माणूसकीचे गाणे

jalgaon-digital
5 Min Read

ग्लोबल व्हिलेजची संकल्पना मांडून जग जवळ येत असल्याची चर्चा चालू असताना केंद्रस्थानी असणारा माणूस मात्र माणसापासून दूर जातो आहे. त्याला अनेक कारणे आहेत. वेगवेगळ्या विचारपद्धती, सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवरील विभिन्नता तसेच आपल्या वंशाबद्दल, धर्माबद्दल आणि जातीबद्दल असणारा पराकोटीचा दुराभिमान. शुद्ध-अशुद्धतेच्या वेडगळ कल्पनांनी जग व्यापलेलं आहे. वर्णवर्चस्वाची विकृत मनोवृत्ती वेडावाकडा आकार धारण करते आहे. धर्माच्या, जातीच्या खुणा पुसून टाकण्याच्या या काळात त्या अधिक स्पष्ट होताना दिसताहेत. वेगवेगळ्या रंगांवर हक्क सांगून समुहाची ताकद राजकीय हेतू साध्य करण्यासाठी वापरली जाते आहे.

दिसण्यातून, वेशभूषेतून डोकावणारी टोकदार अस्मिता माणसाला माणसापासून दूर नेत आहे. विभिन्नतेतून उगम पावणारी एकात्मतेची नदी आटत चालली आहे. धर्माच्या, जातीच्या तटबंदीवर डौलाने फडकणारं बेगडी निशाण हीच त्यांना त्यांची खरी ओळख वाटते आहे. माणूस म्हणून समोरच्याशी संवाद साधणं त्यामुळे मुश्किल झालं आहे. जातीचा,धर्माचा वृथा अभिमान माणूसकीच्या अजोड शिल्पावर घणाघाती घाव घालतो आहे.

केवळ ‘माणूस’ म्हणून वाजणारं माणूसकीचं खणखणीत नाणं व्यवहारिक जगण्यातून बाद झाल्याने माणूसपणाचं चलनवलन विमुद्रीकरणाचा शाप भोगत आहे. फूट पाडून विभागणी केल्याने माणूसकीचं वस्त्र फाटत चाललं आहे. तीच माती, तेच आभाळ, तेच पाणी, तेच पर्यावरण तरीही अंतःस्थ असणारे माणूसकीचे झरे खळाळताना दिसत नाहीत. ते कोरडे पडल्यानेच माणूस माणसापासून दूर जाण्याची प्रक्रिया अधिक गतीमान होताना दिसते आहे.

अश्मयुगापासून आजच्या आधुनिक युगापर्यंतचा माणूस नावाच्या प्राण्याचा प्रवास अद्भूततेने भरलेला आहे. त्या प्रत्येक काळातील त्याचा लढा अद्वितीय आहे. या सगळ्या प्रक्रियेतून ‘माणूस’ म्हणून तावून सुलाखून बाहेर येणं त्याने त्याच्या आत्मबळावर साध्य केलं. या एवढया संघर्षातून स्वतःला घडवत आलेला माणूस पुन्हा उलट्या पावलांनी अश्मयुगाकडे चालताना दिसतो आहे. त्याने परंपरा निर्माण केल्या. संस्कृतीचा तो वाहक झाला. पंचमहाभूतांची आळवणी करता करता तो तेजःपूंज झाला.

कम्फर्ट जगण्यासाठी त्याने साधन व्यवस्था निर्माण केली. गरजेपोटी तो संशोधक झाला. त्याला सत्व समजलं. स्वत्वाची ओळख झाली. त्याने जग पादाक्रांत केलं. त्याची नजर ब्रह्मांडावर खिळली. त्याला आता विश्वही छोटं वाटू लागलं. कुतुहलापोटी चाललं होतं तोपर्यंत ते ठीक होतं. परंतु वर्चस्वाच्या लढाईने सगळं गणित बिघडवून टाकलं. परीघ वाढवण्याच्या लालसेने तो वेडापिसा झाला. खऱ्याखुऱ्या माणूसकी धर्माचं त्याला विस्मरण झालं. जे समोर दिसेल ते मिळवण्यासाठी तो धडपडू लागला. त्यावर हक्क सांगू लागला. जीवनाची नौका भरकटल्याने तो भलत्याच दिशेला वाहत गेला. प्रवाहीत होण्याऐवजी तो प्रवाहपतीत झाला. चांगल्या-वाईटातली सीमारेषा त्याने संपवून टाकली.

प्रेमाची, मायेची भाषा तो विसरला. सहिष्णूतेचा जन्मजात मिळालेला वारसा त्याने भिरकावून दिला. द्वेष, असूयेने तो कलंकीत झाला. करूणेचा उसळणारा सागर त्याने एका आचमणात गिळंकृत केला. राक्षसी महत्वाकांक्षेने त्याच्यातला माणूस मरून गेला. हे जग अधिक सुंदर व्हावं म्हणून निर्माण केलेल्या माणसाचं अधःपतन पाहून निसर्गव्यवस्थेचं हतबल होत जाणं या जगाला विनाशाकडे घेऊन जाणारं आहे.

‘माणूस’ हा माझ्या आस्थेचा आणि कुतुहलाचा विषय आहे. त्यामुळे माझ्या कवितेच्या केंद्रस्थानी माणूसच आहे. त्याचे विचार-विकार, त्याचा राग-लोभ, त्याची भक्ती-शक्ती तसेच त्याचा सरळ साधेपणा. ‘माणूसकीचे गाणे’ लिहिताना हा सगळा ग्लोबल आराखडा डोक्यात होता. लहानपणापासून घरात, बाहेर जे पाहात आलो ती सामग्री मनात होती. त्यामुळे माणूसकीचं गाणं गात चालत राहिलो. इतरांनाही त्यासाठी प्रवृत्त केलं. बंधुत्वाचं घरटं कोसळणार नाही याची अतोनात काळजी घेतली.

जात-पात, धर्मभेद आणि जुनाट चालीरितींना नेहमीच तिलांजली दिली. नीतीमान होताना द्वेष, इर्षेला मनात कधीच थारा दिला नाही. रस्त्यावरच्या आरती आणि नमाजाला कडाडून विरोध केला. त्यायोगे सारा समाज एक होण्याचं सुंदर स्वप्न पाहिलं आणि त्याचा पाठपुरावा केला. पशूपक्षी म्हणजे निसर्गसाखळीचा महत्त्वाचा दुवा. त्यांच्यासाठी अंगणात फळझाडं लावली. पाण्याची भांडी भरून ठेवली. त्यांना तृप्त होताना पाहून माझ्या दातृत्वाचा सागर अथांग होत गेला. दीनदुबळ्या लोकांसाठी जाहीरपणे मैदानात उतरलो नाही. परंतु त्यांच्यासाठी मदतीचा हात नेहमीच खुला ठेवला. त्यांनी उच्चारलेल्या कृतज्ञतेत मला ईश्वराची शुद्ध वाणी ऐकू आली.

माणसाचं माणसापासून दूर जाणं मला ओरबाडत राहिलं. मी कितीदातरी घायाळ झालो. माणूसकीचा वस्त्रधागा जीर्ण होताना पाहून मी आतून फाटत गेलो. मानवतेचं एवढं मोठं मंदिर परंतु आत माणूस नसल्याची खंत मला टोचत राहिली. माणसातला माणूस जागा करण्यासाठी, माणूसकीचं गाणं गाणाऱ्या माणूसकीच्या बागा फुलवण्यासाठी मी माणूस होण्याचा अतोनात प्रयत्न केला. त्याचीच ही कविता ‘माणूसकीचे गाणे’.

आॕगस्ट दोन हजार पंधरा साली लिहिलेली ‘माणूसकीचे गाणे’ ही कविता कुठल्याच अंकातून प्रसिद्ध झालेली नाही. कवितेत असणाऱ्या माणूसकीच्या धाग्याने मला नेहमीच बांधून ठेवलेलं आहे. माणसामधला माणूस जागा व्हावा आणि माणूसकीचे गाणे गाणाऱ्या माणूसकीच्या बागा सर्वदूर फुलाव्यात म्हणून हे ‘माणूसकीचे गाणे’ मी अविरत गाणार आहे.

माणूसकीचे गाणे

माणूसकीचे गाणे गात चालत राहू सारे

बंधुत्वाचे तोलून धरू घरटे कोसळणारे.

जात-पात, धर्मभेद जुनाट चालीरिती

गाडून टाकू द्वेष, इर्षा सांभाळताना नीती.

रस्त्यावरची आरती आणि रस्त्यावरचा नमाज

बंद होईल तेव्हा असेल एक सारा समाज.

पशूपक्ष्यांसाठी थोडी हिश्शामधली भाकर

तोच खरा दातृत्वाचा अथांगसा सागर.

दीनदुबळ्या लोकांसाठी ज्याच्या डोळ्यात पाणी

उच्चार लयीत त्याच्या शुद्ध ईश्वराची वाणी.

माणसापासून माणूस आज दूर जातो आहे

माणूसकीचा वस्त्रधागा जीर्ण विरतो आहे.

सारेच कसे झोपी गेले जागे कुणीच नाही

मानवतेचे मंदिर मोठे आत माणूस नाही.

माणसामधला माणूस आता केला पाहिजे जागा

माणूसकीचे गाणे गातील माणूसकीच्या बागा.

_शशिकांत शिंदे,

(९८६०९०९१७९)

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *