Thursday, April 25, 2024
Homeब्लॉगअजन्मा

अजन्मा

बरड माळरानावर कष्टपूर्वक फुलवलेल्या माणूसकीच्या मळ्याचं, स्नेहाचं आलय असणारं तीर्थस्थान पाहावं म्हणून स्नेहालयचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी यांचा प्रेमळ आग्रह होता. केवळ आर्थिक मदत नको, तर तुम्ही या आणि उभा केलेला हा मानवतेचा खटाटोप समजून घ्या अशा प्रांजळ भूमिकेतून गिरीश सर साद घालीत होते.

जगाचा अव्हेर ज्यांच्या वाट्याला आलाय त्यांच्यासाठी निरलसपणे काम करणारी ‘स्नेहालय’ ही संस्था. प्रत्यक्ष भेट देऊन मलाही तो प्रयोग समजून घ्यायचा होता. दिवसभराचा वेळ काढून संस्थेत दाखल झालो. सोबतचा स्वयंसेवक एकेक गोष्ट दाखवीत होता. थरारून जाण्याची वेळ माझ्यावर होती. फिरत फिरत एका ओट्याजवळ येऊन थांबलो. ओट्यावर काही लहान मुलं शांतपणे बसली होती. गंभीर मुद्रेनं नजर शुन्यात लावून बसलेली. सगळंच हरवल्याचा भाव त्यांच्या चेहऱ्यावर तरंगत होता. स्वयंसेवकाने आपणहून माहिती पुरवली. ते सर्वजण एडस् बाधीत होते. काही दिवसांचेच सोबती. अंगावर सर्रकन काटा उभा राहिला. त्यांच्या गहनगूढ डोळ्यांचा थांग लागत नव्हता. कुठला विचार करीत असतील? झालेल्या दुर्धर आजाराची त्यांना कल्पना असेल का? मृत्यूची भयावहता त्यांना ठाऊक असेल का? कुणाची वाट बघताहेत ते? कुठे असेल त्यांची आई? जन्मतःच दुर्भाग्याचा हा शाप ललाटी रेखून कुठला खेळ खेळू पाहतेय नियती? प्रश्नांचं भणाणणारं मोहोळ अधिकच विव्हल करीत होतं. त्यांच्याशी बोलावं, गप्पागोष्टी कराव्यात यासाठी गिरीश सरांचा आटापिटा चाललेला होता. कारण गिरीश सरच त्यांचे कर्तव्यदक्ष, मातृहृदयी पालक होते. खूप वेळ मी तिथे तसाच उभा होतो. मुलांच्या भवितव्याची आखूड रेषा मला सतावत होती. कुठल्यातरी बळाने ती लांबसडक व्हावी म्हणून मी मनातल्या मनात प्रार्थना करीत होतो. अचानक मुलं उठली आणि ओट्यावरून खाली धावत आली. समोरून गिरीश सर येत होते. सगळीच मुलं त्यांना जाऊन बिलगली. आईने लाड करावेत तसे त्यांनी सगळ्यांचे लाड केले. मुलांच्या डोळ्यात आता एक वेगळीच चमक दिसत होती. मला गिरीश सर आकाशातून उतरलेल्या एखाद्या सुंदर देवदूतासारखे दिसत होते.

- Advertisement -

संस्थेच्या उभारणीपासूनचा इतिहास गिरीश सरांकडून ऐकायला मिळाला. आलेल्या अडीअडचणी, बेतलेले प्रसंग, दुर्दैवी घटना यातून मार्ग काढीत उभं राहिलेलं स्नेहालयचं विलोभनीय रूप त्यांनी आमच्यासमोर साकार केलं. ज्या वयात मुलांना आईवडील हवे असतात त्या वयातल्या, संस्थेत असणाऱ्या त्या एडस् बाधीत मुलांसाठी गिरीश सरांचं हृदय द्रवत होतं. सक्षम, सुदृढ मुलांचं पालकत्व स्विकारणाऱ्या मातापित्यांचं त्यांना कौतुक होतं. परंतु याही मुलांच्या आयुष्याची वजाबाकी लक्षात घेऊन त्यांचा कुणीतरी स्विकार करावा यासाठी ते तळमळत होते. त्यांच्या आयुष्याच्या छोट्याशा तुकड्यावर ते समाधानाचं चांदणं पसरू पाहत होते. त्यांच्या जगण्यातला आनंद त्यांना अक्षय करायचा होता. त्या ईश्वरासमान असणाऱ्या मातापित्यांची ते अहोरात्र वाट पाहात होते.

डॉ. राजेंद्र धामणे आणि डॉ. सुचेता धामणे यांच्या ‘माऊली’ संस्थेबद्दलही मनात कुतुहल होतं. कविवर्य किशोर पाठक यांना ‘सावाना’ दिवाळी अंकासाठी माऊलीच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारा लेख हवा होता. म्हणून मग डॉ. धामणेंची वेळ घेऊन माऊलीत एके दिवशी दाखल झालो. घरच्यांनी वाऱ्यावर सोडलेल्या आणि रस्त्यावर वेडसरपणे फिरणाऱ्या मनोरूग्ण महिलांचं ‘माऊली’ हे आश्रयस्थान. डॉ. सुचेता आणि डॉ. राजेंद्र हे त्यांचे आईवडीलच जणू. एकेका स्त्रीची कहाणी काळजावर डागण्या देत होती. काहींना लहान बाळं होती. त्यांचंही पालनपोषण, शिक्षण याची माऊलीत तजवीज होती. जगाने नाकारलेल्या या निरागस सुंदरतेचा धामणे दाम्पत्याने स्विकार केला होता. त्यांनाही त्या मुलांच्या पालकत्वाची चिंता सतावत होती.

स्नेहालय, माऊली या केवळ संस्था नाहीत. ती आधुनिक जीवनाची निर्मळ तीर्थक्षेत्रं आहेत. तिथे प्रेम आहे, वात्सल्य आहे, आधार आहे आणि काळजीही आहे. माणूसकीचा झरा तिथे अखंडपणे वाहतो आहे. कमालीची करूणा आणि कमालीच्या सहिष्णूतेने तो परिसर भारलेला आहे. ईश्वरालाही अशीच ठिकाणं प्रिय असतात. तो तिथेच वसती करतो. डॉ. राजेंद्र, डॉ. सुचेता आणि डॉ. गिरीश ही त्याचीच लघुरूपं आहेत.

स्नेहालय, माऊलीला भेट देऊन आल्यानंतर पुढे कितीतरी दिवस मी अस्वस्थ होतो. त्या विदारक सत्याने मला अंतर्बाह्य बदलून टाकलं. ओट्यावर बसून कुणाचीतरी वाट पाहणारी ती निरागस मुलं नजरेसमोरून हलत नव्हती. जागेपणी, स्वप्नात मला वेगळेच भास होत होते. कल्पनेतच मी त्या मातापित्यांना तिथवर धाडत होतो. आशाळभूतपणे वाट पाहणाऱ्या त्या मुलांचं बोट धरण्याचं धाडस मात्र होत नव्हतं. विचारांच्या आवर्तात कधीतरी डोळा लागला… प्रवासात माझ्या समोरच्या सीटवर मला ते मातापिता दिसले. अनाथालयातून घेऊन आलेल्या त्या विकलांग जीवाच्या सरबराईत ते आकंठ बुडालेले. मला मार्ग सापडला. तंद्रीतून जागा झालो. त्या अनामिक जीवासाठी रोखून धरलेला आकांत कागदावर मांडत राहिलो. त्याचीच ही कविता, ‘अजन्मा’. समाजशिक्षण हे मूल्य रूजवण्यासाठी लिहून झालेल्या ‘अजन्मा’ कवितेने माझ्या काळजावरचा खूप मोठा भार हलका केला. प्रत्यक्षात नाही परंतु कवितेतून मातापित्यांना मी त्या अनामिक मुलांकडे धाडत राहिलो. कल्पनेत का होईना पण त्या मुलांच्या चेहऱ्यावरचं समाधान व्याकूळपणे निरखत राहिलो.

नोव्हेंबर दोन हजार तीन साली लिहून झालेली ‘अजन्मा’ कविता ‘परिवर्तनाचा वाटसरू’च्या दिवाळी दोन हजार सहाच्या अंकात प्रसिद्ध झाली. पुढे दोन हजार चौदा साली आलेल्या ‘ताटातुटीचे वर्तमान’ या कवितासंग्रहात तिचा समावेश झाला. ‘ताटातुटीचे वर्तमान’ वाचल्यावर सुप्रसिद्ध अनुवादक प्रा. डॉ. विद्या सहस्त्रबुद्धे यांनी संग्रहातील काही निवडक कवितांचा हिंदीत सुगम अनुवाद केला. ‘अजन्मा’ नावानेच झालेला हिंदी अनुवाद दिल्लीहून प्रसिद्ध होणाऱ्या साहित्य अकादमीच्या ‘समकालीन भारतीय साहित्य’ या द्वैमासिक साहित्य पत्रिकेत जानेवारी/फेब्रुवारी दोन हजार एकोणीस साली प्रसिद्ध झाला. विद्याताईंनी मराठीचा उंबरठा ओलांडून माझ्या कवितेला राष्ट्रीय पातळीवर नेलं. त्या सरस अनुवादाची साहित्य वर्तुळात खूप छान चर्चा झाली.

‘अजन्मा’ कवितेने माझ्या आस्थेचा परीघ अमर्याद वाढवला. आजही कधी रस्त्यावर वेडसरपणे फिरणारे जीव पाहिले की हृदयात कालवाकालव होते. काय वाढून ठेवलं असेल त्यांच्या भविष्यात. आणि मग मला स्नेहालय, माऊली ही तीर्थक्षेत्रं दिसायला लागतात. तेवढाच मनाला दिलासा मिळतो. ईश्वराचा अंश असणाऱ्या त्या पाठमोऱ्या प्रतिमांना माझं नास्तिक मन मनोभावे दंडवत घालत राहतं.

अजन्मा

ते दोघे बसलेले गाडीत

माझ्या समोरच्याच सीटवर

त्यांच्यासोबत एक विकलांग मुलगी

तिच्या विषयीची आस्था दोघांच्याही डोळ्यात काठोकाठ भरलेली

तिच्या तोंडावरून गळणारी लाळ पुसण्यासाठी

बापाचा रूमाल तत्पर

जरा कुठे कलंडू लागली तर आईच्या काळजात कालव

मी न्याहाळत राहतो त्यांना आळीपाळीने

तर ते दोघेही त्या अपंग जिवाच्या सरबराईत मशगूल

स्टेशनांमागून जातात स्टेशनं

उजवीकडचा दिवस कलतो डावीकडे

ते आणि मी बहुदा शेवटच्या स्टेशनपर्यंतचे प्रवासी

रात्रीच्या गुडुप अंधारात थांबते गाडी

दिव्यांच्या मिणमिणत्या उजेडात ते दोघे तिला

काळजीपूर्वक उतरवून घेतात खाली

न राहवून मी विचारतो त्या मुलीचे नाव

तर दोघांचाही चेहरा प्रश्नांकित

जरा सावरून मग दोघेही सांगतात उत्साहाने

तिचे नाव अनामिका

आजच तिला घेऊन आलो अनाथालयातून

आमच्यासाठी ती ‘अजन्मा’

छानसे हसून भर्रकन निघूनही जातात

ते जिथे उभे असतात तिथल्या मातीचा मळवट भरून

त्यांच्या दूरवर धुसर होत जाणाऱ्या पाठमोऱ्या प्रतिमांना

माझं नास्तिक मन मनोभावे घालत जातं दंडवत.

_शशिकांत शिंदे

(९८६०९०९१७९)

- Advertisment -

ताज्या बातम्या