Friday, April 26, 2024
Homeब्लॉगनिर्भयता लाभू दे मजला..

निर्भयता लाभू दे मजला..

मुलं शिकत नाही तेव्हा त्याला शिक्षा करायलाच हवी. सारे करूनही ते लक्ष देत नाही. गोड बोलून पाहिले, कौतूक करून पाहिले तरी त्याचे शिक्षण होत नाही. शेवटी शिक्षा हाच पर्याय शिल्लक आहे. म्हणूनच त्याला शिक्षेचा निर्णय घेतला आणि त्याला शिक्षा केल्यांने मुलं शिकू लागल्याचा आजवरचा अनुभव आहे. असे अनुभव सांगणारी माणंस आपल्या अवतीभोवती आहेत.

हे खरे आहे की मुलाला शिक्षा केली म्हणून त्यांने अभ्यास केला असा निष्कर्ष निरिक्षणाच्या आधारे काढणारी माणंस आहेत. तो अभ्यास त्यांने स्वतः आनंदाने केला, की केवळ शिक्षेच्या भितीपोटी केला? भितीपोटी केला जाणारा अभ्यास हा जीवन घडविणारा असेल का? भितीने जे काही केले त्यात निर्भयता नसेत. विवेकशुन्यता असते. शिक्षेने जर मानसिक परिवर्तन होत असेल तर तुरूंगात शिक्षा भोगून आलेला कोणताही आरोपी हा समाजात चांगला नागरिक म्हणून दिसायला हवा. शिक्षा होते म्हणून वरवरचा व तात्पुरता प्रतिसाद बदलतो. त्या शिक्षेच्या भितीपोटी केवळ आभास निर्माण केला जातो. त्यामुळे शिक्षेने प्रतिसाद बदलत असला तरी आंतरिक परिवर्तनाची शक्यता नाही. जोवर आतून बदल घडत नाही तोवर अपेक्षित परिवर्तन अशक्यच आहे. वर्तमानात कोरोनाचे नियम पालन करतांना मास्क वापरणे बंधनकारक आहे पण लोक तसे करीत नाही. मात्र समोर पोलीस दिसले की तात्पुरता मुखावरती मास्क चढवितात आणि पोलीस गेले की पुन्हा जैसे थे. पोलीसांची भिती म्हणून वर्तन बदलते पण त्यात विवेक व जबाबदारीचे भान नसते. मुळात मास्क हवा ती माझी जबाबदारी आहे. त्याचे पालन करणे ही निर्भयता असतो.. नियम तोडणे हे भयच असते हे लक्षात घ्यायला हवे.

- Advertisement -

शिक्षण हक्क कायदा एप्रिल 2010 पासून देशभर आस्तित्वात आला. त्या कायद्यातील कलम 17 प्रमाणे शाळेत शारीरिक अथवा मानसिक स्वरूपाची शिक्षा करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. संपूर्ण भारतात कायद्याने शिक्षा करण्यास प्रतिबंध करण्यात आला. त्यावेळी मुल कसे शिकणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. आता शिक्षा नाही तर शाळेत व घरात देखील मुलांच्या शिस्तीचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे शाळांमध्ये अध्ययन अध्यापनाची प्रक्रियेत अडचणी निर्माण होतील. मुले अभ्यास करणार नाहीत. अभ्यासाबददलची चिंता व्यक्त करण्यात येऊ लागली. त्या चिंतेमागे पूर्व अनुभव होता.

शंभर दिडशे वर्ष इंग्रज राजसत्तेने आपल्यावरती राज्य केल्यानंतर त्यांनी जे काही पेरून ठेवले होते, त्यांच्या विचाराचे प्रतिबिंब इथल्या वर्तनात अधोरेखित होत होते. एका शिक्षण तज्ज्ञाने असे म्हटले आहे की “भारतातून इंग्रज गेले असले तरी अजूनही भारताच्या शाळांमध्ये इंग्रजाचे दर्शन घडते”. यामागे शाळेच्या आवारात काठी घेऊन केली जाणारी, शिक्षा देणारी व्यवस्था म्हणजे इंग्रज विचारधारा आहे. त्या अर्थाचे ते विधान आहे. आपल्या देशात पोलीसांच्या हाती असलेली काठी त्यांचेच धोतक आहे. कायद्याने शिक्षा बंद केल्यावर आरंभीच त्यावरती प्रचंड कोलाहल निर्माण झाले. कायद्याच्या या तरतूदी बददल शंका व्यक्त होऊ लागली. शाळेत कायद्यानंतर कोठे शिक्षा करण्याचा प्रयत्न केला गेला तर त्या संदर्भाने काही पालकांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या आणि त्यातून प्रशासकीय पातळीवर शिक्षा देखील करण्यात आल्या. आंरभी हा विचार स्विकारतांना मानसिक पातळीवर मोठया प्रमाणावर त्रास झाला. पण आता हळूहळू मानसिक स्विकृती झाली. त्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. शिक्षेने फार काही परिवर्तन होत नाही तर फार झाले तर बदल घडतो हे लक्षात घ्यायला हवे.

आपल्या संपूर्ण जीवन प्रवासात मुलांनी अधिक चांगले वागावे या करीता त्यांच्या मनात भितीची पेरणी केली जात असते. अगदी लहान वयात घरात मुल जेव्हा चंचलतेने वागते, त्याच्या मना प्रमाणे वागू पाहाते. न विचारता एखाद्या दिशेचा प्रवास करते, घरात आघाव पणाने बोलू लागते. मोठया माणंसासमोर विवेकशीलतेने प्रश्न विचारते, बंडखोरीने आव्हान उभे करते तेव्हा त्याला थोपविण्यासाठी भिती भरविण्याचा मार्ग सोपा असतो. अनेकदा मुल निर्भयतेने रात्री बाहेर पडते तेव्हा रात्री भूते येतात असे सांगितले जाते.

तर कधी कधी एखाद्या ठिकाणी मुल जाते तेव्हा त्या परीसरात भोकाडी नावाच्या आस्तित्वात नसलेल्या प्रतिमा निर्माण केल्या जातात आणि मुलांच्या मनात भितीचे घर बांधले जाते. त्या बांधलेल्या घरांने काय घडते, तर मुले कायमच त्या भितीच्या भोवती राहून वागण्यास सुरूवात करते. त्याचा सकारात्मक परिणाम तात्पुरता दिसत असला तरी जीवनभर मात्र त्याच्यातील निर्भयतेला कायमचा रामराम ठोकला जातो. त्याचा परिणाम लोकशाहीत जाब विचारणारा, स्वातंत्र्य बाण्याचा, निर्भयतेने व्यक्त होणारा नागरिक आपण निर्माण करण्यात अपयशी ठरत असतो. स्वतःच्या स्वतंत्र्य वाटा निर्माण करण्याऐवजी अनुकरणाची वाट चोखाळणे तो अधिक पसंत करीत असतो.

मुलं अभ्यास करीत नाही म्हटल्यावर त्याला शिक्षा करण्याकडे कल वाढू लागतो. त्याला शिक्षेची भिती मनात भरली की भितीने मानसिक पातळीवर बदल दिसू लागतो.त्या भितीने काय घडते, तर मुलं फार तर इतरांना अपेक्षित असलेल्या दिशेचा प्रवास करते. पण मुलांच्या आत जे काही आहे, त्याला ज्या दिशेने विचार करावा लाटतो तो थांबतो. प्रश्न पडतात, सृजनात्मकतेचा जो प्रवास असतो तो त्याला प्रतिबंध घातला जातो. त्यामुळे त्याला स्वतःच्या मनाप्रमाणे विचार करणे असेल, सृजनतेच्या वाटा तुटविणे असेल ते घडत नाही. भितीमुळे स्वातंत्र्याची प्रेरणा मरण पावते. सृजनतेच्या वाटा निर्माण करणे थांबते.

फारतर अनुकरणाचा प्रवास घडेल पण नव्या वाटा धुंडाळण्याचा प्रवासही खुंटीत होतो. भितीमुळे मन चिंताक्रात बनते. मनात सातत्याने भितीने घर केले असेल तर ते सुरक्षित असल्याची शक्यता नाही. आपण तर सुरक्षितेसाठीच भिती पेरत असतो, मात्र त्याचा परिणाम वरवर दिसतो पण आंतरिक पातळीवर त्याचे दुषपरिणाम भोगत असतो. विवेकांनदाने अशीच भिती लहान वयात घालण्यात आली होती. त्यांनी ती भिती स्विकारली नाही. उलट रात्री ज्या बागेत भूते येतात असे सांगण्यात आले होते, त्याच बागेत आपल्या सहकार्य़ांना घेऊन ते गेले होते. त्यांना कोणतेही भूत दिसले नाही. त्याचा योग्य परिणाम साधला गेला. मनात निर्भयता निर्माण झाली. त्यातून विवेकशीलतेचा प्रवास घडविण्यात त्यांना यश मिळाले. त्यांनी भविष्यात जे काम उभे केले. समाजातील चालीरितींवरती जो हल्ला केला. पंरपरेतील वाईट प्रथांवरती प्रहार करण्याची जी हिम्मत दाखविली त्याचे कारणच निर्भयता हेच होते. त्यामुळे भितीशुन्यता हीच मोठी सुऱक्षितता आहे. त्याउलट भितीशुन्यतेमुळे मुल अधिक सम्यक दिशेने प्रवास घडवेल.

मुळात शिक्षा हिच आव्हानात्मकतेसाठी असते.जेथे बंडखोरी असते तिथे शिक्षेचा प्रवाह अधिक दृढ होत जातो. आपणाला कोणी आव्हान दिलेले मुळात आवडत नाही. मुल जेव्हा अभ्यास करीत नाही त्यात त्याचा दोष असतो का? याचा विचार करण्याची तसदी व्यवस्था घेत नाही. आपण मोठी माणंस देखील जेथे आपला सन्मान, आदर करीत नाही. तेथे जात नाही. आपल्या मनात जेथे भितीचे सावट असते. तेथे आपण सहजतेने प्रवास करीत नाही. मग भिती मनात घर असेल तर अभ्यास कसा होणार? त्यामुळे मुलांना अभ्यास करावा असे वाटत असेल तर भितीमुक्त वातावरण असायला हवे. त्याचा सन्मान व आदर व्यक्त व्हायला हवा.

त्याच्या मनात जे प्रश्न आहेत. त्याला जे काही सृजनशीलतेने करावे वाटते त्यासाठीचे स्वातंत्र्य त्याला मिळते का? याचा विचार व्हायला हवा. त्याला समजून घेतांना अनेकदा शिक्षक वेगळ्या दिशेने घेऊन जात प्रवास घडवितात. विद्यार्थ्यांना न आवडणारी गोष्ट शिकावी यासाठी शिक्षक वेगवेगळया प्रकारच्या गोष्टी करीत असतात, जसे की गणिते सोडून झाली की मग आपण गोष्ट ऐकूया, खेळण्यास जाऊया, चित्रे काढूया अशा आवडत्या गोष्टी करायला मिळाव्यात म्हणून विद्यार्थी अभ्यास करतांना दिसतात. मुळात अभ्यास करावा असे वाटत असेल तर शिक्षा नको आनंदाचे व स्वातंत्र्याचे वातावरण हवे असते.

भयग्रस्ता म्हणजे एक प्रकारे मृत्यू असतो असे कृष्णमृर्ती म्हणत असे. मृत्यू याचा अर्थ विचार, स्वातंत्र्य, विवेकशुन्यता असते. शरीराचा मृत्यू असतो त्या प्रमाणे जीवंतपणात आपण जे काही करतो त्या सर्व भावभावनाचा देखील मृत्यू असतो. त्यामुळे भितीची पेरणी करून आपण जीवनंतपणाचा अनुभव घेऊ शकणार नाही हे लक्षात घ्यायला हवे. जीवंतपणाचा अभाव असेल तर शिकणे कसे घडेल? निर्भयतेत आपुलकी असते आणि विश्वासही. त्यामुळे त्या विश्वासाने मुले घरातील, समाजातील मोठयांचे ऐकत असते. त्यातून शिकण्याचा प्रवास होतो. आपण शिकण्यासाठी नाते निर्माण करण्याची गरज असते.

त्या नात्यात भितीचा अभाव असायला हवा. मग तो प्रवास अधिक आनंददायी आणि ज्ञानमय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भितीची पेरणी करून कोणी अभ्यास करेल असे घडत नाही, त्यातून फार माहितीचे पाठांतर घडेल, मात्र ज्ञानाची निर्मिती होईलच असे नाही. आपणाला शिक्षणाच्या वाटा निर्माण करतांना अधिक सजग, जागृत व जबाबदार नागरिक निर्माण करायचा असेल आणि शिक्षण आनंदक्षम करायचे असेल तर त्यासाठी आपला भवताल अधिक निर्भय करण्याची जबाबदारी स्विकारावी लागेल. भय म्हणजे मृत्यू असेल तर भय युक्त मन शिकण्यासाठी तयार असण्याची शक्यता फारच कमी असणार आहे. त्यामुळे निर्भयतेने ज्या सृजनशीलतेच्या वाटा निर्माण होतील त्या आरंभी ओबडधोबड असल्यातरी त्याचे स्वागत करण्याची गरज आहे.. कारण त्या वाटा मळलेल्या नाहीत. त्या दृष्टीने आपण शिक्षणाकडे पाहायला हवे. शिक्षणातून जितकी निर्भयता पेरत जाल तितके नाविन्यता त्यात येत जाणार आहे. भितीने अनेक वर्षाच्या बुरसटलेल्या पंरपरेचे पाईक होता येईल, पण नाविन्यतेचा विचार मात्र स्विकारता येणार नाही. आपणाला कोणत्या मार्गाने जायचे आहे ते एकदा निवडायला हवे.

संदीप वाकचौरे

(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)

- Advertisment -

ताज्या बातम्या