
विद्यार्थी मित्रांनो,
परिस्थिती तशी भांबावणारीच आहे. त्याहीपेक्षा अनिश्चिततेची व संभ्रमित करणारी आहे. परिक्षा होणार की नाही पासून ऑनलाइन की ऑफ़लाइन ही अनिश्चितता सतत आहे. तरीही विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला आणि करिअरला खीळ बसू नये म्हणून शिक्षण ऑनलाइन चालूच आहे. राज्य सरकारने महामारीच्या परिस्थितीचा नक्कीच काहीतरी अभ्यास करून दहावी व बारावीच्या परिक्षा ऑफ़लाइन होणार असल्याचे जाहीर केले आणि कालपरवा सोशल मिडीयाद्वारे केल्या गेलेल्या एका आवाहनामुळे राज्यभर आंदोलन झाले. या परिक्षा ऑनलाइन व्हाव्यात म्हणून हे आंदोलन केले गेले आणि त्या अनुषंघाने चर्चा करण्याची गरज निर्माण झाली....
परंतु विद्यार्थी मित्रांनो,
खरोखर सर्वच मुलांना परिक्षा ऑनलाइन नको आहेत. आणि ज्यांना त्या ऑनलाइन हव्यात त्यांची कारणे आपण आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रियांमधून ऐकल्या आहेत.
काहींच्या मते अभ्यासच झालेला नसल्याने परिक्षेत काहीच लिहीता येणार नाही म्हणून ऑनलाइन परिक्षा घ्या. असं काय होईल ऑनलाइन परिक्षा देतांना की ज्यामुळे तुम्ही अभ्यास झालेला नसतांना देखील पास व्हाल किंवा चांगले मार्क्स मिळवाल? याचं खरं उत्तर तर सर्वांनाच माहीत आहे.
अशा पद्धतीने पास होणं मनापासून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना खरंच आवडेल? किंबहुना ते योग्य राहील?
याची उत्तर स्वतःलाच द्या.
मात्र हे खरं आहे की महामारीच्या कालखंडात ऑनलाइन शिक्षण पद्धतीत खूप अडचणींना विद्यार्थी, पालक, शिक्षकांना सामोरे जावे लागले. ज्या मोबाईल व इंटरनेटला त्यांच्या अतिवापरामुळे सर्वांनी धारेवर धरले, त्यांच्याच वापरावर जीवनातील प्रत्येक अंग येऊन ठेपले. त्याचा विपरित परिणाम म्हणून शारिरीक मानसिक समस्या, कौटुंबिक कलह, वाढलेली व्यसने, सामाजिक वाद, घटलेली कार्यक्षमता तसेच आर्थिक अडचणी , वैचारिक विषमता यासारख्या अत्यंत घातक गोष्टी घराघरात पोहचल्या. समाजातील प्रत्येक घटक या विपरित परिणामांनी कमीअधिक प्रमाणात प्रभावित झाला.
शिवाय यावर अचूक आणि ठोस उपाय कोणाकडेच नव्हता, अगदी सरकारकडे देखील नव्हता. कारण महामारीच स्वरूपच असं होतं की केवळ माणसं जगवणं हीच प्राथमिकता होती. त्याचाच एक भाग म्हणून लॉकडाऊन, वर्क फ़्रॉम होम, ऑनलाइन एज्युकेशन हे पर्याय अंगिकारावे लागले.
अर्थात या नवीन जीवनशैलीला अंगिकारून भरपूर लोकांनी, विद्यार्थ्यांनी केवळ तगच धरला असे नाही तर उत्तम प्रगती देखील केलीच.
मात्र बऱ्याच जणांना या नवीन जीवनशैली अंगवळणी पडतांना त्रास झाला. ते स्वाभाविक देखील होते. प्रौढांचा विचार थोडा बाजूला ठेवून विद्यार्थ्यांबद्दल बोलायचे झाले तर ऑनलाइन शिक्षण घेतांना मोबाईलची उपलब्धता, इंटरनेटच्या रेंजचे अडथळे, प्रत्यक्ष संवादाचा अभाव, अभ्यास समजण्यात खूप अडचणी, मानसिक गोंधळ, ताणतणाव , त्यामुळे कधी वैफल्यातून तर कधी आवड म्हणून अभ्यास टाळण्याची व मोबाईल गेम्स किंवा व्हिडीओज बघण्याची मिळालेली सहज संधी, ऑनलाइन परिक्षा देतांना करता आलेल्या कॉप्या यामुळे विद्यार्थी दशेत खूप विस्कळीतपणा आला. बहुतेक कामं डिजिटल स्वरूपाची झाल्याने सर्वांचा स्र्किन टाईम प्रत्येकाचा वाढून गेला.
मित्रांनो, इंटरनेट हे असे मायाजाल आहे ज्यावर जितक्या चांगल्या गोष्टी आहेत त्यापेक्षा कितीतरी पटीने आपल्याला आपल्या प्राथमिकतेपासून भरकटवणाऱ्या गोष्टी आहेत. गेम्स, व्हिडीओज, सोशल मिडिया, वेब सिरिजेस, आर्थिक प्रलोभने देणारी जुगारी खेळ, लैंगिक विकृतींना चाळवणारी आभासी साधने. आणि हे सर्व अभ्यासाच्या परिघात कधी घुसले हे कळण्याच्या आत कोवळ्या मनाची मुलेमुली त्यात गुरफटले गेले. ज्यांना हे धोके माहीत होते ते मात्र आपला फोकस अभ्यासावर टिकवून चिकाटीने मेहनत करत राहीले.
कालपरवा जे आंदोलन झाले ते अश्याच इंटरनेटच्या मायाजालात भरकटलेल्या विद्यार्थ्यांचे होते असे म्हणायला जास्त वाव आहे. कारण ज्या व्यक्तीने सोशल मिडीयाच्या माध्यमातून हे आवाहन केले त्याचा सोशल मिडियावरचा एकुणच वावर बघता सर्वांना हे नक्कीच कळायला हवे. केवळ “ हिंदुस्थानी” या एका देशभक्तीपर संबोधनाची झुल पांघरून सोशल मिडियावर या “ भाऊने” आजवर ज्या पद्धतीची भाष्ये केली आहेत, अतिशय किळसवाणी शिवीगाळ केलेली आहे, ती “ हिंदुस्थानी” संस्कृतीही नाही आणि संस्कारही नाही. सोशल मिडियावर तितकासा अंकुश नसल्याने सवंगतेला वारेमाप प्रसिद्धी मिळाली आणि सोशल मिडीयाच्या आहारी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या संस्कारक्षम मनावर असे कुसंस्कार नको तो परिणाम साधून गेले.
परंतु विद्यार्थी मित्रांनो,
जागे व्हा!! अजूनही वेळ गेलेली नाही. तुमचा अभ्यास, तुम्ही देणार असलेली परिक्षा आणि तुमचं करिअर ही अत्यंत व्यक्तिगत गोष्ट आहे. हे तुम्ही पटकन स्विकारा. कारण कोविड महामारीच्या आधीही तुम्ही चांगला सेल्फ स्टडी केला, आत्मविश्वासाने परिक्षा दिली तर तुम्हाला चांगले मार्क्स मिळतच होते. तेव्हाही अभ्यास नीट न करणारे व नापास होणारे विद्यार्थी होतेच.
उलट ऑनलाइन शिक्षणामुळे, इंटनेटमुळे ज्ञानाचा खजिना सर्वांसाठी हवा तेव्हा उपलब्ध झालाय. ही संधी आहे.
आपला प्राध्यान्यक्रम अभ्यास आहे आणि त्यातील डिस्ट्रॅक्शन्स काय आहे हे ओळखण्याचा विवेक सतत जागृत ठेवला तरी तुम्ही सर्व या परिस्थितीतही उत्तुंग यश मिळवू शकता. मानसिक ताणतणाव असतील, निराश वाटत असेल तर योग्य उपाय करा. लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही तुमच्या धेय्यावर ठाम असता, तेव्हा योग्य कृती ही घडतेच. अशा ठाम मनाला ना कधी ताणतणाव जाणवत ना कधी नैराश्य!!
तुमचं वय आहे जिंकण्याचं !!
तेव्हा लागा अभ्यासाला आणि जिंका ही परिक्षा… तुमच्या आवडीचे करिअर तुमची आतुरतेने वाट बघतंय. तुम्ही पण आतुर बना आणि जिंका!!
सर्वांना शुभेच्छा !!
- डॉ शैलेंद्र गायकवाड ( संमोहनकर्ता,समुपदेशक)
मोबा. 9890141061