Friday, April 26, 2024
Homeब्लॉगशोधापूर्वीची अमेरिका

शोधापूर्वीची अमेरिका

पंधराव्या शतकापर्यंत युरोप-आशिया यांनी व्यापलेल्यापृथ्वीच्या भागालाच जग समजले जात होते. पृथ्वीवरील एक प्रचंड मोठा भूखंडयुरोप-आशियातील मानवी समाजाला अज्ञात होता. कोलंबस-अमेरिगो वेस्पूची यासारख्या अनेक साहसी दर्यावदींनी हा भूखंड इतर जगाला ज्ञात करून दिला. त्यांच्यापूर्वी हा भूखंड अस्तित्वात होताच. या भूखंडावर मनुष्यवस्ती देखील होती. युरोपातील दर्यावदी पंधराव्या शतकात या भूभागावर पोहचले ईतकेच. त्यांच्या आगमनापूर्वी येथे असलेला मानवी समाज तेथे कसा पोहचला?, येथील मानवाने युरोप-आशियातील मानवांप्रमाणे शोधमोहिम काढून त्याला अपरिचित भूभागांचा शोध का घेतला नाही?, या मानवाचे जीवन, समाजव्यवस्था आणि संस्कृती कशी होती?, असे नानाविध प्रश्न कोणाच्याही मनात निर्माण होऊ शकतात.

आज ज्याला आपण अमेरिका संबोधतो, या भूखंडावर मानव कसा पोहचला याविषयी अनेक अभ्यासकांनी विविध सिद्धांत मांडले आहेत. युरोपियन अभ्यासकांचा एक अंदाज असा आहे की, सुमारे ३०,००० वर्षांपूर्वी पाषाण युगातील काही मानव या भूखंडावर पोहचले असावे. हे मानव युरेशियातील होते. हे लोक बेरिनिया व सायबेरिया मार्गे आलास्काला पोहचले आणि नंतर ते आजच्या अमेरिका म्हणून ओळखल्या जाणार्‍या भूमीवर पोहचले. हे मानव भूमार्गानेच अमेरिकेत पोहचले, कारण तेंव्हा अमेरिका व युरोप हे भूभाग एकमेकांना जोडलेले होते. पृथ्वीवरील नैसर्गिक उलथापालथीमुळे समुद्राची पातळी वाढल्याने या दोन भूखंडांना जोडणारा भूभाग पाण्याखाली गेला आणि हे भूखंड विलग झाले. यामुळे अमेरिका या भूखंडावरील मूळनिवासी हे युरोपीयनच होते. असा युरोपीयन लोकांचा सिद्धांत.

- Advertisement -

आशियातील अभ्यासकसुद्धा आपला संबंध अमेरिका खंडाशी अतिप्राचीन काळापासून होता, हे सिद्ध करण्यात मागे राहिले नाही. त्यांच्या मतांचा आढावा घेतल्यास, आशियातील लोकांना अमेरिका या महाद्विपाची माहिती प्राचीन काळापासूनच होती. उत्तरपूर्व आशिया म्हणजेच रशियाचा उत्तरपूर्व भाग आणि उत्तर अमेरिकेचा उत्तर पश्चिम भाग यांना एकमेकांपासून विलग करणारी बेरिंगची सामुद्रधुनी किंवा खाडी आहे. सुमारे ८०० कि.मी.रुंद असलेल्या या सामुद्रधुनीमुळे अमेरिका व आशिया हे दोन महाद्विप एकमेकांपासून दुरावलेले आहेत. अधिक सुलभपणे लक्षात येण्यासाठी रशिया आणि अमेरिकेतील आलास्का यांना विलग करणारी ही सामुद्रधुनी. उत्तर पॅसिफिक महासागर आणि बेरिंगचा समुद्र हे देखील या सामुद्रधुनीमुळे एकमेकांपासून विभक्त होतात. या सामुद्रधुनीला पार करुन आशियातील मानव अमेरिकेच्या भूभागावर पोहचला होता. त्यामुळे अमेरिकेचा मूळवासी आशियातील मानव आहे,असे आशियन अभ्यासकांचे मत.

युरोप व आशिया यांच्याही पुढे जाऊन काही भारतीय अभ्यासकांच्या सिद्धांतानुसार भारतीय पुराणांमध्ये पाताळ लोक म्हणून ज्याचे वर्णन येते, तो हाच भूखंड आहे. आशियातील अभ्यासकांना असे मतप्रतिपादन करण्यासाठी रशियन संशोधकांचे संशोधन बळ देणारे ठरले. रशियन संशोधकांच्या संशोधनानुसार आशियातील अतिप्राचीन मानवी समाजाला आंशिक रूपाने का होईना या भूखंडाची माहिती होती. युरोपातील असो की आशियातील मानवी समाज असो या दोघांनाही अमेरिका या भूखंडाची माहिती होती आणि दोन्ही खंडातील मानव तेथे पोहचला होता. असे मान्य करणे, हेच आपल्यासारख्या सामान्यजनांसाठी योग्य. मात्र हे ही तितकेच खरे आहे, की शेवटी हे सर्व सिद्धांत देखील अंदाजच आहेत. आपण मूळचे युरोपीयन आहोत की आशियन हे सांगण्यासाठी अमेरिकेचा आदिवासीच आज अस्तित्वात नाही. कारण इसवी सनाच्या पंधराव्या शतकात युरोप-आशियातील लोकांना या भूखंडाचा शोध लागल्यानंतर, हे दोन्ही लोक तेथे गेले आणि त्यांनी या भूमीवरील आदिवासींचा आणि त्यांच्या संस्कृतीचा नायनाट केला. त्यावेळी आपल्यात आणि त्यांच्यात कोणालाही साधर्म्य आढळले नाही.

आज मात्र ज्यांचा नायनाट केला, त्यांच्याशीच आपला संबंध जोडण्याचा हा खटाटोप सुरु आहे. हा केवळ आजच्या अमेरिकेचे आम्हींच मूलनिवासी होतो. हे ठसविण्याचा प्रयत्न आहे. जगात असे सदैव घडत आले आहे. यात काही नवीन नाही. तसेच कोणताही मानवी समाज याला अपवाद नाही. भूतकाळ आणि भविष्यकाळ यांच्यामध्ये कल्पनेची निराधार भरारी घेता येते. वर्तमानकाळाविषयी असे शक्य नाही, कारण वर्तमानासंदर्भातील कोणतीही गोष्ट वास्तवाच्या कसोटीवर साधार सिद्ध करावी लागते.

प्रागऐतिहासिक काळातील किंवा पुराणातील वांगी तेथेच ठेऊन, तटस्थपणे विचार केल्यास पंधराव्या शतकात साहसी युरोपीयन दर्यावदी या भूखंडावर पोहचले. त्यांचे साहस व धैर्य कोणालाही मान्यच करावे लागेल. छोटया-छोटया व शिडांच्या जहाजांमधून होकायंत्र व दुर्बीण या केवळ दोन आधुनिक उपकरणांच्या जोरावर त्यांनी महासागरात झेप घेतली. त्यांचे तुटपुंज्या साधनसामग्रीसह अथांग महासागरावर महिनोंमहिने एकाकी व दिशाहीन प्रवास करण्याचे धाडस व झपाटलेपण येथे महत्वाचे ठरते. ते या भूभागावर जाणीवपूर्वक पोहचले की योगायोगाने हे महत्वाचे नाही. ते पोहचले हेच महत्वाचे. त्यामुळेच अमेरिकेच्या भूमीवर मध्ययुगिन काळात सर्वप्रथम पोहचणारा मानव युरोपीयन होता, हे मान्य करावे लागते. कारण यासंदर्भातील लिखित व साधार इतिहास तेंव्हापासूनच उपलब्ध आहे.

-प्रा.डॉ.राहुल हांडे

भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६

(लेखक धर्म, इतिहास व साहित्ययांचे अभ्यासक आहेत)

- Advertisment -

ताज्या बातम्या