ताटातुटीचे वर्तमान

आई असते वासरासाठी हंबरणारी गाय, कढत कढत दुधावरची मऊ ओली साय. आई असते झाड ज्याची मूळं मातीत असून, ऋतूनुसार बहरते झडते पाखरांसाठी हसून. आई असते ईश्वराचे पृथ्वीवरील हात, रात्रंदिवस दगडालाही जे आकार देतात. आई असते वास्तवात अशी किमयागार, तिच्या अस्तित्वातून किती उमलतात आकार. आई असते निळ्या निळ्या आकाशाचे गाणे, ती नसते तेव्हा सारे वाटते उदासवाणे... शशिकांत शिंदे यांची ‘कवितेमागची कथा’ ब्लॉगमालिका...
रेखाचित्रे : ज्योती डेरेकर
रेखाचित्रे : ज्योती डेरेकर

आई असते निळ्या निळ्या आकाशाचे गाणे. ती असते आभाळीचा शांत, शीतल, सत्वशील अनुस्वार. निराकाराचा हृदयस्पर्शी सारांश. करूणेचा अथांग महासागर. वात्सल्याचं निसर्गनिर्मित अनुपम देखणं शिल्प. प्रेमाची घनघोर बरसात. मायेची उबदार मिठी. ममतेची तुडुंब भरून वाहणारी नदी. कर्तृत्वाला झळाळी देणारी तेजस्वी विद्युल्लता. निरागस जाणीवांचं ओसंडून वाहणारं कोठार. निरामय जगण्याचा प्राकृतिक दिलासा. निर्वैर नात्यांची घट्ट वीण. निरपेक्ष कर्मवादाचा हसतमुख सिद्धांत. दुःखावरची हळुवार फुंकर. वादळात भरकटलेल्या शिडाला दिशा दाखवणारं होकायंत्र. काळोखात मिणमिणणारी दिव्याची अखंड ज्योत.

संकटांच्या मालिकांना खंडित करणारी धैर्यधुरंदर सम्राज्ञी. क्षुधा शांतवणारी पाणपोई, भुकेल्यांसाठी अव्याहत अन्नछत्र. निरलसपणे पाझरणारा लळा, जिव्हाळा. निर्भयतेची भक्कम तटबंदी. आधाराचा न डगमगणारा खांब. कृपाछत्राची घनदाट वनराई. आई, मंदिराच्या गाभाऱ्यातील पवित्र प्रसन्नता. प्रार्थनेच्या ओळीतील आर्त आशय. सद्गुणांचा अमूर्त समुच्चय. सदाचाराचा चढता आलेख. उन्हाच्या काहिलीत तळमळणाऱ्या जीवांसाठी सावलीचा न संपणारा प्रदेश. अनुभवांचं बिजारोपण. साक्षात्काराची सर्जनशील उगवण. वाऱ्याची थंडगार झुळूक. पावसाची कोसळणारी नक्षत्रं. आई, सुखेनैव नांदणारं गोकूळ. सुखाचा परीसस्पर्श. समाधानाची वाढत जाणारी रेषा. आनंदाचं अविरत बरसणारं चांदणं. अमृताचं चिरंजीव शिंपण.

आई असते वासरासाठी हंबरणारी गाय, कढत कढत दुधावरची मऊ ओली साय. आई असते झाड ज्याची मूळं मातीत असून, ऋतूनुसार बहरते झडते पाखरांसाठी हसून. आई असते ईश्वराचे पृथ्वीवरील हात, रात्रंदिवस दगडालाही जे आकार देतात. आई असते वास्तवात अशी किमयागार, तिच्या अस्तित्वातून किती उमलतात आकार. आई असते निळ्या निळ्या आकाशाचे गाणे, ती नसते तेव्हा सारे वाटते उदासवाणे.

कवी यशवंतांच्या 'आई म्हणोनी कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी मज होय शोककारी' या कवितेच्या ओळी किंवा कवीवर्य कृ.ब. निकुम्ब यांच्या 'घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात' या ओळी लहानपणापासून मनात रुतून बसलेल्या. त्यांचा खूप मोठा प्रभाव आजही आहे. इयत्ता आठवीचं वर्ष दर्जेदार शिक्षणाच्या निमित्ताने मी घरापासून दूर वसतीगृहात राहून काढलेलं आहे. सुटीच्या दिवशी त्या विशालकाय दगडी वेशींमध्ये मी जाऊन बसायचो. त्यांचा मोठा आधार वाटायचा. आईची, घरच्यांची खूप आठवण यायची. 'घाल घाल पिंगा वाऱ्या' म्हणत मी दुःखाला वाट मोकळी करून द्यायचो. कवीवर्य कृ. ब. निकुम्बांच्या त्या कवितेने माझा असा खूप छानसा सांभाळ केलेला आहे. आजही करते आहे. नंतर फ. मुं. शिंदेंची 'आई' कविता वाचनात आली. तिनेही मनात घर केलं. आईवरच्या अशा असंख्य कविता अंतःकरणात नेहमीच पिंगा घालत असतात.

रेखाचित्रे : ज्योती डेरेकर
रेखाचित्रे : ज्योती डेरेकर

पुढे जाऊन मी कविता लिहायला लागलो तेव्हा मीही आईवर लिहिण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच कविता लिहून झाल्या. परंतु मला जे हवं ते त्यात उतरत नव्हतं. माझी आई मला त्यात सापडत नव्हती. आईचं एक ढोबळ चित्र तयार होत होतं. परंतु त्या पलीकडचं बरंच काही राहून जात होतं. माझी चाळीशी उलटलेली. नोकरीच्या निमित्ताने गाव कधीचाच सुटलेला. बायको आणि दोन गोजिरवाण्या मुली असा आमचा सुखी संसार. गावाच्या ओढीने आई गावाकडेच थांबलेली. ती तशी यायची मुलींना भेटायला. परंतु दोन दिवसातच मला तिच्या डोळ्यात अख्खा गाव दिसायला लागायचा. ती कासावीस व्हायची. जड अंतःकरणाने आम्ही तिला निरोप द्यायचो. तिने इथेच येऊन राहावं असं खूप वाटायचं. परंतु गाव तिच्या अणूरेणूत इतका मिसळून गेलेला की तिला परागंदा तरी कसं करावं? तिची मूळं त्या मातीत घट्ट रुजलेली. त्यांना उखडून तरी कसं टाकावं? हे ताटातुटीचं वर्तमान माझ्या भूतकाळाला सारखं छळत होतं. माझी उलघाल वाढत गेली. त्यातूनच 'ताटातुटीचे वर्तमान' ही कविता दोन हजार दहा साली लिहून झाली. आईचा आशीर्वादाचा हात माथ्यावर होता. ती आभाळ झाली आणि कोसळत राहिली घनघोर. तिच्याविषयी वाटणाऱ्या आत्यंतिक प्रेमापोटीच हे ताटातुटीचं वर्तमान अधोरेखित झालं.

दोन हजार तेरा साली 'कालनिर्णय' सांस्कृतिक दिवाळी अंकाच्या संपादकांचं कविता मागणीचं पत्र आलं. कवितांची निवड सुप्रसिद्ध समीक्षक प्रा. डॉ. राजशेखर शिंदे करणार होते. मी 'ताटातुटीचे वर्तमान' ही कविता धाडून दिली. यथावकाश पत्त्यावर कालनिर्णयचं पार्सल आलं. सोबत मानधनाचा चेकही होता. कवितांचं संपादन करताना डॉ. शिंदेनी 'कविता : काळाचा बदल जपणारी' या शीर्षकाखाली एकूणच कवितेवर अभ्यासपूर्ण भाष्य केलेलं होतं. त्याचा आशय असा होता.

"कविता निवडीत नव्या-जुन्यांचा मेळ घातला. ज्यांच्यात सर्जनशीलतेची क्षमता आहे अशा निमंत्रित बऱ्याच कवींच्या कवितांची अंतिमतः निवड केली नाही, याचे वाईट वाटते. स्पर्धाशील व शुद्ध वाङ़्मय-व्यवहारासाठी कठोर निर्णय घेऊन रोष ओढवून घ्यावा लागतो. निवडलेल्या कवींत काहींची कवी म्हणून ओळख आहे. त्यांचे अनेक कवितासंग्रही प्रकाशित आहेत. तरीही त्यांची नवता अजून प्रकट व्हायची आहे. कवी म्हणून ते वटलेले नाहीत. अजून त्यांच्यात मर्यादेचे पाश भेदून पुढे जाण्याची क्षमता आहे. म्हणून प्रातिनिधिक रूपात त्यांची निवड केली.

गद्यवाङ़्मयाची रचना कलात्मक, गुंतागुंतीची व काहीशी कष्टसाध्य असते. पण तरीही गद्य प्रकाराच्या भाषेचा अर्क कवितेच्या शब्दकळेत पाहावयास मिळतो. त्या अनेक अर्धसूचक शब्दकळेतून कवीला जे सूचित करायचे असते ते तो सूचित करतो. निर्मितीच्या धुंदफुंद आणि वास्तवातील बेहोश अवस्थेत तो काही अविष्कृत करतो. कवींच्या स्वप्नविश्वातील दृश्यसृष्टीला, त्या सृष्टीतील भावनांना, विचारांना, विकारांना, मनात उत्पन्न होणाऱ्या भावनांच्या तरंगांना एक वेगळाच रंग येतो. तो रंग कवी आपल्या अंतर्यामी पाहतो, त्यात तो बेहोश होऊन आकंठ न्हातो. ती अनुभूती सुखाची असेल तेव्हा भरल्या मनाच्या तृप्तीचा हुंकार, दुःखानुभवांचा वेदनांकित हुंकार म्हणजे त्याची कविता. विशिष्टाविशिष्ट वृत्त म्हणजे कविता नव्हे; कविता म्हणजे वृत्ती होय.

बदलत्या सामाजिक मूल्यासोबत कविताही बदलती, नवता स्वीकारती झाली. संतांच्या समष्टीभावातून काव्याचा प्रवास संकोच पावून व्यष्टीरूपात आली. कवी स्व-जाणिवांना प्रतिसाद देता झाला. तो काव्यरूपाने अतिखाजगी आयुष्य जगू लागला. दारेखिडक्या बंद करून आत्माविष्कार केल्याने लज्जास्पद व्यक्तिभावना प्रकटू लागल्या. जनसामान्यांची चाड कालौघात क्षीण झाली. परिणामी मनातला लिंगभाव, त्याविषयीची ओढ, त्याकरिता निलाजरेपणा व्यष्टिभावातून कवितेमध्ये स्पष्टपणे, उजळ-उथळपणे आला. व्यभिचारी भावांचे कानेकंगोरे ते सर्जनोत्सुकतेने शोधले जाऊ लागले तरीही कविता खळाळतीच आहे. कविता सबंध ब्रह्मांड आपल्यात सामावून घेते. कविता आपल्या काळातील गाळ-गढूळ, सत्त्व, धर्माधर्म, सत्-असत, विवेक-अविवेक, रक्त, अश्रू, शरीर-अशारीर सर्वकाही स्वीकारते. म्हणून ती कालमूल्यवाची प्रतिमा ठरते. यंदाच्या अंकामधील कविता तिच्या परंपरेहून भिन्न नाही. कवी आपल्या सर्जनाने काळावर आपली नाममुद्रा उमटवितो. दैनंदिन जगण्याचे उर्ध्वपातन कवितेमधून होते, असे रा. रा. श्री. भालचंद्र नेमाडे यांनी सांगून ठेवले आहे, ते सर्व स्वीकारार्ह आहे."

रेखाचित्रे : ज्योती डेरेकर
रेखाचित्रे : ज्योती डेरेकर

'ताटातुटीचे वर्तमान' या कवितेचं भाग्य असं की त्याच नावाने दोन हजार चौदा साली पुण्यातील अक्षर मानव प्रकाशन संस्थेने माझा तिसरा कवितासंग्रह प्रकाशित केला. एकूणच जगण्यात आलेलं तुटलेपण या निमित्ताने चव्हाट्यावर आलं. अर्पणपत्रिका लिहिताना कवितेतल्याच ओळी माझ्याकडे धावत आल्या. आशीर्वाद देताना आई नेहमीच माझ्यासाठी त्या ओळींचा उच्चार करते. मी भरून पावतो. 'हराळीसारखा वाढत जा आणि कापसासारखा म्हातारा हो !' असं तोंडभरून म्हणते तेव्हा किती फुलं लगडतात आयुष्याला. वर्तमान ताटातुटीचं असलं तरी तिचा अनमोल आशीर्वाद नात्यांचं बहुरंगी वस्त्र बेमालूमपणे ममतेच्या अतूट धाग्यांनी विणत राहतो.

ताटातुटीचे वर्तमान

किती काळजी करतेस ग तू ?

काळजीने किती खंगत चाललीस बघ.

आताशी कुठे माझी चाळीशी उलटली

अजून कितीतरी उन्हाळे, पावसाळे

तसेच कोंडून ठेवलेले मनात

आणि तुझ्या मुखात न शोभणारी निरवानिरवीची भाषा.

हाताचा पाळणा करून तूच वाढवलंस ना ?

नेहमी आशीर्वाद देताना -

हराळीसारखा वाढत जा आणि कापसासारखा म्हातारा हो !

असं तोंडभरून म्हणतेस, किती फुलं लगडतात आयुष्याला.

तू हवी आहेस मला, माझ्या मुलींना

आजी नावाचं केंद्र बंद करून टाकलेल्या या जमान्यात

तुझी इतिकर्तव्यता अजून तरी संपलेली नाही बये.

मी इथे पोटापाण्यासाठी वणवणत बाहेर

तुला तुझा गाव सुटत नाही.

तिथली माणसं, तिथला निसर्ग, तिथला देव, तिथली भूमी,

प्राणी, पक्षी, वारा, पाणी ...

हे तुझ्या अणूरेणूत इतकं मिसळून गेलेलं

की यातून तू वेगळी नाहीच मुळी.

तुझी मूळं छाटून तुला परागंदा तरी कसं करावं?

खूपदा वाटतं तू इथेच यावंस कायमचं मुक्कामाला

तुझ्या सोबत मुलींनी घरभर व्हावं

तुझ्या आशीर्वादाचा हात फिरत राहावा माथ्यावर

तू आभाळ व्हावंस आणि कोसळत राहावं घनघोर.

हा मधल्या काळातला चिखल स्वच्छ झाला

की व्हावं पुन्हा स्थानापन्न तुझ्या गर्भालयात

आणि बदलून टाकावं ताटातुटीचे वर्तमान

जमलंच तर हळुवारपणे.

- शशिकांत शिंदे

(९८६०९०९१७९)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com