Blog : ज्ञानयज्ञाचा अमृतमहोत्सव!

Blog : ज्ञानयज्ञाचा अमृतमहोत्सव!
Blog

नाशिकरोड (Nashikroad) येथील श्री शारदा विद्या प्रसारक मंडळाचे (Shri Sharda vidya prasarak mandal) यंदा अमृतमहोत्सवी (Amrutmahotsavai Varsh) सुरू आहे. आज (5 ऑक्टोबर) ही संस्था 76 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्त या अखंड ज्ञानयज्ञाच्या वाटचालीचा धावता आढावा...

75 वर्षांपूर्वीचे नाशिकरोड खेडेवजा शहर होते. शहराच्या गळ्याभोवती झोपडपट्ट्यांचा विळखा पडलेला होता. चलार्थ पत्र मुद्रणालयातील कामगारांच्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची हेळसांड होत होती. नाशिकरोड परिसरात नामवंत माध्यमिक शाळा होत्या, पण तळागाळातील, दारिद्य्ररेषेखालील, झोपडपट्टीत आयुष्य व्यतित करणार्‍या मुलांना शिक्षणाचा मुख्य प्रवाह अघोषित बंद होता.

समाजातील विषमता पाहून दु:खी झालेल्या काही ध्येयवेड्यांनी ‘समाजसेवा हीच ईश्वरसेवा’ या भावनेने अशा उपेक्षितांच्या शिक्षणाचा विडा उचलला. समाजातील तथाकथित उच्चभ्रूंच्या दृष्टीने हा शुद्ध वेडेपणा, आतबट्ट्याचा व्यवहार, आत्मघात होता. ‘एकला चलो रे’ची हाक देवून या शिक्षणप्रेमी समाजसेवकांनी जाणीवपूर्वक वसा घेऊन येणार्‍या अडचणींना तोंड दिले. अडचणींचा पाढा न वाचता ‘अडचण हीच संधी’ समजून परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न केला.

'प्रयत्न करणार्‍यांनाच देव मदत करतो. त्यांच्या पाठी उभा राहतो' हे विधान त्यांच्या बाबतीत चपखल बसते. शिक्षण संस्था चालवणे ही कसोटीच असते. दानशूर व्यक्ती, समाज वा सरकारकडून आर्थिक पाठबळ मिळाले नाही तर प्रसंगी पदरमोड करून शिक्षणाचा शकट हाकावा लागतो.

स्व. नारायण रामचंद्र नागपुरे तथा नानासाहेब नागपुरे यांनी 5 ऑक्टोंबर 1946 ला दसऱ्याच्या दिवशी श्री शारदा विद्या प्रसारक मंडळाची मुहूर्तमेढ नाशिकरोड परिसरात रोवली. सुरूवातीला संस्थेची एक माध्यमिक शाळा नाशिकरोडच्या आशा टॉकीजमध्ये भरत होती. स्व. बिटको शेठ यांनी नानांना मदतीचा हात देवून शैक्षणिक कार्यात सहभग नोंदवला.

नानांनी सायकलवरून विद्यार्थ्यांना शाळेत आणले. तुटपुंज्या सरकारी आर्थिक मदतीवर अवलंबून न राहता नानांनी उत्पन्नाचे स्त्रोत शोधण्याची पुरेपूर धडपड केली. त्यांना संस्थेतील सेवकवर्गाने चांगली साथ दिली.

हळुहळू संस्थेचा व्याप वाढत गेला. 2 माध्यमिक व 3 प्राथमिक शाळा नाशिकरोड तसेच उपनगर परिसरात ज्ञानदानाच्या कार्यात गुंतून गेल्या. समाजाकडून मदतीचा हात पुढे येऊ लागला. संस्था प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू लागली. परंतु नंतरचा काही काळ संस्थेच्या कसोटीचा ठरला.

न्यायालयाने नेमलेल्या विश्वस्तांनी संस्थेची विस्कटलेली घडी पूर्ववत करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांचे फळ म्हणजे आज संस्था 75 वर्षांची झाली आहे. मोठ्या उमेदीने, चिकाटीने दमदार आणि आत्मविश्वासपूर्ण वाटचाल करीत आहे. संस्थेचे यंदा अमृतमहोत्सवी पर्व सुरू आहे.

संस्थाचालक, शिक्षक-शिक्षकेतरांच्या जीवनातील अविस्मणीय, स्वर्गीय आनंदाचा हा क्षण आहे. ही संस्था आज उपनगर व नाशिकरोड परिसरात प्राथमिक व माध्यमिक शाळा चालवत कार्याचा ठसा उमटवत आहे. उपनगरच्या श्री. भा. वि. जोशी महाराष्ट्र हायस्कूलने सर्वप्रथम ‘ओझोन दिना’चे आयोजन केले. 'युनो'ने या कार्याची दखल घेतली.

संस्थेच्या कसोटीच्या काळात न्यायालयाने नेमलेल्या 5 विश्वस्तांनी मोठ्या कष्टाने संस्थेचे अस्तित्व टिकवून संस्थेची प्रगती केली. त्यांच्यापैकी कुणीच आज हयात नाहीत. त्यांची आठवण याप्रसंगी प्रकर्षाने येते. अविरत धडपडीमुळे संस्थेला हे सोन्याचे दिवस विद्यमान विश्वस्त, शिक्षक, शिक्षकेतर वर्ग, विद्यार्थी, पालक व समाजधुरिणांना पाहावयास मिळत आहेत.

महाराष्ट्र माऊली पूज्य साने गुरूजींच्या ‘बलसागर भारत’चा ध्यास घेऊन मुलांच्या मनोरंजनासोबत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अविरत धडपड व त्यागाने वचनपूर्ती करून पुढची वाटचाल करणे हेच आम्हा विश्वस्तांचे ध्येय-कर्तव्य असेल. संस्थेची स्थापना करणारे स्व. नाना नागपुरे व शिक्षणाची गंगा समाजातील

घराघरापर्यंत पोहचवणार्‍या सर्व माजी विश्वस्तांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून संस्थेची प्रगती, उज्ज्वल भवितव्य व उत्कर्षासाठी आम्ही सर्वच वचनबद्ध आहोत. संस्था 76 व्या वर्षात पदार्पण करीत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

- सुभाषचंद्र वैद्य,

सेक्रेटरी, श्री शारदा विद्या प्रसारक मंडळ, नाशिकरोड.

Related Stories

No stories found.