Friday, April 26, 2024
Homeब्लॉगकेळ हिच्या दांडातली

केळ हिच्या दांडातली

प्रेम या शब्दात संपूर्ण विश्व सामावलेले आहे. प्रेम हे प्राकृतिक मनाचं चिरंतन जैविक मूल्य आहे. आवडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर मानवी मनाचं उपजत प्रेम असतं. आस्था , आदर , करूणा , माया , ममता , कटिबद्धता , समर्पण , बंधुभाव , समता , स्वातंत्र्य , काळजी , मदत , स्नेह , क्षमा ही प्रेमाचीच विस्तारलेली रूपे आहेत. हक्क , अधिकाराच्या दहशतीने प्रेमाची वाढ होत नाही. ते कोमेजून जातं. त्याला साहचर्याच्या कोवळीकतेचे फुटवे फुटत नाहीत. प्रेम म्हणजे हळव्या मनाच्या सुपीक जमिनीतून डोकावणारा अंकुर. औदार्याची परिसिमा. उदात्त भावनांचा परिपोष म्हणजेच प्रेमाची जोपासना.

प्रेमाच्या निर्मोही वस्त्राला जेव्हा विकार चिकटतात तेव्हा वस्त्र गळून पडतं. शालीनतेचा पडदा वर खेचला जाऊन वासनेचा रंगमंच खुला होतो. कामांध जनावरांच्या फौजा बिनदिक्कत फिरायला लागतात. सुंदरतेच्या सुकुमार प्रसन्नतेचा घोट घेण्यासाठी टपून बसतात. विवेकाला मूठमाती दिल्याने स्वैराचार बोकाळत राहतो. सुरक्षित जगण्याच्या प्रतलावर भयाचा काळसर्प वळवळत राहतो. निरागसतेला पायदळी तुडवून कामुकतेचा ज्वर वाढत जातो. ‘अजाणतेपण’ कुस्करलं जाऊन त्याची शिकार होते. ना हाक ना बोंब. शिकारी उजळ माथ्याने वावरत राहतात.

- Advertisement -

समाजात घडणाऱ्या या अघटितांच्या ओरखड्याने मी अस्वस्थ झालो. माझं मन विद्ध झालं , व्याकूळ झालं. मी नुकताच कविता लिहू लागलो होतो. त्या पहिल्यापणातल्या जाणीवांचा हा अविष्कार. जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली लिहिलेल्या त्या ओळींनी माझ्या कवितेला नेमका आकार दिला आणि माझ्या कवित्वाला नवा आशय प्रदान केला. प्रतिमा , प्रतिकांनी नटलेली ‘केळ हिच्या दांडातली’ ही कविता कल्याणवरून प्रकाशित होणाऱ्या राजीव जोशी संपादित ‘संवाद’ या द्वैमासिकात नोव्हेंबर/डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्येच प्रसिद्ध झाली. संवाद वाचून कविवर्य पुरूषोत्तम पाटलांनी राजीव जोशींना एक पोस्टकार्ड टाकलं. त्यात ‘केळ हिच्या दांडातली’ ही अर्थगर्भ कविता मनापासून आवडल्याचं आवर्जून कळवलं. राजीव जोशींनी तो आनंद माझ्यापर्यंत सहर्ष पोहोच केला.

ग्रंथाली प्रकाशनाची वाचक चळवळ त्यावेळी जोमात होती. ते ‘रुची’ नावाचं दर्जेदार मासिक चालवत. वाङ़्मयीन अभिरूची जोपासणाऱ्या त्या मासिकाचा वाचकवर्ग महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेरही विखुरलेला होता. कवितेला वाहिलेलं ‘कवितेची पाने’ हे सदर कवी अशोक नायगावकर त्यात लिहीत असत. कवितेवरचं निखळ भाष्य आणि वेगवेगळ्या नियतकालिकातून निवडलेल्या कविता असं त्या सदराचं स्वरूप होतं. पहिल्याच सदरात नायगावकरांनी नीरजा , भुजंग मेश्राम , नीता मुरलीधर भिसे , कुमार विकल (अनुवाद-कविता महाजन) , जुबैर रिजवी (अनुवाद-खावर) या मातब्बर कवींसोबत संवादमधून निवडलेल्या माझ्या ‘केळ हिच्या दांडातली’ कवितेला आवर्जून स्थान दिलं. मे एकोणीसशे एकोणनव्वद सालच्या त्या अंकात कवितेची चर्चा करताना नायगावकरांची प्रतिभा विशेष बहरली होती. त्यांनी लिहिलं होतं….

“रुची मासिकाच्या सुधारित आवृत्तीस एक वर्ष होऊन गेले. या प्रवासात एक खंत मात्र जाणवली. ‘कविता दशकाची’ या उपक्रमाव्यतिरिक्त ग्रंथालीने कविता आणि कवी यांना उपेक्षित ठेवले आहे. जागतिक कविता उत्सव अथवा कवी कुसुमाग्रजांना अर्पण केलेल्या ज्ञानपीठ पुरस्काराने मराठीचा गौरव झाला आहे ; हे औचित्य साधून ‘रुची’ या अंकापासून कवितेसाठी काही पाने राखून ठेवणार आहे. या सदरामध्ये अर्थातच विविध ठिकाणाहून प्रसिद्ध होणारी कवितेची नियतकालिके , अनियतकालिके व कवितासंग्रह यांमधून कवितांची निवड केली जाईल.

महानगरे आणि जिल्हा पातळीवरील शहरे ही प्रसिद्धी माध्यमांच्या खूप निकट असतात आणि नकळत सर्वांनाच उजेडात यायला विनासायास मदत होते. फारसा कस नसूनही प्रसिद्धीचा झगमगाट तयार होतो. दूरवरच्या ग्रामीण परिसरातील कवी मात्र गुणवत्ता असूनही अंधारात राहतात ही खंत आहे. यातून मग प्रादेशिक खंत , गैरसमज इत्यादीना नकळत खतपाणी मिळते. कवी हा त्याच्या कवितेने ओळखला जावा , त्याला मिळालेल्या पारितोषिकांच्या बिरूदावलीने अथवा टीव्हीवरून दाखविलेल्या कवितासंग्रहांच्या मुखपृष्ठाने ओळखला जाऊ नये याबाबत दुमत नसावे. दरवर्षी एक-दोन कवींच्या नाकाशी केशवसुत पारितोषिक धरून कवींना जीवंत ठेवण्याचा प्रयत्न होतो. गावोगाव स्मृत्यर्थ पारितोषिके जाहीर होतात. गझल लिहिणाऱ्यांना व ती न लिहिणाऱ्यांना एकमेक शत्रुवत वाटतात. काहींनी आधुनिक संवेदनशीलतेचे इतके कडक सोवळे नेसलेले असते की आपल्या मित्रवर्तुळाव्यतिरिक्त इतर सर्व लेखन त्यांस नगण्य वाटते. कविसंमेलनात जाऊन बसावे तर कोण अधिक टाळ्या घेतो अथवा जास्त चांगले गाऊन दाखवतो याची स्पर्धा चाललेली दिसते. सामाजिक कविता तर अशी अंगावर येते की हे कवी लोक रात्री झोपेत येऊन आपला शिरच्छेद करणार ! त्यापेक्षा गावोगाव प्रकल्प उभारणारे अथवा गरीब शेतकऱ्यांची पीकपाण्याची नावे नोंदवणारे हृदयात स्थान निर्माण करतात.”

सुप्रसिद्ध समीक्षक प्रा. प्रकाश कामतीकर एका दैनिकाच्या रविवार आवृत्तीत ‘शब्दांनो… मागुते या !’ हे कवितेचं सदर चालवायचे. जुलै एकोणीसशे पंच्याण्णवच्या एका रविवारी त्यांनी माझ्या काही निवडक कवितांवर त्या सदरातून लिहिलं. निवडलेल्या पाच कवितांमध्ये ‘केळ हिच्या दांडातली’ या कवितेचा अंतर्भाव होता. त्यानंतर जवळजवळ तेवीस वर्षांनी म्हणजे दोन हजार अठरामध्ये कामतीकर सरांनी ‘शब्दांनो… मागुते या !’ या नावाने ऐंशीच्या दशकात तरूण असलेल्या कवींच्या कवितेचा मागोवा घेणारा कवितासंग्रह संपादित केला. त्यात पुन्हा ‘केळ हिच्या दांडातली’ कवितेला विशेष स्थान मिळालं. मनोगतात त्यांनी लिहिलं होतं….

” शब्दांनो मागुते या , या संग्रहात कोणे एकेकाळी मी चालविलेल्या विविध वृत्तपत्रातून कवितेविषयीच्या सदरातील त्या वेळेसच्या तरूण , संवेदनशील व उमेदींच्या मनस्वी कवीची चाहूल घेतलेली आहे. हे कवी पुढच्या वाटचालीत खरेच खूप मोठे होत गेले. काहींनी साहित्य प्रांत गाजवला. राजमान्यता , लोकमान्यता मिळविली. बऱ्याच कवींचे अनेक संग्रह देखील निघाले. जीवनाच्या संघर्षशील पायवाटेवर हे कवी पुढे कुणी इंजिनिअर , डॉक्टर , वकील , प्राध्यापक , शिक्षक , प्रगतीशील शेतकरी अशा विविध क्षेत्रांत प्रस्थापित झाले. कुणी परदेशवारी करून आले. कुणी परदेशी स्थायीक झाले. या सगळ्याचा मनस्वी आनंद माझ्या मनात आहे.

पण एका तरूण , हळव्या , उमेदीच्या काळात आपण शब्दांच्या मायाजालात कसे गुरफटून होतो हे मागे वळून बघण्याचा ‘स्वप्नरंजनाचा’ खेळ प्रस्तुत पुस्तकात मांडला आहे. कधी कुणाच्या वाचनात हा खेळ आला तर हा ‘नॉस्टाल्जिया’ त्याला पुन्हा आनंददायी व प्रेरणादायी ठरेल असे मला मनापासून वाटते. या ‘स्वप्नरंजनाच्या’ खेळात मीही चांगलाच रमून गेलो व गतकाळातले ते वैभवी व धुंद क्षण अनुभवले. त्यासाठी या कवीमित्रांचा मी आभारी आहे. त्यांच्या कोवळीकतेच्या वयातील या ‘पाऊलखुणा’ निश्चितपणे त्यांना सुखावून जातील ही खात्री वाटते.

शशिकांत शिंदे यांच्या कवितांतून निसर्गाच्या अनुरूपतेचे संस्कार ल्यालेली शब्दकळा अवतरते. ती निसर्गाचं एक घटित व अघटित असं सावटाचं रूप घेऊन येते. या शब्दप्रतिमांची अर्थवत्ता ही निसर्गरूपाची चारुता स्वीकारून मानवी आशा-आकांक्षेची मर्यादाच उघड करते. म्हटलं तर ही निसर्ग कविता आहे ; पण आपल्या विशुद्ध रूपाने ती न अवतरता आपल्या मनःसंस्काराची सावली होऊन छायारूपात प्रगट होत जाते. हेच या कवितेचे खरे सौंदर्य आहे. हा सृष्टीचा गाभा तसा मातृत्वाचा दिलासा आहे. चिरंतनाचा आश्रय आहे व सृजनाचा बीजमंत्र आहे. म्हणूनच मग तिच्या ‘पोटावर-ओठावर चंद्र गोंदलेले दिसतात.’ चकोराच्या दृष्ट लागण्याने अंगोपांगीचे उन्मेष बाटून जातात.”

काही कविता प्रसिद्धीचं भलंमोठं ललाट घेऊनच जन्माला येतात. ‘केळ हिच्या दांडातली’ या कवितेचं भाग्य पाच वेळा उजळलं. संवाद द्वैमासिक , रुची मासिक , शब्दांनो मागुते या हे सदर , शब्दांनो मागुते या हा संपादित कवितासंग्रह आणि दोन हजार पाच साली आलेला ‘शरणागताचे स्तोत्र’ हा माझा कवितासंग्रह यांतून त्या कवितेची नाममुद्रा अधिकच ठसठशीत झाली. कवितेचं भाग्य बदललं परंतु त्या अत्याचारित , पिडित , अनामिक अबलांच्या वाट्याचे भोग तसेच आहेत. पुन्हा एकवार त्या निर्भय , निरामय क्षणांनी त्या अभागी जीवांचं आयुष्य फुलासारखं फुलून येवो , ही अगतिक प्रार्थना माझ्या सर्जनशील जाणीवांना शस्त्रासारखी टोकदार करते आहे.

केळ हिच्या दांडातली

रानातून पोर बाई

कशी आली अवचित

फाटलेल्या पदराला

उरावर कवळीत.

पोटावर , ओठावर

चंद्र हिच्या गोंदलेले

डोळ्याआड क्षितीजही

सांजावून पेटलेले.

उर हिचा धपापतो

थरथर मांड्यातही

सुकुमार अंगकाठी

लवलव प्राणातळी.

दिठ कुण्या चकोराची

हिच्यावरी सांडली ग

केळ हिच्या दांडातली

अंगोपांगी बाटली ग.

– शशिकांत शिंदे ,

(९८६०९०९१७९)

- Advertisment -

ताज्या बातम्या