Friday, May 10, 2024
Homeब्लॉगपुन्हा पुन्हा तोच खेळ

पुन्हा पुन्हा तोच खेळ

अगदी कोवळ्या वयात गोविंद बल्लाळ देवलांचं ‘संगीत शारदा’ हे नाटक पाहिल्याचं आठवतं. मी त्यावेळी सहावीत होतो. एकोणीसशे सत्त्याहत्तर अठ्ठ्याहत्तरचा काळ. रेडिओ हे एकमेव मनोरंजनाचं साधन. भाद्रपदात गणपती यायचे. त्या दरम्यान कार्यक्रमांची रेलचेल असायची. चित्रपट, नाटक, देखावे बघता बघता गणपती निघून जायचे.

विजय माळवदे आणि मी वर्गात एकाच बेंचवर बसायचो. त्यामुळे आमची मैत्री झालेली. त्याचे वडील शिर्डी पोलीस स्टेशनचे पीएसआय होते. माझे वडील प्राथमिक शिक्षक. अभ्यासाच्या निमित्ताने त्याच्या घरी माझं येणंजाणं होतं. त्याचे आईवडील खूप प्रेमळ आणि मायाळू होते. वडील पीएसआय असल्यामुळे विजयच्या घरी गणपती मंडळांच्या कार्यक्रमांची निमंत्रणे यायची. दिमतीला खात्याची जीप आणि सेवेला आॕर्डर्ली असल्यामुळे ते दूरपर्यंत कार्यक्रमांना हजेरी लावत. विजयचे वडील नाटकांचे चाहते होते. त्यामुळे सावळीविहिरच्या लक्ष्मीवाडी साखर कारखान्यावर सादर होणारी दर्जेदार नाटके ते सहसा चुकवत नसत. अभ्यासासोबत मुलांनी विविध कलांचा आस्वाद घ्यावा असा त्यांचा अट्टहास असे. विजयबरोबर मग ते मलाही घेऊन जात. ‘संगीत शारदा’ हे दीर्घ नाटक तिथेच त्यांच्याबरोबर पाहिलं. मोकळ्या मैदानात विशेष पाहुण्यांसाठी रंगमंचासमोर गाद्या टाकलेल्या असत. रंगमंचावरचा अविष्कार पाहताना आकाशातील तारकादळे उतरून आल्याचा भास होई. वय लहान होतं. समज यथातथाच होती. परंतु जरठ-बाला विवाहावर भाष्य करणारा ‘संगीत शारदा’चा विषय अस्फुटसा आठवतो. नाटकातील स्त्री पात्र केवळ सोशिक नाहीत. ती अन्यायाबद्दल बोलणारी आहेत. व्यवस्थेला थेट प्रश्न विचारणारी आहेत.

- Advertisement -

अठराशे नव्याण्णव साली त्या तत्कालीन विषयावर लिहिताना देवलांना स्त्रीचं निमूटपणे सोसत राहणं मुळीच मान्य नव्हतं. कोवळ्या वयातल्या मुलीबरोबर प्रौढ पुरूषांनी विवाह करण्याच्या कुप्रथेला देवलांनी केवळ वाचा फोडली नाही तर त्या स्त्रीला आत्मस्वर दिला. हे सगळं समजण्याचं ते वय नव्हतं. परंतु त्यातले संवाद, त्यातली दाहकता, त्यातलं कारूण्य, त्यातली हतबलता, त्यातला विखार आणि त्यातला क्लायमॕक्स असा अंगावर येत राहिला. त्याचा प्रभाव कधीच कमी झाला नाही.

त्याच प्रभावळीत आण्णासाहेब किर्लोस्करांचं ‘संगीत सौभद्र’ आणि जयवंत दळवींचं ‘महानंदा’ पाहता आलं. त्यांचाही पगडा मनावर दीर्घकाळ टिकून होता. पुढे जाऊन ‘महानंदा’ कादंबरी वाचनात आली. तेव्हा विजयच्या घरच्यांसोबत लक्ष्मीवाडी साखर कारखान्यावर पाहिलेलं ‘महानंदा’ नाटकच आठवत राहिलं. आणखी पुढे जाऊन ‘महानंदा’ नावानेच आलेला चित्रपटही पाहिला. एखाद्या कलाकृतीला अशा बहूविध माध्यमांतून न्याहाळताना ती कलाकृती मनाचा तळ ढवळत राहते. देवळाच्या आश्रयाने राहणाऱ्या भाविणीच्या मुलीचं शहरात राहणाऱ्या प्राध्यापकावर प्रेम जडतं. त्या प्रेमावर उभं राहिलेलं प्रश्नचिन्ह आणि कुटुंबातून झालेला जोरकस विरोध याची हळूवारपणे जयवंत दळवींनी केलेली मांडणी. त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली ती. त्यांची असफल प्रेमकथा. तिचं वाट पाहणंच मला जास्त अस्वस्थ करून गेलं.

पुरूषप्रधान संस्कृतीच्या वर्चस्वाला धक्का देणाऱ्या स्त्रिया हाताच्या बोटावरच मोजाव्या लागतात ! आजही परिस्थिती बदललेली नाही. निमूटपणे सोसत राहणं. कोंडमारा सहन करीत राहणं. समर्पित होणं. झालेल्या अन्यायाच्या विरोधात अवाक्षरही न उच्चारणं. आणि काही झालंच नाही अशा थाटात पुन्हा त्याची उत्कटपणे वाट पाहणं. दुपारच्या सुन्न प्रहरी एकमेकींच्या दारात बसून दुःख उगाळत बसणाऱ्या स्त्रियांचे संवाद मी ऐकलेले आहेत. संगमनेरजवळ असणाऱ्या खराडीच्या मावशीकडे मी उन्हाळ्याची सुट्टी घालवत असे. त्या रानवस्तीला मावशीच्या मैत्रीणी सगळी कामं आवरल्यावर निवांत येऊन बसत.आम्ही जवळच खेळत असू. त्या स्त्रियांच्या दुःखाच्या कहाण्या सुरू होत. अनावर झाल्याने अश्रूंचे बांध फुटत. मन मोकळं करून बदल्यात मावशीचा धिराचा शब्द घेऊन त्या पांगत.

‘संगीत शारदा’तील स्त्री पात्रं, ‘महानंदा’तील भाविणीची मुलगी आणि मावशीच्या दारात येऊन बसणाऱ्या स्त्रियांच्या दुःखाची जातकुळी इथूनतिथून एकच आहे. भातुकलीपासून सुरू झालेला हा प्रवास खऱ्याखुऱ्या आयुष्यापाशी येऊन थांबतो, थोडासा अडखळतो. मला प्रश्न पडतो. का म्हणून सहन करते स्त्री ? आयुष्याला समजून न घेता, कितीही नकोसा झाला तरी खेळत राहते पुन्हा पुन्हा तोच खेळ…! उत्तरे नसणाऱ्या प्रश्नांच्या आवर्तात मी हरवून जातो. भातुकली असो वा खरेखुरे आयुष्य, स्त्रीच्या नशिबी लिहिलेले असते फक्त वाट पाहणे.

‘पुन्हा पुन्हा तोच खेळ’ ही कविता लिहून झाली दोन हजार पाच साली. तेव्हा माझ्यासमोर वैवाहिक जीवनाचा दहा वर्षांचा कालखंड कच्चा माल म्हणून उपलब्ध होता. संगीत शारदा, महानंदा आणि मावशीच्या दारातील त्या स्त्रियांनी माझ्याभोवती फेर धरलेला होता. सर्वप्रथम मी मला तपासून पाहिलं. नवरा म्हणून मी कितपत त्या योग्यतेला न्याय दिला ? तर बऱ्याचदा नाही अशीच उत्तरे मिळत गेली. पुरूषी वर्चस्वाचा एक उद्दाम किडा आपल्या आत वळवळत असतो. त्याला काबूत ठेवता आलं की मग संसार सुखाचा होतो. माझ्या टाकून बोलण्याने ती कितीदातरी घायाळ झालेली आहे. संतापी स्वभावाचा विस्तव तिने अनेकवेळा झेललेला आहे. ती कमावती असली तरी त्याचा इवलासाही गर्व तिच्या वृत्तीत नाही. माझ्या चुकांवर तिने कायमच समजूतदारपणाचं पांघरूण घातलेलं आहे. ती चिडत नाही. रागावत नाही. का म्हणून सहन करते ती…? तिच्या ओठांवर मंद स्मित उमलून येतं. अंतःकरणातून वाहणाऱ्या वात्सल्याच्या नदीचा खळाळ ऐकायला येतो. डोळ्यांच्या आत पसरलेल्या करूणेच्या महासागराला भरती येते. प्रेमाची विलक्षण ताकद तिच्या मौनाला शब्दांकित करते.

कविता दर्जेदार अंकात प्रसिद्ध व्हावी म्हणून स्त्री जाणीवांची कदर करणाऱ्या ‘मिळून साऱ्याजणी’च्या दिवाळी अंकासाठी पाठवून दिली. त्यांनी ती छापलीच नाही. केवळ कवितेला वाहिलेल्या ‘नव अनुष्टुभ’ या वाङ़्मयीन नियतकालिकासाठी पाठवून पाहिली. त्यांनीही नकारघंटाच वाजवली. मग मुंबई मराठी साहित्य संघाच्या ‘साहित्य’ दिवाळी अंकाला पाठवली. त्यांनाही ती आवडली नाही. एवढे नकार ऐकल्यानंतर ती कविता परत कुठेच पाठवण्याचं धाडस झालं नाही. प्रसिद्धीचा टिळा सगळ्यांच्याच माथ्यावर झळकत नाही. शेवटी कवितेत वर्णिलेल्या सोशिक स्त्रियांसारखी निमूटपणे ती कवितेच्या डायरीत पडून राहिली.

दोन हजार चौदा साली ‘ताटातुटीचे वर्तमान’ हा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. पुण्यातील ‘अक्षर मानव’ प्रकाशन संस्थेने तो प्रकाशित केला. कवितांची निवड सुप्रसिद्ध कथालेखक राजन खान यांनी केली होती. सगळीकडून नाकारल्या गेलेल्या ‘पुन्हा पुन्हा तोच खेळ’ या कवितेला खान सरांनी संग्रहात आवर्जून स्थान दिलं. त्यामुळे कवितासंग्रह अधिकच दर्जेदार झाला.

संग्रहावर बऱ्याच ठिकाणी समीक्षणात्मक लिहून आलं. सुप्रसिद्ध समीक्षक प्रा. डॉ. तुषार चांदवडकर यांनी कवितेचा गौरव करताना लिहिलं होतं, ‘शशिकांत शिंदेची कविता ‘स्त्री’च्या माय, लेक व सखी या तीनही रूपांचा तल व तोल शोधणारी कविता आहे. त्यामुळे तिचे भावविश्व आणि विचारविश्व वर्तमानातील ताटातूट टाळू पाहणारे आहे. दूभंगलेपणात ‘अभंगपण’ साधणे हा एक साहित्याचा धर्म आहे. मला वाटते ही कविता असाच प्रामाणिक प्रयत्न करणारी आहे.’

मित्रवर्य प्रा.महेश कुलकर्णी लिहितात, ‘स्त्रीच्या आयुष्याचे हा कवी वास्तव पण भेदक चित्रण आपल्यासमोर मांडतो ते काळजाला भिडते. यातून कवी स्त्रीजन्माची कहाणी सांगतो. बाईचा जन्म, तिचा संघर्ष, कष्ट आपल्यासमोर मांडण्यात कवी यशस्वी होतो.’ प्रा. डॉ. किशोर सानप आणि प्रा. डॉ. स्मिता भुसे यांनीही ‘पुन्हा पुन्हा तोच खेळ’चं वैशिष्ट्य त्यांच्या लेखातून अधोरेखित केलं.

मुली लहानपणी भातुकलीचा खेळ खेळायच्या. खोटेच होते रुसवे फुगवे. खोटीच होती भांडणे. त्यांच्या निरागस चेहेऱ्यावर उमलून आलेले हसू मात्र खरे होते. किती गोड दिसायच्या ! दृष्ट लागू नये असंच होतं ते सगळं. खराखुरा खेळ आता त्यांनी मांडायला घेतलाय. इथेच त्यांचा खरा कस लागणार आहे. आयुष्याला समजून घेतल्यामुळे ‘पुन्हा पुन्हा तोच खेळ’ भातुकलीसारखा तेवढ्याच निरागसतेने खेळण्यासाठी आता त्या सज्ज आहेत.

पुन्हा पुन्हा तोच खेळ

मुली खेळतात भातुकलीचा खेळ

मांडतात भांडी ओळीने

खेळत राहतात पुन्हा पुन्हा तोच खेळ.

पूर्वी असायची चूल-बोळकी

आता गॕस-गिझर-फ्रिजने जागा अडवलेली.

झाडांच्या पानांची भाजी

आणि आईचा डोळा चुकवून पळवलेल्या उंड्याच्या पोळ्या

चिखलाचा भात आणि पाण्याचे वरण

की होतो स्वैपाक तयार.

मग सुरू होते वाट पाहणे

दुपारी जेवायला येणाऱ्या नवऱ्याची

तो वेळेवर येत नाही कधीच

मग या धूत बसतात धुणी एकमेकींच्या दारात

विषयांची नसते कमी

किंवा लावतात टीव्ही

आणि दुपारच्या धो धो सिरियलमध्ये जातात वाहून.

नवरा येत नाही

वाट पाहून पाहून थकलेल्या त्या लवंडतात थोड्या,

चुकून लागतो डोळा

तर नवरा दारात दत्त म्हणून उभा.

डोळ्यावरची तार सारून त्या वाढतात ताटे

तो चुकूनही उशिरा येण्याबद्दल करीत नाही खेद व्यक्त

उलट तिच्या झोपेवरच घेतो तोंडसुख,

वचावचा चार घास खाऊन जातो निघून.

मग या येतात पुन्हा एकत्र

डोळ्याला पदर लावून ऐकत राहतात एकमेकींना मोकळेपणी

संध्याकाळी थोड्या भावूक होऊन

उत्कटपणे पुन्हा त्याची पाहत राहतात वाट.

भातुकली असो वा खरेखुरे आयुष्य

स्त्रीच्या नशिबी लिहिलेले असते फक्त वाट पाहणे

समजून न घेता आयुष्याला

कितीही नकोसा झाला तरी

स्त्रिया खेळत राहतात पुन्हा पुन्हा तोच खेळ.

शशिकांत शिंदे

(९८६०९०९१७९)

- Advertisment -

ताज्या बातम्या