स्पंदन :ओ जानेवाले हो सके तो लौट के आना...

स्पंदन :ओ जानेवाले हो सके तो लौट के आना...
मुकेशचंद्र माथुर

पंचेचाळीस वर्षांपूर्वी म्हणजे २७ ऑगस्ट १९७६ रोजी दर्दभऱ्या स्वरांचा बादशहा मुकेशचंद्र माथुर हे जग सोडून गेला. हिंदी चित्रपट सृष्टीतला शो मन राज कपूरचा पडद्यावरचा आवाज म्हणून मुकेश प्रसिद्ध होता. मोहम्मद रफी-किशोरकुमार -मुकेश ही त्रयी हिंदी चित्रपट गाण्यांच्या शौकिनांमध्ये कमालीची लोकप्रिय होती. तिघांचा आपापला चाहता वर्ग होता. त्यांच्या या चाहता वर्गाने त्यांच्या गायकीच्या सर्व गुणदोषांसह त्यांना स्वीकारले होते. क्वचितप्रसंगी त्यांच्यात वाद-विवादही होत. कोण श्रेष्ठ याच्या चर्चा देखील रंगत. ज्याप्रमाणे मुकेश राज कपूरचा पडद्यावरचा आवाज होता तद्वतच रफी दिलीपकुमारचा तर किशोर देव आनंदचा. पण रफी शम्मी कपूर, शशी कपूर, धर्मेंद्र यांच्यासाठीही गायला तर किशोर पुढे जाऊन राजेश खन्ना व अमिताभ बच्चनचा पडद्यावरचा आवाज बनला. मुकेश मात्र मनोजकुमार सारखा अपवाद वगळता प्रामुख्याने राज कपूरचाच आवाज म्हणून प्रस्थापित झाला. देव आनंद, दिलीपकुमार यांच्यासाठी इतरही काही गायकांनी आवाज दिला. पण राज कपूरसाठी मुकेश शिवाय मन्ना डे यांचा अपवाद वगळता इतरांनी फारसे पार्श्वगायन केलं नाही.

मुकेशचंद्र माथुर
स्पंदन : हिंदी सिनेदुनियेतला देव माणूस : मोहम्मद रफी

१९८० च्या दशकांत ओर्केष्ट्रा नावाचा कलाप्रकार बऱ्यापैकी जोरात नि जोमात होता. प्रत्येक ओर्केष्ट्रा मध्ये रफी-मुकेश-किशोर यांच्या शैलीत गाणारे गायक असायचे. यात मुकेशची गाणी गाणारा गायक जास्त भाव खाऊन जायचा. कारण या गायकाच्या आवाजात मुकेशच्या आवाजाचं साध्यर्म जास्त असायचं. याचं कारण म्हणजे मुकेशचा आवाज अनुनासिक होता. शिवाय रफी-किशोर-मन्नादा-हेमंतकुमार-तलत मेहमूद यांच्या तुलनेत मुकेश सूरांत डावा होता. जाणकारांच्या मते मुकेश बऱ्याचदा बेसूर गायचा. म्हणूनच नौशाद, सलील चौधरी, सचिनदेव बर्मन अशा संगीतकारांनी मुकेशकडून फार कमी गाऊन घेतलं आहे. समीक्षक ज्याला बेसूर म्हणायचे त्याच मुकेशचा नाकातून येणारा स्वर त्याच्या चाहत्यांच्या मनात कल्लोळ निर्माण करायचा. मुकेशला आपल्या गायकीच्या मर्यादा चांगल्या ठाऊक होत्या. त्याचा मुलगा नितीन मुकेश देखील पार्श्वगायनाच्या क्षेत्रात आला. एकदा एका मुलाखतकर्त्याने त्याच्या मुलाविषयी विचारले असता, वो तो मुझ से भी ज्यादा बेसूरा है...असे उद्गार मुकेश यांनी काढल्याचे सांगितले जाते. यात किती सत्यता आहे, याची कल्पना नाही.

मुकेशच्या आवाजाने प्रभावित होऊन गायनाच्या क्षेत्रात आलेला लोकप्रिय कलावंत म्हणजे बाबला मेहता. त्यांचा ‘बाबला’ याच नावाचा ओर्केष्ट्रा खूप लोकप्रिय होता. दांडिया आणि गैर फिल्मी गाण्यांचे अल्बम लोकप्रिय करण्याचे श्रेय बाबला यांना दिलं जातं. त्यांना फार उशिरा म्हणजे १९९० नंतर टी-सीरीज कॅसेट कंपनीच्या आणि इतर चित्रपटांत (दिल है के मानता नही, सडक, चांदनी ) पार्श्वगायन करण्याची संधी मिळाली. मुकेश यांच्या हयातीतच ज्यांना गायची संधी मिळाली असा मुकेश पंथीय गायक म्हणजे मनहर उधास. एकदा एका गाण्यासाठी मुकेश काही कारणास्तव उपलब्ध नव्हते. त्यामुळे हे गाणं आधी मनहर यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित करून नंतर मुकेश यांच्याकडून गाऊन घेण्याचे संगीकाराने ठरवलं. गाण्याचे बोल होते, ‘’आप को हमसे बिछडे हुए एक जमाना बीत गया...’’ चित्रपट विश्वास. मनहर यांच्या आवाजातलं हे गाणं ऐकून मुकेश खुश झालेत. त्यांना हे गाणं फार आवडलं नि त्यांनी मनहर यांच्याच आवाजात ते कायम ठेवायला सांगितलं. या गाण्यामुळे मनहर यांना पार्श्वगायनाची दारे उघडी झाली. गीतकार गुलशन बावरा यांनी लिहिलेलं हे गाणं संगीतकार कल्याणजी-आनंदजी यांनी स्वरबद्ध केलं आहे. या गाण्यात मनहर उधास यांना गायिका सुमन कल्याणपूर यांनी साथ दिली आहे.

मनहर उधास यांनी गायलेली पूर्वा सुहानी आई रे (पूरब और पश्चिम ), लुटे कोई मन का नगर (अभिमान), हम तुम्हे चाहते है ऐसे (कुर्बानी), हर किसी को नही मिलता (जांबाज), प्यार करते है तुम्हे कितना (होटल), हम तेरे बिन कही रह नही पाते (सडक), तेरा नाम लिया तुझे याद किया (राम लखन), सौदागर सौदा कर, ये इलू इलू क्या है (सौदागर ), अय साहेब ये ठीक नही (खलनायक), जीवनसाथी साथ में रहना (अमृत), गली गली में (त्रिदेव), तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है (आप तो ऐसे ना थे ), मौसम कि तरह बदल तो नही जाओगे (जानवर), तू मेरा जानू है, प्यार करने वाले कभी डरते नही, डिंग dong ओ बेबी सिंग सॉंग (हिरो), तू कल चला जायेगा (नाम), मैने रब से तुझे मांग लिया है (कर्मा) अशी अनेक गाणी लोकप्रिय आहेत. अभिनेता जॉकी श्रॉफ यांच्या सोबत त्यांची जोडी जमली होती.

मनहर उधास यांचे बंधू पंकज उधास व निर्मल उधास हे देखील याच क्षेत्रातले. पैकी पंकज यांनी गझल गायनात नाव कमावलं. निर्मल यांना मात्र फार संधी नाही मिळाली. तिन्ही भाऊ गायक असल्याचे त्यांचं उदाहरण तसं दुर्मिळच. मुकेश यांच्या गायकीचा प्रभाव असलेला अजून एक गायक म्हणजे आपले मराठमोळे सुरेश वाडकर. शास्त्रीय संगीताचे रितसर शिक्षण घेतलेल्या वाडकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीने एक वेगळा असा ठसा उमटवला आहे. त्यांची क्रोधी, प्यासा सावन या चित्रपटातील गाणी ऐकून राज कपूर खूप प्रभावित झाले होते. त्यांनी ‘प्रेमरोग’ पासून ‘हीना’ पर्यंत प्रत्येक सिनेमात मुख्य पुरुष गायक म्हणून सुरेश वाडकर यांना संधी दिली. राज कपूर यांनी त्यांना मुलगा मानलं होतं. मनहर उधास यांच्या आवाजात मुकेश यांच्या गायकीची झलक दिसते. पण त्यांचा आवाज अनुनासिक नाही. तर सुरेश वाडकर यांची गायकी कोणाचीही नक्कल न करणारी. पण आवाजाची जातकुळी मात्र मुकेश यांच्याशी नातं सांगणारी. शास्त्रीय संगीताची बैठक असल्याने सुरेश वाडकर इतर समकालीन गायकांमध्ये उजवे ठरतात. मराठीत तर त्यांनी अतिशय वैविध्यपूर्ण गाणी गाऊन मराठी रसिकांचे कान तृप्त केले आहेत. शिवाय हिंदीत सुद्धा सर्व आघाडीच्या संगीतकारांकडे ते गायले आहेत. अमिताभसह अनेक दिग्गज अभिनेत्यांना त्यांनी आपला आवाज दिला आहे. ‘स्कूल ऑफ मुकेश’ चा सर्वात प्रतिभावंत गायक म्हणजे सुरेश वाडकर असं म्हणण्यात कोणतीही अतिशयोक्ती नाहीये. मुकेश सुरांच्या बाबतीत यथातथाच होते. पण त्यांच्या आवाजातला दर्द काळीज पिळवटून टाकतो. तर मनहर उधास मोनोटोनस वाटत असले तर बेसुरे होत नाहीत. हेच त्यांच्या गायकीचं यश म्हणता येईल.

आपल्या पिताश्रींच्या शैलीत गाणाऱ्या नितीन मुकेश यांना कसं विसरता येईल ? जिंदगी कि ना टूटे लडी (क्रांती), आ जा रे ओ मेरे दिलबर (नुरी), गापुची गापुची गम गम (त्रिशूल), पैसा बोलता है (कालाबाजार), कसम क्या होती है (कसम), चना जोर गरम (क्रांती), सो गया ये जहा (तेजाब), यु लगने लगी आजकल जिन्दगानी ( संतोष), दिल ने दिलसे क्या कहा (आईना ), इस जहा कि नही (किंग अंकल), चांदी कि साईकल सोने कि सीट (भाभी), वो कहते है हमसे (दर्यादिल ), जिंदगी का नाम दोस्ती (खुदगर्ज) , जिंदगी हर कदम एक नई जंग है (मेरी जंग ), वफा न रास आई (बेवफा सनम ) अशी अनेक लोकप्रिय गाणी श्रोत्यांना त्यांनी दिली आहेत. त्यांनीही तत्कालीन आघाडीच्या सर्वच संगीतकारांकडे गाणी गायली आहेत.

हिंदी चित्रपट संगीताच्या चाहत्यांना आपल्या दर्दभऱ्या स्वरांतून तृप्त करणाऱ्या मुकेशचंद्र माथुर नावाच्या गायकाची अगणित गाणी श्रोत्यांना या पुढेही रिझवणार आहेत. मुकेश यांच्या गाण्यांची मोहिनी कधीही न सरणारी आहे. त्यांच्या ४५ व्या स्मृती दिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली वाहताना त्यांचेच शब्द आठवतात, हो जाने वाले हो सके तो लौट के आना...

डॉ. प्रवीण घोडेस्वार

सहयोगी प्राध्यापक,

मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखा,

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,

नाशिक

मोबाईल : ९४०३७७४५३०

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com