सॅनिटायझर
ब्लॉग

सॅनिटायझर

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | किरण वैरागकर

फार पूर्वीच्या काळी म्हणजे चौसोपी वाडे असतानाची गोष्ट! बाहेरचा माणूस आत आला की, आल्या-आल्याच तिथे हात-पाय धुण्याकरता सोय असायची. त्यानंतर आम्ही लहान असेपर्यंत घरात आल्यावर हात-पाय धुणे अगदी अनिवार्य होते. हळूहळू ते गेलेच आणि उगवले सॅनिटायझरच्या रूपाने!...

आधी एक माफीनामा! ‘सॅनिटायझर’करता मराठी शब्द नाही आढळला. एखादा चांगला आणि चपखल पर्यायी शब्द सुचवा अथवा आपल्या प्रयत्नाने नवीन शब्द नक्कीच करता येईल. आणि या शब्दाप्रमाणेच आधी विशेष न वापरलेली गोष्ट, द्रव्य म्हणजे सॅनिटायझर! जसा मास्क नव्हता किंवा तो हॉस्पिटल आणि काही ठराविक व्यक्तींकडे असायचा तसाच सॅनिटायझर!

दवाखान्यात, रुग्णाच्या उशाशी आणि काही अतिकाळजी घेणार्‍या म्हणजे या बाबतीत आगाऊ, पाणीपुरी खायच्या आधी हात सॅनिटाईझ करणार्‍या व्यक्ती सोडल्या तर याचे दर्शन दुर्लभ! अतिमागणीमुळे आता ते मिळणे दुर्लभ! 400% मागणी वाढलीय. जय करोना! ना भूतो ना भविष्यती सॅनिटायझरची लॉटरी लागली आणि मेडिकल दुकानात कोपर्‍यात बसलेला सॅनिटायझर डायरेक्ट फ्रंट डेस्कवर आला.

फार पूर्वीच्या काळी म्हणजे अगदी चौसोपी वाडे असतानाची गोष्ट! बाहेरचा माणूस आत आला की, आल्या-आल्याच तिथे हात-पाय धुण्याकरता सोय असायची. तदनंतर आम्ही लहान असेपर्यंत घरात आल्यावर हात-पाय धुणे अगदी अनिवार्य होते. हळूहळू ते गेलेच आणि उगवले या सॅनिटायझरच्या रूपाने! आता मात्र कुठल्याही सोसायटीत वा घरात गेलो तर हात सॅनिटाईझ करूनच आत घेतात. अनिवार्यच आहे ते.

आजकाल, ‘खरेदी नको, पण सॅनिटायझर आवर’ असा प्रत्यय येतोय सर्वच दुकानात. परवा देसाईकडून जोशी आणि नंतर चितळेकडे गेलो तर प्रत्येक ठिकाणी आधी हात सॅनिटाईझ करा. अहो माल आहे की नाही हे तर विचारू द्या. नाही आधी हात सॅनिटाईझ. शिस्त म्हणजे शिस्त! आम्ही घरी येईपर्यंत हाताला सॅनिटायझरने येथेच्छ आंघोळ झाली होती. मीच हात, बोटं तपासून बघितली, झिंगली बिंगली नाहीत ना?

अहो त्यात पन्नास टक्क्यांहून अधिक अल्कोहोल असते म्हणे. म्हणजे दारूचं की! हे ऐकून आमच्या स्नेह्याच्या चिरंजीवानं सर्व बोटं, अंगठे चोखून बघितले स्वतःचे! विचारले तर म्हणाला अल्कोहोलची चव बघत होतो. अती ज्ञान उपलब्धतेचा परिणाम! आधी मेडिकल दुकानातून, स्पिरिट किंवा बेनाड्रीलसारखे औषध हा दारूला पर्याय म्हणून वापरायचे, पण सॅनिटायझर तसा काही मार्ग काढू शकला नाही; नाही तर खप 800% वाढला असता.

आता कुठंही गेले की सॅनिटाईझ! कोणी आलं की सॅनिटाईझ! दर दिवशी दर माणशी दर वेळेस अगदी दोन मिलिलिटर आणि दहा बारा ठिकाणी जाणार असेल तर दरमहा दरमाणशी अर्धा लिटर लागेल.

आणि इतरांना वाटण्यात जाणार ते वेगळे. तंबाखू, सिगारेटच्या वेळेस जसे लोक हात पुढे करायचे तसे आता सॅनिटायझरची बाटली काढली की करतात. तो बिचारा मास्क भिजतो म्हणून नाही तर मास्कला पण आंघोळ घातली असती. सॅनिटायझर अगदी पर्समध्ये मावेल एवढ्या छोट्या बाटलीपासून तर व्यापारी प्रमाणावर वापरायला अगदी बॅरलमध्ये उपलब्ध झाले.

एकाच वेळेस पूर्ण जगात प्रसिद्ध पावलेले सॅनिटायझर कदाचित प्रथमच उत्पादन असेल, पण या सॅनिटायझरचा भाव आणि प्रस्त मात्र खूप वाढलंय. नवरी म्हणे मेंदी लावायच्या आधी सॅनिटायझर लावते. पोरगं शाळेत पुस्तक उघडायच्या आदी सॅनिटायझरची बाटली उघडतो. मंदिरात गेलो तरी सॅनिटायझर, नशीब देवाला कोणी सॅनिटायईझ नाही करीत.

लिफ्ट, दार, कार सगळीकडे म्हणजे ‘बोटं लावीन तिथे सॅनिटायझर’ असा प्रकार सुरु आहे. अतिदक्षतेमुळे सॅनिटायझरच्या बाटलीलासुद्धा सॅनिटायझरने साफ नाही केलं म्हणजे मिळवली!

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com