निग्रो मुक्तीची 'बीजं' पेरणारा बळीराजा

इंग्लंडच्या संस्कृतीचा व जीवनशैलीचा प्रभाव असणारे जे अमेरिकन नागरिक होते त्यांच्या दृष्टीने जेफरसन गावंढळ माणूस होता. इंग्लंडच्या मातीतील कृत्रिम औपचारिकता आणि बेगडी शिष्टाचार यांना त्याच्या जीवनात कवडीचे स्थान नव्हते. ग्रामीण अमेरिकेचा भूमिपुत्र म्हणून असलेली भूमिका आणि आचरण त्यांन कधीच सोडले नाही. एवढेच नव्हे तर त्याची त्याला कधी खंत किंवा शरम देखील वाटली नाही. 'व्हाईट हाऊस' मध्ये राष्ट्राध्यक्ष म्हणून राहत असतांना देखील तो ग्रामीण मोकळेढाकळेपणानेच जगला.... अभ्यासक प्रा.डॉ.राहुल हांडे यांची ‘बखर अमेरिकेची’ ब्लॉग मालिका...
निग्रो मुक्तीची 'बीजं' पेरणारा बळीराजा

"शेतकरी हे देशातील सर्वात सद्गुणी आणि स्वतंत्र नागरिक आहेत." असे विचार असणाऱ्या थॉमस जेफरसन यांचा राष्ट्राध्यक्ष म्हणून दुसरा आणि अखेरचा कार्यकाळ १८०९ मध्ये संपुष्टात आला. नवीन राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठी निवडणूक प्रक्रिया प्रारंभ झालेली होती. स्वांतत्र्यचा जाहीरनामा आणि अमेकरिकन संविधानाचा निर्माता असलेला थॉमस जेफरसन एक अजब रसायन होते. जीवनाच्या प्रवासात त्याने यशाची अनेक शिखरं पादाक्रांत केली असली तरी त्याच्यातील शेतकरी कायम जीवंत होता.

इंग्लंडच्या संस्कृतीचा व जीवनशैलीचा प्रभाव असणारे जे अमेरिकन नागरिक होते त्यांच्या दृष्टीने जेफरसन गावंढळ माणूस होता. इंग्लंडच्या मातीतील कृत्रिम औपचारिकता आणि बेगडी शिष्टाचार यांना त्याच्या जीवनात कवडीचे स्थान नव्हते. ग्रामीण अमेरिकेचा भूमिपुत्र म्हणून असलेली भूमिका आणि आचरण त्यांन कधीच सोडले नाही. एवढेच नव्हे तर त्याची त्याला कधी खंत किंवा शरम देखील वाटली नाही. 'व्हाईट हाऊस' मध्ये राष्ट्राध्यक्ष म्हणून राहत असतांना देखील तो ग्रामीण मोकळेढाकळेपणानेच जगला. साधे व सहज जीवन जगण्यावर त्याचा अतूट विश्वास होता. अमेरिकन राजदूत म्हणून जगाची 'फॅशन पंढरी' म्हणून ओळखल्या जाणा-या पॅरिसमध्ये तो अनेक वर्ष राहिला. असे असले तरी पॅरिसचा तामझामाचा किंवा फॅशनेबल जगण्याचा त्याचा व्यक्तिमत्वावर काहीच प्रभाव पडू शकला नाही. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आणि त्याची पत्नी यांच्यातील संबंध अमेरिकन राजकारणात खूप महत्व ठेवत असतात. त्यांचे वैवाहिक जीवनाच्या कितीही चिंध्या झाल्या असल्या तरी जगासमोर एक अत्यंत आदर्श दांपत्य असल्याचे नाटक त्यांना वठवावे लागते.

निग्रो मुक्तीची 'बीजं' पेरणारा बळीराजा
अमेरिकन लोकशाहीतील फडांचा प्रारंभ

जेफरसन हा अमेरिकेच्या इतिहासातील विधूर राष्ट्राध्यक्ष होता. त्यामुळे व्हाईट हाऊसमध्ये येणा-या अतिथींच्या आदरातिथ्याची देखरेख अनेकवेळा त्याच्या मुलींना पहावी लागत असे. अत्यंत सौजन्यपूर्ण वर्तन असलेल्या जेफरसनच्या वागण्यात कोणत्याही प्रकारचा दिखाऊपणा नव्हता. जगण्यातील बेगडी औपचारिकता कदापि मान्य नव्हती. त्याचे सहज वागणे न आवडल्याने ब्रिटनचा एक राजदूत त्याच्यावर नाराज झाला होता. जेफरसनला इंग्लंडशी मैत्री जशी मान्य नव्हती. तशीच तेथील बुरसटलेले बेगडी आचारण देखील मान्य नव्हते. त्याने इंग्लंडची कधी फिकर केली नव्हती तर ब्रिटिश राजदूताच्या नाराजीची काय तमा. व्हाईट हाऊसमधील असो अथवा कोणताही सार्वजनीक समारोह जेफरसनने उच्च-निच ज्याला शिष्ट भाषेत 'प्रोटोकॉल' म्हणतात याची पर्वा केली नाही. आपण राष्ट्राध्यक्ष आहोत किंवा कोणी विशेष आहोत. अशी वेगळी ओळख जोपासण्याचा त्याने कधीच प्रयत्न केला नाही. अत्यंत सहजपणे व मोकळेपणाने तो लोकांमध्ये वावरत व वागत असे.

जेफरसन यांचे कपडे उंची वस्त्राचे असले तरी शिलाई मात्र अत्यंत साधारण असायची. घोडस्वारी हा त्यांचा एक आणखी आवडता छंद. जो त्यांनी आयुष्यभर जोपासला. राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर देखील घोडयांच्या बग्गीपेक्षा प्रत्यक्ष घोडयावर बसूनच फेरफटका मारणेच त्यांना आवडत होते. युरोपात विशेषतः इंग्लंडमध्ये अतिथी घरी आल्यानंतर ही त्यांची सुटबुटात भेट घेणे महत्वाचे असते. जेफरसन मात्र बहुतेक वेळा व्हाईट हाऊसमध्ये येणा-या पाहुण्यांचे स्वागत स्लीपर घालूनच करायचे. यामुळे सभ्य इंग्रंज गृहस्थ मनातल्या मनात चरफडायचे. जेफरसन यांनी असल्यांचा कधी साधा विचार देखील केला नाही. त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये विदेशी अतिथींचे स्वागत करण्यासाठी जे नियम बनवले होत, ते वाचून कोणालाही हसू येईल.

निग्रो मुक्तीची 'बीजं' पेरणारा बळीराजा
अमेरिकन लोकशाहीतील फडांचा प्रारंभ

जेफरसन हा तसा अमेकरिकेतील गुलाकगिरीवर अवलंबून असलेल्या प्लांटर अर्थव्यवस्थेतील(शेती अर्थव्यवस्था) एक सधन शेतकरी होता. त्याच्याकडे वारसा हक्काने आलेले, त्याने खरेदी केलेले आणि त्या गुलाम कुटुंबांमध्ये जन्मलेले मिळून सुमारे ६०० गुलाम होते. गुलामांच्या विक्रीमुळे एकमेकांपासून ताटातूट झालेल्या आपल्या गुलामांचे कुटुंब एकत्र आणण्यासाठी त्याने काही गुलाम खरेदी केले. ज्यामुळे त्यांची कुटुंब पुन्हा एकत्र झाली. "माझाी पहिली ईच्छा आहे की गुलामांना चांगले वागवले जावे." असे मत त्याने व्यक्त केले होते. अमेरिकेतील इतर शेतक-यांपेक्षा गुलामांना चांगली वागणूक देण्याचा प्रयत्न तो सातत्याने करत होता. त्यामध्ये त्याने आपल्या गुलामांना रविवारी आणि ख्रिसमसच्या दिवशी सुट्टी देणे. हिवाळयात त्यांना अधिक काम न देणे. अशा काही सुधारणा सांगता येतात.

जेफरसनचा एक खिळे बनवण्याचा कारखाना होता. त्यामध्ये गुलाम मुलेच कर्मचारी म्हणून काम करत होते. त्यातील एक गुलाम बोरवेल कोलबर्ट याने हया खिळयाच्या कारखान्यात काम केले होते. त्याचे काम पाहून त्याल कारखान्यात पर्यवेक्षक म्हणून बढती देण्यात आली होती. त्याकाळाच्या पार्श्वभूमीवर ही फार मोठी गोष्ट होती. आज एखादा यावर असा प्रश्न करू शकतो. की जेफरसनला गुलामी प्रथा नष्ट करायची होती, तर त्याच्याकडे गुलाम कसे होते? आणि राष्ट्राध्यक्ष झाल्यावर त्याने हया प्रथेचा नायनाट का केला नाही? कोणताही महापुरुष किंवा महान नेता हा त्याकाळाला एक नवे परिमाण देत असला तरी त्या काळाचा युगधर्म त्याला पूर्णपणे कधीच मोडता येत नाही. समाजातंर्गत विविध घटकांचे आडवे-उभे धागे प्रत्येक काळात एकमेकांत घट्ट विणलेले असतात. ही विण अतेरिकी पद्धतीने उसवता येत नसते. कोणत्याही क्रांतीकारक परिवर्तनाचा प्रारंभ अत्यंत मंदगतीने सुरू होत असतो.

निग्रो मुक्तीची 'बीजं' पेरणारा बळीराजा
अमेरिकन राज्यघटनेचा शिल्पकार

समाज मानस कधी अचानक रात्रीतून बदलत नसते. त्यामुळे आजचे अनेक शहाणे एखादया महापुरुषाने असे का केले नाही? तसे का केले नाही? यावर ज्ञान पाझळत असतात. त्याला काही एक अर्थ नसतो. गांधीच्या अहिंसा आणि चरखा यांनी स्वातंत्र्य मिळाले का? अशी समाजाला भरकटवणारी वल्गना करणे सोपे असते. गांधींनी हा मार्ग भारतीय मानसिकतेचा नेमका शोध घेऊन स्वीकारला होता. कारण जे मोजके सशस्त्र क्रांतीचे प्रयत्न करणारे स्वातंत्र्ययोद्धे भारतात निर्माण झाले. त्यांना घातपाताने पकडून देऊन किंवा त्यांची खबर देऊन 'राबबहादुर' झालेले काही आणि नंतर 'खरे राष्ट्रभक्त' म्हणून मिरवणारे अनेक जण आपण पाहतो. ज्यावेळी गुलामीवर अमेरिका ऐष करत होता. त्यावेळी थॉमस जेफरसन हा माणूस गुलामी प्रथेविरुद्ध त्या काळाच्या चौकटीत राहून आवाज उठवण्याचा प्रयत्न करू लागला होता.

१७७९ पासून व्हर्जिनियाच्या संविधानापासून ते अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यापर्यंत त्याने त्याच्या स्तरावर हा प्रयत्न केला. ही गुलामी प्रथा संपूर्णपणे संपुष्टात येण्यासाठी अमेरिकेत 'सिव्हिल वॉर' म्हणजे गृहयुद्ध व्हावे लागले. ऐवढेच नाही तर अब्राहम लिंकन यांना बलिदान दयावे लागले. आपल्या हयातीत जेफरसन निदान अमेरिकेतील वायव्य प्रांतामध्ये तरी गुलामी प्रथा नष्ट करू शकला होता. अमेरिकेतील निग्रोंच्या गुलामीचे समूळ उच्चाटन करण्याची बीजं मात्र हया बळीराजानेच पेरली होती. हे इतिहास कधीही नाकारू शकत नाही.

निग्रो मुक्तीची 'बीजं' पेरणारा बळीराजा
अमेरिकन लोकशाहीतील फडांचा प्रारंभ

१८०८ ला अमेरिकेच्या चौथ्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीत जेफरसन यांचा सर्वात विश्वासू सहकारी जेम्स मॅडिसन अध्यक्ष म्हणून सहज निवडून आला. जेफरसन निवृत्ती जीवन जगण्यासाठी आपल्या 'माँटेसिलो' निवासस्थानी परतले. तेंव्हा ते कर्जबाजारी झालेले होते. प्रचंड मोठी जमीन आणि पदरी गुलाम असून देखील त्यांची आर्थिक परिस्थिती खालवलेली होती. त्यांच्या खर्चिक स्वभावामुळे त्यांची कर्जे वाढलेली होती. गुलाम पद्धतीचा कट्टर विरोधक असलेला, हा महापुरुष स्वतःच्या जीवनात आपल्या मालकीच्या गुलामांना मुक्त करू शकला नाही. याला कारण त्याची आर्थिक परिस्थिती होती. त्याचे गुलाम त्याला अर्थसहाय्य करणाऱ्या व कर्ज देणा-या संस्थांकडे तारण ठेवलेले होते. अखेर त्याने आपल्या वैयक्तिक ग्रंथालयातील ६४८७ ग्रंथ अमेरिकन काँग्रेसच्या ग्रंथालयाला २३,९५० डॉलर्सला विकली. यातून हे सिद्ध होते की माणसाने आयुष्यात एक पैशाचा भ्रष्टाचार केला नाही. त्यांचा एकच भ्रष्टाचार भविष्यात उघड झाला.

१९९८ मध्ये अमेरिकेत एका DNA टेस्टमुळे खळबळ माजली आणि जेफरसन यांच्यासंदर्भातील एक प्रवाद सत्य म्हणून सिद्ध झाला. जेफरसन यांच्या निग्रोंविषयी असलेल्या आत्मियतेला एक नाजूक किनार होती. १७८४ साली जेफरसन जेंव्हा फ्रांसला अमेरिकेचे राजदूत म्हणून गेले, तेंव्हा त्यांनी काही गुलाम सोबत नेले होते. त्यामध्ये त्यांचा गुलाम निग्रो स्वयंपाकी जेम्स हेमिंग्ज आणि त्याची बहीण सैली हेमिंग्ज हे देखील होते. या काळात जेफरसन यांचे आणि सैली यांचे संबंध प्रस्थापित झाले. जेफरसन यांच्यापासून सैलीला मुले देखील झाली होती.

निग्रो मुक्तीची 'बीजं' पेरणारा बळीराजा
आम्ही संयुक्त राज्यांचे साधारण लोक..

१९९८ मध्ये झालेल्या DNA टेस्टमुळे जेफरसन यांचे वंशज आणि सैली हेमिंग्जचे हिचे वारस यांच्या DNA मध्ये साम्य आढळून आले. जेफरसन यांची कारर्किद त्यांच्या राजकीय निर्णयांमुळे म्हणा किंवा प्रशासन पद्धतीमुळे वादग्रस्त ठरू शकते. मात्र राष्ट्रहिताशी या माणसाने कधी बेईमानी केली नाही. राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांना आणखी एका कारणाने टिकेचे धनी व्हावे लागले. ते म्हणजे त्यांनी अमेरिकन व्यापारी-औद्योगिक प्रवृत्तीच्या विरोधात जाऊन शेतीला आणि शेतक-यांच्या कल्याणाला प्राधान्य दिले. जेफरसन व्यापार-उद्योग याविषयी कायम उदासिन राहिले. शेतीला प्रोत्साहन देण्यामुळे त्यांना विरोध आणि टिका सहन करावी लागली.

'प्रत्येक मानवास स्वातंत्र्याचा निर्विवाद हक्क आहे.' अशी स्वातंत्र्याची व्याख्या करणारा थॉमस जेफरसन. हा माणूस कायम आपल्या तत्त्वांशी एकनिष्ठ राहिला. त्यांच्या कार्यपद्धतीवर अनेकांनी टिका केली असली तरी अमेरिकेच्या ५ सर्वश्रेष्ठ राष्ट्राध्यक्षांमध्ये त्यांचा समावेश होतो. त्याला एक कारण असे ही असेल की बळीराजाचा व निग्रो गुलामांचा विचार करणारा. त्याच्या सारखा राष्ट्राध्यक्ष अमेरिकेत होऊन गेला. यावर आजचे जग ते अनुभवत असलेल्या अमेरिकेकडे पाहून विश्वास ठेऊ शकत नाही.

प्रा.डॉ.राहुल हांडे, भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६

(लेखक धर्म,इतिहास व साहित्य यांचे अभ्यासक आहेत)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com