Friday, April 26, 2024
Homeब्लॉगमाझी पोर

माझी पोर

कविता लिहिताना कवी आपल्या सभोवतालाला शब्दांच्या चिमटीत पकडण्याचा प्रयत्न करीत असतो. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, कौटुंबिक स्तरावर होणाऱ्या परिवर्तनाचे पडसाद कवितेतून उमटत राहतात. कविची जशी जाण असेल तसा आशय कवितेतून पाझरत राहतो. वर्तमानाला मिठी घालून तो भूत आणि भविष्याला निरखत असतो. त्याला मांडायचा असतो हा विश्वव्यापी कोलाहल. तो घासून घेतो सगळीच घटीतं अनुभवाच्या सहाणेवर. त्याच्या विचारविश्वाच्या व्यापक पटावर कवितेचा धुरकट चेहरा सुस्पष्ट होत जातो. कविता हे कवीचं तुकड्या तुकड्यांनी जोडलेलं आत्मचरित्र असतं.

वयाच्या या टप्प्यावर मागे वळून बघतो तेव्हा सुरवातीचे भाबडे दिवस आठवतात. नुकतंच लग्न झालं होतं. डोळ्यात मधुर स्वप्नं, हृदयात अधिर अभिलाषा. आणि त्यांच्या पूर्ततेसाठी चाललेला आटोकाट प्रयास. सगळंच स्वप्नील. मोठ्या मुलीचा, सुचेताचा जन्म झाला आणि घराला अनोख्या चैतन्याने घट्ट मिठीत घेतलं. तिच्या जन्मानंतर पाच महिन्यातच पत्नीला शिक्षिकेची नोकरी मिळाली. मुलीला छातीशी धरून ती इमाने इतबारे शिकवत राहिली. परंतु नंतर आबाळ होत गेली. नोकरीनिमित्ताने आम्ही परगावी होतो. आणि गावाकडून कुणी येऊन मुलीची काळजी घेईल अशी परिस्थिती नव्हती. मग काळजावर दगड ठेवून तिला तिच्या आजोळी ठेवलं आणि माघारी परतलो. आठदहा महिन्यांच्या त्या छोट्या जीवाला सोडून येताना पराकोटीच्या यातना झाल्या. दिवस नोकरी व्यवसायात निघून जायचा. रात्र खायला उठायची. तिच्या छोट्या छोट्या गोष्टी आठवून रडू यायचं. आता काय करीत असेल ती? रडत तर नसेल? तिला आईची आठवण येत असेल का? मग मध्येच सुट्टी काढून तिला भेटून यायचो. अशी घट्ट बिलगायची आईला की जशा त्या वेगळ्या नाहीतच मुळी. तो अद्वैताचा विळखा माझ्या मनःपटलावर जसाच्या तसा कोरला गेलेला आहे. आजी, आजोबा, मामा, मावश्यांच्या गराड्यात ती आनंदी असण्याचा दिलासा तिच्या विरहावर अंशतः मात करायचा.

- Advertisement -

वर्षभर ती आजोळी राहिली. त्या दरम्यान आजीच तिची आई झाली. त्या घराने तिला काळजाच्या तुकड्यासारखं जपलं. अमर्याद प्रेम दिलं. कुठलीच गोष्ट कमी पडू दिली नाही. त्या संस्कारक्षम वयातील तिच्या जाणीवांना त्यामुळेच पुढील आयुष्यात सहृदयतेचे पंख फुटले. आज ती शासकीय सेवेत एका जबाबदारीच्या पदावर काम करते तेव्हा याची निश्चितच प्रचिती येते. वर्षभरानंतर ती परतली तेव्हा चांगली खेळकर आणि बरीचशी खोडकर झाली होती. भोकाडी म्हणून एकदा तिने चक्क मलाच तिच्या मित्र-मैत्रिणींना दाखवलं होतं. अथांग निळ्या आकाशाचा आशय तिच्या डोळ्यात मावत नसे. तिला गगनात मुक्त विहरणाऱ्या पाखरांची आस असायची. काय लिहून ठेवलं असेल तिच्या प्राक्तनात? आमच्या काळजाचा मेघ बरसत रहायचा. तिच्या दुःखाचा ओरखडा मनावर वळासारखा उमटायचा. तिच्या आनंदाला उधाण यायचं. घर बेहोष व्हायचं. मोरपंख लेवून आलेले खूप सुंदर दिवस होते ते. उशिरा घरी परतायचो. माझी चाहूल लागताच वाऱ्याच्या वेगाने धावत यायची आणि घट्ट बिलगायची. लाख जन्मांचं सार्थक झाल्यासारखं वाटायचं. त्या घट्ट मिठीतच मला ‘माझी पोर’अष्टाक्षरीच्या चार कडव्यात हळूवारपणे सापडत गेली.

‘माझी पोर’ कविता वाङ़मयाचं भरणपोषण करणार्‍या एका सुप्रसिद्ध साप्ताहिकात प्रसिद्ध झाली. दर महिन्याला एक प्रतिथयश साहित्यिक साप्ताहिकाच्या ‘कविकट्टा’ सदरात चांगल्या कवितांची निवड करायचे आणि त्याला जोडून कवितेवरील चिंतनशील भाष्य. त्या महिन्यात सुप्रसिद्ध साहित्यिक आणि समीक्षक प्रा. रा. ग. जाधव यांनी ‘माझी पोर’ची निवड केलेली होती. जाधव सरांच्या लेखनाचा आवाका खूप मोठा होता. अनेक पुरस्कारांचे मानकरी आणि तेवढेच हकदार असणारे जाधव सर त्यांच्या साहित्यिक कर्तृत्वामुळे पुढे जाऊन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बिनविरोध अध्यक्ष झाले. त्यांनी ‘माझी पोर’ निवडताना केलेलं भाष्य माझ्यासारख्या नवोदित कविसाठी पुरस्कारापेक्षा थोर होतं.

त्यांनी लिहिलं होतं, आधुनिक जीवनात वात्सल्यभावनेचा उत्तरोत्तर संकोच होत गेल्याचे जाणवते. निकोप निर्मळ कुटुंब व कौटुंबिक नाती यांतूनच वात्सल्यभावनेचा परिपोष होत असतो. या प्रकारचे कुटुंबजीवन हळूहळू संपत चालल्याचे दिसून येते. माता-पिता आणि मूल, वार्धक्याचे दुसरे बालपण जगणारे आजोबा-आजी आणि नातवंडे, अधूनमधून मातृरूपात जाणवणारी पत्नी आणि पितृरूपात जाणवणारा पती – या प्रकारचे भावपूर्ण वात्सल्यव्यूह आता दूर्मिळ होत आहेत. मात्र ग्रामीण जीवनात अजूनही या प्रकारची वत्सल नाती तग धरून असलेली दिसतात. शशिकांत शिंदे यांच्या ‘माझी पोर’ या कवितेतून हे जाणवते. बाप आणि मुलगी, असे त्यातील नाते आहे. कन्या म्हणजे पितृहृदयातील कधीच न संपणारा अस्वस्थ कळवळा! वेदना व सार्थकता यांच्या दुःखद-सुखद कात्रीत पित्याची वत्सलता सापडलेली असते. ही कविता अशीच प्रचिती देते.

जाधव सर पुण्यात ज्या वास्तूत राहिले त्या वास्तूचं नाव होतं ‘अनपट बिल्डिंग.’ सर अध्यक्ष झाले तेव्हा त्यांच्या नावाच्या आद्याक्षरातील ‘रा.ग.’ आणि त्यांच्या निवासस्थानातील ‘अनपट’ या शब्दांचा मेळ घालत मी त्यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारी अनपट रागदारी ही कविता लिहिली. नगरच्या पेमराज सारडा कॉलेजच्या सभागृहात आपल्यावरील कविता ऐकताना त्यांचा शांत, सोज्वळ चेहरा आणि भरून आलेले डोळे माझ्या मनःचक्षूसमोरून अजूनही हलत नाहीत.

शिर्डीच्या कन्या विद्यालयात अलका पवार मॅडमनी कवितेच्या निमित्ताने बोलावलं होतं. सभागृह तुडुंब भरलेलं. इतर कवितांच्या सोबतच ‘माझी पोर’ही पेश केली. त्यावेळी तिला सुंदर चाल लावून म्हणत असे. बाजूला विद्यालयाच्या प्रमुख रोहोम मॅडम बसलेल्या होत्या. कविता संपताना सहज त्यांच्याकडे नजर गेली तर त्या रुमालाने डोळे पुशीत होत्या. नंतरचा टाळ्यांचा कडकडाट कानांवर फक्त आदळत होता. जाणवला मात्र नाही.

सुचेता तिच्या हुशारीने, कर्तृत्वाने मोठी झाली. आता तर तिचं लग्नही झालं. परंतु आताही कधी भेटली की सरळ गळ्यात पडते. त्या वेळी माझा हात तिच्या पाठीवरून वात्सल्याने फिरायचा. आता ती तेवढ्याच आश्वासकपणे माझ्या पाठीवर थोपटत राहते. त्या मायेच्या असिम अवकाशात मला ‘माझी पोर’ पुन्हा नव्याने सापडते.

माझी पोर

माझी इवलीशी पोर

तिचे इवलेसे जग

कधी मागते आकाश

कधी उडणारा खग.

तिच्या बंद मुठीतील

मुक्या प्राक्तनाची रेघ

कळवळतो आतून

माझ्या काळजाचा मेघ.

तिच्या नितळ मनाचा

जेव्हा गढूळतो तळ

माझ्या मनावर त्याचे

लाख उठतात वळ.

दिस बुडताना पोर

माझ्या शिरते कुशीत

लाख जन्मांचे सार्थक

क्षणी दाटते पेशीत.

– शशिकांत शिंदे

(9860909179)

- Advertisment -

ताज्या बातम्या