हंगाम

झाडाच्या आडव्या फांदीला करकचून बांधलेला दोर. कोपऱ्यात बसून हुंदके देणार्‍या कास्तकारणीचं सुनं कपाळ. म्हाताऱ्या आईवडलांच्या डोळ्यातील अश्रू आटल्याने थिजून गेलेल्या बाहुल्या. चिल्यापिल्यांच्या आयुष्याची परवड. दुःखाचा अक्राळविक्राळ राक्षस ठाण मांडून बसलेला. मला या चित्रमालिकेनं फारच अस्वस्थ केलं....शशिकांत शिंदे यांच्या ‘कवितेमागची कथा’ या ब्लॉगमालिकेचा तिसरा भाग...
 हंगाम

शेताच्या बांधावर बसून पावसाची आशाळभूतपणे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्यात मला ही कविता सापडली. त्यातील कारुण्य माझ्या काळजाला झोंबलं. उत्खनन करत गेलो तर कितीतरी गोष्टींचा शोध लागला. त्या डोळ्यात मला निसर्गासमोरची शरणागतता आणि व्यवस्थेसमोरची हतबलता दिसली. दुबार पेरणीच्या संकटाचा बागुलबुवा आ वासून बसलेला. बी-बियाणं, खतांसाठी दुकानासमोर लागलेल्या रांगा. नापिकीमुळे, कर्जबाजारीपणामुळे नैराश्यग्रस्त झालेले जीव. यातनांचा कडेलोट झाल्यावर येणारी अगतिकता. किटकनाशकांच्या बाटल्या.

झाडाच्या आडव्या फांदीला करकचून बांधलेला दोर. कोपऱ्यात बसून हुंदके देणाऱ्या कास्तकारणीचं सुनं कपाळ. म्हाताऱ्या आईवडलांच्या डोळ्यातील अश्रू आटल्याने थिजून गेलेल्या बाहुल्या. चिल्यापिल्यांच्या आयुष्याची परवड. दुःखाचा अक्राळविक्राळ राक्षस ठाण मांडून बसलेला. मला या चित्रमालिकेनं फारच अस्वस्थ केलं.

अहमदनगर जिल्ह्याचे भौगोलिक दृष्टिकोनातून दोन भाग पडलेले आहेत. नगर दक्षिण आणि नगर उत्तर. उत्तर भाग पाटपाण्याचा, ओलिताखालचा. त्यामुळे समृद्ध. माझं बालपण उत्तर भागात शिर्डीसारख्या त्यावेळी फार प्रसिद्ध नसलेल्या छोटेखानी गावात गेलेलं. नोकरीच्या निमित्ताने दक्षिण भागात पाथर्डीसारख्या डोंगराळ प्रदेशात मी पथारी पसरली. हा सगळा कोरडवाहू पट्टा. त्याच्या पहिल्या दर्शनाने मन खट्टू झालं. थोडा निराश झालो. शिक्षकाची नोकरी. समोरचे विद्यार्थी समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातून आलेले. त्यातील बहुतांश विद्यार्थ्यांची शेतीची पार्श्वभूमी.

शेतातली, घरातली छोटीमोठी कामे करून ते धावतपळत शाळेत यायचे. त्यांना शिकवताना मला हळूहळू त्यांच्या परिस्थितीचा अंदाज यायला लागला. थोडंसं खणल्यावर ते त्यांच्या घरगुती गोष्टी माझ्याशी शेअर करू लागले. मग निमित्ताने त्यांच्या घरी, शेतावर जाणं येणं होऊ लागलं. त्यांच्या आईवडलांशी बोलताना एकेक कहाण्या उलगडत गेल्या. दुःख, दैन्य, दारिद्रय, उपासमार, अवहेलना, कुचंबणा या शब्दांचा जवळून परिचय झाला. त्या शब्दांनी माझ्या जाणिवांना डंख दिले. मला घायाळ केलं. दुरून दिसणाऱ्या त्या महाकाय आवरणाखालचा हा अपरिचित, अज्ञात प्रदेश माझा सांगाती झाला. 'हंगाम' ही शिर्षस्थ कविता होती. तिला जोडून असंख्य कवितांची घुसळण मनात चालू झाली. त्यातून जे नवनीत बाहेर आलं त्याने मला जबाबदार कवींच्या रांगेत नेऊन बसवलं.

एकोणीसशे त्र्याण्णव सालच्या 'मौज'च्या दिवाळी अंकात 'हंगाम' प्रसिद्ध झाली. 'मौज'सारख्या दर्जेदार, अभिरुचीसंपन्न वाङ्मयीन दिवाळी अंकात कविता येणं याला त्याकाळी विशेष महत्व होतं. त्या दरम्यान इतर कविताही वेगवेगळ्या दिवाळी अंकातून प्रकाशित होत होत्या. त्यामुळे जाणकारांचं विशेष लक्ष मी वेधून घेतलेलं होतं. नवोदितांना प्रोत्साहन मिळावं म्हणून प्रवरानगर येथून कवितेच्या हस्तलिखिताला विखे पाटील साहित्य पुरस्कार दिला जात असे. त्यावेळी प्रख्यात कवी प्रा. शंकरराव दिघे पुरस्कार निवड समितीचे निमंत्रक म्हणून काम पाहत होते. त्यांनी मला निरोप पाठवला आणि कवितांचे हस्तलिखित पाठवण्याची आज्ञाच केली.

'हंगाम' या शिर्षकाखालीच पन्नास कवितांचा गुच्छ त्यांच्याकडे रवाना केला. डॉ. किशोर शांताबाई काळे यांचं 'कोल्हाट्याचं पोर' तसेच सुप्रसिद्ध कवी खलील मोमीन यांच्या 'अक्षराई' या पुस्तकांसोबतच मला 'हंगाम'साठी एकोणीसशे पंच्याण्णव सालचा पुरस्कार जाहीर झाला. सर्वश्री रावसाहेब कसबे, नारायण सुर्वे, दया पवार, रामदास फुटाणे यांच्या हातून पुरस्कार स्विकारताना अभिमान ओसंडून वाहत होता. 'प्रवरावृत्त' हे तसं परिसरातील शेतकऱ्यांच्या समस्या मांडणारं आणि साखर कारखान्याचा आर्थिक लेखाजोखा प्रसिद्ध करणारं स्वतंत्र पाक्षिक. त्यात 'हंगाम आणि इतर कविता' छापून संपादक दिघे यांनी धमाल उडवून दिली होती.

शाहीर भारत गाडेकर या उमद्या शिक्षकाने त्यावेळी पाथर्डीत 'महाराष्ट्र कलामंच' ही सांस्कृतिक संस्था स्थापन केली होती. आम्ही संस्थेचे विश्वस्त सभासद होतो. वेगवेगळे कार्यक्रम चालायचे. मिटिंगा व्हायच्या. प्राचार्य विलास सोलाट सर प्रत्येक मिटिंगला हजर असायचे. मिटिंग संपताना सरांना 'हंगाम' कवितेची आवर्जून आठवण व्हायची. ते मला कविता म्हणण्याचा आग्रह करायचे. कविता ऐकताना त्यांच्या पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा पाहून मलाही भरून यायचं. शेतकऱ्याच्या घरातून आल्याने आणि कष्टाचे दिवस अनुभवल्याने सर जास्तच हळवे व्हायचे. सोलाट सर आज या जगात नाहीत. परंतु आजही कुठे 'हंगाम' कविता ऐकवताना सर पहिल्या रांगेत बसून दाद देता देता डोळ्यांच्या कडा पुसताहेत असा भास होत राहतो.

कवितेच्या तळाशी अशा अनेक घटना, अनेक घटीतं दडलेली असतात. थोडासा भाग खरवडला की सगळंच उजळ होऊन जातं. वेगवेगळ्या शक्यतांनी ठासून भरलेल्या या वाटचालीत प्रेमाच्या असंख्य थांब्यांना टाळून पुढे जाता येत नाही. 'हंगाम' कवितेने माझ्या भोवतीचा गोतावळा गुणाकार करून वाढवत नेला. त्या गोतावळ्यात संदीप काळे, अर्जून देशमुख, कैलास दौंड या कविमित्रांचं स्थान पक्क होत गेलं. कवितेचं एक निरामय पर्यावरण 'हंगाम' कवितेने मला उदार अंतःकरणाने बहाल केलं.

हंगाम

तुझी वाट पाहून शेवटी

कोरड्या मातीत केली पेर

हंगाम निघून गेल्यानंतर

बेणं म्हणजे कचराकेर.

बांधावरती बसून तुला

दिले जरी शिव्याशाप

मातीआड बियाणंही

उलणार नाही आपोआप.

दोन दिवसात बियाणंही

किडामुंगी वाहून नेईल

नंतर झड धरलीस तरी

जमीन मात्र खाटीच राहील.

तुझं वेळेवरती येणं

त्याला निर्मितीचा गंध

हंगाम टाळून आलास तर

जगण्याच्याच वाटा बंद.

-शशिकांत शिंदे (९८६०९०९१७९)

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com