सब घोडे बारा टक्के..

शिक्षणात जे काही अपयश असते त्याला विद्यार्थी जबाबदार असतात. मुल नापास होते त्याचा अर्थ त्याला तेच जबाबदार असते. त्याला कमी गुण मिळतात याचा अर्थ त्याला बुध्दीमता कमी असते. तो ढ असतो. शिक्षणाची व्यवस्था मुलांच्या यश अपयशात जबाबदार असते, पण शिक्षणाची व्यवस्था अपयश स्विकारतांना दिसत नाही. निकाल लागला की शाळा, महाविद्यालये त्या यशाच्या वाटेकरी होतात... शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक संदीप वाकचौरे यांची ‘शिक्षण भवताल’ ब्लॉग मालिका...
सब घोडे बारा टक्के..

परवा एका आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणा-या संस्थेच्या वतीने शिक्षणात काम करणा-या कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण आय़ोजित करण्यात आले होते. प्रशिक्षणात मुलांचे शिक्षण आणि विद्यार्थ्यांना जीवनात मिळणारे अनुभव या अंगाने विषयाची मांडणी करण्यास सांगण्यात आले होते. कोणतेही मुल त्याच्या जीवन प्रवासात मिळालेल्या अनुभवाच्या आधारे नविन अनुभवाशी जोडणी करून ज्ञानाची निर्मिती करीत असते. त्याकरीता मेंदूची गुंतागुंतीची असणारी रचना सतत कार्यरत राहून त्या करीता काम करीत असते.

एकूणच जीवन अनुभव आणि मुलांचे शिकणे याबाबत चर्चा रंगत आली होती. मात्र यात एक कार्यकर्त्या म्हणत होता, की “आपण वर्गात जेव्हा काही शिकवत असतो तेव्हा काही मुले त्या शिकण्याच्या, शिकविण्याच्या प्रक्रियेत सक्रियतेचे दर्शन घडवत नाही. ते सहभागी होत नाही. याचा अर्थ त्यांना शिक्षणाची आवड नाही, त्यांना शिक्षणाची गरज नाही, त्यांना शिक्षणात रस वाटत नाही. त्यामुळे ही मुले मागे पडतात. एका अर्थाने ते मुलांचे ते अपय़श असते”. शिक्षणात जे काही अपयश असते त्याला विद्यार्थी जबाबदार असतात.

सब घोडे बारा टक्के..
शिक्षकीपेशाची तुटवू वाट....

मुल नापास होते त्याचा अर्थ त्याला तेच जबाबदार असते. त्याला कमी गुण मिळतात याचा अर्थ त्याला बुध्दीमता कमी असते. तो ढ असतो. शिक्षणाची व्यवस्था मुलांच्या यश अपयशात जबाबदार असते, पण शिक्षणाची व्यवस्था अपयश स्विकारतांना दिसत नाही. निकाल लागला की शाळा, महाविद्यालये त्या यशाच्या वाटेकरी होतात. त्याचवेळी जे विद्यार्थी अनुत्तीर्ण होतात त्या अपय़शाला तेच विद्यार्थी जबाबदार असतात. त्या अपयशात व्यवस्थेचा कोणताही सहभाग असत नाही. त्यामुळे एकूण अपयश हे विद्यार्थ्यांच्या मस्तकी असते. शिक्षणाची व्यवस्था विद्यार्थ्यावरती जबाबदारी टाकून मोकळी होते.

खरेतर कार्यकर्त्याचा प्रश्न अगदीच बरोबर होता. त्यांचे असणारे निरिक्षण हे सार्वत्रिक होते. शंभर टक्के मुले शिकण्याच्या प्रक्रियेत कधीच सहभागी होत नाहीत. वर्गात शिक्षक जे काही शिकवत असतात, त्यासाठी जो मार्ग अनुसरलेला असतो तो सर्व विद्यार्थ्यांना भावनारा असतोच असे नाही. आस्तित्वात असणारे प्रत्येक मुल वेगळे आहे. प्रत्येक मुलाचा अनुभव वेगळा आहे. त्याची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी भिन्न आहे. त्याची बुध्दीचा कल भिन्न असेल. अशावेळी प्रत्येकाला एकाच पध्दतीने शिकवून चालणार नाहीत. सब घोडे बारा टक्के या न्यायाने आपण शिक्षणाची व्यवस्था पुढे नेणार असू दे शिक्षणातून “ढ”च विद्यार्थी निर्माण होत राहतील. जेव्हा आपण शिकविण्यासाठी ज्या प्रक्रिया, पध्दतीची निवड करतो ती सर्वांनाच भावेल असे घडण्याची शक्यता फारच कमी असते. याचे कारण वर्गात असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्यामध्ये एकाच प्रकारची बुध्दीमत्ता नसते.

जगप्रसिध्द मेंदूशास्त्र अभ्यासक हावर्ड गार्डनर यांनी बुध्दीमत्तेचे अनेक प्रकार असतात असे प्रतिपादन केले आहे. अर्थात बहुबुध्दीमत्तेचा विचार त्यांनी प्रतिपादन केला आहे. तो आता जगातील शिक्षण क्षेत्राने स्विकारला आहे. शिक्षणात त्या सिध्दांताचे उपयोजन केले गेले तर बरेच प्रश्न कायम स्वरूपी निकाली निघू शकतील. या सिध्दांताचा विचार करून अभ्यासक्रम,मूल्यमापन आणि अध्यापन करीत शिक्षण गतीमान करण्याची निंतात गरज आहे असे सांगितले जात आहे. तसे जर घडले तर आपले वर्तमानातील शिक्षणांचे बरेच प्रश्न सुटू शकतील असा विश्वास वाटतो. खरेतर प्रत्येक मुलांमध्ये एका प्रकारची बुध्दीमत्ता अधिक असेल तर दुसरी बुध्दीमत्ता कमी अधिक प्रमाणात असेल, प्रत्येकात सर्व प्रकारच्या बुध्दीमत्ता कमी अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे प्रत्येक मुलात दडलेल्या बुध्दीमत्तेचा शोध घेणे महत्वाचे आहे. ती बुध्दीमत्ता ओळखणे आणि त्या बुध्दीमत्तेच्या अनुषंगाने विद्यार्थ्याला शिकण्याची संधी उपलब्ध करून देणे, त्याला शिकण्यासाठी त्या स्वरूपाची आव्हाने निर्माण करून देणे महत्वाचे ठरते. त्यामुळे ती आव्हाने शिक्षण प्रक्रियी निर्माण करण्यात अपयशी ठरली तर मुले शिकण्याच्या प्रक्रियेत सक्रीय होण्याची शक्यता फार कमी आहे.

सब घोडे बारा टक्के..
आम्ही भारतीय होणार कधी?

प्रसिध्द शिक्षणतज्ज्ञ लिला पाटील यांनी विद्यार्थ्यांना जाणून घेऊन जर अध्ययन अनुभव दिले नाही, तर त्यांच्यामध्ये असलेल्या कौशल्यांचा देखील -हास होण्याची शक्यता असते असे म्हटले आहे. त्यांनी म्हटले, की अशीच एक प्राण्याची शाळा भरली होती. त्या शाळेत अनेक प्रकारचे प्राणी शिकत होते. घोडाही होता आणि त्याच्या सोबत ससाही होता. शाळेत वेगवेगळे प्रकारचे विषय सर्वांना शिकविले जात होते. काही काळानंतर त्यांची परीक्षा घेण्यात आली, तेव्हा प्रत्येकाला एकाच स्वरूपाचे प्रश्न होते. त्यास प्रत्येक विद्यार्थ्यांनी योग्यते प्रमाणे प्रतिसाद नोंदविला होता. त्या आधारे मूल्यमापन झाले आणि प्रत्येकाच्या गुणपत्रकात गुण नोंदविले गेले. तेव्हा प्राण्यांना शिकविणा-या शिक्षकांनी मूल्यमापनाच्या प्रतिसादावरून मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला. शिक्षकांनी प्रगती पुस्तक पाहिले आणि त्यानुसार घोडयाला धावण्यात अधिक मार्क मिळाले, पण त्याला उडया मारण्याच्या क्षेत्रात फारसे गुण मिळाले नाही.

त्यामुळे शिक्षक घोडयाला म्हणाले, “तुला धावता चांगले येते पण उडया मारता येणे महत्वाचे आहे. तरच तू चांगल्या गुणांने उत्तीर्ण होशील”. मग त्यांने धावण्याकडे दूर्लक्ष केले आणि उडया मारण्याचा अभ्यास सुरू केला. तसे सशाला जवळ करीत गुरूजी म्हणाले “तुला उडया मारण्यात पैकीच्या पैकी मार्क मिळाले आहेत, पण धावण्यात खूप मागे आहेत. त्यामुळे आता तुला धावण्याकडे लक्ष द्यावे लागेल”. मग सशाने स्वतःची असलेली शक्ती म्हणजे उडया मारण्याकडे दुर्लक्ष करीत धावण्याचा प्रयत्न सुरू केला. असे काही महिने गेले आणि पुन्हा मूल्यमापन करण्याची वेळ आली. मूल्यमापन झाले आणि तेव्हा या दोन्ही विद्यार्थ्यांना मागील वेळी जे गुण मिळाले होते त्यापेक्षा यावेळीच्या मूल्यमापनात गुण कमी मिळाले. याचे कारण त्यांना जे येत नव्हते, त्यांना त्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी लागणारी क्षमता आहे की नाही त्याची पडताळणी न करता त्यासाठी सराव सुरू केला होता. त्यामुळे जे येत होते त्याकडे आपोआप दुर्लक्ष झाले.

खरेतर जे येत नव्हते ते प्राप्त करतांना त्या प्रत्येकाला काही मर्यादा आहेत. क्षमता आणि कौशल्य यांचे काही नाते आहे याचा विचार करण्याची गरज असते. पण क्षमताचा विचार न करता आव्हाने दिली तर विद्यार्थी तुटण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे या गोष्टींचा अर्थ इतकाच आहे की प्रत्येकात जे काही आहे त्या कौशल्यांचा विचार करून विकासाच्या संधीची पाऊलवाट निर्माण करायला हवी असते. विद्यार्थ्यांमध्ये जे काही आहे त्याचा अधिक विकास आणि नाही ते प्राप्त करण्याचा प्रयत्न व्हायला हवा. त्या अर्थाने विद्यार्थ्यांमध्ये जी बुध्दीमत्ता आहे तिची दखल घेऊन शिकण्यासाठी अनुभवाची बांधणी करायला हवी. त्यादृष्टीने संधी निर्माण करून इतर क्षमताच्या विकसनाची पाऊलवाट निर्माण करायला हवी.

सब घोडे बारा टक्के..
खेळता खेळता शिकूया..

वर्गात एखादा घटक अध्यापन करताना वर्गात अनेक प्रकारची बुध्दीमत्ता असलेली विद्यार्थी असल्यांने त्या बुध्दीमत्तांना पुरक ठऱणारे असे अध्ययन अनुभव मिळायला हवे असतात. जर व्याख्यान पध्दतीने एखादा घटक विश्लेषित केला जाणार असेल तर तो सर्व विद्यार्थ्यांना भावनार नाही. तो भाषिक बुध्दीमतेच्या विद्यार्थ्यांना अधिक जवळचे वाटेल. अन्यथा इतरांना ते जवळचे वाटणार नाही. म्हणून एकाच घटक शिकण्यासाठीच्या प्रक्रियेत विविध प्रकारच्या अनुभवाची मालिका निर्माण करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने एकाच तासिकेत विविध अध्ययन अनुभवाची मालिकेची मांडणी करण्याची गरज असते, म्हणजे अधिकाअधिक विद्यार्थ्यांना ती तासिका आपली वाटेल. घटकासंबंधीचे अनुभव जवळचे वाटले की मुले तासिकेत सहभागी होत असतात. त्याच बरोबर शिक्षक व विद्यार्थी यांच्यात होणा-या आंतरक्रियेला जसे महत्व आहे. त्याप्रमाणे आंतरक्रियेसाठीची भाषा देखील महत्वाची आहे.

दोघांच्या भाषेत अंतर असेल तर विद्यार्थी तासिकेत सहभागी होत नाहीत. त्या करीता भाषा एकमेकांना एकमेकांच्या जवळच्या वाटायला हवी असते. भाषेने एकमेकाशी नाते उभे राहात असते. त्यामुळे अनुभव जसे जवळचे वाटायला हवे असतात त्याप्रमाणे भाषाही विद्यार्थ्यांना जवळची वाटायला हवी असते. शंभर टक्के विद्यार्थी जेव्हा स्वतःहून, स्वयंप्रेरणेने आणि आनंदाने शिक्षणाच्या प्रक्रियेत सहभागी होतील, तेव्हाच शिक्षणास आरंभ होणार आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करणे वाटते तितके सोपे नाही, त्याकरीता विद्यार्थ्यांचा पूर्वानुभव, परीसर, त्यांचे सांस्कृतिक, सामाजिक जीवनाचा परिचय होणे देखील महत्वाचा आहे. शिक्षकांना स्वतः बदलावा लागेल. त्यासाठी कष्टत राहावे लागेल. पारंपारिक पध्दतीला छेद देत नवी विचारधारा स्विकारावी लागेल. नवविचारधारा स्विकारण्याची मानसिकता निर्माण करणे कठिण असते. पण ती हिम्मत दाखविली तर शिक्षणातील “ढ” चा पाढा संपुष्टात येऊन आपण अत्यंत सृजनशील समाजव्यवस्था निर्माण करू शकू. जगात जे काही नविन घडते आहे, नविन शोध लागते आहे त्यांचा स्विकार बदलाच्या दिशेने चालत राहाणे यात सर्वांचे हित सामावले आहे.

संदीप वाकचौरे

(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com