दोन जनादेश, दोन संदेश

jalgaon-digital
7 Min Read

शिंदे-फडणवीस सरकारवर अस्थिरतेची टांगती तलवार असतानाच राज्यात विधानसभेच्या कसबा आणि चिंचवड मतदारसंघांची पोटनिवडणूक झाली. कसब्याची जागा जिंकून महाविकास आघाडीने भाजपला पराभवाचा धक्का दिला. मात्र चिंचवडची जागा भाजपने राखली. दोन्ही मतदारसंघांतील मतदारांनी पोटनिवडणुकीत दिलेला मतकौल आणि संदेश वेगवेगळा आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांना भविष्यातील निवडणुकांसाठी सावध करणारा हा निकाल आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून ती अंतीम टप्प्यात आहे. लवकरच निकाल येण्याची शक्यता आहे. सरकारवर अस्थिरतेची टांगती तलवार असतानाच राज्यात विधानसभेच्या कसबा आणि चिंचवड मतदारसंघांची पोटनिवडणूक झाली. अनुक्रमे भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने या दोन्ही जागा रिक्त झाल्या होत्या. या दोन्ही जागा भाजपसाठी प्रतिष्ठेच्या असल्याने त्या राखण्यासाठी भाजप नेते ठाम होते. पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा त्यांचा आग्रह आणि प्रयत्न होता.

निवडणूक बिनविरोध करण्यावर विरोधक सहमत होतील व सहकार्य करतील, अशी भाजपला अपेक्षा होती. तसे आवाहनही भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना केले होते. तथापि पोटनिवडणूक लढण्यावर विरोध ठाम राहिल्याने निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न फसले. दोन्ही बाजूंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आणि तेवढीच चुरशीत लढवली गेली. दोन्ही मतदारसंघांत सरासरी 50 टक्के मतदान झाले. निवडणूक आणि मतदानाबाबत मतदारांचा प्रतिसाद कमीच दिसला.

कसब्यातून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर 11 हजारांचे मताधिक्य मिळवून विजयी झाले. ‘हू इज धंगेकर?’ या पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी निवडणुकीवेळी विचारलेल्या प्रश्‍नाचे चोख उत्तर धंगेकर यांनी भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा पाडाव करून दिले. चिंचवडमधून सहानुभूतीचा फायदा मिळून भाजप उमेदवार अश्‍विनी जगताप 36 हजार मताधिक्याने निवडून आल्या. त्यांचा विजय तसा अपेक्षितच मानला जात होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना घाटे यांना त्यांनी पराभूत केले. दोन्ही मतदारसंघांतील मतदारांनी पोटनिवडणुकीत दिलेला मतकौल आणि संदेश वेगवेगळा आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांना भविष्यातील निवडणुकांसाठी सावध करणारा हा निकाल आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कसबा आणि आणि चिंचवडमधून भाजपचे आमदार निवडून आले होते. कसबा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. गेली 28 वर्षे हा मतदारसंघ भाजपकडेच होता. आताच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने तो भाजपकडून खेचून आणला आहे. कसब्यातील पराभव भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

एखाद्या आमदाराचे निधन झाल्यानंतर होणार्‍या पोटनिवडणुकीत दिवंगत आमदाराच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी दिली जाते. बहुतेक राजकीय पक्ष तो शिरस्ता पाळतात. महाराष्ट्राच्या राजकारणात तशी प्रथा आहे. तथापि कसबा आणि चिंचवडच्या जागांसाठी उमेदवारी देताना भाजपने नेहमीपेक्षा वेगवेगळा विचार केला असावा. कसब्यातून टिळक कुटुंबातील सदस्याला उमदेवारी दिली जाईल, असा अंदाज बांधला जात होता, पण भाजपकडून येथे हेमंत रासने यांच्या रूपाने टिळक कुटुंबाबाहेरील उमेदवार दिला गेला. त्यामुळे दुखावलेल्या टिळक कुटुंबीयांची नाराजी उघडपणे दिसून आली. टिळक कुटुंबियांना डावलण्याच्या निर्णयाचा फटका कसब्यात भाजपला बसेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. ती खरी ठरली. याउलट समाजकार्यात सदैव पुढे असलेल्या रवींद्र धंगेकर यांच्यासारख्या धडाडीच्या कार्यकर्त्याला काँग्रेसने उमेदवारी दिली.

महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते तसेच कार्यकर्त्यांनी एकजुटीने मनापासून धंगेकर यांचा प्रचार केला. कसब्यात सर्व समाज आणि पक्षांच्या कार्यकर्त्यांशी चांगले संबंध असल्याचा फायदाही धंगेकरांना झाला. मुख्य म्हणजे टिळक कुटुंबियांना डावलले गेल्याने निर्माण झालेल्या नाराजीचा फायदाही धंगेकरांचे मताधिक्य वाढण्यात झाला. भाजप आणि शिंदे गटाकडून रासने यांच्या प्रचारावर बराच जोर दिला गेला. अगदी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अर्धा डझन मंत्री कसब्यातील निवडणूक मैदानात प्रचारासाठी उतरले होते. मनसेनेनेही भाजप उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला होता. दोन्ही बाजूंच्या प्रचारसभा आणि प्रचारफेर्‍यांनी कसबा मतदारसंघ दणाणला होता.

विजयाचे दावे-प्रतिदावे केले जात होते. चिंचवडमधून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्‍विनी जगताप यांना भाजपने उमेदवारी दिली. साहजिक सहानुभूतीचा फायदा भाजप उमेदवाराला होणार यात शंका नव्हती. जगताप यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांना उमेदवारी मिळाली. कसब्यातील काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासारखेच काटेदेखील तुल्यबळ उमेदवार होते. त्यामुळे चिंचवडची जागाही जिंकण्याचा आत्मविश्वास आघाडीच्या नेत्यांना होता, पण राहुल कलाटे यांच्या बंडखोरीचा फटका काटे यांना बसला.

अपक्ष लढूनही कलाटे यांना 40 हजार मते मिळाली. कलाटेंच्या उमेदवारीने आघाडीच्या मतांचे विभाजन झाले. त्यामुळे काटे यांचे विजयाचे गणित बिघडले. तिरंगी लढतीत भाजपच्या जगताप यांनी मतांच्या मोठ्या फरकाने निवडणूक जिंकली. दोन्ही जागा आम्हीच जिंकू, असे भाजप नेते ठासून सांगत होते, पण कसब्याची जागा भाजपच्या हातून निसटली. टिळक कुटुंबातील सदस्याला उमेदवारी दिली गेली असती तर चिंचवडप्रमाणे कसब्याची जागाही भाजपला राखता आली असती. महाविकास आघाडीला तेथे यश मिळणे अवघड झाले असते. कधी-कधी परीक्षेत सोपा वाटणारा पेपर अवघड जातो. कसब्यातील निवडणुकीत भाजपच्या बाबतीत तसेच घडले आहे.

एकजुटीने लढले तर विजय खेचून आणता येतो, हा आत्मविश्वास कसब्यातील विजयाने महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना दिला आहे. तथापि तीन पक्ष एकत्र लढूनसुद्धा भाजप उमेदवाराला मिळालेली मते घसघशीत आहेत. भाजपची पारंपरिक मते कमी झालेली नसल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्षांनी केला आहे. पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होईल. त्या निवडणुकीत कसब्यातून टिळक कुटुंबातील सदस्याला उमेदवारी देऊन आताची चूक भाजपला दुरुस्त करता येईल. कदाचित ही जागा पुन्हा जिंकता येईल, असेच हा निकाल सुचवतो.  चिंचवडमध्ये बंडखोरी रोखण्यात महाविकास आघाडीला अपयश आले.

त्याचा फटका राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराला बसला. आघाडीची मते विभागून भाजप उमेदवाराचा विजय सोपा झाला. याचाच अर्थ पुढील निवडणुकांवेळी बंडखोरी टाळण्याचे मोठे आव्हान आघाडीतील पक्षांपुढे असेल. भाजपलाही बंडखोरीपासून वाचावे लागेल. मुख्यमंत्र्यांनी प्रचार करूनसुद्धा भाजप उमेदवार पराभूत झाला, याबद्दल शिंदे गटाच्या नेत्यांनाही आत्मचिंतन करावे लागेल. लवकरच राज्यात मनपा आणि जिल्हा परिषद निवडणुका होतील. पुढच्या वर्षी लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकाही आहेत. सर्वच पक्षांना हे दुहेरी आव्हान पेलावे लागेल. पुढच्या सर्व निवडणुकांमध्ये भाजप-शिंदे गट विरुद्ध महाविकास आघाडी अशा सरळ लढती प्रत्येक मतदारसंघात पाहावयास मिळू शकतात.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

शिक्षक आणि पदवीधर निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचे वर्चस्व दिसून आले. महाविकास आघाडीची कोकणातील जागा भाजपने जिंकली, पण नागपूर आणि अमरावतीच्या जागा जिंकून आघाडीने भाजपला धोबीपछाड दिला. त्या निवडणुकांपाठोपाठ कसबा पोटनिवडणुकीतही भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. लोकसभेला 45 तर विधानसभेला 150 जागा जिंकण्याचा निर्धार करणार्‍या भाजपला या दोन्ही निवडणुकांतील निकालांपासून योग्य तो बोध घ्यावा लागेल. अन्यथा महाविकास आघाडी पुन्हा वरचढ ठरून भाजपच्या स्वप्नावर पाणी फेरल्याशिवाय राहणार नाही.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *