देव शोधते मी...!; किरण वैरागकर यांचा ब्लॉग

देव शोधते मी...!; किरण वैरागकर यांचा ब्लॉग
Blog

सकाळची गडबड! नेहमीचीच ती! सर्वांचे डबे, शाळा आणि काय मग नंतर माझे रुटीन, पण त्यातल्या त्यात एक बरे की सासूबाई आलेल्या असल्यामुळे पूजा त्या करणार होत्या. आंघोळ झाल्या-झाल्या देवाला नमस्कार केला. हळदी-कुंकू वाहिले आणि लगेच कामाला लागले. देवाचे आणि आपले एक बरे असते. त्याला नमस्कार करताना डोळे मात्र आपोआप मिटतात. सर्व गात्र त्या क्षणी एकवटतात. भावना आणि शरीर एकत्र होते. नमस्कार चमत्कार घडतो त्या एका क्षणात! माझ्या भावना तरी त्याला पोहचतात हे नक्की! नमस्कारानंतर मी माझ्या सकाळच्या मोहिमेत सामील झाले....

थोड्या वेळाने सासूबाई फुलं आणून, सर्व तयारी करून पूजेला बसल्या. तिथूनच आवाज दिला. अगं, ए देव कुठे आहेत? मला तर प्रश्नच कळेना. आपण नमस्कार केला होता तेव्हा ते होते की नाही हेही आठवेना. देव मनात असतो असे मी मानते हे ठीक, पण घरातले देव गेले तरी कुठे? सासूबाईंची नजर न बोलता बरंच काही बोलून गेली, पण आता खरी गरज खऱ्या देवांना शोधायची होती, मनातल्या नाही.

तेवढ्यात आमचे कन्यारत्न अवतरले. ताईडीला डब्बा हवा होता म्हणून आली होती. तिच्या लक्षात आले देव शोधताहेत म्हणून. स्वतःच म्हणाली, ए देव इथे नाही तिथे आहेत. आम्ही चाट पडलो. अगं म्हणजे कुठे? तिच्या बोटाच्या दिशेने बघितले.

खोप्यात..... त्यांच्या नव्या घरात! तुम्ही फार अडगळीत ठेवता देवांना. जरा मोकळे राहू द्या ना त्यांनाही.

हे तत्वज्ञान ऐकायची मनस्थिती नव्हती. मी आणि सासूबाई लगेच अंगणात गेलो. तायडीने मोठा खोपा आणि त्यात मंदिर केले होते. आत बाळकृष्ण व्यवस्थित बसला होता.

बघ किती छान दिसतोय एकटा!

देवसुद्धा एकटा आनंदी दिसतो, असतो हे पण कळले. त्या आनंदात बाळकृष्णाची कंठी, मुकुट सर्व जागेवर असल्याचे बघून घेतले.

अगं पण गणपती कुठं आहे?

तो ना छकुलीकडे गेलाय 'नाईट स्टे'ला.

अगं, गणपती काय? नाईट स्टे काय? अगं छकुलीची आई तिला देवाशी खेळू देत नाही.

मी सांगितले तिला, माझी आई देते. तुला पण देईन. घे तू गणपती आजच्या दिवस!

इकडे मी मात्र माझी नजर सासूबाईंचे डोळे सोडून सगळीकडे गणपती बघत होती. सासूबाई आणि ताईडी म्हणजे काय विचारता. ती आजीला घेऊन लगेच छकुलीकडे गेली.

थोड्या वेळाने दोघी आल्या ते मात्र एकदम हसत-हसत. आता ताईडीने आजीला काय सांगितले काय माहीत. आल्या-आल्या त्या म्हणाल्या, गणपती बाप्पा गावाहून आले आहेत. त्यांना जास्त आंघोळ घालू हं तायडे. मग त्या परत देवात रमल्या.

त्याच वेळेस बाहेर नेहमीचा बहुरूपी आला होता आणि गाणे म्हणत होता.... 'देव देव्हाऱ्यात नाही....'

मी मात्र देवाला कुठे-कुठे शोधावे, त्याने असावे या विचारात कामाला लागले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com