Friday, April 26, 2024
Homeब्लॉगसंस्कृत दिन विशेष : भाषासु मुख्या मधुरा

संस्कृत दिन विशेष : भाषासु मुख्या मधुरा

श्रावणी पौर्णिमा हा ‘दिवस संस्कृतदिन’ म्हणून साजरा केला जातो.‘भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाणभारती’ हे वचन संस्कृतची महती सांगते. संस्कृत दिनानिमित्त संस्कृतचे वैशिष्ट्य सांगून गैरसमजांचे निराकरण करणारा हा लेख.

– विनय जोशी

- Advertisement -

भाषा हे केवळ अभिव्यक्तीचे साधन नसते तर ते त्या समाजाच्या सांस्कृतिक, सामाजिक, तत्वज्ञानिक अशा अनेक पैलूंचे प्रतिबिंब असते. भारताच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन संस्कृत भाषेत प्रकर्षाने घडते.

भारतीय धार्मिक साहित्य ,तत्वज्ञान,पुराणकथा, इतिहास हे सारे संस्कृत मध्ये आहे. इतकेच नव्हे तर प्राचीन भारतीय विज्ञान,वैद्यक, नाट्यशास्त्र, संगीत, अर्थशास्त्र अशा अनेक विषयांवर संस्कृतमध्ये विपुल ग्रंथसंपदा आहे. म्हणून ‘संस्कृतिः संस्कृताश्रिता।’ हे वचन सार्थ ठरते.

संस्कृत ही इंडो-युरोपियन भाषाकुलांतील एक प्राचीन भाषा! हिच्या उगमाविषयी मत-मतांतरे असली तरी हिचे प्रचंड साहित्य भांडार, नियमबद्ध व्याकरण आणि माधुर्य हे वादातीत आहे. संस्कृत काही सर्व भारतीय भाषांची जननी नाही.

तमिळ ही संस्कृत इतकीच प्राचीन भाषा आहे. परंतु काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून पूर्वोत्तरपर्यंत कुठल्या ना कुठल्या स्वरूपात पोहोचलेली एकमेव भाषा म्हणजे संस्कृत! प्रत्येक भारतीय भाषेत संस्कृतमधील शब्द आढळतात.

यामुळेच कदाचित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदीला अधिकृत भाषा म्हणून मान्यता मिळण्यास होणारा विरोध पाहून संस्कृत हा पर्याय सुचवला असावा.

अत्यंत प्रमाणबद्ध व्याकरण हे संस्कृतचे प्रमुख वैशिष्ट्य! पाणिणी, पतंजली, भर्तृहरी, कात्यायन आदी वैयाकरणांनी संस्कृतचे व्याकरण नियमबद्ध केले. यामुळेच लेखनकलेशिवाय फक्त मौखिक परंपरेतून वेद कुठलीही चूक न होता पिढ्यान्-पिढ्या संरक्षित राहिले.

संस्कृतइतके विपुल शब्दभांडार इतर कुठल्या भाषेत नसावे. संस्कृतमध्ये ‘पाणी’ या शब्दासाठी 150 हून अधिक पर्यायी शब्द आहेत. बैलासाठी 60 हून अधिक, हत्तीला 100 च्या वर, सिंहाला 80 च्या वर नावे आहेत. ‘स्त्री’ या शब्दाकरता योषिता, नारी, अर्धांगिनी, वामांगिनी, वामा असे अनेक शब्द संस्कृतात आहेत.

हा प्रत्येक शब्द स्त्रीची सामाजिक, कौटुंबिक आणि धार्मिक भूमिका दर्शवतो. मराठीत ‘आपण वाघ ससा खातो’ या वाक्यातील क्रम बदलून ‘ससा वाघ खातो’ असं म्हटलं तर अर्थ बदलेल.

संस्कृतमध्ये मात्र वाक्यातील शब्दांचा क्रम बदलत ‘व्याघ्र: शशकं खादति’ऐवजी ‘शशकं खादति व्याघ्र:।’ असे म्हटले तरी अर्थ कायम राहतो. ‘राम: काष्ठै: स्थाल्याम् ओदनं पचति।’ हे वाक्य आपण 120 पद्धतीने लिहूनही अर्थ तोच राहतो.

इतकी समृद्ध भाषा असूनदेखील संस्कृतबद्दल अनेक गैरसमज आहेत. संस्कृत ही फक्त धर्म आणि कर्मकांड यांची भाषा आहे, असे सांगितले जाते, पण संस्कृतमध्ये धार्मिक साहित्यापेक्षाही कथा, नाटक, काव्ये, शास्त्रीय ग्रंथ यांचेही प्रमाण लक्षणीय आहे.

संस्कृत ही फक्त हिंदू धर्माची भाषा नसून आणि बौद्ध परंपरेतील अनेक ग्रंथ संस्कृतमध्ये आहेत. बुद्धांचे पहिले चरित्र ‘बुद्धचरितम्’ संस्कृतमध्ये लिहिले गेले. संस्कृत ही कधी बोलीभाषा नव्हती. ती केवळ अभिजनवर्गाची लेखनभाषा होती, असा गैरसमज आहे.

सर्वसामान्यांना संस्कृत कळत नव्हते तर संस्कृतमध्ये इतके विपुल नाटक, काव्य का निर्माण झाले असते? संस्कृत नाटके जत्रेत सादर केली जात असत, असा उल्लेख आढळतो. म्हणूनच जत्रेतील सर्वसामान्य लोकदेखील या नाटकांचा आस्वाद घेत असत, असे म्हणता येईल. संस्कृत ही अत्यंत क्लिष्ट आणि अवघड आहे, असे काहीना वाटते.

शालेयस्तरावर व्याकरणाचा बागुलबुवा उभा केल्याने ही भीती बसली असावी. परंतु संभाषणातून अगदी हसत-खेळत संस्कृत बोलता येते याची अनेक उदाहरणे आहेत.‘डिम्ब: किलालम् अश्नाति।’ हे वाक्य दुर्बोध वाटू शकेल, पण हेच वाक्य सोप्या संस्कृतमध्ये ‘बालक: जलं पिबति।’ असे म्हटले तर अगदी सहजच त्याचा अर्थ कळतो.

संस्कृत ही मृतभाषा आहे हादेखील एक असाच अपसमज! भारतात आजही अनेक कुटुंब संस्कृतमध्ये बोलतात. मुत्तुरसारख्या गावाची जनभाषा संस्कृत आहे.

संस्कृतमधील साहित्य फक्त भारतात नव्हे तर जगातील अनेक विद्यापीठांत अभ्यासले जाते. संस्कृत संभाषण शिबिरांतून लक्षावधी लोक संस्कृत बोलायला शिकले आहेत. कोट्यवधी भारतीयांच्या घरात दररोज श्लोक, स्तोत्रांच्या माध्यमातून संस्कृतचा आवाज निनादत आहे.

विविधतेने नटलेल्या भारतीय परंपरांचा पाईक होण्याची, त्यांचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा आपण शालेय स्तरापासून करीत आहोत.

म्हणूनच भारतीय परंपरांची, संस्कृतीची आधारशीला असणार्‍या संस्कृतचे रक्षण, संवर्धन करणे आपले राष्ट्रीय कर्तव्य ठरते.

यासाठी संस्कृत बोलायला शिकणे, इतरांना शिकवणे, संस्कृत साहित्याच्या अभ्यास करणे, दैनंदिन जीवनात संस्कृतचा उपयोग करणे असे अनेक उपाय केले जाऊ शकतात. यातूनच काळाच्या प्रवाहात टिकून राहिलेली आपली ही अतिप्राचीन भाषा पुढील अनेक पिढ्यांपर्यंत टिकून राहावी याच संस्कृतदिनानिमित सदिच्छा!

(लेखक भारतीय विद्या अभ्यासक आहेत.)

- Advertisment -

ताज्या बातम्या