Friday, April 26, 2024
Homeब्लॉगदमलो ना बाबा आता...

दमलो ना बाबा आता…

अपेक्षांचं ओझं घेऊन वावरणाऱ्या पिढीला वर्तमानाच्या विशाल पटलावर पसरलेल्या जीवनाचा आस्वाद घेता येत नाही. भविष्याकडे जाणारी पायवाट दहशतीच्या अरण्यातून जात असल्यामुळे चकवा पडल्यागत ती तिथेच घोटाळत राहते. करिअर नावाचा बागुलबुवा मुलांच्या मानगुटीवर लादून पालक त्यांच्या सर्जनाच्या वाटा कायमच्या बंद करून टाकतात. अंतरंगात भिरभिरणारं प्रतिभेचं स्वच्छंदी फुलपाखरू निरागस डोळ्यातून फडफडत राहतं.

विजेच्या चपळाईने उमटू पाहणारी तेजस्वी चित्रशलाका धूसर झाल्याने लुप्त होत जाते. कंठातून उमलणारा कोवळा गंधार फुलण्याआधीच कोमेजून जातो. लयबद्ध पदन्यासातून उलगडत जाणारा सांस्कृतिक अविष्कार गप्पगार होतो. लेखणीला फुटू पाहणाऱ्या फुटव्यांची कत्तल केली जाते. कवितेचा आशय करपून जातो. कथेचा अवकाश रिकामाच राहतो. लालित्याला लगाम घातल्याने अवघी सृजनशीलता बंदिवान होते. निसर्गाच्या नवलाईने हरखून जाणाऱ्या मनाला हिरव्यागार कुतुहलाची पालवी फुटत नाही. काळोखाच्या पोकळीत हर्षोल्हासाने सांडलेल्या चांदण्यांची अपूर्वाई वाटत नाही. गाण्याच्या लकेरीवर मेंदूतील तार झंकारत नाही. आठवणींच्या प्रदेशातील एखाद्या अवघड वळणावर डोळे भरून येत नाहीत. छंदांच्या मोकळ्या पडलेल्या रानाकडे आंतरिक उमाळ्याने धावणाऱ्या पावलांना पायखुटी घातल्यामुळे नैसर्गिकरित्या होणारं मानवी भावनांचं विरेचन बंद होऊन जातं. आतला लाव्हा प्राकृतिक अभिव्यक्तिला धडका देत राहतो. पद, पैसा, प्रतिष्ठेच्या कृत्रिम आवर्तात सापडल्यामुळे निरागस संवेदनशीलता संपून जाते. यंत्रवत हालचाल करणाऱ्या रोबोंची पिढी उदयाला येते. कौटुंबिक, सामाजिक उत्तरदायित्वाला फाट्यावर मारून मावळणारी पिढी उगवणाऱ्या पिढीच्या खांद्यावर अपेक्षांचं ओझं लादत राहते.

- Advertisement -

‘शाळा जणू मंदिर जसे, अभ्यास म्हणजे प्रार्थना’, अशी लयबद्ध ओळ गुणगुणणाऱ्या पिढीचे आम्ही प्रतिनिधी आहोत. अनामिक उर्जेने भारलेला काळ होता तो ! शाळांनाही ‘जीवन शिक्षण विद्या मंदिर’ अशा अर्थपूर्ण नावांनी ओळखले जाई. मंदिराचं पावित्र्य शाळांनी जपलेलं होतं. शिक्षक मांगल्याचा वसा जपणारे पुजारी. विद्यार्थी निष्ठावंत उपासक. शिक्षकांनी आळवलेल्या प्रार्थना, मनोभूमिवर ठसवलेले सदाचाराचे धडे, चूक झाल्यावर प्रायश्चित्त म्हणून बजावलेली कडक शिक्षा, अचूक उत्तरासाठी प्रेमभराने केलेलं कौतुक, दुःखाच्या प्रसंगी आईच्या ममतेनं पाठीवरून फिरवलेला मायेचा हात, निसर्गाची ओळख व्हावी म्हणून परिसरात केलेली भटकंती हाच होता पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा खराखुरा अभ्यासक्रम. त्या अभ्यासक्रमाने आम्हाला खऱ्या अर्थाने घडवलं. गुरूजींनी सांगितलेला गृहपाठ पूर्ण केला की अवांतर गोष्टींसाठी वेळ मिळत असे. घरच्यांचीही त्याला आडकाठी नसे. मनसोक्त खेळ. मनसोक्त वाचन. ओळीने असणाऱ्या बैठ्या, छोट्या घरांच्या समोर पसरलेल्या ऐसपैस गल्ल्या. तोवर इलेक्ट्रिसिटीने जनजीवनात शिरकाव केलेला नव्हता. कंदिलाच्या मिणमिणत्या उजेडाने घर उजळून निघत असे. कंदिल मध्यभागी ठेऊन त्याच्या अंधूक प्रकाशात मोठ्या बहिणीसोबत केलेला अभ्यास आठवतो. त्यात एक गंमत होती. आनंददायी प्रक्रियेचा तो एक भाग होता. अभ्यासाला धरून शिक्षकांचं, घरच्यांचं दडपण नव्हतं. त्यामुळे आपोआपच उपजत उर्मींना व्यक्त होण्याचं धाडस झालं. केवळ एका चौकटीतलं सुरक्षित आयुष्य नको असतं. मग त्याच त्याच रूटिन गोष्टींचा कंटाळा येतो. विमनस्कतेने आयुष्य नासून जातं. आनंद, सुख, समाधान हे खूप छोट्या छोट्या गोष्टींत दडलेलं असतं. जीवन शिक्षण मंदिरांनी नकळतपणे ती अलीबाबाची गुहा उघडण्याचं काम केलं. पाहिजे तो ऐवज सापडत गेला. आयुष्य अनेक अंगांनी फुलून आलं. आजही अशा शाळा आहेत. परंतु पालकांची मनोवृत्ती बदललीय. मुलांच्या क्षमता न ओळखता त्यांच्या पाठीवर अपेक्षांची ओझी लादली जाताहेत. त्याखाली दबल्याने त्यांच्या ओठातून बापुडवाणे शब्द बाहेर पडताहेत – ‘दमलो ना बाबा आता….’

दोन हजार दहा साली ‘दमलो ना बाबा आता’ ही कविता लिहून झाली. त्या दरम्यान समाजात घडलेल्या काही आकस्मिक घटनांनी मी अस्वस्थ होतो. परीक्षेत अपेक्षित यश मिळालं नाही म्हणून, अनुत्तिर्ण झाल्याने, घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण न करू शकल्याने काही विद्यार्थ्यांनी आयुष्याला नाकारून आत्महत्येचा मार्ग जवळ केला होता. शिक्षक असल्यामुळे विद्यार्थ्यांचा दिनक्रम मला जवळून माहित होता. त्यांची ओढाताण पाहून कीव येत असे. सकाळी लवकर उठून खाजगी कोचिंग क्लासेसला धावतपळत जाणे. क्लासवरून आल्यावर कसेबसे दोन घास पोटात ढकलून दिवसभर शाळेत उपस्थित राहणे. पुन्हा सायंकाळी राहिलेल्या विषयांचा कोचिंग क्लास. घडाळ्याबरहुकूम फक्त पळत राहणे. हे कशासाठी तर फक्त मेरीटसाठी. या धावपळीत श्वास घ्यायलाही उसंत मिळत नाही. मग छंद, खेळांना कुठून वेळ काढणार ? रात्री पुन्हा दिलेल्या गृहपाठाचा रट्टा मारून झोप. दिवसभराच्या अभ्यासाचा ताण आणि पालकांच्या अपेक्षांचं ओझं सांभाळता सांभाळता त्याच्या बदलत जाणाऱ्या मनःस्थितीचा थांग लागत नाही आणि अनर्थ ओढवतो. परंतु वेळ टळून गेलेली असते. नंतर मनस्ताप करून घेणाऱ्या आईवडलांचं दुःख बघवत नाही. मला हे सगळं मांडायचं होतं. परंतु त्याची काळी बाजूच समोर येत होती. या सगळ्या ताणतणावांना सामोरं जाणारा, आईच्या दुःखाचा गहिवर जगाला हळव्या सुरात सांगणारा, थोडीशी बंडखोरी करून बाबांना दमल्याची जाणीव करून देणारा, विश्रांतीची गरज विशद करून हे ओझं हलकं करा असे सडेतोडपणे सांगणारा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काळ कितीही भयंकर आला तरी परिस्थितीला स्विकारून आयुष्याला गच्च मिठी मारणारा नायक मला सापडला. त्याच्या मुखातून शब्द उमटले, ‘दमलो ना बाबा आता.’ मी त्याचीच एक सकारात्मक कविता केली.

त्याच वर्षी म्हणजे दोन हजार दहा साली संगमनेरला अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलन पार पडलं. डॉ. संजय मालपाणी आणि दुर्गाताई तांबेंच्या कलात्मक संयोजनाने संमेलनाला अधिक उंचीवर नेऊन ठेवलं. मित्रवर्य संतोष खेडलेकर आणि संदीप वाकचौरे यांच्यामुळे निमंत्रित कवींच्या यादीत मला स्थान मिळालं. दोन हजार विद्यार्थी, पालकांच्या समोर ‘दमलो ना बाबा आता’ ही कविता गाऊन सादर केली. संपूर्ण सभागृह स्तब्ध होऊन कविता ऐकत होतं. शेवटचा टाळ्यांचा कडकडाट अजूनही कानाजवळ रेंगाळतो आहे. व्यासपीठावरून खाली उतरल्यावर आॕटोग्राफ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे केलेल्या वह्यांचे कोरे कागद नजरेसमोर आजही फडफडताहेत. कवितेची नजाकत लक्षात घेऊन मी ती पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या ‘किशोर’ मासिकासाठी पाठवून दिली. कार्यकारी संपादक माधव राजगुरूंना आवडल्यामुळे त्यांनी ती दोन हजार दहाच्या ‘किशोर’ दिवाळी अंकात प्रसिद्ध केली. कविता वाचून ती आवडल्याचे अनेक जणांनी आवर्जून कळवले. त्याच वर्षी पुण्याहून येताना शिक्रापूरच्या बसस्थानकात कविमित्र भरत दौंडकरची भेट झाली. अवांतर गप्पा करताना विषय कवितेवर आला. माझ्या डोक्यात ‘दमलो ना बाबा आता’ ही कविता घुमत होती. मी सुरू केलेली कविता त्याने संपूर्ण पाठ म्हणून दाखवली. मी अवाक झालो आणि सुखावलोही.

त्या कवितेमुळे काही सकारात्मक घडलं की नाही, मला माहित नाही. परंतु ज्या ज्या ठिकाणी ती ऐकवली त्या त्या ठिकाणी मिळणारी अपूर्व दाद मला सगळं काही सांगून गेली. कवीने लिहित राहावं. त्याच्या परिणामांचा विचार करू नये. कुणीतरी निश्चितच शब्दांचा मागोवा घेत परिस्थितीवर स्वार होऊन जीवनाची सकारात्मक बाजू तपासून पाहत असेल !

दमलो ना बाबा आता

दमलो ना बाबा आता मी दप्तर उचलून माझे

थोडीशी द्या विश्रांती, थोडेसे घटवा ओझे.

दिवसाच्या सोबत होते दमछाक उरी फुटताना

स्वप्नांना येते नीज हकनाक पुरे पडताना

अभ्यास नव्हे हा दैत्य आयुष्य लपेटून माझे

थोडीशी द्या विश्रांती, थोडेसे घटवा ओझे.

मी ऐकत नाही गाणी , मी खेळत नाही खेळ !

मी झालो मिस्टर रोबो, मज मुळीच नाही वेळ

या धाकदपटशाखाली मन मरून गेले माझे

थोडीशी द्या विश्रांती, थोडेसे घटवा ओझे.

तो काळोखाचा रस्ता जे चालत गेले दूर…

गहिवरतो त्यांच्यासाठी आईचा हळवा सूर

या अशा भयंकर वेळी मी चित्त राखले माझे

थोडीशी द्या विश्रांती, थोडेसे घटवा ओझे.

शशिकांत शिंदे

(९८६०९०९१७९)

- Advertisment -

ताज्या बातम्या