वरदान...मृत्यूच जेव्हा प्रेरणा बनून आला

चढावर दम तुटला. सायकलचं एक पायडल मारण्याचंही त्राण उरलं नाही. खाली उतरलो. बळेबळेच सायकल हाताने ढकलीत चालत राहिलो. श्वास फुलून आला होता. दवाखान्याची पायरी चढेपर्यंत अंगात ताप भरला होता. कंपनी ते दवाखाना या दरम्यानच्या चार किलोमीटर अंतराने जीव कासावीस झाला होता...शशिकांत शिंदे यांची ‘कवितेमागची कथा’ ब्लॉगमालिका...
रेखाचित्रे : ज्योती डेरेकर
रेखाचित्रे : ज्योती डेरेकर

जीवनाचं अंतिम चरण म्हणजे मृत्यू. अटळ असला तरी तो कुणालाच प्रिय नाही. ज्यांना त्याचं व्याकरण समजतं तेच त्याला वरदान मानून स्विकारतात. आयुष्य पुढे सरकत राहतं. तो असतोच आसपास लक्ष ठेऊन श्वासांवर. लय बिघडली की घेतो ताबा. चैतन्य लोप पावतं. आपण पार्थिवालाच कवटाळत राहतो. सृष्टी नित्यनूतन असते. जन्म आणि मृत्यूची पारडी हेलकावत राहतात. निसर्गचक्र आकार घेतं. त्यात सगळी सुखदुःखे, समाधान, आनंद, राग-लोभ, मत्सर, असूया, प्रेम, करूणा, माया-ममता, इच्छा-आकांक्षा ठासून भरलेल्या असतात. कुणाच्या प्रारब्धात काय असेल ? सांगता येत नाही. ज्याच्या त्याच्या मगदूराप्रमाणे जीवनाचा आलेख वरखाली होत राहतो. मृत्यूच्या चाहूलीने काहीजण भांबावतात. जे त्याला सहृदासारखं आलिंगन देतात त्यांचा सत्याचा शोध संपलेला असतो. त्यांचा चेहेरा परिपूर्तिच्या तेजाने झळाळून उठतो.

चढावर दम तुटला. सायकलचं एक पायडल मारण्याचंही त्राण उरलं नाही. खाली उतरलो. बळेबळेच सायकल हाताने ढकलीत चालत राहिलो. श्वास फुलून आला होता. दवाखान्याची पायरी चढेपर्यंत अंगात ताप भरला होता. कंपनी ते दवाखाना या दरम्यानच्या चार किलोमीटर अंतराने जीव कासावीस झाला होता. नोकरीच्या सुरवातीच्या काळात टेक्निशियन म्हणून व्हिडिओकॉन कंपनीत उमेद्वारी करीत होतो. नगर पुणे रस्त्यावर रेल्वे ब्रिजला खेटून असणाऱ्या इंडास्ट्रियल एरियात कंपनीचा पीआयपी सेक्शन होता. त्यावेळी भिंगारला रूम करून मित्रांसमवेत राहत होतो. रोजची प्रवासाची दगदग, कंपनीतलं मान मोडून करावं लागणारं काम आणि खाणावळीतलं निकृष्ट प्रतीचं जेवण. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. त्यादिवशी कामावर असतानाच अस्वस्थ वाटायला लागलं. ड्युटी आॕफिसरच्या लक्षात आल्यावर त्याने दवाखान्यात धाडलं. डॉक्टर मायाळू होते. कंपनीशी करार केलेला असल्यामुळे त्यांनी सरळ अॕडमिट करून घेतलं. दोन दिवस थांबलो. ताप उतरत होता आणि पुन्हा चढत होता. आईवडलांना कळालं. ते सरळ गावाकडं घेऊन गेले. शिर्डीच्या साईनाथ रूग्णालयात पुन्हा अॕडमिट झालो. तापाचा चढउतार चालूच होता. त्यावेळी श्रीरामपूरचे एक हृदयरोगतज्ञ दर गुरूवारी रूग्णालयात व्हिजिटला येत असत. स्थानिक डॉक्टरांनी त्यांचाही सल्ला घ्यायचं ठरवलं. तपासल्यावर गंभीर मुद्रेने ते बराच वेळ डॉक्टरांशी बोलत राहिले. जन्मतःच हृदयाला छिद्र असल्यामुळे पुढील उपचारांसाठी त्यांनी मुंबईच्या केईएम हॉस्पिटलचा रस्ता दाखवला. सोबत संबंधित डॉक्टरांना दाखवण्यासाठी एक पत्रही दिलं. तज्ञ निघून गेल्यावर आधीच कमकुवत असलेला मी मनातून खूपच घाबरलो. त्या क्षणी मनात काय काय चमकून गेलं ! मृत्यूची गडद छाया पसरल्याचा भास झाला. जीवनाचा हिरवागार प्रदेश काळजीच्या तप्त उन्हाने पार कोमेजून गेला. सगळं संपल्याचा विरक्त भाव मनात दाटून आला. हा असा आजार कधी ऐकला नव्हता. त्याची दाहकता ठाऊक नव्हती. तरीही पार कोलमडून गेलो. कोसळलो. मृत्यूचे विचार मनात थैमान घालू लागले. मृत्यू या विषयाने माझा ताबाच घेतला. आईवडील, भाऊबहिण, मित्रपरिवार यांची भेट पुन्हा होईल का ? हृदय सारखं धडधडत होतं. त्याचे ठोके मात्र विसंगत पडत होते. त्या दोन दिवसात मृत्यूच्या खूप समीप जाऊन उभा राहिलो. वेगवेगळ्या परिप्रेक्ष्यातून त्याला न्याहाळत होतो. ही सगळी नाती, हा सगळा जिव्हाळा तुटतो की काय ? म्हणून तळमळत होतो. हे सगळं एवढ्या लवकर तोडायचं होतं तर मग निर्माणच का केलं ? त्या नियंत्याला हाका घालत राहिलो. त्या दोन दिवसांच्या चिंतनातून 'वरदान' कविता कागदावर उमलून आली. मृत्यूच्या घुसळणीतून निघालेल्या त्या हलाहलाला प्राशन करून कवितेने माझ्या जिजीविषेवर अमृताचे थेंब शिंपडले.

रेखाचित्रे : ज्योती डेरेकर
रेखाचित्रे : ज्योती डेरेकर

एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली 'वरदान' कविता लिहून झाली. त्यावेळी वयाने नुकतीच विशी ओलांडली होती. त्या अनघड वयात एखाद्या पोक्त कवीने मांडावा असा आशय त्या कवितेत उतरला होता. आजही ती कविता वाचताना त्यावेळचा थरार आठवून अंगावर रोमांच उभे राहतात. एकोणीसशे एकोणनव्वद साली महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अनुदानातून शब्दालय प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या 'आठवणींच्या कविता' या पहिल्या कवितासंग्रहात 'वरदान' कविता समाविष्ट झाली.

डॉ. अविनाश जोशी, प्रा. शंकरराव दिघे या दोन नावांचा प्रवरानगरच्या साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात विशेष दबदबा होता. नेहरू ललित कला अकादमीच्या माध्यमातून ते दोघेही कार्यरत होते. ते स्वतः कवी असल्यामुळे दोघांच्याही मनात कवितेविषयी कमालीची आस्था होती. अकादमीच्या माध्यमातून प्रोत्साहन म्हणून ते वेगवेगळे कार्यक्रम घेत. त्यावर्षी त्यांनी कवितावाचन स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं. दादासाहेब कोते, यशवंत पुलाटे, भास्करराव लगड, पोपट पवार, भागवत अनाप या कविमित्रांसोबत मीही स्पर्धेत भाग घेतला. 'वरदान' कवितेला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. रोख रक्कम आणि चांदीचा मुलामा असणारी ढाल घेऊन घरी परतलो. ढाल दर्शनी भागात ठेऊन पुढे कितीतरी दिवस आल्यागेल्याजवळ वडलांनी कवितेचं केलेलं कोडकौतुक आजही माझ्या स्मरणात आहे. त्याच कार्यक्रमात डॉ. जोशींनी कवितेचा आशय आणि वाचनाविषयी बोलताना आवर्जून केलेला उल्लेख माझ्या मनात प्रेरणेचा दिवा लावून गेला. डॉ. जोशी, प्रा. दिघे आणि माझे वडील आज ते तिघेही हयात नाहीत. परंतु त्यांनी दिलेल्या आशीर्वादाचं वरदान मला हयातभर पुरणार आहे.

रेखाचित्रे : ज्योती डेरेकर
रेखाचित्रे : ज्योती डेरेकर

कवयित्री संजीवनी खोजेला माझ्या कविता खूप आवडायच्या. एकोणीसशे नव्वद साली आॕगस्ट महिन्याच्या एका सायंकाळी जयंत येलूलकर, अलका मेहता आणि मी संजीवनीच्या घरी एकमेकांच्या कविता ऐकत बसलो होतो. मी माझ्या अलीकडे लिहिलेल्या मृत्यूच्या कविता ऐकवल्या. संजीवनीला त्या एवढ्या आवडल्या की तिने 'वरदान' कविता माझ्या हस्ताक्षरात लिहून घेतली आणि तिच्या पर्समध्ये ठेऊन दिली. पुढे आठदहा दिवसांनीच जीवनावर प्रेम करणाऱ्या या कवयित्रीने बालकवींप्रमाणेच रेल्वेरूळावर धडाडत्या इंजिनाखाली मृत्यूची गळाभेट घेतली. बाजूलाच पर्स पडलेली. त्यात मृत्यूवर भाष्य करणाऱ्या तिच्या काही कविता. माझ्या हस्ताक्षरातील 'वरदान' कविताही त्यात मिसळून गेलेली. त्या सायंकाळी कविता ऐकताना तिच्या चेहेऱ्यावरचे बदलत जाणारे भाव आम्हाला कुणालाच टिपता आले नाहीत याचं शल्य आजही अणकुचीदार होऊन टोचत आहे.

एकोणीसशे शहाण्णव साली अहमदनगर येथे पार पडलेलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ऐतिहासिक स्वरूपाचं झालं. त्याने अनेक विक्रम प्रस्थापित केले. अनेक मानदंड निर्माण केले. संमेलनाच्या पूर्वसंध्येला 'काव्यनगरी' हा मराठी जगतातील चारशे कवींच्या कवितांचा प्रातिनिधीक कवितासंग्रह राजकारण आणि साहित्याची जवळीक असणाऱ्या डी. एम. कांबळेंनी प्रसिद्ध केला. ते त्यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद नगर शाखेचे अध्यक्ष होते. त्यांना आवडणाऱ्या 'वरदान' कवितेला त्यांनी काव्यनगरीत आवर्जून स्वतंत्र स्थान दिले. काव्यनगरीचा काव्यजगतात बराच बोलबाला झाला.

मृत्यूच जेव्हा प्रेरणा बनून आला तेव्हा 'वरदान' कवितेचा जन्म झाला. मृत्यूच्या त्या किंचित्काल दर्शनाने माझ्यातील मूलभूत प्रेरणांना जागं केलं. सदासर्वदा लख्ख उजेड काय कामाचा ? दाट काळोखात ध्यान लावून बसता आलं पाहिजे. आतला प्रकाश त्या समाधीचीच वाट पाहतो आहे. जीवनाचं 'वरदान' देण्यासाठी अखंडपणे मिणमिणतो आहे.

वरदान

जे जगण्यासाठी जन्म तुला मागितला

ते जगणे आता मरणाच्या गर्भात

या जन्माचा मी कसा सावरू तोल

दे हाक तुझ्या मी असेन पडसादात.

ही करूणेची अस्वस्थ प्रार्थना माझी

ऐकून तुझे मंदिर कसे सुनसान

प्राणांचा माझ्या चिरा चिरा ढासळला

तू स्तब्ध कसा ? दे मृत्यूचे वरदान.

रक्तात पोसले हे कुठलेसे गाव

धमन्यात दूरवर किती पांगली नाती

या साऱ्यांच्या रे मनभरल्या मायेशी

तू सांग कशाला नाळ जोडली माझी ?

तोडता न येती असले बंध जनांचे

मी जगण्याचा हा शाप भोगतो आहे

या काठावरती उभा तुला विनवितो

तारणे, मारणे तुझ्याच हाती आहे !

- शशिकांत शिंदे

(९८६०९०९१७९)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com