यशवंतरावांच्या दृष्टीने सागर आणि सावरकर
ब्लॉग

यशवंतरावांच्या दृष्टीने सागर आणि सावरकर

यशवंतराव म्हणाले, 'निदान मला तरी काही विचारायचं नाही. मला फक्त आपणास डोळे भरून पाहायचं होतं.' यशवंताचा हा आदरभाव सावरकरांच्या हृदयाला भिडला. ते उठून त्याच्याजवळ आले. त्याच्या पाठीवर हात ठेवून म्हणाले, 'माझ्यात बघण्यासारखं काय आहे ? मीही तुमच्यासारखाच एक माणूस. तुमच्या अगोदर काही वर्षे जन्माला आलो. देशसेवेचं व्रत घेतलं आणि बलिदानाची प्रतिज्ञा करून कामाला लागलो. यात विशेष असं काय आहे ? आमच्या पिढीने आम्हाला जे योग्य वाटलं ते करायचा प्रयत्न केला. आता तुमची नवी पिढी काय करते ते पहायचं आहे.'आणि गंभीर होऊन सावरकर खाली बसले. पत्रकार राजेंद्र पाटील यांच्या ‘महाराष्ट्राचे शिल्पकार’ या ब्लॉग मालिकेचा सातवा भाग.....

Rajendra Patil Pune

सध्याचे राजकारण किंवा सामाजिक वातावरण इतके एकांगी टोकाला गेले आहे की त्यातून अनेकदा आपल्याला विखार बाहेर पडताना दिसतो. तो मग राजकीय नेत्यांपासून, कलाकारांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत बघायला मिळतो. राष्ट्र पुरुषांना केवळ एका धर्म किंवा जातीपुरते मर्यादित समजून त्यांच्या आडून जातीयवादाचा हा विखार अनेकदा अनेकांच्या वक्तव्यामधून अथवा लिखाणातून जाणवतो. ‘सोशल मिडीया’मुळे तर त्याची तीव्रता अधिक जाणवते. संबंधित व्यक्तीमत्वांचा आपापल्या पद्धतीने केवळ आपल्या जातीचा म्हणून उदोउदो करणे अथवा दुसऱ्या जातीच्या राष्ट्रपुरुषांवर चिखलफेक करणे यामुळे सामाजिक मने किती दुभंगली आहे याचा प्रत्यय अनेकदा येतो. बऱ्याच वेळा अगदी विचारवंतापासून ते सामान्य नागरिकांपर्यंत याची री ओढली जाते. राजकारणात अशा पद्धतीचे वातावरण तयार होणे हे देशाच्या आणि सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. विचारधारा भिन्न असली तरी एकमेकांचा विचार समजून घेणे, त्या व्यक्तीला समजून घेणे आवश्यक असते परंतु ते होताना दिसत नाही.

कॉंग्रेसची विचारधारा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची विचारधारा यांचे विश्लेषण करताना अशाच प्रकारचा विखार आपल्याला अनेकदा बघायला मिळतो. विचारधारेत फरक असू शकतो परंतु एकमेकांचा सन्मान राखणे हे सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने किती जरुरीचे आहे, त्यातल्या त्यात राजकारण्यांनी आणि विचारवंतांनी हे समजून घेणे आवश्यक आहे.

हे सर्व पुराण यासाठी की स्व. यशवंतराव चव्हाण आणि यांनी स्वत:हून स्वा. सावरकरांची भेट घेतली होती आणि त्यांचे सावरकरांबद्दलचे मत काय होते हे आपण कधी जाणून घेत नाही. महाराष्ट्राचा शिल्पकार अशी ओळख असलेले स्व. यशवंतराव ज्यावेळी स्वा. सावरकरांबद्दलची अशी भावना व्यक्त करीत असतील तर तुम्ही-आम्ही कोण? अर्थात हा विखार दोन्ही बाजूने व्यक्त होतो. या सर्वांनीच सामाजिक भान ठेवून याचा विचार करणे आवश्यक आहे.

लहानपणापासूनच यशवंतरावांना भव्यतेचं आकर्षण होतं. कर्तबगार व्यक्तींबद्दल त्यांना मनस्वी आदर होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहसी व्यक्तिमत्वासंबंधी अनेक गोष्टी यशवंतरावांनी ऐकल्या होत्या. ' ‘श्रद्धानंद ' नावाच्या नियतकालिकात प्रसिद्ध होणारी ' माझी जन्मठेप ' ही सावरकरांची आत्मकहाणीही त्यांनी वाचली होती. स्वातंत्र्यासाठी अवघे जीवन वेचणा-या या देशभक्तास एकदा डोळे भरून पहावे असे त्यांना वाटू लागले. कृष्णाकाठी वाढलेल्या यशवंतरावांनी अजून समुद्र पाहिला नव्हता. समुद्राच्या भव्यतेविषयी त्यांनी फक्त ऐकले होते. पण एकदा अगदी अनपेक्षितपणे या दोन्हींचे दर्शन घेण्याची संधी यशवंतरावांना मिळाली.

१९३० साली बिळाशीच्या सत्याग्रहात सामील होण्यासाठी यशवंतराव आणि राघुअण्णा लिमये बिळाशीला गेले. तिथे शेतक-यांची सभा घेऊन ते मलकापूरला आले. राघूअण्णा म्हणाले, ' यशवंता, आता इतक्या दूर आपण आलो आहोतच, तर सरळ खाली कोकणात जाऊया.' ' कोकणात जाऊन आपण काय करणार ?' यशवंतरावांनी विचारले.

'अरे, आमचं लिमयांचं मूळ गाव इथून जवळच आहे. ते गाव पाहू आणि पुढे रत्नागिरीला जाऊ.'

रत्नागिरीचे नाव ऐकताच यशवंतराव एकदम खूश झाले. ते म्हणाले, ' रत्नागिरीला गेल्यावर समुद्र आणि सावरकर यांचे दर्शन एकाचवेळी घेता येईल. फार चांगली कल्पना आहे. चला कोकणातच जाऊया.' त्याप्रमाणे दोघे लिमयांच्या गावाला व तिथून पुढे रत्नागिरीला गेले. नारळ आणि पोफळीच्या झाडांनी वेढलेल्या रत्नागिरी शहरात ते मनसोक्त भटकले. मि-या बंदराच्या बाजूने चालत असताना अचानक लख्खदिशी समुद्र नजरेसमोर दिसला. यशवंतरावांचे मन हरखून गेले. कार्तिकातल्या निळ्याभोर नभासारखे दिसणारे समुद्राचे ते विशाल रूप दोघांनी डोळे भरून पाहिले. यशवंतरावांच्या डोळ्याचे पारणे फिटले.

त्यादिवशी रत्नागिरीतच थांबून दुस-या दिवशी सकाळी ते दोघे सावरकरांना भेटायला त्यांच्या घरी गेले. बाहेरच्या खोलीत त्यांना बसायला सांगितले गेले. आतल्या खोलीत सावरकर कोणाशीतरी बोलत होते. ते लोक गेल्यानंतर सावरकर या ' बालक्रांतिकारांना ' भेटण्यासाठी बाहेर आले. राघुअण्णा व यशवंतरावांनी उठून त्यांना नमस्कार केला. सावरकरांनी त्यांचे कुशल विचारले.

'मी यशवंत चव्हाण, कराडच्या टिळक हायस्कूलमध्ये शिकतो.' यशवंताने आपली ओळख करून दिली.' एवढ्या लांब प्रवास कशासाठी केलास बाळ ?' सावरकरांनी विचारले. त्यावर राघुअण्णा म्हणाले, ' आम्ही मिठाच्या सत्याग्रहातील काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत. बिळाशीच्या बंडात सहभागी होण्यासाठी आलो होतो.'

'मोठेच पराक्रमी दिसता तुम्ही !' खळखळून हसत सावरकर म्हणाले, काही वेळ इतर विषयासंबंधी बोलणे झाल्यावर सावरकर म्हणाले, ' तुम्हाला मला काही विचारायचंय काय ?'

यशवंतराव म्हणाले, ' निदान मला तरी काही विचारायचं नाही. मला फक्त आपणास डोळे भरून पाहायचं होतं.' यशवंताचा हा आदरभाव सावरकरांच्या हृदयाला भिडला. ते उठून त्याच्याजवळ आले. त्याच्या पाठीवर हात ठेवून म्हणाले, ' माझ्यात बघण्यासारखं काय आहे ? मीही तुमच्यासारखाच एक माणूस. तुमच्या अगोदर काही वर्षे जन्माला आलो. देशसेवेचं व्रत घेतलं आणि बलिदानाची प्रतिज्ञा करून कामाला लागलो. यात विशेष असं काय आहे ? आमच्या पिढीने आम्हाला जे योग्य वाटलं ते करायचा प्रयत्न केला. आता तुमची नवी पिढी काय करते ते पहायचं आहे.' आणि गंभीर होऊन सावरकर खाली बसले.

त्यांच्या मनाच्या सागरात उसळणा-या देशभक्तीच्या लाटा यशवंतरावांना स्पष्टपणे जाणवल्या. त्यांच्या घरातून बाहेर पडताना यशवंतराव मनाशी म्हणाले, ' ही माझ्या जीवनातील अविस्मरणीय घटना आहे. आज मी एकाच वेळी समुद्र आणि सावरकर पाहिले. दोघांपैकी अधिक भव्य कोण हे ठरवणे अवघड आहे!'

राजेंद्र पाटील, पुणे

मो.- ९८२२७५३२१९

संदर्भ - कथारूप यशवंतराव

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com