जाणत्या नेतृत्वाचा ‘दे धक्का’!

- एन. व्ही. निकाळे
जाणत्या नेतृत्वाचा ‘दे धक्का’!

कोणाच्याही ध्यानी-मनी नसताना ‘आपण पक्षाध्यक्षपद सोडत आहे’ अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आत्मचरित्र प्रकाशन समारंभात भाषणाच्या शेवटी करून सर्वांना आश्‍चर्याचा धक्का दिला. ‘भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे’ असे विधान पवार यांनी अलीकडेच केले होते, पण ते पक्षाध्यक्षपदाबाबत असेल याची कोणालाही कल्पना नव्हती. भाकरी फिरवली नाही तर ती करपते. मात्र भाकरी फिरवण्याची सुरुवात पवार स्वतःपासून करतील, असे कोणालाही वाटले नसेल....

'लोक माझे सांगाती' या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार यांनी काही राजकीय गौप्यस्फोट केल्याचा बभ्रा प्रसार माध्यमांतून प्रकाशनाआधीच सुरू झाला होता. त्यामुळे पुस्तकात नेमके कोणते व कोणाविषयी गौप्यस्फोट केले आहेत? याची सर्वांना उत्सुकता होती. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत पवार यांचा आत्मचरित्र प्रकाशन सोहळा झाला. मान्यवरांनी पवारांबद्दल गौरवोद‍्गार काढले. नंतर पवारांचे भाषण झाले. विविध मुद्यांना त्यांनी स्पर्श केला. कोणाच्याही ध्यानी-मनी नसताना पवार यांनी भाषणाच्या शेवटी पक्षाध्यक्षपद सोडत असल्याची घोषणा करून उपस्थितांना आश्‍चर्याचा धक्का दिला.

पवारांच्या पक्षाध्यक्षपद त्यागाच्या घोषणेने मोठी खळबळ उडाली. क्षणभर कोणाला आपल्या कानांवर विश्‍वास बसला नाही, पण पक्षाचे आधारवड असलेल्या पवार यांनी पक्षाध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली हे समजल्यावर सगळ्यांनाच धक्का बसला. आनंद सोहळ्यावर नैराश्य आणि दु:खाचे सावट पसरले. नेते व कार्यकर्त्यांनी पवारांभोवती गर्दी केली. पक्षाध्यक्षपद सोडू नका, निर्णय बदला, अशी विनवणी सर्वच नेत्यांनी केली. अनेकांना दु:खावेग आवरला नाही. काहींना रडू कोसळले. कार्यकर्त्यांची अवस्था अधिकच बिकट झाली होती. पद सोडण्याचा निर्णय मागे घेण्याचा सर्वांनी आग्रह धरला, पण निर्णयावर पवार ठाम होते. 

कार्यकर्तेही मागे हटायला तयार नव्हते. अखेर प्रफुल्ल पटेल यांनी वडीलकीच्या नात्याने सर्वांना दटावत पवार यांना घरी जाण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला. पवारांच्या निर्णयाची बातमी राज्यभर पसरल्यावर ठिकठिकाणचे कार्यकर्ते भावनावश झाले. अनेकांनी राजीनामेही दिले. नेते व कार्यकर्त्यांचे पवारांवर किती प्रेम आहे, त्यांच्याशिवाय अन्य नेतृत्वाची कल्पना ते करूच शकत नाही, हेही यानिमित्त दिसून आले. पवारांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या महाविकास आघाडीचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे व आगामी निवडणुकांत आघाडी चांगली कामगिरी करून सत्ताबदल घडवेल, असे आशादायक वातावरण तयार झाले आहे.

मात्र पवारांचा पक्षाध्यक्षपद सोडण्याचा निर्णय आघाडीसाठी धक्काच होता.
चव्हाण सेंटरवरील कार्यकर्त्यांची गर्दी हटत नव्हती. अनेक कार्यकर्ते उपोषणास बसले. राज्यातही कार्यकर्ते आंदोलन करत होते. कार्यकर्त्यांचा आग्रह पाहून पवार यांनी आपल्या निर्णयावर विचार करण्यासाठी दोन-तीन दिवसांचा अवधी मागून घेतला. आपल्या निर्णयावर ठाम असले तरी समितीचा निर्णय मान्य करू, असेही पवार यांनी सांगितल्याने कार्यकर्त्यांना आशेचा किरण दिसू लागला होता.

अध्यक्षपदासाठी पक्षातील अनेक नावांची चर्चा झाली, पण पवारांशिवाय दुसरा कोणताच चेहरा त्या पदावर पाहण्यास कार्यकर्ते राजी नाहीत. येत्या पंधरवड्यात दोन राजकीय भूकंप होतील, असे भाकित वंचित आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवले होते. राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही तेच भाकित अधिक सुस्पष्ट करताना एक राजकीय भूकंप महाराष्ट्रात तर दुसरा देशपातळीवर होईल, असा अंदाज वर्तवला होता. शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपद सोडण्याचा घेतलेला निर्णय हा त्यापैकी एक राजकीय भूकंप मानावा का? राज्यातील राजकीय वातावरण ढवळून काढणारा हा निर्णय असेल तर देशपातळीवरचा दुसरा संभाव्य भूकंप काय असेल?

2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपला शह देण्यासाठी देशातील विरोधी पक्षांची एकजूट करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या धर्तीवर देशपातळीवर विरोधकांची मजबूत आघाडी व्हावी, असा विचार शरद पवार यांनी सुरुवातीपासून मांडला आहे.

त्यादृष्टीने पवार यांनी सर्वात आधी प्रयत्न सुरू केले. विरोधकांच्या ऐक्यात पवार यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. पक्षाध्यक्षपद सोडण्याच्या त्यांच्या निर्णयाचा विरोधी पक्षांच्या एकजुटीच्या प्रयत्नांवर परिणाम संभवतो. पक्षाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मोकळे होण्याच्या निर्णयाने पक्षातील त्यांचे स्थान मजबूत आणि अढळच राहील, हा संदेश कार्यकर्त्यांच्या पवारांविषयीच्या भावनांवरून दिला गेला.  

‘भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे’ असे विधान पवार यांनी नुकतेच केले होते, पण ते पक्षाध्यक्षपदाबाबत असेल याची कोणालाही कल्पना नव्हती. भाकरी फिरवण्याची सुरुवात पवार स्वतःपासून करतील, असे कोणालाही वाटले नसेल. आत्मकथा प्रकाशनावेळी पवार यांनी पक्षाध्यक्षपदावरून निवृत्ती घेण्याची घोषणा का केली असेल? गेल्या काही दिवसांपासून माध्यमांत येणार्‍या बातम्यांची पार्श्‍वभूमी त्याला असेल का? राज्याच्या सत्तासंघर्षावर येत्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येण्याची शक्यता आहे.

त्यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा उलथापालथ होऊन सत्ता समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. त्याआधी राष्ट्रवादीतील काही आमदार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पवार यांनाही पक्षातील काही हालचालींची कुणकूण लागली असेल. भाजपत जाण्याच्या विचारात असलेल्या राष्ट्रवादीतील कुंपणावरील आमदार व नेत्यांना पवारांच्या निर्णयाने योग्य तो संदेश पोहोचला असेल. त्यामुळे सत्तासंघर्षाच्या निकालानंतरची राष्ट्रवादीतील संभाव्य फूट टाळता येईल याची खात्री पवारांसारख्या मुरब्बी नेत्याला असावी.


नेते आणि कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना आणि वाढता दबाव पाहता शरद पवार आपला निर्णय मागे घेतील, असे संकेत मिळत होते. अध्यक्ष निवडीसाठी नेमलेल्या समितीनेदेखील पवार यांचा राजीनामा नामंजूर केला. नेते आणि कार्यकर्त्यांचा आग्रह व प्रेमापुढे नमते घेत पवार यांनी अखेर पक्षाध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेतला आहे. मात्र अपेक्षित असलेला परिणाम साधला गेला याची खात्री पवार यांना झाली असेल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com