Saturday, April 27, 2024
Homeब्लॉगराजस सुकुमार मदनाचा पुतळा

राजस सुकुमार मदनाचा पुतळा

आषाढी एकादशी हा वारकर्‍यांचा सर्वात मोठा सण. या दिवशी महाराष्ट्राच्या सगळ्या भागातून वैष्णव पंढरपूरमध्ये जमतात. पंढरीत आल्यानंतर नगरप्रदक्षिणा होते. यंदा 10 ते 15 लाखांपेक्षा अधिक लोक इथे आहेत. इतक्या सगळ्यांना विठ्ठलाचं प्रत्यक्ष दर्शन शक्य नसल्यामुळे ते कळसाचं आणि नामदेवांच्या पायरीचं दर्शन घेऊन समाधानी मनोवस्थेत परत जाण्यास निघतात. या देखण्या लोकसोहळ्याचा हा खास मागोवा.

तब्बल दोन वर्षांच्या खंडानंतर, अतिशय प्रतिकूल वातावरणातून बाहेर पडत पार पडणारा यंदाचा पालखी सोहळा आणि अत्यंत भक्तीभावानं साजरी होणारी आषाढी एकादशीची पर्वणी सर्वार्थानं अनोखी आणि मंगलदायी म्हणायला हवी. पायी वारी झाल्यानं कृतकृत्य झालेला वारकरी आणि विठ्ठलाच्या- संतांच्या नामाचा गजर करणारा साधाभोळा समाज पहायला मिळणं हीच खरं तर एक परममंगल पर्वणी आहे. पंढरपूरचा पांडुरंग हा महाराष्ट्राचा लोकदेव आहे. सकल संतांनी आपली सगळी अभंगसंपदा त्याच्या ठायी समर्पित केलेली दिसते. महाराष्ट्रातल्या भक्तीसंप्रदायाने विठ्ठल हे असं रुप उभं केलं की त्यामुळे एक वेगळं सामाजिक भान आलं. पांडुरंग आपल्या भक्तासाठी म्हणजेच पुंडलिकासाठी पंढरीत आल्याची कथा आपण जाणतो. पण एकीकडे पांडुरंग पुंडलिकासाठी आला तर दुसरीकडे पुंडलिक आपल्या माता-पित्याच्या सेवेसाठी आला. याचा आशय असा की माता-पित्याच्या सेवेत खंड पडू नये म्हणून पुंडलिक पांडुरंगापुढे वीट टाकतो. विठ्ठल त्यावर उभा राहतो आणि विचारतो, मी तुला केव्हा भेटू? त्यावर पुंडलिक उत्तर देतो की माता-पित्यांची सेवा पूर्ण होईपर्यंत तुला विटेवर उभं रहावं लागेल. त्यानुसार आजही हा देव विटेवर उभा आहे.

- Advertisement -

ही कथा आजच्या कुटुंबव्यवस्थेला मोठी शिकवण देणारी आहे. ज्या कुटुंबामध्ये आई-वडिलांना मानाचं स्थान आहे, ते दैवत घरात आहे, त्यांच्याबद्दलचा कृतज्ञ भाव, प्रेम, श्रद्धा-निष्ठा आणि सेवा आहे तोपर्यंत पांडुरंग विटेवर उभा राहणार हे याचं रुपक आहे. आज तेच रुपक जपत आपण आषाढी एकादशी साजरी करु या. आपल्याला ज्ञान मिळेल का, मोक्ष मिळेल का, आपण योग्याच्या अवस्थेला पोहोचू शकू का हे सगळं बाजूला ठेवून आपण किमान आई-वडिलांना समजून घेऊ, हीच भावना यावेळी मनात असायला हवी कारण आई-वडील समजतात त्याला पांडुरंगही समजतो. इथे ज्ञानेश्वर माऊलींची एक ओवी स्मरते. यात ते म्हणतात की आई-वडील हे तीर्थाचंही तीर्थ आहे. त्यांच्या सेवेत जीवन व्यतित करणं हेच एक मोठं तीर्थाटन आहे. वारीच्या निमित्ताने वारकरी संप्रदायाने हाच संदेश महाराष्ट्राला दिला आहे. राज्यात भागवत धर्म एका संप्रदायाच्या रुपात आला. त्याच्या निर्मितीमागे तेव्हाची स्थिती करणीभूत होती. सकल संतपरंपरा अथवा संतचळवळ उभी राहण्यामागे परकीयांचं आक्रमण हे मुख्य कारण होतं. त्या काळी वारंवार परकीयांची आक्रमणं होत होती. जवळपास तीनशे-चारशे वर्षं परकीयांचं राज्य होतं. एक एक करत वाकाटक, चालुक्य, चित्रकूट आणि यादवांचं राज्य गेलं. या संपूर्ण काळात या भूमीने सत्ताधार्‍यांच्या राक्षसी असुया पाहिल्या. जहागीरदार-सरदारांचा वर्ग निर्माण झालेला पाहिला. त्या वर्गाकडून जनतेचं रक्षण नव्हे; उलट जनतेला उपसर्ग होत असल्याचं पाहिलं.

या सगळ्यामुळे सामान्य माणूस अगतिक झाला होता. तो आत्मनिर्भरता हरवला होता. त्याला स्वधर्म आणि स्वकर्म म्हणजे काय ते समजत नव्हतं. कुठल्या देवाची उपासना करावी हा संभ्रम होता. आणि हे उमगलेला वर्ग मात्र जनसामान्यांना हे ज्ञान देण्यास तयार नव्हता कारण तो कर्मकांडामध्ये गुंतला होता. नाथांनी सांगितल्याप्रमाणे जपी-तपी-कापडी-संन्यासी-बैरागी हा वर्ग अंगा लावोनिया राख, करी भलतेची पापफ अशी तेव्हाची स्थिती होती. गावगाड्यातले पाटील, महाजन, चौगुले, कुलकर्णी रयतेला लुटत होते. अत्याचार, भ्रष्टाचार, दुराचार बोकाळला होता. यातून बाहेर पडत माणसाला आत्मनिर्भर बनवणं, त्याच्या ठायी चैतन्य निर्माण करणं गरजेचं होतं. याच भूमिकेतून संतचळवळ जन्माला आली आणि देशभाषेची प्रतिष्ठा निर्माण झाली. हीच आपली अस्मिता! यातून भक्तीपंथाचा उदय झाला. शेवटी भक्ती-देव-देवत्वाशिवाय समाज एकत्र येऊ शकत नाही. हे मान्य केल्यानंतर सर्वांना मान्य असणारं, सगळ्यांना सहजतेनं उपलब्ध होणारं, पूजाविधीमध्ये फारसा किचकटपणा नसणारं, त्याच्या गुणवर्णनात अत्यंत सहजता असणारं असं दैवत म्हणजे पांडुरंग असल्यामुळे त्याचा स्वीकार झाला. विठ्ठल हे एकीकडे कृष्णाचं तर दुसरीकडे विष्णूचं रुप आहे. असा हा पंढरीराया महाराष्ट्रातल्या सर्व संप्रदायांना मान्य असणारा होता. म्हणूनच शंकराचार्‍यांच्या पांडुरंगाष्टकापासून लोकवाणीपर्यंत सर्वत्र तो उभा राहिलेला आपण पाहतो. वारकरी संप्रदायाचं एक प्रमुख दैवत म्हणून सर्वांनी त्याचा स्वीकार केला. अशा या दैवतासाठी आषाढीची वारी आहे.

पंढरीच्या एकूण चार वार्‍या आहेत. आषाढी, कार्तिकी, चैत्री आणि माघी अशा या वार्‍या भक्तिभावानं केल्या जातात. आधी वारीमागचं प्रयोजन हरवलेला लोकसंवाद पुन्हा सुरू करणं हे होतं. वारीमध्ये भक्ती-भाव-श्रद्धा आहे पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे लोकजीवन आहे, लोकजीवनातली सर्व अंगं आहेत. समाजातले सगळे घटक आहेत. त्या घटकांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका आहे. म्हणजेच वारीत जगण्यातली स्वाभाविकता आहे. हे सगळं महाराष्ट्राच्या लोकजीवनाला लाभावं आणि खरं संतसाहित्य लोकगंगेपर्यंत पोहोचावं या हेतूने वारीची सुरूवात झाली. संत नुसतेच जनांना काही सांगत राहिले असते तर ते किती जणांपर्यंत पोहोचलं असतं ही शंका आहे. कारण ग्रांथिक परंपरेला काही मर्यादा आहेत. ग्रांथिक परंपरेला प्रबंधरचना म्हणतात. दुसरी येते ती अभंगरचना. यात अभंगांबरोबरच गवळणी, भारुड आदींचा समावेश होतो. हे सगळं सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एका व्यासपीठाची आवश्यकता होती. वारीच्या निमित्ताने ती पूर्ण झाली कारण हे एक खूप मोठं व्यासपीठ आहे. वारीच्या संपूर्ण वाटचालीमध्ये संतांच्या अभंगरचनांखेरीज अन्य काहीही गायलं जात नाही. त्यामुळे या माध्यमातून अभंगरचना प्रचंड लोकप्रिय झाल्या. माणसांचा एकमेकांशी संवाद होत गेला, लोकजीवन समजलं. या निमित्ताने महाराष्ट्रातल्या कानाकोपर्‍यातला सगळा वर्ग एकत्र आला. एकात्मतेची दिंडी निघाली, समतेची पताका खांद्यावर मिरवली गेली. भक्तीचा व्यापार फुलला. सदाचाराची देवाणघेवाण झाली आणि पंढरपूरच्या वाळवंटामध्ये एकची टाळी झाली. थोडक्यात, एकची टाळी म्हणजेच ही वारी आहे!

आषाढी एकादशी हा वारकर्‍यांचा सर्वात मोठा सण. या दिवशी महाराष्ट्राच्या सगळ्या भागातून आलेले वैष्णव पंढरपूरमध्ये जमतात. सगळ्या भागांमधून दिंड्या येतात. पंढरीत आल्यानंतर त्यांची नगरप्रदक्षिणा होते. पूर्वी विठ्ठलाचं दर्शन सहज उपलब्ध होत होतं. मात्र, आता लाखोंच्या संख्येत समाज एकत्र येतो. यंदा तर 10 ते 15 लाखांपेक्षा अधिक लोक इथे आहेत. इतक्या सगळ्यांना विठ्ठलाचं प्रत्यक्ष दर्शन शक्य नसल्यामुळे ते कळसाचं आणि नामदेवांच्या पायरीचं दर्शन घेऊन समाधानी मनोवस्थेत परत जाण्यास निघतात. अशा प्रकारे भक्तीसंप्रदायातील भावनेचा अविष्कार या दिवशी बघायला मिळतो. या निमित्तानं संध्याकाळी वाळवंटात कीर्तनाचे फड उभे राहतात. त्याद्वारे समाज प्रबोधनादी गोष्टी घडतात.

पूर्वी गावागावातले सत्पुरुष दिंडी घेऊन येत असत. वारीतली वाटचाल हे त्यांचं साधन होतं, चालणं साधना होती आणि पंढरीरायाचं दर्शन हे त्यांचं साध्य होतं. आजही दिंडी घेऊन येणार्यांची हीच भावना असते. पांडुरंगाच्या दर्शनासाठी वेडापिसा झालेला आणि त्याच्या एका दर्शनानं सुखावणारा भाविक आजही जागोजागी दिसतो. खरोखर पांडुरंगाचं रुप मनोहर आहे.

सुंदर ते ध्यान

उभे विटेवरी

कर कटावरी

ठेवोनिया

असं तुकोबा म्हणतात, तर…

रुप पाहता लोचनी

सुख जालें वो साजणी

तो हा विठ्ठल बरवा,

तो हा माधव बरवा

असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात.

त्याचबरोबर राजस सुकुमार मदनाचा पुतळा अशी सगळी वर्णनं ऐकल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन किती मंगल आणि सुंदर आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकता भासत नाही. पांडुरंगाच्या मूर्तीमध्ये तीन प्रकार आहेत. एक म्हणजे ती ज्ञानमूर्ती आहे, ती योगमूर्ती आहे आणि तिसरं म्हणजे ती भगवत् मूर्ती आहे. म्हणजेच ज्ञानतत्वानं पाहणार्‍यांसाठी ती ज्ञानमूर्ती आहे, चिंतनाच्या अंगानं पाहणार्‍यांसाठी ती योगमूर्ती आहे आणि भक्तीच्या, भावाच्या अंगानं पाहिलं तर ती भगवत् मूर्ती आहे. ते रुप ज्ञानवंत आणि भक्ताबरोबरच सामान्यांनाही आकर्षित करतं. ते रुप पाहताना संतांच्या मुखातून अभंगवाणी बाहेर पडते तसंच एखादी खेडूत बाई पांडुरंगाच्या दर्शनाला आल्यानंतर त्याच्या पायीच्या विटेकडे बघून म्हणते, काय पुण्य केलं पंढरीच्या गं तू ईट, देव विठ्ठलाचं पाय सापडलं कुटं? असं भावदर्शन अन्यत्र कुठे पाहायला मिळणार! हेच भावदर्शन आजही उभ्या महाराष्ट्राला भावतं. साने गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे, पांडुरंग हा महाराष्ट्राच्या जनशक्तीचा मुका अध्यक्ष आहे. अशा या पंढरीनाथाची कृपा सदासर्वकाळ राहो हीच सदिच्छा.

- Advertisment -

ताज्या बातम्या