Friday, April 26, 2024
Homeब्लॉगआता मोहीम लोकसभेची!

आता मोहीम लोकसभेची!

लोकसभा निवडणुकीला वर्षभराचा कालावधी उरला आहे, पण त्या निवडणुकीची तयारी भाजपने आतापासून सुरू केली आहे. महाराष्ट्रातून 45 पेक्षा जास्त जागा भाजपला जिंकायच्या आहेत. कसब्यातील ऐतिहासिक विजयानंतर महाविकास आघाडीनेदेखील लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याच्या बातम्या आहेत. राज्यात लोकसभेच्या 48 पैकी 34 जागा महाविकास आघाडी जिंकेल, असा अंदाज एका माध्यम संस्थेच्या ताज्या सर्व्हेक्षणात वर्तवण्यात आला आहे. तो भाजपला हादरा देणारा आहे…

आधी अंधेरी पोटनिवडणूक, नंतर शिक्षक-पदवीधर विधान परिषद निवडणूक आणि पाठोपाठ कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी भाजप उमेदवारांना पराभूत करून विजय मिळवला. आतापर्यंतच्या निवडणुकांत आघाडी भाजपला वरचढ ठरल्याचे दिसते. निवडणुकांतील यश सातत्याने आघाडीला मोठे बळ मिळाले आहे. शिवसेनेत फूट पडून 40 आमदारांनी भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर महाविकास आघाडीच्या भवितव्याबद्दल बर्‍याच शंकाकुशंका उपस्थित केल्या गेल्या.

- Advertisement -

सरकार कोसळल्याने आता आघाडीतही फूट पडेल, दोन्ही काँग्रेस शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाशी काडीमोड घेतील व हा पक्ष एकाकी पडेल, असे तर्कवितर्क लढवले जात होते. प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. शिवसेनाफुटीचा आघाडीच्या अस्तित्वावर कोणताही परिणाम झाला नाही. उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष ठामपणे उभे असल्याचे आतापर्यंतचे चित्र आहे.

आघाडीचे नेते म्हणून ठाकरे यांच्याच नेतृत्वात गेले नऊ महिने आघाडीची वाटचाल सुरू आहे. न्यायालयीन लढाई लढत असताना शिवसेना (उबाठा) पक्षाने महाराष्ट्र पिंजून काढला. शिंदे गट सोबत आल्याने ठाकरे यांची शिवसेना संपुष्टात येईल, अशी स्वप्ने पाहिली जात होती, पण तसे काही घडले नाही. 40 आमदार फुटले तरी राज्यभरातील कार्यकर्ते आणि निष्ठावंत नेते आजही ठाकरेंसोबत असल्याचे वेळोवेळी दिसून आले. सत्तांतरानंतर राज्यात आतापर्यंत शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ तसेच विधानसभेच्या तीन पोटनिवडणुका झाल्या. मूळ शिवसेनेच्या मतांवर पक्षफुटीचा फार फरक पडलेला नाही.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

तिन्ही निवडणुकांना आघाडीतील तिन्ही पक्ष एकजुटीने लढले. त्यातून आघाडीच्या विजयाचा करिष्मा दिसला. तिन्ही निवडणुकांत सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाला पराभवाचे धक्क्यांमागून धक्के देण्याचे काम आघाडीतील पक्षांनी केले आहे. अंधेरीची जागा शिवसेना (उबाठा) पक्षाने पुन्हा जिंकून घेतली. शिक्षक-पदवीधर निवडणुकांमध्ये पाचपैकी तीन जागा आघाडीने जिंकल्या. कोकणातील जागा जिंकून भाजपने आघाडीला धक्का दिला, पण भाजपच्या ताब्यातील नागपूर आणि अमरावती या दोन प्रतिष्ठेच्या जागा जिंकून आघाडीच्या उमेदवारांनी भाजपला दुहेरी धक्का दिला.

राज्यात भाजपची पीछेहाट करण्यात आघाडी यशस्वी ठरल्याचे आतापर्यंतच्या निवडणूक निकालांतून स्पष्ट झाले आहे. मिळालेल्या विजयांमुळे आघाडीच्या नेत्यांचा आत्मविश्‍वास बराच उंचावल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवते. आगामी विधानसभा निवडणुकीत आघाडी जिंकेल व पुन्हा राज्याची सत्ता काबीज करील, असा विश्‍वास आघाडीच्या नेत्यांना वाटू लागला आहे.

लोकसभा निवडणुकीला वर्षभराचा कालावधी उरला आहे, पण त्या निवडणुकीची तयारी भाजपने आतापासून सुरू केली आहे. त्रिपुरा आणि मेघालय निवडणुकीत काँग्रेससह विरोधी पक्षांवर मात करून भाजपने पुन्हा सत्ता काबीज केली. नागालँडमध्येही भाजप सत्तेत जाऊन बसला आहे. ईशान्येची मोहीम फत्ते झाल्याने भाजप गोटात सध्या आनंदाचे वातावरण आहे. पक्षनेतृत्वाने आधीपासूनच लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. लोकसभेच्या 400 हून जास्त जागा जिंकण्याचा निर्धार भाजपने केला आहे.

त्यासाठी खास रणनीती आखली गेली आहे. त्यानुसार देशातील 144 महत्वपूर्ण जागांवर विशेष भर दिला जात आहे. त्याकरता प्रत्येक केंद्रीय मंत्र्यावर एकेका मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील 24 जागांचा त्यात समावेश आहे. महाराष्ट्रातून लोकसभेच्या 45 जागा भाजपला जिंकायच्या आहेत. भाजप प्रदेशाध्यक्षांनीच तसे जाहीरपणे सांगितले आहे.

कसब्यातील ऐतिहासिक विजयानंतर महाविकास आघाडीनेदेखील लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना (उबाठा) या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक नुकतीच मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात झाली. बैठकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह आघाडीतील महत्त्वाचे नेते हजर होते.

नेत्यांच्या पातळीवर आघाडी भक्कम असली तरी कार्यकर्त्यांच्या पातळीवर एक होणे जास्त आवश्यक आहे. त्याशिवाय दिल्लीतील सत्ताधीशांना पराभूत करता येणार नाही, असे सांगून आघाडीतील पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी केले. ही बैठक एकाअर्थी आघाडीचे शक्तीप्रदर्शनच मानले जात आहे. आमदार, खासदार, माजी आमदार, माजी खासदार, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष बैठकीला हजर होते. येत्या काळात आघाडीच्या विभागवार सभा घेऊन शक्तीप्रदर्शन करण्याचा निर्णय बैठकीत घेतला गेला.

लोकसभा निवडणुकीबाबत आघाडीतील घटक पक्षांची एक बैठक नुकतीच झाल्याच्या चर्चा आहेत. लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आघाडीच्या जागावाटपाचे सूत्रही ठरल्याच्या बातम्या माध्यमांत प्रसिद्ध झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळवण्यासाठी आतापासून जागानिश्‍चिती झाली तर त्याचा फायदा आघाडीच्या उमेदवारांना प्रचारात होऊ शकेल, असा त्यामागील तर्क आहे. लोकसभेच्या जागावाटपाबाबत आघाडीत चर्चा होण्यामागे आगामी लोकसभा निवडणुकीबाबत काही माध्यम संस्थांनी अलीकडेच केलेल्या पाहणीचे अंदाज कारणीभूत असू शकतात.

‘मूड ऑफ द नेशन’ सर्व्हेक्षणात पंतप्रधान मोदींची जादू कायम दाखवण्यात आली आहे. महाराष्ट्राबाबतचा त्यातील अंदाज मात्र भाजपची चिंता वाढवणारा आहे. राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी 34 जागा महाविकास आघाडी जिंकेल, असा अंदाज त्या सर्व्हेक्षणात वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याच्या भाजपच्या निर्धाराला हादरा देणारा हा अंदाज आहे. महाविकास आघाडीकडून लोकसभेसाठी सुरू झालेली तयारी आणि नऊ महिन्यांत तीन निवडणुकांतील पराभवांचा विचार करता भाजप आणि शिंदे गटाला नव्याने व्यूहरचना करावी लागेल, अशीच महाराष्ट्राची व देशाचीही मन:स्थिती असल्याचे हा अंदाज सूचित करतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या