काही बोलायाचे आहे..

काही बोलायाचे आहे..

भारतात आत्महत्या करणार्‍यांची संख्या खुनामुळे होणार्‍या मृत्यूंपेक्षा पाच पट अधिक आहे. मानसिकदृष्ट्या खचलेल्या व्यक्तीला कुटुंबाच्या, मित्रांच्या प्रेमाची, समजूतदारपणाची गरज असते. परंतु आज कुटुंब संस्था बेघर बनत चालली आहे, तर मित्र-मैत्रिणींशी असणारा संवाद सोशल मीडियामुळे कमी होत चालला आहे. या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

अलीकडच्या काळात आत्महत्या करून जीवनाचा शेवट करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. समाजात स्वतःची प्रतिमा असणार्‍या, वलयांकित व्यक्तींच्या आत्महत्या जेव्हा घडतात तेव्हा त्याची चर्चा अधिक प्रमाणात होताना दिसते. पण ते हिमनगाचे टोक आहे असे म्हटल्यास आजच्या परिस्थितीत गैर ठरणार नाही.

मुळात नैराश्य अर्थात डिप्रेशन हे आज जगापुढील एक आव्हान बनत चालले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, अमेरिका आणि चीननंतर भारत हा जगातील तिसर्‍या क्रमांकाचा नैराश्यग्रस्त देश आहे. नैराश्येच्या समस्येवर योग्य वेळी उपचार घेतले गेले नाहीत तर त्याची परिणती काहीवेळ जीवन संपवण्यात होताना दिसते.

राष्ट्रीय क्राईम रिकॉर्ड ब्यूरोच्या अहवालानुसार 2019 मध्ये 1.39 लाख लोकांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. यामध्ये 18 ते 45 वयोगटातील व्यक्तींचे प्रमाण होते तब्बल 67 टक्के! याचाच अर्थ नवी उमेद, ऊर्जा, उत्साह आणि स्वप्ने पाहण्याच्या, स्वप्नपूर्तीसाठी समर्पण भावाने योगदान देण्याच्या वयात आज बहुतांश तरुण जीवनापासून पलायन करताहेत.

आज जीवनशैलीच नव्हे तर एकूणच सभोवतालचे वातावरण बदलत चालले आहे. या बदलत्या काळात ताणतणावांनी प्रत्येकाला ग्रासले आहे. पूर्वीच्या काळीही ताणतणाव होते, पण त्यांचे स्वरूप वेगळे होते. दोन वेळचे अन्न मिळवायचे, कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाडायच्या यातून येणारा ताण पूर्वी पाहायला मिळायचा. आज तशी स्थिती नाही. आज किमान गरजा भागवण्याइतकी मानवाने प्रगती केली आहे. मागच्या काळापेक्षा आजचे आयुष्य हे कितीतरी प्रमाणात आरामदायी झाले आहे. पण त्यातून काही नवे प्रश्न निर्माण झाले आहेत.

आत्महत्या करण्याची कारणे प्रत्येक ठिकाणी भिन्न असतात. त्यामुळेच या प्रश्नाचा विचार करताना तो सर्वंकषरीत्या करायला हवा. सर्वप्रथम आत्महत्या करणार्‍या व्यक्तीला मानसिक आजार जडला होता का हे पाहावे लागते. पण बरेचदा आपण अन्य घटकांचाच उहापोह अधिक करतो. सामान्यतः नैराश्य, स्क्रिझोफेनिया, पर्सनॅलिटी डिसऑर्डर या तीन मानसिक आजारांमध्ये अशा प्रकारचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न होताना दिसतो.

आज ताणतणाव कसा हाताळायचा यापेक्षा तो कशामुळे निर्माण होतोय हेच अनेकांना कळेनासे झाले आहे. याचे मूळ कारण आहे मोकळ्या संवादाचा अभाव. एकमेकांशी आपण बोललोच नाही, आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्तच केल्या नाहीत तर त्यातून मनावरचे दडपण वाढत जाते. याबाबत आपण दीर्घकाळ कोणतेही उपाय केले नाहीत तर त्यातून नैराश्य किंवा डिप्रेशनची स्थिती येते. त्यामुळे मोकळेपणाने संवादाची प्रक्रिया वाढीस लागणे अत्यंत आवश्यक आहे. आपण घरात पत्नीशी, मुलांशी बोलतो त्याला संवाद म्हणत नाहीत. संवाद हा इंटरअ‍ॅक्टिव्ह किंवा परस्परांच्या विचारांची देवाणघेवाण करणारा, परस्परांचे विचार समजून घेणारा असला पाहिजे. आज तोच हरपत चालल्यामुळे ताणतणाव वाढत आहेत.

आणखी एक मुद्दा म्हणजे अलीकडील काळात नात्यांची ऊब हरपत आहे. पूर्वी आपण मामाकडे जायचो, काकांकडे, आत्याकडे जायचो. आज नात्यांमध्ये तशी जवळीक राहिलेली नाही. परिणामी लोकांचे अवलंबित्व ‘पीअर ग्रुप’वर म्हणजे मित्र, ऑफिसमधील सहकारी यांच्यावर वाढते आहे. पण इथे आपण स्पर्धकही असतो. उदाहरणार्थ, ‘अ’ या दहावीच्या विद्यार्थ्याचा ‘ब’ हा कितीही जवळचा मित्र असला तरी त्याच्यापेक्षा जास्त गुण मिळवणे ही ‘अ’ची गरज असते. या स्पर्धात्मकतेमुळे या नात्यांमध्ये आत्मकेंद्रीपणा असतो. स्वतःचा फायदा पाहिलाच पाहिजे, पण अशा प्रकारचे स्पर्धकतेचे नाते असल्यामुळे एकटेपणा वाढत जातो.

आता प्रश्न उरतो तो मानसिक आजार झाला आहे हे ओळखायचे कसे? याचे सर्वात पहिले लक्षण म्हणजे स्वभावात अचानकपणे झालेला कोणताही बदल. एखादी बोलकी व्यक्ती अचानकपणाने 8-15 दिवसांपासून शांत शांत राहत असेल किंवा याउलट शांत असणारी व्यक्ती अचानकपणाने खूप जास्त बोलत असेल किंवा कधीही मद्यसेवन न करणारी, कमी प्रमाणात मद्यपान करणारी व्यक्ती अचानकपणाने रोज एक बिअर पिऊ लागली तर या गोष्टी त्या व्यक्तीच्या आयुष्यात काही तरी चुकीचे घडत असल्याचे निदर्शक असतात. अशावेळी त्यांना योग्य मानसिक आधार आणि उपचार न मिळाल्यास त्यांची मनोवस्था ढासळत जाते. म्हणूनच अशा व्यक्तींनी सर्वात प्रथम कुणाशी तरी बोलून मन मोकळे करणे गरजेचे असते. एकट्याने मार्ग काढतो असे म्हणून ही अवस्था बदलत नाही. खरे पाहता अशा स्थितीत मनोविकारतज्ज्ञांशी सल्लामसलत करणे कधीही उपयुक्त ठरते. पण आपल्याकडे मानसोपचारतज्ज्ञांकडे जाणे याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यामुळे मानसिक आजार झालेले, वैफल्यग्रस्त झालेले निम्म्याहून अधिक लोक मानसोपचारतज्ज्ञांकडे जाण्यास कचरतात. अशा मंडळींनी किमान त्यांच्या आईशी, मित्राशी किंवा पत्नीशी बोलून मनावरचा ताण कमी केला पाहिजे. यातून पहिले पाऊल पडते. अशा स्थितीत व्यसनापासून कटाक्षाने परावृत्त राहिले पाहिजे. कारण व्यसनामुळे समस्या सुटत नाही किंवा समस्येपासून काहीकाळ आरामही मिळत नाही, तर समस्या अधिक बिकट बनू शकते. उदाहरणार्थ, आर्थिक अडचणीच्या काळात मद्यसेवन केल्यामुळे तो प्रश्न सुटत नाही. उलट दारूवर होणार्‍या खर्चाने मनावरचा ताण अधिक वाढत जातो. तसेच नशा केल्यामुळे आपल्या विचारशक्तीमध्ये आणि निर्णय क्षमतेमध्ये बदल होत जातो. म्हणूनच ताणतणाव, नैराश्य असण्याच्या काळात व्यसनाकडे पाऊल पडू देऊ नका.

या सर्व पार्श्वभूमीवर समारोप करताना सर्वसामान्यांनी दररोज येणार्‍या ताणतणावांचे व्यवस्थापन कसे करायचे, ताणाचा सामना कसा करायचा आणि तणावमुक्त जीवन कसे जगायचे हे जाणून घेऊया. यासाठी मी नेहमीच सांगत आलो आहे की, आयुष्यात रुटीन, रिस्पॉन्सिबलिटी आणि रिलॅक्सेशन या तीन ‘आर’चा समतोल साधता आला पाहिजे. यातील कोणतीही एक गोष्ट 100 टक्के केली तर आयुष्य यशस्वी होत नाही. उदाहरणार्थ, जबाबदार्‍यांचा विसर पडून केवळ रुटीनमध्येच गुंतून पडून चालणार नाही; त्याचप्रमाणे केवळ मुलाबाळांच्या जबाबदार्‍यांचे ओझे आहे म्हणून रिलॅक्सेशन न घेता सतत धावूनही चालणार नाही. अशाच प्रकारे कोणतीही जबाबदारी न घेता केवळ रिलॅक्सेशन म्हणजेच आराम करूनही चालणार नाही. तीनही गोष्टींमध्ये समतोल साधणे आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आज सर्वांना सर्वच गोष्टी सुलभरीत्या उपलब्ध आहेत. मात्र या भौतिक गोष्टींमध्ये सुख कधीच नसते. अन्यथा आपण सुपरमार्केटस्मधून सुख विकत घेतले असते. म्हणूनच आपल्या स्वतःला आनंद कशात वाटतो हे ओळखून घ्यावे. तुम्हाला एखादे गाणे ऐकण्यात आनंद असेल आणि दुसर्‍याला हजार रुपये खर्च करण्यात आनंद वाटत असेल तर हे दोन विभक्त विचार आहेत. तुम्ही जर उद्या त्या व्यक्तीप्रमाणे हजार रुपये खर्च करायला जाल तर त्यातून आनंद मिळेलच याची कोणतीही शाश्वती नाही. म्हणून आपल्याला आनंद कशात वाटतो ते जाणून घ्या आणि त्याचप्रमाणे आयुष्य जगा. आयुष्य खूप सुंदर आहे. त्याचा आनंद घेण्यासाठी सकारात्मक बना. विचारांची सकारात्मकता अनेक अशक्य गोष्टी साध्य करण्यास कामी येते. जगण्याची उर्मी देते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com