Friday, April 26, 2024
Homeब्लॉगजीवनातील प्रभावी, निर्मळ भावना !

जीवनातील प्रभावी, निर्मळ भावना !

विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला काही करावे असे वाटत असेल, तर फक्त मुलांवरती प्रेम करा. मुले शिकती करण्याचा तो एकमेव राजमार्ग आहे.

पण शाळेत प्रेम नसेल, घरात प्रेम नसेल, समाजात प्रेम नसेल तर शिकणे होण्याची शक्यता फारच कमी आहे. देणारा आणि घेणारा यांच्यामध्ये असलेला धागा जितका म्हणून पक्का असेल तितके ज्ञानाची देवाणघेवाण प्रभावी होईल. जेव्हा दोघांच्यामध्ये केवळ औपचारिक नाते असते तेव्हा शिकणे रसाळ, आनंददायी, मनाला प्रसन्न करणारे होण्याची शक्यता नाही.

- Advertisement -

जेव्हा एखादे नाते मालक आणि नोकर असेल तर तेथे आदेशाचे पालन होते. जेव्हा नाते साहेब आणि कर्मचारी असेल तेव्हा निर्णयाची अमलबजावणी होते. जेव्हा नेता आणि कार्यकर्ता असे नाते असते तेव्हा अनुकरणाची शक्यता असते आणि जेव्हा दोघांमधील नाते प्रेमाचे असते तेथे संवाद, सृजनशिलता, कल्पकता, चिकित्सक वृत्ती निर्माण होणे आणि प्रश्न पडणे आणि विचारणे घडते. हे घडण्याची क्रीया प्रेमाच्या नात्यात असते. प्रेमात स्वातंत्र्यता असते. त्या नात्यात स्विकृती असते. त्यामुळे या प्रेमाच्या नात्यांने जे जे घडते ते खरे शिक्षण असते. किंबहुना ते सर्वात प्रभावी माध्यम असते.

प्रेम ही मानवी जीवनातील सर्वात प्रभावी,निर्मळ भावना आहे.प्रेमाने जीवन फुलते. बहरते प्रेम म्हणजं बंध असतो. प्रेम अंतरिक भावना आहे. ती बाहय प्रेरक देखील आहे. प्रेम म्हणजे वय, जात, धर्म, लिंग, गरीब, श्रीमंत, व्यवसाय, नोकरी, प्रतिष्ठा यांच्या पलिकडचे नाते असते. श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्यात प्रेमाचे नाते होते. इसाप आणि त्यांचा मालक यांच्यात नोकर मालक बंध होते, पण त्यांच्या अंतरिक प्रेमाचे नाते उभे राहिले आणि गुलामीच्या बेडया तुटल्या.

प्रेमाने विविध कारणांमुळे असलेले अंतर कमी होत गेले. प्रेमात क्षमाशिलतेची भावना असते. प्रेम करणा-यांचे ज्यांचेवरती प्रेम असते त्यांने केलेल्या चुकांची स्विकृती असते. त्यात चुकांना पोटात घालणे असते. चुका केल्या म्हणून ना व्देष असतो, ना तिरस्कार…केवळ प्रेमाने समजावणे आणि चुकांची दुरूस्ती करणे असते. पण प्रेम मात्र विकत घेता येत नाही. ते प्राप्त करता येत नाही. प्रेम मागून मिळत नाही.

जेथे प्रेम नसते तेथे कडक शिस्तीचा भाव असतो. शोषणाची वृत्ती असते. प्रेमाचा अभाव म्हणजे संघर्ष असतो. एकमेकाचा हेवा असतो.मात्र प्रेम असेल तर शुन्यत्वाचा अनुभव असतो.प्रेम हा शांततेचा अनुभव असतो.शांततेचा मार्ग असतो.स्वार्थाचा त्याग असतो. विकासाची ओढ असते.प्रगतीची वाट असते त्यामुळे शिक्षणात प्रेमाची निंतात गरज सातत्याने व्यक्त होत असते..

शिकणे तेव्हा परिणामकारक होते जेव्हा विद्यार्थ्यांवरती प्रेम असेल .जगात अनेक महान व्यक्ती,वैज्ञानिक,चित्रकार,कलाकार यांच्या चरित्राचा आढावा घेतला तर अनेक जन व्यवहारिक जीवनाच्या पातळीवर विक्षप्त वाटत असतील ही पण त्यांचे आय़ुष्यात त्यांनी आपल्या आवडत्या क्षेत्रात निंतात प्रेम केले त्यातून त्यांना व्यवाहारिक पातळीवर यश मिळाले नसेल मात्र त्यांनी ज्या विषयावरती प्रेम केले त्यात ते यशाचे शिखर सहज पादाक्रांत करताना दिसतात.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पी.ए असलेले नानक रतू यांनी त्यांच्या काही आठवणी लिहिल्या आहेत.त्यात त्यांनी म्हटले आहे , की बाबासाहेब रात्री आपले वाचन ,लेखन करीत असतांना त्यांच्या जेवणाच्या टेबलावरती ताट नेऊन ठेवले असायचे..बाबासाहेब अभ्यास करीत असायचे.मी परवानंगी घेऊन घरी निघून गेलेलो असायचो. दुस-या दिवशी आल्यानंतर पाहिले तर ताट जागेवरती असायचे.

त्यांना विचारले तर त्यांना जेवनाची आठवण देखील नसायची.अन्न ही गरज आहे. पण स्वतःच्या कामावरती, वाचन, लेखनावरती असलेल्या प्रेमाने ते घडले होते. प्रेम ही भावना शिक्षणात निंतात गरजेची आहे. कारण शिक्षणात यंत्राचा फारसा उपयोग नाही.येथे शिक्षण जे काही होते केवळ आणि केवळ मानवी आंतरक्रियेवरती.येथे सर्व व्यवस्था ही मानवी संबंधावरती अवलंबून आहे.

त्यामुळे हे बंध अधक घटट विकसित करण्यासाठी प्रेमांचाच मार्ग अनुसरण्याची गरज आहे.शिक्षणात प्रेमाची गरज अनेक विचारवंतानी व्यक्त केली आहे.शिक्षण प्रक्रियेत जर काही करायचे असेल तर केवळ आणि केवळ मुलांवरती प्रेम करा..बाकी काही नको.इतर गोष्टी आपोआप गुणवत्तेने घडत जातील .

शिक्षक जेव्हा मुलांवरती प्रेम करतो तेव्हा शिकविलेल्या सर्व गोष्टी मुलांला समजतात. येथे नात्याचे बंध एकमेकासाठी कष्टत राहाण्याची प्रेरणा असते. विद्यार्थ्यांचे प्रेम शिक्षकांना प्रेरणा देत असते.उत्तम अध्यापन व्हावे.मुलांच्या हदयाशी भिडावे.त्यांच्या जीवनाशी नाते सांगणार अध्ययन अनुभवांची बांधणी घडावी यासाठी शिक्षक सातत्यांने स्वतःला ज्ञानसंपन्न करण्याचा प्रयत्न करीत असतात.त्यासाठी वाचनाचा ध्यास असतो.त्या वाचनातै केवळ विद्यार्थ्यांना ज्ञानसंपन्न करण्याचा विचार असतो.

आपल्या विद्यार्थ्यांना एका गुणवत्तेच्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी शिक्षक अंनत प्रयत्न करीत असतो.जीवन व्यवहारात आपण ज्यांचेवरती प्रेम करतो त्या प्रेमाच्या नात्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा असते.येथे पण अनेक शिक्षक ध्यास घेऊन काम करीत राहातात.तो ध्यास म्हणजे केवळ विद्यार्थ्यावरील प्रेम असते.अनेक वर्ष शिकविण्याचा अनुभव असून देखील शिक्षक पुन्हा पुन्हा आपला अभ्यासाचा मार्ग चालत राहातात.

नव्या नव्या पाऊलावाटा धुंडाळत राहातात त्याचा अर्थ काय असतो , तर विद्यार्थ्यांवरील प्रेम असते. शिक्षक नवनविन पध्दतीने मुलांच्या गुणवत्तेसाठी प्रयत्न करीत राहातात.त्या प्रेमातून उपक्रमशिलता जोपासणे घडते.शिक्षकांना शिकविण्यासाठी आनंदाचे भरते येत राहाते. अनेक प्रयत्नातून त्याचा प्रवास सुरूच असतो. त्याच बरोबर शिक्षकांसाठी असलेल्या नवनविन तंत्रज्ञान आणि ज्ञानाची प्राप्तीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असतात.

प्रशिक्षणातून मुलांच्या विकासाचा मार्ग शोधत असतात. कोणतेही प्रशिक्षण त्याला टाकाऊ वाटत नाही.माझ्या मुलांसाठी काय काय आहे त्याचा शोध आणि चर्चा,कृती असते. या प्रेमातून शिक्षक स्वतःला जीवंत ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यामुळे नव्याची भूक सतत असते त्यामागे केवळ विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील प्रेमाचे नात असते. इतक्या प्रेमाने एखादा शिक्षक जेव्हा कार्यरत राहातो, तेव्हा पुस्तकाच्या पानापानवर शब्दांच्या गर्दीत दडलेले शिक्षणांचे सिंध्दात आपोआप यशस्वी होतांना पाहावयास मिळतात.

अनेकांनी आपल्या आयुष्यात एखाद्या क्षेत्रात जी यशाची गगनभरारी घेतली आहे.तिच्या मागील रहस्य विचारले , तर त्यांचे उत्तर असते अमूक शिक्षक ..ते अमुक शिक्षक म्हणजे काय असते ? तर त्या शिक्षकांचा त्या विषयातील रस असतो. अभ्यासाची वृत्ती आणि दृष्टीकोण असतो.विद्यार्थ्यांच्या प्रेमापोटी जेव्हा हा प्रवास घडतो तेव्हा विद्यार्थ्यी त्या त्या क्षेत्रात यशाच्या शिखरावर जाण्याचा प्रवास असतो.

त्यामागे शिक्षकांने निर्माण केलेली पाऊलवाट असते.शिक्षक ज्या पध्दतीने वर्गात अनुभवाची रचना करतात.त्यात जितकी म्हणून विविधता आणली जाते तितके विद्यार्थी त्यात रमतात.त्या प्रवासाने अनेकांच्या आयुष्याची पाऊलवाट निर्माण होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यांची पाऊलवाट शिक्षकांच्या प्रेमाच्या विचारातून जात असते. प्रेम असेल तर विद्यार्थी चुका करतो हे स्विकारणे आपोआप घडते.त्यात चुकांचा भाव नसतो.

हे घडत राहाते इतक्या सहजतेने त्याची स्विकृती असते. एक तरूण तरूणी विवाहबध्द होतात.त्यांनतर लग्नानंतर पहिल्याच वेळी सासरच्या घरी नवविवाहित तरूणी स्वयंपाक करते. त्यात तीने केलेली भाजी अंत्यत पातळ झालेली असते. पती,सासरा जेवायला बसलेले असतात. पती समोर बसलेल्या आईला विचारतो “ आई भाजी पातळ झाली आहे ग..” तर आई म्हणते “ भाजी तर तुझ्याच पत्नीने केली आहे ”. त्यानंतर मुलगा आईला म्हणतो “ आई भाजी खुप छान झाली आहे ”.पातळ झालेली भाजी छान कशी झाली ? तर त्यामागे असलेल्या नात्यातील प्रेम होते. त्यामुळे प्रेमाच्या नात्यात चुकांची स्विकृती असते. मुलांच्या चुका स्विकारल्या गेल्या तर शिकणे अधिक परिणामकारक व प्रभावी होण्याच्या दृष्टीने प्रवास उत्तम घडत राहील

शिक्षक व विद्यार्थ्यांच्या नात्यात प्रेम असेल तर चुका दुरूस्ती करण्यासाठी शिक्षक पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहातात. त्यात त्यांचा संताप नसतो.त्रागा नसतो आणि राबणे नसते .त्या प्रक्रियेत देखील त्यांना आनंद असतो.यात एखादी गोष्ट समजली नाही , तर विद्यार्थी सहजतेने प्रश्न विचारतात.त्या प्रश्नात जाणून घेणे असते.प्रश्नाची मोकळिक असते.प्रश्न विचारतांना त्यात भय नसते आणि लज्जाही..केवळ जाणणे असते.

प्रेमात असलेल्या नात्यामुळे निर्माण झालेल्या विश्वासामुळे हे साध्य होत असते. आईला जितक्या सहजतने आणि निर्मळतेने प्रश्न विचारले जातात. मनात येणा-या शंकांचा शोध घेतला जातो तितक्या सहजतेने शिक्षणात घडण्याची गरज असते.त्यामुळे शिक्षणाचा पहिला नियम काय असेल तर प्रेम करणे हाच असायला हवा..पदवी..हा नियम नंतर येतो.बोलता न येणा-या,सांगता न येणा-या लहान बाळाचे दुखणे आईला कसे कळते,बाळाला भूक लागली आहे ही जाणीव त्या आईला कशी होते ? या प्रश्नाच्या मुळाशी केवळ मातृत्वाची आस आणि प्रेमाची नाळ असते.

शिक्षणात शिक्षकत्वाची आस आणि प्रेमाची कास असेल तर शिक्षणातील प्रश्न आपोआप सुटतील. प्रश्नाच्या मुळाशी केवळ प्रेमाचा अभाव आहे का ? याचा शोध घ्यायला हवा. जेथे प्रश्न नाहीत अशा ठिकाणी काय उपाययोजना आहेत तर केवळ प्रेमाचा वर्षाव हे तर कारण नाही ना ? याचा विचार करायला हवा. गिजूभाई बधेका यांनी चाललेली पाऊलवाट यापेक्षा वेगळी कोणती होती.. ?

– संदीप वाकचौरे

(लेखक- शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)

- Advertisment -

ताज्या बातम्या