मूर्तिभंजक नेता

"माझी आई रात्री मला भेटायला यायची, मी झोपेपर्यंत ती मला कुशीत घेऊन पडून असायची. मला झोप लागल्यानंतर ती निघून जायची. मी जेंव्हा झोपतून उठायचो तर ती माझ्याजवळ नसायची." हे विधान आपल्या नानाविध प्रश्नांचे मोहळ उभं करू शकते. धर्म, इतिहास व साहित्य यांचे अभ्यासक प्रा.डॉ.राहुल हांडे यांची ‘बखर अमेरिकेची’ ब्लॉगमालिका...
मूर्तिभंजक नेता

हे एखाद्या लहान मुलांचे स्वप्न अथवा कल्पना विश्व असावे असे देखील वाटून जाते. अशा सर्व तर्क-विर्तकांच्या पल्याड उभे असलेले हे सात वर्षाच्या एका नीग्रो मुलाचे दाहक बालविश्व आहे. गुलाम आईच्या पोटी गो-या मालकाकडून जन्माला आलेले हे गुलाम बाळ. आईपासून तोडून १२ मैलांवरील दुस-या मालकाकडे सोपवण्यात आले. गो-या मालकाच्या वासना तृप्तीच्या कारणामुळे म्हणा अथवा गुलामांचे उत्पादन करण्याच्या भांडवली धोरणामुळे म्हणा हे बाळ त्या मातेच्या माध्यमातून हया जगात अवतरले.

त्या आईला गो-या मालकाच्या हेतूशी मतलब नव्हता. तिच्यासाठी ते केवळ तिचे बाळ होते. आपल्या बाळाला भेटण्यासाठी ही आई रात्री बारा मैल चालून यायची. बाळ झोपेपर्यंत त्याला आपल्या उबदार कुशीत घेऊन तिच्या करपलेल्या जीवनाला व मनाला शीतलता मिळवण्याचा वेडा प्रयत्न करायची. बाळ झोपी गेल्यावर परत बारा मैल चालून आपल्या कोंडवाडयात परतायची. तिला भल्या सकाळी गो-या मालकाची गुलामी करण्यास हजर रहावे लागत असे. अन्यथा चाबकाच्या फटक्यांनीच पोटाची खळगी भरावी लागे.

बाळं सात वर्षांचे झाले. हया काळात अवघ्या चार-पाच वेळाच हया माय-लेकरांना एकमेकाच्या कुशीत विसावा घेता आला. एके दिवशी आईची बाळासाठी करावी लागणारी चोवीस मैलांची पायपीट कायमची थांबली. त्या रात्री ती आई बारा मैलांवर थांबण्याऐवजी अनंताच्या प्रवासाला निघून गेली. अनाथपण आणि गुलामी अशा दुहेरी जीवनसंघर्षात हया बाळाने स्वतःचे अस्तित्व अत्यंत कणखरपणे टिकवलं. जीवनाच्या भट्टीत तावून-सलाखून निघालेल्या हया मुलाने भविष्यात इतिहास घडवला. तो जगाच्या इतिहासात फ्रेडरिक डग्लस म्हणून अजरामर झाला. नीग्रो मुक्तीच्या आंदोलनाला तात्त्विक, वैचारिक व बौद्धिक अधिष्ठान देण्याचे पहिले श्रेय फ्रेडरिक डग्लस यांनाच द्यावे लागते. अमोघ वक्तृत्व आणि टोकदार लेखणी यांच्या आधारावर फ्रेडरिक डग्लस यांनी अमेरिकेतील नीग्रो समाज एका धाग्यात बांधण्याचे काम केले.

गुलामीतून स्वतःची मुक्तता करण्यासाठी त्याने केलेला संघर्ष रोमांचकारी असा आहे. तरुण डग्लसने जेंव्हा आपल्या जुल्मी मालकाला चांगला चोप दिला तेंव्हा त्याच्या लक्षात आले की प्रतिकार केल्याशिवाय मुक्तीचा मार्ग मोकळा होऊ शकत नाही. अथक प्रयत्नातून पलायन करून तो जेंव्हा न्यूयॉर्कला पोहचला तेंव्हा त्याने स्वातंत्र्याचा पहिला श्वास घेतला. अंदाजे १८१८ साली दक्षिण अमेरिकेच्या मेरीलॅडमधील टॅलबोट काऊंटी येथे जन्मलेले फ्रेडरिक डग्लस यांचे आत्मकथन 'नॅरेटिव्ह ऑफ द लाईफ ऑफ फ्रेडरिक डग्लस ॲन अमेरिकन स्लेव्ह' प्रसिद्ध झाले. तत्पूर्वी १८४१ साली विल्यम लियॉड गॅरिसन संपादित करत असलेल्या लिब्रेटर वृत्तपत्रात ते संपादन साहय करू लागले. संपादक गॅरिसन यांनी डग्लस यांना दोन जबाबदा-या दिल्या होत्या, त्यानुसार विविध शहरांमध्ये फिरून दक्षिण अमेरिकेतील नीग्रोंच्या अमानुष गुलामीविषयी जनजागृती करणे आणि वृत्तपत्रासाठी वर्गणी गोळा करणे.

डग्लस यांना आता प्रसिद्धी मिळाली होती; परंतु गुलामीच्या सावटातून त्यांची पूर्ण मुक्तता झाली नव्हती. कारण गुलाम म्हणून त्यांच्यावरील मालकी सिद्ध करणारे कागदपत्रं अद्याप त्यांच्या मुळ मालकाकडे होते. त्यामुळे पकडले जाण्याच्या भीतीने फ्रेडरिक डग्लस यांना काही काळ इंग्लडला पलायान करावे लागले. इंग्लंडमध्ये देखील त्यांनी नीग्रोंच्या विदारक परिस्थितीविषयी युरोपियन समाजात जागृती करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान डग्लस यांच्या काही मित्रांनी त्यांच्या मुळ मालकांकडून ते त्या मालकाचे गुलाम असल्याची कागदपत्रे खरेदी केली. त्यामुळे डग्लस यांची ख-या अर्थाने गुलामीतून मुक्तता झाली. मात्र तोपर्यंत त्यांना अनेकदा स्वतःचे नाव आणि गावं बदलावे लागले. १८४७ ला इंग्लडहून परतल्यावर त्यांनी नीग्रो गुलामी विरोधात आवाज बुलंद करणारे 'द नॉर्थ स्टार' नावाचे स्वतःचे वृत्तपत्र काढले. ज्याला पुढे 'फ्रेडरिक डग्लस न्यूजपेपर' म्हणून ओळखले जाऊ लागले.

आपल्या वृत्तपत्रातून त्यांनी वांशिक भेदभावाबद्दल असणारे पूर्वग्रह व गैरसमज आणि त्यातून नीग्रोंवर होणारे अमानवी अत्याचार याबाबत उत्तर अमेरिकेत जागृती आणण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर डग्लस महिला अधिकारांवर तेवढयाच पोटतिडकीने विचार मांडत होते. फ्रेडरिक डग्लस यांनी नीग्रो समाजाला दैववादी मानसिकतेतून बाहेर आणण्यासाठी केलेल प्रयत्न अत्यंत महत्वाचे होते. नीग्रोंनी आपल्या गो-या मालकांचा धर्म स्वीकारला तरी मालकाने त्यांना माणूस म्हणून स्वीकारले नाही. अशा हतबल परिस्थितीत ईश्वर हाच त्यांचा एकमेव आधार ठरला. ईश्वरावर असणारी श्रद्धा नीग्रोंनी अधिक दृढ केली आणि कधीही ढळू दिली नाही. गो-यांनी ईश्वराची देखील श्वेत-अश्वेत विभागणी केली होती. गो-यांचे चर्चमध्ये नीग्रोंना प्रवेश नव्हता एवढेच काय तर नीग्रोंना ईश्वराची प्रार्थना देखील उघडपणे करता येत नव्हती. रात्री-अपरात्री एकांतात नीग्रो ईश्वराची प्रार्थना करत.

सर्वहारा नीग्रोंकडे मालकाची भाषा,जीवनमूल्ये आणि धर्म स्वीकारण्याशीवाय पर्याय नव्हता आणि त्यांनी त्याचा स्वीकार मनःपूर्वक केला. तरी गोरी अमेरिका त्यांची होऊ शकली नाही. त्यांना दैववादातून बाहेर काढणे अत्यंत आवश्यक होते. ज्यामुळे हे लोक अमानुष गुलामगिरीविरोधात विद्रोह करतील. यासाठी श्वेत समाजातील काही संवेदनशील व ध्येयवादी लोकांनी पुढाकार घेतला. नीग्रोंना स्वातंत्र्य आणि घटनादत्त मूलभूत अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांनी एक चळवळ सुरु केली. गुलामगिरीला पूर्णपणे नष्ट (Abolish) करणे,हे या चळवळीचे ध्येय होते. त्यामुळे त्यांना मूर्तिभंजक (Abolitionists) असे संबोधण्यात येऊ लागले. मूर्तिभंजक अत्यंत जहाल पुरोगामी होते. उत्तर अमेरिकेत निर्माण झालेल्या हया चळवळीचा प्रभाव तेथे दिसू लागला.

हया चळवळीमुळे पुरोगामी उत्तर आणि प्रतिगामी दक्षिण अशी अमेरिकेची विभागणी झाली. हया मूर्तिभंजकांनी दक्षिण अमेरिकेतील नीग्रो गुलामांना उत्तरेकडे आणि कॅनडात पलायन करण्यास सहर्काय व प्रोत्साहन देण्यास सुरवात केली. तसेच पलायनाच्या काळात त्यांना आश्रय देण्याची व्यवस्था केली. पलायन करण्यासाठी ज्या अज्ञात मार्गांचा वापर करण्यात आला त्यांना 'अंडरग्राऊंड रेलरोडस्' असे म्हटले जाते. नीग्रोंच्या हया पलायनावर हॉलिवूडमध्ये काही चित्रपट अलिकडच्या काळात निर्माण झाले आहेत. फ्रेडरिक डग्लस हयांनी मूर्तिभंजक चळवळीत खूप महत्वाचे योगदान दिले. त्यांच्यासारखा धाडसी व दूरदर्शी नेता नीग्रो गुलामांमध्ये निर्माण झाला,ही अत्यंत महत्वाची गोष्ट होती. फ्रेडरिक डग्लस यांनी नीग्रो गुलामांच्या पलायनात अत्यंत महत्वाची भूमिका निभावली. त्यांचे घर म्हणजे पलायन करणा-या नीग्रोंसाठी हक्काचा आधार आणि विश्रामगृह ठरले होते.

नीग्रो मुक्तीसाठी आग्रही असणा-या एका महान नेत्याची राजकीय कारकिर्द याचकाळात आपल्या सर्वोच्च ध्येयापर्यंत पोहचत होती. त्यामुळे फ्रेडरिक डग्लस यांच्यासारख्या सर्व नीग्रो नेत्यांना राजकीय पाठबळ मिळणार होते. अमेरिकेच्या राजकीय क्षितीजावर अब्राहम लिंकन यांचा उदय आणि फ्रेडरिक डग्लस यांची चळवळ हा सर्व घटनाकम समांतर आणि परस्पर पूरक ठरले. डग्लस आता मूर्तिभंजक चळवळीचे सर्वोच्च नेते झाले होते. १२ एप्रिल १८६१ रोजी अमेरिकेत गृहयुद्धाची ठिणगी पडली. दासप्रथेवरून उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांच्यातील राज्यं एकमेकांच्या विरोधात उभी ठाकली. दासप्रथेवरून एखाद्या देशात अशाप्रकारे गृहयुद्ध होण्याची ही इतिहासातील एकमेव घटना आहे. यावेळी अमेरिकेच्या युनयिन आर्मीला सैनिकांची कमतरता भासत होती.

अशावेळी डग्लस यांनी नीग्रोंची एक सैन्य तुकडी तयार केली. यावरच ते थांबले नाही तर स्वतःच्या तीन मुलांना देखील त्यांनी हया तुकडीत भरती केले. अश्वेत सैन्य तुकडीला प्रशिक्षणात अभाव,शस्त्रास्त्र आणि वेतन यासंदर्भात नकळतपणे भेदभाव सहन करावा लागत होता. फ्रेडरिक डग्लस यांनी या बाबीकडे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचे लक्ष वेधले असता त्यांनी डग्लस यांना सबुरीचा सल्ला दिला. दरम्यान लिकंन दुस-यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यांनी फ्रेडरिक डग्लस यांना व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केले. लिंकन यांना यासाठी प्रचंड विरोध सहन करावा लागला. खरे तर त्यांच्या प्रयत्नांमुळे अमेरिकेच्या राज्यघटनेत १८ वी सुधारणा होऊन दासप्रथा बेकायदेशीर ठरवण्यात आली होती. कायदयाने गुलामी व भेदभाव नष्ट झाला तरी मनातून जाण्यासाठी खूप मोठा संघर्ष बाकी होता. अखेर लिंकन यांनी फ्रेडरिक डग्लस यांना व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केलेच. लिंकन यांच्या दालनात डग्लस यांनी प्रवेश करताच लिंकन उठून उभे राहिले आणि म्हणाले,"बघा माझा मित्र डग्लस आला आहे.

" लिंकन यांनी डग्लस यांच्यासोबत हस्तांदोलन केले. हे ऐतिहासिक हस्तांदोलन ठरले. कारण असे करणारे लिंकन पहिले राष्ट्राध्यक्ष होते आणि डग्लस पहिले नीग्रो होते. या घटनेच्या काही आठवडयानंतरच अब्राहम लिंकन यांची हत्या करण्यात आली. १८७७ साली डग्लस यांना 'मार्शल' ही पदवी अमेरिकन सरकारने दिली. १८८९ साली त्यांना 'हैती'मध्ये काऊंसल जनरल म्हणून नियुक्त करण्यात आले. १८८२ साली त्यांची पत्नी ॲना डग्लस यांचे निधन झाले. त्यानंतर दोन वर्षांनी १८८४ साली त्यांनी हेलन पिट्टस हया श्वेत महिलेशी विवाह केला. यावर अमेरिकेत श्वेत-अश्वेत दोन्ही समाजातून मोठया प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात आली.

यावर फ्रेडरिक डग्लस यांनी प्रतिकिया दिली की,"माझी पहिली पत्नी माझ्या आईप्रमाणे अश्वेत होती,तर दुसरी पत्नी माझ्या पित्याप्रमाणे श्वेत आहे." विरोधकांना योग्य उत्तर मिळाले होते. त्यामुळे ते शांत झाले. २० फेब्रुवारी १८९५ रोजी महिला अधिकारांसंदर्भात आयोजित एका बैठकीत सहभागी फ्रेडरिक डग्लस यांना तीव्र हदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी तेथेच अंतिम श्वास घेतला. 'एक दिवस अमेरिकेत श्वेत आणि अश्वेत प्रेम व शांतीयुक्त सहजीवन जगतील' हया ध्येयासाठी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत फ्रेडरिक डग्लस कट्टीबद्ध राहिले. नीग्रो समाजाचे कर्ता सुधारक नेतृत्व नीग्रो चळवळीचा राजमार्ग प्रशस्त करून हया जगातून मार्गस्थ झाले.

- प्रा.डॉ.राहुल हांडे, भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६

(लेखक धर्म,इतिहास व साहित्य यांचे अभ्यासक आहेत)

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com