिती माध्यमांमधून वाचायला मिळते. नदीवर पूल नसल्याने काही गावांतील विद्यार्थ्यांना नावेतून पलीकडच्या गावातील शाळा गाठावी लागते. काही गावांतील विद्यार्थी जीवावर उदार होऊन चक्क नदीपात्रातून व क्वचितप्रसंगी पोहून वाट काढतात. वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांनी खरशेतमधील रहिवाशांच्या जीवनसंघर्षाला वाचा फोडली. वृत्तपत्रांत सचित्र बातम्या झळकल्या. वृत्तवाहिन्यांनी त्यावर विशेष वृत्तांत प्रसारित केले. समाज माध्यमांवरही हा विषय सध्या चर्चेत आहे. माध्यमांनी खरशेतच्या व्यथा मांडल्यावर त्याची भरपूर चर्चा झाली. अजूनही होत आहे.

माध्यमांनी आवाज उठवताच नाईलाजाने सरकारी यंत्रणाही जाग्या झाल्या आहेत. राज्याच्या पाणीपुरवठामंत्र्यांनी खरशेतवासियांच्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेतली. सूत्रे हालली. जिल्हा परिषद, पंचायत समितीचे अधिकारी गावात पोहोचले. ‘तास’ नदी ओलांडण्यासाठी ग्रामस्थांनी दोन्ही काठांवर ठेवलेल्या बल्ल्या सर्वप्रथम हटवल्या गेल्या.

संभाव्य धोका वा दुर्घटना होऊ नये याची काळजी तत्परतेने घेतली, पण बल्ल्या काढल्याने ग्रामस्थांची मात्र गैरसोय झाली. पाण्यासाठी नदी ओलांडता येत नसल्याने आजूबाजूच्या परिसरात पाण्यासाठी धावाधाव करण्याची वेळ महिलांवर सध्या आली आहे. नदीवर लोखंडी पूल बांधण्यासाठी मोजमापे घेतली गेली आहेत. आश्वासनेही मिळाली, पण पाण्यासाठी महिलांना करावी लागणारी पायपीट आणि वणवण तेवढ्याने थांबेल का? नदीवर पूल कधी उभा राहणार? जाणे-येणे सुलभ आणि सुरक्षित कधी होणार? याची प्रतीक्षा खरशेतकर नाईलाजाने करत आहेत.

दुर्गम आदिवासी भाग आणि शहरी भाग यातील विकासाची दरी किती मोठी आहे ते यावरून सहज लक्षात यावे. नाशिक महानगर ‘देखणे’ (स्मार्ट) करण्यासाठी भरपूर योजना ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत (Smart City) हाती घेण्यात आल्या आहेत. शहराच्या अनेक भागात रस्त्यांची कामे सुरू आहेत. मनपाची शहर बससेवा (NMC Bus) धावत आहे. उड्डाणपूल उभे राहिले आहेत. आणखीही उभे राहत आहेत. गोदावरीला (Godavari) प्रदूषणमुक्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विकासाला गती मिळाल्याचे चित्र नाशकात पाहावयास मिळते. येवला-लासलगाव मतदारसंघातील सोळा गाव पाणी योजनेच्या नूतनीकरणाला राज्य सरकारने (State Government) नुकतीच प्रशासकीय मंजुरी दिली आहे.

साडेसतरा कोटींचा निधीही (Fund) मंजूर झाला आहे. नव्या प्रस्तावात सौरऊर्जा प्रकल्पाचाही समावेश आहे. त्यातून योजनेला वीज मिळेल. वीजबिल भरण्याचा प्रश्नच उरणार नाही, असे सांगण्यात येत आहे. या भागातील लोकप्रतिनिधी बरेच जागरुक असल्याचे हे लक्षण आहे. इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तालुक्यांतील लोकप्रतिनिधींनीदेखील खरशेतसारखी आदिवासी गावे आणि पाड्यांच्या प्रश्नांकडे लक्ष पुरवल्यास तेथेही छोटी-मोठी विकासचित्रे कदाचित पाहावयास मिळू शकतील. लोकांचे जगणे सुसह्य होऊ शकेल.

माध्यमांच्या जागरुक प्रतिनिधींनी खरशेतचा विषय मांडला, पण नाशिक जिल्ह्यात, राज्यात आणि देशात अशी कितीतरी गावे असतील. त्या गावांतील रहिवाशांच्या बर्‍याच समस्याही असतील, पण त्यांच्यापर्यंत माध्यमांचे प्रतिनिधी वा वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे अजून पोहोचले नसतील. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात स्वतंत्र भारतातील (India) जनतेच्या नशिबी अजूनही असे भोग यावेत, ही दुर्दैवी आणि खेदाची बाब आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com