Friday, April 26, 2024
Homeब्लॉगमूल्यांची पेरणी करणार कोण?

मूल्यांची पेरणी करणार कोण?

समाजात संघर्ष हा नेहमीच विकासाला मारक व राष्ट्राच्या प्रगतीला घातक असतो.संघर्ष नेमका का होतो ? सध्या ज्या कारणानी संघर्षांची बीजे पेरली जाता आहेत त्यामागे

धर्माचा विचार असतो किंवा स्वहिताचा विचार असतो. जगातील सर्वाधिक युध्दे तर धर्माच्या नावाखाली लढली गेली आहेत.

- Advertisement -

अशावेळी जो धर्म शांतता आणि समृध्दतेकरीता निर्माण झाला आहे त्या धर्माच्या नावाने माणंस उध्दवस्त करणे कसे शक्य आहे हा प्रश्न पडतो. धर्माच्या विचाराचा मोठया प्रमाणावर समाजमनावर पगडा असतो.ज्या विचारात व्यक्ती व समाज उन्नतीचा धागा असतो..तो विचार खरच का रूजत नाही ? धर्माचा भूतदयेचा विचार माणंसाच्या मनावर अधिराज्य करतो, मात्र माणंसाशी माणंसासारखे वागण्याचा विचार मनात घर का करीत नाही ? हा प्रश्न अऩुत्तरित राहातो. म्हणजे आम्हाला पशूत देव दिसतो मात्र माणंसात देवत्व दिसत नाही. अशीवेळ जेव्हा समाजात येते तेव्हा तो पोकळी विवेक व शहाणपणाची असते.त्यासाठी शिक्षणातून मूल्य पेरणीची निंतात गरज सातत्याने अधोरेखित करण्यात आली आहे.समाज एका मूल्यांच्या विचारावरती उभा असतो.मूल्यांचा धागा सैल होत गेला की समाजाचा -हास सुरू झालेला आपल्याला पाहावयास मिळतो.मूल्य हरवली,त्या मागील चिंतन,दृष्टी संपुष्टात आली की व्यक्तीचे माणूसपण संपण्याचा प्रवास सुरू होतो.आज आपल्याला आर्थिक सुबत्ता नसली तरी शांतता हवी आहे. आनंद हवा आहे.नात्याला घटट वीन हवी आहे , प्रगतीची वाटचाल चालायची आहे..पण त्या करीता कोणाला तरी पायाखाली तुडून काहीच नको आहे हेही लक्षात घ्यायला हवे आहे. हातात हात घेऊन चालणे आणि सर्वांना सोबतीने बरोबर घेतल्यांने विकासाची वाट निर्माण होते आणि ती अनंत काळ टिकत असते . आपले संत ,ऋषी मुनी यांनी निर्माण केलेली वाट ही आजही प्रकाशमान दिसते याचे कारण त्या वाटा शाश्वत मूल्यांच्या आहेत.म्हणून अभ्यासक्रमात अधोरेखित केलेली मूल्यांचा विचार जोपर्यत आपण गंभीरपणे शिक्षणाच्या प्रक्रियेत केला जात नाही तोपंर्यत शिक्षणात माणूस निर्माण करण्याची अपेक्षाच फोल ठरणार आहे.

चीन सारखा देश जगाच्या पाठीवर महासत्ता बनण्याचा प्रवास करू पाहातो आहे.त्यासाठी त्यांनी चालविलेला आटापिटा अवघे जग अनुभवते आहे.आर्थिक महासत्ता होण्यासाठी त्यांनी निवडलेल्या पाऊलवांटानी त्यांना निश्चित स्वरूपात यश मिळत असल्याचे दिसते आहे.अशा परीस्थितीत ज्यां नागरिकांसाठी व राष्ट्रासाठी ते करू पाहाता आहेत त्यांच्या जीवनातील आनंद हरवला गेल्याचा अहवालही प्रसिध्द होता आहेत.त्यामुळे त्यांनी ज्या विचाराने पेरणी केली त्या विचाराचे रोपटे माणंसाच्या मनात निर्माण झाले.मात्र त्या रोपटयाला निराशेचे,दुःखाचे फळे लागली असल्याचे अधोरेखित झाल्यावर त्यासाठी त्यांनी शालेय अभ्यासक्रमात मूल्यांचा विचार पुन्हा अधोरेखित केल्याचे दिसते आहे.पुन्हा माघारी फिरत त्यांनी आपला प्रवास सुरू केला आहे. त्यामुळे पुढच्यास ठेच मागचा शहाणा या न्यायाने काही शिकण्याची गरज आजही अधोरेखित होतांना पाहावयास मिळत आहे.आपल्या अभ्यासक्रमात मूल्य,जीवनकौशल्य आणि गाभाघटक यांचा विचार अधोरेखित केलेला असतो.अभ्यासक्रमात जे अधोरेखित केले आहे त्याचे प्रतिबिंब अप्रत्यक्ष पाठयपुस्तकात असेलल्या पाठात प्रतिबिंबीत होत असते. पाठयपुस्तकात असलेल्या पाठातून तो विचार रूजवायचा असतो.मात्र अभ्यासक्रमाची उददीष्टे न पाहाता,मूल्य जीवनकौशल्यांचा विचार न करता केवळ मजकूराची देवाणघेवाण होणार असेल आणि त्याचेच मूल्यमापन होणार असेल , तर अक्षराच्या साक्षरतेचा मूल्यमापनाला प्रतिसाद मिळेल पण जीवनाच्या उन्नत विचारांसाठी काहीच पेरणीचा मार्ग मात्र त्यातून अधोरेखित होणार नाही.केवळ अक्षर साक्षरतेने कधीच शहाणपण व विवेक निर्माण करता येत नाही हे सिध्द झाले आहे. शिकलेली माणंस शिक्षित असतील पण ती शहाणी असतील यावर विश्वास कसा ठेवायचा.आपल्या अवतीभोवती आपण जेव्हा पाहातो तेव्हा सर्वाधिक चर्चा भ्रष्टाचारावरती होत असते.तो भ्रष्टाचार दिवंसेदिवस वाढत असल्याचे दिसते आहे.जगाच्या पाठीवर आपला क्रमांक सातत्याने वरवर चढतांना दिसत आहे.एकीकडे भ्रष्टाचार वाढतो आहे आणि दुसरीकडे शिक्षण घेत असलेली पीढी वाढते आहे.शिक्षण आणि भ्रष्टाचाराचा आलेख जर समानतेने उंचावत असेल तर त्याचा काही संबंध आहे का ? याचा विचार करायला हवा.शिक्षण घेतल्यानंतर लोक शहाणी होत असतील तर समाजात संघर्ष,अपघात,न्यायालयीन याचिका,मानसिक विकार कमी होण्याची गरज आहे.माणूस अधिक आनंदी व्हायला हवा.तसे काही घडतांना अथवा कमी होतांना दिसत नाही.उलट दिवंसेदिवस प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला कायदे करण्याची वेळ पडत आहे.कोरोनाच्या काळात बेजाबदारीचे दर्शन घडलेच.

मुळतः आपल्या सामाजिक जीवनातील समस्या यांच्या मुळाशी व्यक्तीगत मूल्यांचा विचार आहे.आपण कायदे करतो,नियम बनवितो,मात्र त्यांने सर्व बदलेल असे वाटने हा केवळ भास आहे.मूळतः जोपर्यंत मनाचे परिवर्तन शिक्षणाच्या मार्गाने होत नाही.तेथे शिकविल्या जाणा-या अभ्यासक्रमातून त्याची पेरणी होत असते.शिक्षणातून बाहय मूल्यांचा विचार अधोरेखित होतांना दिसत आहे.बाहय जीवन अधिक चांगले करण्याचा प्रयत्न होतो आहे पण समाजात केवळ बाहय मूल्यांनी आनंद,समाधान निर्माण होणार नाही.त्या करीता आंतरिक परिवर्तनाचा विचार रूजवायला हवा असतो.दलाई लामा यांनी म्हटले आहे , की समाज व्यवस्थेत जोपर्यंत बाहय मूल्यांना प्राधान्य दिले जात आहे तोवर अन्याय,अथ्याचार,भ्रष्टाचार,असमानता,असहिष्णूता,आणि लोभ यांचे आस्तित्व कायम राहाणार आहे.कारण माणंसात भरून राहिलेले दुर्गुण हे आंतरिक मूल्यांकडे झालेल्या दूर्लक्षाचा परिणाम असतो.त्यामुळे शिक्षणाचे बाबतीत अधिक जबाबदारीची जाणीव असणे,त्या स्वरूपाचा शिक्षक समूह निर्माण करणे महत्वाचे आहे.

शिक्षक ही मोठी शक्ती आहे.त्यांचे हाती समाज व राष्ट्राचे भविष्य आहे.त्या शक्तीपुढे सत्ता देखील लोंटागण घालते हा इतिहास आहे. फिनलंड मध्ये निर्वासितांना प्रवेश देणेबाबत विचार सुरू होता.तसा विचार केला जात होता आणि राज्यकर्ते व समाज मात्र निर्वासितांना आपण प्रवेश देऊ नये असा विचार करीत होती.त्यासाठी समाज आंदोलन करण्याच्या मानसिकतेत होता.त्या मागे केवळ आपल्या देशातील शिक्षणांचा गुणवत्ता ढासळेल ही चिंता होती.कदाचित त्यांची चिंता अधिक योग्य असेल पण शिक्षकांना सांगितले त्यांना येऊदे..शिक्षणांची चिंता आम्ही वाहू आणि प्रवेश मिळाला.जेथे समाज व राज्यकर्ते विरोध करीत होते तेथे शिक्षकांच्या म्हणण्याने आंतरराष्ट्रीय निर्णय घेतला गेला.शिक्षकांच्या म्हणण्याला आणि मताला किती मोल असते हे या निमित्ताने अधोरेखित झाले होते.शिक्षणाकडे किती उदार आणि मनोभूमिकेतून पाहायचे असते हे या निमित्ताने समोर आले.त्यामुळे मूल्यांचा विचार जीवन व्यवहारात अधोरेखित केला गेला तर काय घडते हे जगाच्या पाठीवर अनेक राष्ट्रांनी दाखवून दिले आहे.याचे कारण शिक्षकांच्या हाती समाज व राष्ट्र निर्मितीची शक्ती असते हे ते जाणून होते.त्यामुळे आपणाला देखील त्या उंचीने त्या पाऊलवाटा तुटवायला लागणार आहेत.

अनेकदा मूल्य हरविल्याची चर्चा सुरू होते तेव्हा ती शिक्षणातून रूजवावी असा विचार पुढे येतो,त्यासाठी मूल्यांच्या तासिका घ्याव्यात असे म्हटले जाते मात्र केवळ अशा स्वरूपाच्या तासिकांनी मूलांमध्ये मूल्यविचार रूजवू शकणार नाहीत.केवळ पोपटपंचीने परीक्षेत मार्क पडतात.जीवनात यशाच्या शिखरावर पोहचण्यासाठी मात्र सतत मूल्यांना स्थान द्यावे लागते.ते ज्यांच्यामध्ये रूजले त्या अनेकांच्या आयुष्याला दिशा मिळाली आहे.यशवंतराव चव्हाण,लालबहादूर शास्त्री ही माणंस मूल्यांवरती घडली .रेल्वेमंत्री असतांना अपघात झाला म्हणून राजीनामे देणारे शास्त्रीसारखी माणंस वर्तमानात अभावाने दिसतात.त्याचे कारण येथील शिक्षणातून आलेल्या मूल्यधारनेचे दर्शन झाले .मूल्य ही बाहेर लादन्याची गोष्टच नाही.त्यात ती सांगून पेरता येत नाही तर अनुकरणाने येणारी आहे.त्यामुळे विद्यार्थी जेथे वाढतात तेथील परिसरातील भवतालमध्ये मूल्य दिसायला हवी असतात.सांगणे आणि वर्तन यात अंतर असेल तर परिणाम शुन्य असतो. पैसा खाणारा माणूस जेव्हा नितीच्या गोष्टी करू लागतो तेव्हा त्या गोष्टी म्हणजे रिकाम्या घडयावरचे पाणी असते.पुस्तके वाच असे सांगून चालत नाही, त्याला त्याच्या भवताली पुस्तके वाचणारी माणंस दिसावी लागतात.मोबाईल वापरू नको असे सांगणारे अनेक जन आपल्याला दिसतात, पण तरी मुले त्यांचे ऐकत नाही.याचे कारण सागंणारा जोपर्यंत त्यावाटेने चालत नाही, तोपर्यत त्या गोष्टी आचरणात येण्याची शक्यता नाही.त्यामुळे शिक्षणात जोपर्यंत कर्ते विचार येत नाही तोपर्यत परिवर्तनाच्या पाऊलवाटा चालणे अशक्य आहे.शिक्षण हे केवळ पुस्तके संपविणारी आणि पास नापासापुरती व्यवस्था नाही.त्या पलिकडे जीवनाला उन्नत बनविणारे जे काही आहे ते सर्व पेरणारी ती एकमेव व्यवस्था आहे.ती व्यवस्था जितकी निरोगी असेल तितके सामाजिक आरोग्य उत्तम राहाण्याची शक्यता आहे.त्यामुळे आपणाला उद्याचे भविष्य कसे हवे आहे ते ठरवायला हवे. त्यासाठीच्या प्रकाशवाटा चालत राहाण्याचा संकल्प करूया..कारण आज पेरले तर उद्या काही उगविण्याची शक्यता आहे अन्यथा अंधाराच्या वाटा आहेतच.

संदीप वाकचौरे

(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)

- Advertisment -

ताज्या बातम्या