Tuesday, April 23, 2024
Homeब्लॉग'साऊ शोषितांची ढाल, साऊ मुक्तीचं पाऊल ......!

‘साऊ शोषितांची ढाल, साऊ मुक्तीचं पाऊल ……!

‘साऊ पेटती मशाल, साऊ आग ती जलाल,

साऊ शोषितांची ढाल, साऊ मुक्तीचं पाऊल …’

- Advertisement -

अशा क्रांतीज्योती सावित्रीबाईंचा ३ जानेवारी हा जन्मदिवस यापुढे ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून साजरा होणार हा महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय निश्चितच स्वागतार्ह व आनंददायी असाच आहे. एवढेच नव्हे तर दर वर्षी हा दिवस ‘सावित्री उत्सव’ म्हणून साजरा करण्यात येणार ही अधिसूचना जारी होणे म्हणजे सध्या देशात जे ‘कट्टर रंगायन’ सुरू असलेल्या काळ्याकरड्या वातावरणात तेजाची तिरीप वाटावी. हा भारत सक्षम – साक्षर करण्यात फुले दांपत्याचा सिंहाचा वाटा आहे.

आजही भारतीयांची मानसिकता एवढी विखारी, मागास आहे तर १९० वर्षांपूर्वी ती किती पराकोटीची मागास असेल? लक्षात घ्या. मग प्रश्न पडतो की, अशा टोकदार काटेरी वाटेवर काळजात कोणतं तुफान घेऊन निघाले असतील साऊमाई आणि क्रांतीबा??? प्रवाहाविरोधात जाताना येणाऱ्या अडचणी आणि यातनांना किती धैर्याने तोंड दिलं असेल या मायबापाने! काहीच नव्हतं तसं सोबत त्यांच्या ! होते ते एकमेकांचे हात हाती, घट्ट जुळलेले वैचारिक बंध आणि ऊरात ठाम विश्वास बस्स….!

केवळ मूठभर उच्चवर्णीयांची ज्ञानग्रहणातील मक्तेदारी मोडीत काढून इथल्या मातीत ‘न भूतो न भविष्यती’ अशी अफाट क्रांती केली त्यांनी. म्हणूनच क्रांतीबा आणि क्रांतीज्योती म्हणून त्यांची इतिहासात नोंद झाली आहे आणि अनादी काळ ती तशीच राहील. मनुवादी पितृसत्ताक पद्धतीतून वर्षानुवर्षे चालत आलेल्या अन्याय शोषणाच्या अत्याचारी परंपरेस प्रथम स्त्रीशिक्षणाच्या माध्यमातून चूड लावली ती सावित्रीमाई आणि ज्योतिबांनी. लाखो संकटे आली दोघांच्या पुढ्यात. राहते घर सोडावे लागले, सनातन्यांनी मारेकरी पाठवले, भिडेवाड्यातल्या शाळेत जाताना शेणमाती अंगावर झेललीच, अर्वाच्च शिवीगाळही सहन केली, माईच्या अब्रूला धक्का लावण्याचा प्रयत्नही झाला. पण माई आणि क्रांतीबा साऱ्यांनाच पुरून उरले. हेच असते नैतिकता, ध्येयासक्ती व निश्चयाचे बळ!

सावित्रीबाई केवळ लौकिकार्थानेच ज्योतिबांच्या अर्धांगिनी नव्हत्या तर जे ऐतिहासिक क्रांतिकार्य ज्योतिबांनी उभे केले त्यातील अर्धा वाटा निःसंशय सावित्रीबाईंचा आहे. शेतकरी, शेतमजूर, अनाथ, विधवा, दीनदुबळे, शोषित स्त्रिया याबाबतच्या संपूर्ण कार्यात सावित्रीबाई ज्योतिबांच्या बरोबरीने लढल्या. बालहत्या प्रतिबंध, केशवपन, स्त्री शिक्षण, सत्यशोधक समाज, दुष्काळातील अन्नछत्र , प्लेगसाथीतील लोकजागृती याबाबत सावित्रीबाईंचे कार्य हिमालयाएवढे उत्तुंग आहे. त्या उत्तम कवयित्री होत्या, समाजशिक्षिका होत्या. द्रष्टेपण त्यांच्या उक्तीकृतीतून प्रतीत होताना दिसते.

कपोलकल्पित देवधर्म आणि त्या नावे पोसलेली दांभिकता ह्यांचा बागुलबुवा करून जातीच्या उतरंडी अधिक भक्कम करू पाहणाऱ्या वर्णवर्चस्ववाद्यांना आपल्या निर्भीड, निरपेक्ष समाजकार्यातून पहिली सणसणीत चपराक दिली ती ज्योतिबा आणि सावित्रीबाईंनी!

सर्व मानवजात निर्मिकाने जन्मास घातली, ती सर्व सारखी आहेत. जन्माने कुणीही उच्च वा नीच ठरत नाही तर कर्मानेच माणसाची श्रेष्ठ – कनिष्ठता ठरते हे फुले दांपत्याने आपल्या कार्यकर्तृत्वाने सिद्ध केले. सत्य, विवेक, समता, मानवता, समर्पण, बांधिलकी, त्याग, ममता हे सद्गुण समजून घ्यायचे असतील तर सावित्रीबाई आपण समजावून घेणे गरजेचे आहे.

सावित्रीबाईंनी शाळेत जाताना अनन्वित छळ सहन केला नसता तर बहुजनांच्या मुक्तीलढ्याचा प्रारंभ झालाच नसता. मुक्ता साळवे ही सावित्रीबाईंच्या शाळेतील मातंग समूहातील १३ वर्षाची विद्यार्थीनी आत्मभान येऊन आपल्या निबंधातून ‘आमचा नक्की धर्म कोणता?’ असा जाब देवाला विचारते. ‘सावित्रीबाई’ हे केवळ एक नाव नाही तर ‘सावित्री’ हा परिवर्तन, क्रांती, धैर्य या शब्दांचा समानार्थी शब्द आहे. समाजाचा संसार करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवले.

ज्योतिबांना पक्षाघाताचा झटका आला, त्यानंतर प्रकृती खालावातच गेली त्यातच ज्योतिबांचे निधन झाले. ‘ज्योतिबांच्या शवाला माईंनी अग्नी दिला’ ही सुद्धा एक क्रांतीच होती. त्यामुळेच भारतीय इतिहासात प्रथमच स्त्रीने अग्निडाग दिल्याची नोंद झाली. सावित्रीबाईंचा जन्मच मुळी क्रांतीसाठी झाला असावा. इथल्या विषमतावादी, पुराणवादी, रूढीप्रिय परंपरेस दिलेला प्रचंड मोठा हादरा म्हणजे सावित्रीबाईंचे संपूर्ण जीवन होय. सावित्रीबाईंने समग्र स्त्री जातीच्या कल्याणासाठी जे चटके, यातना सोसल्या त्याचे भान आपण ठेवलेच पाहिजे.

तिच्या लेकी म्हणून आपण वास्तवात जगायला हवे, दगडधोंडे पूजण्यापेक्षा जिवंत माणसांची वेदना समजून घ्या, त्यास हात द्या, त्यास स्वावलंबी करा, त्यांच्यातील आत्मविश्वास जागृत करा. न्यायाप्रती सजग राहा, अन्यायाविरोधात आवाज उठवा, द्वेषाने दुःख निर्माण होते तर प्रेमाने जग जिंकता येते यावर विश्वास ठेवा.

जोडीदाराशी वैचारिक ताळमेळ साधा, कुटुंबाचे वैचारिक भरणपोषण करा, बहुश्रुत व्हा, वाचन करा, नवनिर्मिती करा, सृजनशील असा. रुची असलेल्या विविध कलाकौशल्यात प्राविण्य मिळवा. अभ्यासूपणे, विचारपूर्वक व्यक्त व्हा, अभिव्यक्त व्हा. स्वतःची एक ओळख तयार करा, स्वतःचे एक स्थान निर्माण करा. महिलांनी महिलांना मागे खेचू नका तर प्रोत्साहन द्या-मदत करा.

भारतास सर्वच बाबतीत सक्षम व्हायचे असेल तर इथल्या स्त्रीशक्तीस सजग जागृत असणे आवश्यक आहे. संविधान हे आपल्या ‘माणूस’ म्हणून जगण्याचा परवाना आहे, त्याची जपणूक व अंगीकार करा. आपण केवळ ३ जानेवारीलाच सावित्रीबाईंचे स्मरण करायचे नाही तर त्यांच्या विचारआचारांना आपल्या जगण्यात रुजवून घेतले पाहिजे, अंगिकारले पाहिजे तरच आपण ‘सावित्रीच्या लेकी’ म्हणून मिरवू शकतो! म्हणून मला म्हणावेसे वाटते की,

”माझ्या सावित्रीनं दिलं

मला अक्षरांचं दान

माझ्या अक्षरांचे दीप

तुझ्या पायी पंचप्राण”

—————————————–

-डॉ.प्रतिभा जाधव,नाशिक

मो.9657131719

[email protected]

- Advertisment -

ताज्या बातम्या