Friday, April 26, 2024
Homeब्लॉगशब्दांसाठी...

शब्दांसाठी…

प्रतिभासंपन्न मनाच्या हळव्या भूप्रदेशावर नकळतपणे शब्दांचं दान पडतं आणि कवितेचं शिवार हिरवंगार होऊन जातं. शब्द माहेरपणाला येतात. प्रतिभेची सावली जडभार होते. अंगणातलं आभाळ कवितेच्या अलवार पावलांनी मोहरून जातं. वारा वाहात असतो झाडांना मिठी घालून. पिवळसर हिरव्या तृणपात्यांच्या माथ्यावर आशीर्वादाच्या लयबद्ध लाटा आंदोलत राहतात.

पानाफुलांच्या स्पर्शाने पुलकित झालेले शब्द चिंब दवासारखे निथळत राहतात. पक्षी स्थलांतर करतात. त्यांच्या चोचीतून ओघळलेले शब्द कवितेच्या अभयारण्यात घनगर्द होत जातात. नदीचं संथ वाहणं. माथ्यावरील आभाळाच्या उत्कट प्रतिमा सांभाळणं. काठावरील कसदार प्रतिभेला हिरवागार आशय प्रदान करणं. यातूनच कवितेची नागमोडी रेषा साहित्याच्या प्रतलावर उमटत जाते. कविता आतल्या उमाळ्याने धावत राहते. नक्षत्रांनी खच्चून भरलेल्या आभाळावर शब्दांचा चांदणचुरा उधळून उत्तररात्र पहाटेच्या पायघड्या ओलांडताना दिवसाच्या भेटीसाठी अधिर झालेली असते. क्षितीजावर उजेडाची लखलखीत कविता दैदिप्यमान होते. रात्री घाटरस्त्याने प्रवास करताना दूर दरीच्या पलीकडे प्रकाशाचे चिमुकले थेंब चमकताना दिसतात. त्या थेंबांचीच एक शलाका बनते. कवितेची ओळ प्रकाशमान होत जाते.

- Advertisement -

शब्द बटिक नसतात. त्यांना वशही करता येत नाही. ते प्रसन्न होतात तेव्हा अवघं भांडार खुलं करतात. अनेकविध प्रतिमांनी अवघा आसमंत नटलेला. प्रतिकांची गहनता अर्थसघन झालेली. छंद, कसबी कारागिरांप्रमाणे घडवतात अलंकारांच्या विविध मात्रा. आशयाचा पदर भरजरी होत जातो. शब्दांची नक्षीदार वेलबुट्टी कवितेचं सौंदर्य अंतर्बाह्य खुलवते. शब्दांच्या ठायी असतो अनामिक उर्जेचा स्त्रोत. त्यांनी उभारलेल्या प्राकृतिक रचनाबंधाला आपण बहाल करतो विविध संज्ञा. त्यातून उमटतात शांततेचे सूर तर कधी अराजकाचा उसळतो आगडोंब. शब्द बापुडे ! मूग गिळून गप्प बसतात. त्यांना सांधायची असते दरी, बांधायचा असतो पूल. अथक परिश्रमांनी उभारलेल्या ‘सौहार्द’ शब्दाची घोर विटंबना होते. प्रेम, करूणा, माया, ममता ही शब्दावली हतबल होऊन नामुष्कीचे स्वगत उच्चारत राहते.

शब्दांची ही ताकद नेहमीच माझ्या विस्मयाला चकीत करीत आलेली आहे. मला शब्दांशी खेळायला आवडतं. त्यातून बऱ्याचदा अचंबित करणाऱ्या काही चमत्कृती निर्माण झालेल्या आहेत. शब्द मला आकर्षित करतात. उदाहरणार्थ – वेळ मध्यरात्रीची आहे / आणि दारावरची बेल विचित्रपणे वाजते आहे / भितीने गर्भगळीत होऊन तुम्ही दार उघडता / तर समोर कुणीच नाही / अशावेळी निश्चितच ‘भास’ हा शब्द तुमच्या दारावरून परतलेला असतो. इथे अस्तित्व नसलेला ‘भास’ हा शब्द जीवंत होऊन त्या दोन तीन ओळींमध्ये दहशत पसरवत राहतो. किंवा, जमीनीपासून वातावरणाच्या पातळीपर्यंत कुठेही जा / तुम्ही तुमच्या नकळत एक गोष्ट करीत असता / तुम्ही तुमच्या आकारमानाएवढी ‘हवा’ तुमच्याच बाजूला सारीत असता. इथे पुन्हा न दिसणारी ‘हवा’ आपल्या उत्कंठेला धडका देत राहते. आणि ‘माय’ शब्द उच्चारताना माझ्या नजरेसमोर काय तरळतं ? तर, ‘म’ म्हणजे ती स्त्री. ‘म’ ला दिलेला काना म्हणजे तिने पुढ्यात ओढलेला पदर. ‘य’ म्हणजे पदराखाली दूध पिणारं तिचं सान लेकरू. ‘माय’ शब्दात मातृत्वाचा आशय हा असा काठोकाठ भरलेला आहे. शब्दांची हीच खरी श्रीमंती आहे. अर्थाला धक्का न देता त्यातला आशय खुलवता आला पाहिजे. मग कवितेची पायवाट आपोआप प्रशस्त होत जाते. कवितालेखनाच्या सुरूवातीच्या काळात म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली ‘शब्दांसाठी’ ही कविता लिहून झाली. कवितेला नियमित स्थान देणाऱ्या एका सुप्रसिद्ध साप्ताहिकात लगोलग प्रसिद्धही झाली. एकोणीसशे एकोणनव्वद साली नवीन वर्षाच्या स्वागताखातर संजय मांडुळे या संगमनेरला असणाऱ्या कविमित्राने ‘शब्दांसाठी’ ग्रिटिंग स्वरूपात मला धाडली. हा माझ्यासाठी सुखद धक्का होता.

शिर्डीला जगताप वाड्यात त्या दोन खोल्यांच्या छोट्याशा घरात आम्ही बरेच वर्षे राहिलो. कुटुंबातील पाच सदस्य आणि आला गेला पै पाहुणा यांच्यासाठी ते घर पुरत नसे. वाडा नावालाच परंतु गल्लीचा फील असल्यामुळे आम्ही तेथे रमलो होतो. हल्ली बडोद्याला असणारा आमचा लेखकमित्र संजय बच्छाव मला खिजवण्यासाठी मुद्दाम वाड्याचा उल्लेख जगताप बोळ असा करीत असे. बैठकीच्या खोलीत लोखंडी पलंग, सागवानी टेबल आणि तीन खुर्च्या दाटीवाटीने मांडलेल्या. त्या छोट्याशा खोलीतच टेबलाशी बसून मी माझी पहिली कविता लिहिली. त्या बाळबोध प्रयत्नांना कविमित्र दादासाहेब कोतेच्या प्रोत्साहनाचा स्पर्श झाल्यामुळे पुढे लिखाणात उत्तुंग झेप घेता आली. झपाटल्यासारखे, कार्यशाळेत बसल्यागत आम्ही दोघे लिहित होतो. लिहून झाल्यावर एकमेकांना ऐकवत होतो. तो आमच्या आनंदाचा भाग होता. प्रसिद्धीचा सोस नसल्यामुळे बाहेर कुठे धाडतही नव्हतो. बरंच लिहून झालं. परंतु समोरचा मंत्रमुग्ध होऊन मनःपूर्वक दाद देईल अशी कविता काळजातून उमटत नव्हती. त्याचा अदमास असल्यामुळे लिहिण्यात खंड पडत नव्हता. त्या प्रगल्भ जाणीवेचं व्याकरण पक्क असल्यामुळे पुढे जाऊन कवितेच्या पटलावर नोंद घेण्याजोगं काही करता आलं ! छोट्या मोठ्या अंकातून कविता छापून यायला लागली तसा इतरांना सुगावा लागला. काहींनी खिल्ली उडवली. काहींनी प्रशंसा केली. आमचे एक शिक्षक प्रत्यक्ष भेटीत आमचा नामोल्लेख खोचकपणे शाहीर असा करू लागले.

पावसाळी दिवस होते. भर दुपारची वेळ. आभाळ भरून आलेलं. वारा पडलेला. सुन्न शांतता. मी टेबलाशी बसलेला. झाकोळून आलेलं आभाळ माझ्या मनात उतरू लागलेलं. ढग ओथंबून आलेले. बरसण्यासाठी अस्वस्थ. नुसतीच घालमेल. संचिताच्या थंडगार हवेचा हळूवार स्पर्श आणि मग घनघोर बरसात. ते टिपण्यासाठीच चाललेला माझा आंतरिक संघर्ष. बाहेर पावसाचा कल्लोळ. त्यानेच खुली केली सर्जनाची पाऊलवाट. लिहित गेलो. जे आजवर सुचत नव्हतं ते निर्मितीप्रक्रियेच्या रूपाने कागदावर अवतरलं. चार ओळी लिहून झाल्या आणि शेजारी राहणाऱ्या गोसावी सरांनी आवाज दिला. त्यांना पेन हवं होतं. काय करावं ? माझ्याकडेही ते एकमेव होतं. आणि मला अजून सुचत होतं ते लिहायचं होतं. पेन न देणं बरोबर दिसणार नाही म्हणून देऊन टाकलं. कवितेची पुढची ओळ आतून धडका देत होती. मनातल्या मनात घोळवत राहिलो. अंमळ उशिरा सरांनी पेन आणून दिलं. मनात उमटलेल्या पुढच्या चार ओळी शब्दांसाठी झालेल्या अस्वस्थतेतून पूर्ण केल्या.

एकूणच साहित्याची निर्मितीप्रक्रिया समजावून सांगताना बऱ्याच मित्रांनी त्या कवितेचा उदाहरणादाखल वापर केला. कविसंमेलनाचं सूत्रसंचालन करताना कविमित्र संदीप काळे ‘शब्दांसाठी’ ही कविता सादर करून कवितेची निर्मितीप्रक्रिया उलगडून दाखवतो. कविमित्र प्रा. दादासाहेब कोते, प्रा. महेश कुलकर्णी, प्रा. डॉ. स्मिता भुसे, प्रा. डॉ. राजू रिक्कल विद्यार्थ्यांना कविता शिकविताना या कवितेचा आवर्जून दाखला देतात. लोकांच्या ओठावर गेलेल्या ओळी चिरकाल टिकून राहतात. ते भाग्य या छोट्या कवितेला लाभलं. प्रसंगी शब्दांसाठी जीव जाळण्याची तयारी ठेवावी लागते, तेव्हा कुठे संचिताचा पागोळ नवा शब्द होऊन कवितेतून अंकुरतो.

शब्दांसाठी

पाऊस जीवाचे

गाणे बनतो तेव्हा

मन रूजवायाला

शब्द एकही नुरतो….

मग अकल्पितासम

संचित पानांवरचे

पागोळ होऊनी

शब्द नवा अंकुरतो.

मी शब्दांसाठी

जीव गहाणून बसलो

कुणी म्हणतो वेडा,

‘काल शहाणा होता!’

त्या क्षुद्र पामरा

कसे कळावे आता

मी शब्दांसाठी

जीव जाळला होता.

शशिकांत शिंदे

(९८६०९०९१७९)

- Advertisment -

ताज्या बातम्या