Thursday, April 25, 2024
Homeब्लॉगस्पंदन : गुंचे लगे है कहने...

स्पंदन : गुंचे लगे है कहने…

संगीतकार रामलक्ष्मण यांनी शनिवार २२ मे रोजी नागपूरात अखेरचा श्वास घेतला. त्यांचं खरं नाव विजय पाटील. ते मूळचे नागपूरचे. चित्रपट संगीत क्षेत्रात करिअर करण्याच्या उद्देशाने ते ऐन विशीतच नागपूर इथून मुंबईत दाखल झाले. एका कार्यक्रमात त्यांची भेट उत्तम बासरी वादक असलेल्या सुरेंद्र हेंद्रे नामक त्यांच्या समवयस्क युवकाशी झाली. ते सुद्धा याच क्षेत्रात काम करू इच्छित होते. पुढे या दोघांची भेट

निर्माते-दिग्दर्शक-गीतकार-लेखक-अभिनेते दादा कोंडके यांच्याशी झाली. दादांनी त्यांना ‘राम लक्ष्मण’ या नावाने संगीत देण्याचा सल्ला दिला. या जोडीला ख्यातनाम चित्रपट निर्मिती संस्था राजश्री प्रोडक्शनचा ‘एजंट विनोद’ हा पहिला हिंदी चित्रपट मिळाला. तर दादा कोंडके यांच्या ‘पांडू हवालदार’ या चित्रपटातून त्यांनी मराठीत पदार्पण केलं. पण त्यांचे साथीदार सुरेंद्र यांचं अकाली निधन झालं. पुढे त्यांनी एकट्यानेच रामलक्ष्मण या नावाने संगीतकार म्हणून आपली यशस्वी कारकीर्द घडवली.

- Advertisement -

मराठी भाषक असूनही हिन्दी सिनेजगतात संगीतकार म्हणून आपला ठसा उमटवणारे फार कमी संगीतकार आहेत. सी. रामचंद्र, स्नेहल भाटकर, सुधीर फडके, एन. दत्ता, हृदयनाथ मंगेशकर, अजय-अतुल एवढीच नावं सांगता येतात. यातल्या बहुतेकांनी एकाच भाषेत जास्त काम केलं आहे. सी. रामचंद्र यांनी मराठीत खूप कमी काम केलं आहे. तर इतरांनी हिंदीत फार काम केलेलं नाहीये. पण मराठी आणि हिंदीत समसमान काम करणारे आणि लोकप्रियता मिळवणारे रामलक्ष्मण हे एकमेव संगीतकार आहेत ! संगीतकार रामलक्ष्मण यांच्या कारकिर्दीचे तीन भाग करता येतील. एक म्हणजे त्यांनी हिंदीत राजश्री प्रोडक्शन सोबत केलेलं काम, दुसरं म्हणजे दादा कोंडके यांच्या समवेत केलेलं काम आणि तिसरं म्हणजे दादा शिवाय केलेलं मराठीतलं आणि राजश्री वगळता हिंदीत केलेलं काम. त्यांच्या या कामगिरीवर नजर टाकली तर ते एक अष्टपैलू प्रतिभावंत संगीतकार होते याची खात्री पटते. दुर्दैवाने त्यांची म्हणावी तशी दखल कोणी घेतली नाही. हिंदीत पण नाही आणी मराठीत सुद्धा! याला कारण म्हणजे त्यांचा स्वभाव. ‘आपण भलं नि आपलं काम भलं’ या उक्तीप्रमाणे ते जगले. त्यांनी आपली लॉबी किंवा गट निर्माण केला नाही. ऐनकेन प्रकारे प्रसिद्धीच्या झोतात राहणे त्यांना जमले नाही. तसेच महत्वाचे म्हणजे त्यांचं नाव देखील त्यांना आडवं आलं असण्याची दाट शक्यता नाकारता येण्यासारखी नाहीये. हिंदीत मराठी म्हणून उपेक्षा झाली तर मराठीत दलित-बहुजन समाजाचं प्रतीनिधीत्व करत असल्यामुळे ते दुर्लक्षित राहिलेत. त्यांच्यापेक्षा कमी गुणवान असूनही भप्पी लाहिरी व अन्नू मलिक यांच्यासारख्या संगीतकारांना जास्त संधी आणि प्रसिद्धी मिळाली.

रामलक्ष्मण यांनी ज्या कालखंडात आपली कारकीर्द सुरु केली तेव्हा लक्ष्मीकांत-प्यारेलाल, राहुलदेव बर्मन, खय्याम, कल्याणजी-आनंदजी, राजेश रोशन, उषा खन्ना, रवींद्र जैन असे दिग्गज संगीतकार कार्यरत होते. शिवाय नव्वद नंतरच्या काळात आनंद-मिलिंद, नदीम श्रवण, जतीन-ललित असे नव्या दमाचे संगीतकार देखील आपला प्रभाव टाकत होते. तर मराठीत राम कदम, विश्वनाथ मोरे, प्रभाकर जोग, सुधीर फडके, हृदयनाथ मंगेशकर हे प्रस्थापित तर अनिल-अरुण, अशोक पत्की हे नवोदित संगीतकार आपला जम बसवत होते. अशा प्रचंड स्पर्धेच्या काळात आपली स्वतंत्र ओळख प्रस्थापित करणे ही सोपी गोष्ट नव्हती. पण ती ते करण्यात यशस्वी झाले.

नव्वदचं दशक संपताना म्हणजे १९८९ मध्ये त्यांनी संगीतबद्ध केलेला ‘मैने प्यार किया’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नि रामलक्ष्मण यांची कारकीर्द झळाळून उठली. या चित्रपटातली गाणी तुफान लोकप्रिय झाली. अभिनेता सलमान खान या चित्रपटामुळे एकदम प्रकाशझोतात येऊन आघाडीचा स्टार झाला. लता आणि एस. पी. बालसुब्रमण्यम यांनी गायलेल्या यातल्या गाण्यांची मोहिनी इतकी जबरदस्त होती की ही गाणी इंग्रजीत सुद्धा करावी लागली. ह्या इंग्रजी गाण्यांचा ‘व्हेन लव्ह कॉल्स’ या नावाने हा अल्बम निघाला होता. या चित्रपटाने सलमान खानचा पडद्यावरचा आवाज म्हणून एस. पी. यांची ओळख घट्ट झाली.

राजश्री प्रोडक्शनच्या या चित्रपटाने निर्मिती खर्चापेक्षा कैकपटीने जास्त उत्पन्न कमावले. या चित्रपटानंतर पाच वर्षांनी म्हणजे १९९४ मध्ये राजश्री प्रोडक्शनच्याच ‘हम आपके है कौन’ या चित्रपटात रामलक्ष्मण यांनी अतिशय सुश्राव्य आणि लोकांच्या ओठांवर सहज येणारी डझनभर लोकप्रिय गाणी दिलीत. ही गाणी ‘मैने प्यार किया’ पेक्षाही जास्त सुपरहिट झाली. याही सिनेमात सलमान आहे. शिवाय माधुरी दीक्षितच्या चित्रपट कारकिर्दीतला हा एक महत्वाचा सिनेमा समजला जातो. राजश्री प्रोडक्शनच्या शिरस्त्याप्रमाणे त्यांचा पुढचा चित्रपट देखील ५ वर्षांनी म्हणजेच १९९९ मध्ये प्रदर्शित झाला. ‘हम साथ साथ है…’ हा तो चित्रपट. यातही सलमान आहेच. यातली गाणी आधीच्या दोन चित्रपटांइतकी नसली तरी बऱ्यापैकी लोकप्रिय झाली होती. हा राजश्री प्रोडक्शन व रामलक्ष्मण यांनी सोबत काम केलेला शेवटचा सिनेमा. राजश्रीचा ‘मै तो प्रेम की दिवानी’ हा चित्रपट २००३ मध्ये आला. याला अन्नू मलिकने संगीत दिलं. सिनेमा तर चालला नाही पण याची गाणी देखील कुठे ऐकू आली नाहीत.

राजश्री प्रोडक्शनचा ‘तराना’ हा चित्रपट १९७९ मध्ये आला होता. यातली गाणी सुद्धा तेव्हा लोकप्रिय झाली होती. विशेषत: सुलताना सुलताना मेरा नाम है सुलताना ( उषा मंगेशकर), गुंचे लगे है कहने फुलोंसे गीत सुनाओ (शैलेंद्रसिंग) आणि हम तुम दोनो साथ मे भीग जाएगे बरसात मे (उषा-शैलेन्द्र) ही गाणी लोकांनी उचलून धरली होती. याशिवाय त्यांनी संगीतबद्ध केलेल्या सांच को आंच नही, हमसे बढकर कौन, वो जो हसीना, हमसे है जमाना, आखरी बाझी, फ्तथर के फूल, 100 डेज, सातवा आसमान, प्यार का तराना, मुस्कुराहट, आगे की सोंच वगैरे चित्रपटातही श्रवणीय गाणी श्रोत्यांना दिली आहेत. मराठी आणि हिंदी चित्रपट संगीताच्या चाहत्यांना अनेक सुरेल गाणी देणाऱ्या संगीतकार रामलक्ष्मण यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

सहयोगी प्राध्यापक,

मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखा,

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,

नाशिक

मोबाईल : ९४०३७७४५३०

- Advertisment -

ताज्या बातम्या