Friday, April 26, 2024
Homeब्लॉगस्पंदन : ओ दिल बंजारे...

स्पंदन : ओ दिल बंजारे…

२६ ऑक्टोबर हा ख्यातनाम संगीतकार आणि गायक हृदयनाथ मंगेशकर यांचा जन्मदिवस. १९३७ साली त्यांचा जन्म झाला. म्हणजे यावर्षी ते वयाची ८४ वर्षे पूर्ण करीत आहेत. हृदयनाथ मराठीतले अत्यंत प्रतिभावंत संगीतकारांपैकी एक समजले जातात. त्यांनी संगीतबद्ध केलेली आणि लता-आशा यांनी गायलेली अनेक भावगीतं मराठी रसिकांमध्ये कमालीची लोकप्रिय झाली आहेत. त्यांनी मराठी भावसंगीतात केलेल्या कामगिरीमुळे त्यांचं ‘भावगंधर्व’ असंही गुणगान केलं जातं. ते त्यांच्या मित्र-परीवारांत ‘बाळासाहेब’ या नावाने ओळखले जातात. जुन्या काळातील विनोदी अभिनेते दामूअण्णा मालवणकर यांची कन्या भारती ह्या त्यांच्या अर्धांगिनी. या जोडप्याला आदिनाथ, वैजनाथ ही मुले तर राधा नामक कन्या आहे. कविवर्य ग्रेस, सुरेश भट, कुसुमाग्रज, आरती प्रभू अशा मराठीतल्या दिग्गज कवींच्या कवितांना त्यांनी चाली लाऊन त्याची गाणी केली आहेत. आदिनाथ आणि राधा या दोघा भावंडांनी गायनाच्या क्षेत्रात करिअर करण्याचा प्रयत्न केला. पण हे दोघेही यात साफ अपयशी झाले. मंगेशकरांच्या तिसऱ्या पिढीला संगीताच्या विश्वात यत्किंचितही नावलौकिक मिळवता आली नाही, ही बाब विशेष म्हटली पाहिजे. मास्टर दिनानाथ मंगेशकर यांच्यापासून सुरु असलेली ही परंपरा आता खंडीत होत असल्याचे स्पष्ट होते.

स्पंदन : किशोरकुमारचे ‘आभास’कुमार…

- Advertisement -

हृदयनाथ मंगेशकर यांनी १९५५ मध्ये संगीतकाराच्या भूमिकेत पदार्पण केलं. ‘आकाशगंगा’ हा त्यांनी संगीत दिलेला पहिला मराठी चित्रपट होय.यानंतर त्यांनी चानी, संसार, जैत रे जैत, उंबरठा, हा खेळ सावल्यांचा, निवडुंग,सर्जा, हे गीत जीवनाचे यासारख्या मराठी चित्रपटांना संगीत दिलं आहे. यातली गाणीही लोकप्रिय झाली आहेत. त्यांनी काही दूरचित्रवाणी मालिकांनाही ( फुलवंती, कुछ खोया कुछ पाया )संगीत दिलं आहे. यांची शीर्षक गीतंही गाजली आहेत. उदा.’महाश्वेता’ या दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रक्षेपित झालेल्या मालिकेसाठी स्वरबद्ध केलेली कवी ग्रेस यांची रचना ‘भय इथले संपत नाही…’ लोकप्रिय आहे. त्यांनी अनेक लोकप्रिय आणि दर्जेदार भावगीते-भक्तीगीते-कोळी गीते-अभंग श्रोत्यांना दिली आहेत. त्यांनी उस्ताद आमीर खान यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे घेतले आहेत. संत कबीर,संत मीराबाई, संत सूरदास, संत ज्ञानेश्वर यांच्या रचना त्यांनी संगीतबद्ध केल्या आहेत. शिवाय महान शायर गालिबच्या गझल सुद्धा सूरांत बांधल्या आहेत. त्यांनी स्वरबद्ध केलेली कवी ग्रेस, सुरेश भट, ना.धों. महानोर आणी कवयत्री शांताबाई शेळके यांच्या रचना अजरामर झाल्या आहेत. संत मीराबाई यांच्या भक्ती गीतांच्या दोन ध्वनिफिती (चला वही देस आणि मीरा भजन ) काढणारे ते पहिले संगीतकार आहेत. ‘भावसरगम’ हा त्यांच्या गाण्यांचा कार्यक्रम. अनेक वर्ष त्यांनी हा कार्यक्रम भारतात आणि विदेशातही केला आहे. यात त्यांनी देवकी पंडित, पद्मजा फेणाणी-जोगळेकर, अनुराधा मराठे, साधना सरगम अशा गायिकांना संधी दिली. त्यांनी आपल्या कारकिर्दीत लता-आशा –उषा मंगेशकर यांच्या खेरीज फार कमी गायिकांकडून गाणी गाऊन घेतली आहेत. पुरुष गायकांमध्ये सुरेश वाडकर यांना त्यांनी सर्वाधिक गाणी दिली असल्याचे आढळते. शिवाय महेंद्र कपूर, हेमंतकुमार या अमराठी गायकांकडूनही त्यांनी मराठी गाणी गाऊन घेतलेली आहेत.

हृदयनाथ मंगेशकरांनी मोजक्या हिंदी चित्रपटांना स्वरसाज चढवला आहे. यात हरीश्चंद्र तारामती, प्रार्थना , धनवान, मशाल, सुबह, चक्र, लेकीन, माया मेमसाब, लाल सलाम या सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. १९९० मध्ये त्यांना ‘लेकीन’ या चित्रपटासाठी उत्कृष्ट संगीतकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तर २००९ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ या नागरी सन्मानाने गौरवण्यात आलं आहे. याच वर्षी त्यांनी ‘शिवसेना’ या राजकीय पक्षात प्रवेश केला. सावरकरांची ‘सागरा प्राण तळमळला’ ही रचनाही त्यांनी संगीतबद्ध केली आहे.

हिंदी सिनेजगतातले सुप्रसिद्ध दिग्दर्शक यश चोप्रा यांचा ‘मशाल’ हा चित्रपट १९८४ मध्ये प्रदर्शित झाला होता. दिलीपकुमार, वहिदा रहेमान, अनिल कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला हृदयनाथ यांचं संगीत लाभलं आहे. यातली गाणी जावेद अख्तर यांनी लिहीलीयेत. हा गीतकार म्हणून जावेद यांचा पहिला चित्रपट असावा. यातली गाणी छान जमली होती. मुझे तुम याद करना और याद आना तुम… हे लता-किशोर यांचं युगल गीत, फुटपाथ के हम रहनेवाले…हे तरुणाईचं समूह गीत, किशोरचं जिंदगी आ रहा हू मै…हे सोलो गीत इत्यादी गाणी श्रवणीय झाली आहेत. याच चित्रपटात लता-किशोर-महेंद्र कपूर यांच्या आवाजात होळी गीत आहे. याची चाल त्यांनी ‘जैत रे जैत’ मधल्या ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली…’ याच गाण्याची वापरली आहे.

राजेश खन्ना, राकेश रोशन आणि रीना रॉय अभिनित ‘धनवान’ हा सिनेमा १९८१ मध्ये आला होता. या चित्रपटातली गाणी महान शायर साहीर लुधियानवी यांनी लिहिली आहेत. यातली ये आंखे देखकर हम सारी दुनिया भूल जाते है…(लता-सुरेश वाडकर) आणि कुछ लोग महोब्बत को बेपार समझते है…(लता) ही दोन गाणी अप्रतिम आहेत. याही चित्रपटात त्यांनी ‘बल्ले बल्ले भाई रेशमी दुपट्टा…(लता-महेंद्र कपूर) हे पंजाबी लोकसंगीतावर आधारलेलं गीत दिले आहे. जांभूळ पिकल्या..ची चाल त्यांनी पंजाबी लोकगीतावरून घेतली असल्याचे त्यांनी आपल्या कार्यक्रमातून अनेकदा सांगितले आहे. हे ही गाणं त्यावरूनच घेतलं आहे.

१९९१ मध्ये ‘लेकीन’ या सिनेमा प्रदर्शित झाला. यात डिम्पल कपाडिया, हेमा मालिनी व विनोद खन्ना यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट रवींद्रनाथ टागोर यांच्या एका कथेवर आधारित होता. लता-हृदयनाथ मंगेशकर-बाळ फुले यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन गुलजार यांनी केलं होतं. गाणी अर्थातच त्यांनीच लिहिलीयत. यातली सर्वच गाणी खूप सुश्राव्य झाली आहेत. केसरिया बालमा…, यारा सिली सिली…, सुनो जी अरज हमारी…, झुठे नैन बोले सांची बतिया…, सुरमई शाम इस तरह से…, मै इक सदी से बैठी हू…,दिल में लेकर तुम्हारी याद चले…अशी एकापेक्षा एक सरस गाणी त्यांनी साकारली आहेत. त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना उत्कृष्ट संगीतकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असल्याचा उल्लेख वर आला आहेच. या चित्रपटात त्यांनी कोणत्याही मराठी गाण्याची चाल वापरली नाहीये, ही बाब विशेष.

केतन मेहता यांनी दिग्दर्शित केलेला ‘माया मेमसाब’ हा चित्रपट १९९३ मध्ये आला होता. यामध्ये दीपा साही, फारुख शेख, राज बब्बर, शाहरुख खान हे मुख्य कलावंत होते. यातली इक हसी निगाह का दिल पे साया है (लता/कुमार सानू), ओ दिल बंजारे, यह शहर बडा, खुद से बांते करते रहना, मेरे सरहाने जलाओ सपने (सर्व लता) ही गाणी बऱ्यापैकी लोकप्रिय झाली होती. यातल्या काही गाण्यांवर त्यांच्याच मराठी गीतांचा प्रभाव दिसून येतो. उदा. खुद पे बांते करना…हे गाणं ‘काजळ रातीनं ओढून नेला…या ‘जैत रे जैत’ मधल्या गीताची आठवण करून देतं. २००२ मधल्या ‘लाल सलाम’ या चित्रपटातली गाणी फारशी गाजली नाहीत. यातलं ‘तुम आशा विश्वास हमारे’ (लता) हेच एक गाणं लक्षात राहणारं आहे.

संगीतकार म्हणून हिंदी सिनेमात हृदयनाथ मंगेशकर यांनी फार कमी काम केलं आहे. त्यांचा ‘लेकीन’ हाच एकमेव गाजलेला चित्रपट म्हणता येईल. शिवाय त्यांची बरीच हिंदी चित्रपट गाणी मराठी गाण्यांवर बेतलेली दिसतात. त्यांनी आपल्या गाण्यांच्या जाहीर कार्यक्रमातून अनेकदा सांगितलं आहे की त्यांची अनेक गाणी ही मास्टर दिनानाथ मंगेशकर यांनी बांधलेल्या चीजांवर आधारलेली आहेत. दिनानाथ मंगेशकर अशा चीजांचा खजिना सोडून गेल्याचं सांगण्यात येतं. मग नव्या चाली बांधण्यात हृदयनाथ यांना फारसे प्रयास पडले नसावेत. कदाचित फार कमी गाण्यांना त्यांनी स्वत: चाली लावल्या असतील. त्यामुळे त्यांनी स्वतः रचलेल्या चाली किती आणि वडिलांच्या बंदिशींवर आधारित बांधलेल्या चाली किती हा तसा संशोधनाचा विषय ठरू शकतो. पण याबाबत संगीत क्षेत्रातील जाणकार, अभ्यासक, समिक्षक यांनी कधी भाष्य केल्याचे आठवत नाही. याचं कारण म्हणजे आपल्या काही धारणा. मंगेशकर आहेत म्हणून त्यांच्याकडे उपजत प्रतिभा असलेच असा दृढ झालेला समज. पण त्यांच्या दोन्ही मुलांनी (आदिनाथ व राधा ) हा समज अथवा ही धारणा चुकीची असल्याचे दाखवून दिलं आहे. असो. त्यांच्या गाण्यांचे मूळ काही का असेना, त्या गाण्यांनी मराठी रसिकांना , श्रोत्यांना अनोखा श्रवणानंद दिला आहे यात मात्र शंका नाही.

प्रा. डॉ. प्रवीण घोडेस्वार

सहयोगी प्राध्यापक,

मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखा,

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,

नाशिक

मोबाईल : ९४०३७७४५३०

- Advertisment -

ताज्या बातम्या