शहाणपणाची पेरणी

दुःखाच्या काळ्याकुटट अंधारातून जीवनाला लख्ख प्रकाशाच्या झोतात आणणे हे शिक्षणाचे काम आहे. शिक्षणाने जीवनाला अर्थ प्राप्त करून देणे. प्रत्येक सजीवाच्या जीवनाला काही अर्थ आहे. मानवी जीवनाचा प्रवासात जगणे आनंदाचा भाग आहे अशा जाणीवा स्वतःत निर्माण करणे हे शिक्षण आहे....संदीप वाकचौरे यांची ‘शिक्षण भवताल’ ब्लॉगमालिका...
शहाणपणाची पेरणी

शिक्षणातून प्रत्येकाला स्वतःचा शोध लागायला हवा. जीवनाची सार्थकता शिक्षणातून अधोरेखित करण्याचा प्रयत्न व्हायला हवा. शिक्षण घेऊन जीवनाचा अर्थ न उलगडल्यांने शिक्षण घेतलेली माणंसे समाजात अशिक्षित असल्यासारखे वागत आहेत.

शिक्षण घेऊनही बोलण्यातील भाषा असभ्य असेल. मोठया पदावर असूनही सहनशीलता आणि समोरच्याला जाणून घेण्याची क्षमता कमी असेल, दुस-यांना जाणून घेण्यात,समजाऊन घेण्यात शिकलेला माणूस म्हणून कमी पडत असू तर शिक्षण हे केवळ पदविचे भेंडोळी ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षण म्हणजे आहे तरी काय, तर ती शहाणपणाची पेरणी असते.

इ .एम. शुमाखर शिक्षणाबददलच्या हेतूविषयी लिहितात ,की शिक्षण हे लोकांना दाट जंगलातून बाहेर काढणे असते. येथे असलेले जंगल म्हणजे निरर्थकपणा, निर्हेतूकपणा, प्रवाहपतित होणे, अनावर लाड यांनी बनलेले आहे. या अंधारलेल्या जंगलातून बाहेर पडण्याची हिम्मत, शक्ती देते ते शिक्षण असते. मानवी जीवनात अनेक गोष्टी निर्थरक असतात.

सत्याचा शोध घेण्याऐवजी माणूस आपल्या भवतालच्या सुखासाठीच्या कल्पनेचा पाठलाग करत असतो. शिक्षणातून माणूस निर्माण करायचा असतो. शिक्षणातून शहाणपण पेरायचे असते. किंबहूना शहाणपण देते ते खरे शिक्षण असते. शिक्षण तर शांततेच्या दिशेने प्रवास घडवत असते.

मानसिक, कायिक, बौध्दिक हिसा संपवते. माणसातील चांगूलपणाचा शोधाचा पाठलाग करण्यास भाग पाडते ते शिक्षण असते. शिक्षणातून परिवर्तन करायचे म्हणजे भौतिक सुविधामध्ये बदल घडवून आणणे नसते. आज शिक्षण घेतल्यानंतर हे परिवर्तन घडते का असा प्रश्न स्वतःला विचारायला हवा. शिक्षणातून आपणाला जे अपेक्षित असते ते घडते का याचे आत्मपरिक्षण सतत घडायला हवे.

अनेकदा छोटयाशा स्वार्थाकरीता व्यक्ति आपल्या आयुष्याचे ध्येय, उददीष्टाकरीता चांगुलपणा गमावत असतो. जीवन प्रवासात आपणाला काय साध्य करायचे आहे हे ठरविण्यासाठी शिक्षणाने मदत करायची गरज आहे. आज हे जीवनध्येय शिक्षण ठरविण्यास मदत करते का ? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

जन्माला येऊन आपण समाजासाठी काहिच करू शकलो नाही. शिक्षक म्हणून काम करीत असताना ठसा उमटविणार योगदान देऊ शकलो नाही. ज्या ज्या क्षेत्रात माणूस कार्यरत असेल तर त्या त्या क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविण्याचा प्रयत्न व्हायला हवा असतो . कोणत्याही हेतू शिवाय जीवन प्रवास सुरू ठेवणे म्हणजे दिशाहिन प्रवास ठरावा.

त्यामुळे जीवन प्रवासाची दिशा शिक्षणाने निश्चित मदत करायला हवी. शिक्षण म्हणजे पदवी नाही, तर जीवनाचा अर्थ शोधणे आहे. त्या अर्थासाठीचा अखंड प्रवास करणे आहे.

अनेकदा जीवनात शिकलेले माणंस आपल्यातील सत्व गमावून बसलेली दिसतात. स्वाभिमान नावाची गोष्ट हरवून जातात. विचाराचा कणा गमवतात. त्यामुळे आपल्याला काही विचार असतो हेच विसरतात. एखादी गोष्ट मनात असेल , तर त्या गोष्टी न बोलता समोरच्या व्यक्तिला खुश करण्याचा प्रयत्न करतात. त्या खुशीत आपल आस्तित्व संपुष्टात आणतात. आंतरिक आवाज जो असतो, तो जर एखादी गोष्ट करण्यास धजावत नसेल , तर ती करता कामा नये.

पण दुर्दैवाने तसे होतांना दिसत नाही. सध्या शिक्षणाने स्वआवाज गमावणेच अधिक होत आहे. त्यामुळे समाजा ऐवजी माणंसाची गर्दी अवतीभोवती आपल्याला दिसते आहे. कधी एकेकाळी शिकलेली माणंस समाजात शहाणी वाटत होती. त्यांच्याप्रति आदर व्यक्त होत होता. शिकली म्हणजे निश्चित शहाणपण असलेली व्यक्ती अशी धारणा होती, पण दुर्दैवाने त्या आभासच ठरला. समाजात वावरतांना आपल्याला या माणंसाना आवाज असतो असे दिसत नाही.

कार्यालयात तर ओके बॉस, एस बॉस या पलिकडे आवाज नाही. खरच आपल्या शिक्षणातून विवेकाचा आवाज येतो का ? असा प्रश्न पडतो. महाराष्ट्राचे माजी मंत्री कै.बी.जे खताळ यांना एका वनविभागातील कनिष्ठ कर्मचारी ते गावी आले की दर रविवारी भेटण्यासाठी येत होते , पण त्याला बोलायला मिळत नव्हते. किंबहूना ते संपर्क करण्या संदर्भात फारसे धाडस दाखवत नव्हते.मंत्री महोदयांनी दोन तीन वेळा पाहिले.

पण अखेर खताळ पाटलांनीच त्याला येण्याचे कारण विचारले, तर त्यांने सांगितले मी वनविभागात आहे आणि वनविभागातील डोंगर,टेकडीवरती चर खोदून पाणी जिरविण्याचा प्रयोग केला तर पाणी जिरेल आणि त्याचा फायदा होईल.या भेटी दरम्यान इतक्या महत्वाच्या गोष्टीसाठी मंत्रीमहोदयाशी बोलणे आणि अनुमती घेणे अस काही असेल. पण या शेवटच्या स्तरावरच्या व्यक्तीला आपला आवाज वरच्या स्तरावरील व्यक्तिला ऐकवावा वाटणे हे केवळ आतला आवाज ऐकून चालण्याचा निर्धार असेल तर चालणे शक्य होईल.

समाजाचे ज्यात भले आहे ते काही करणे आणि मनात सद्हेतून एखादी गोष्ट करावी वाटत असेल तर त्या आवाजाला अधिक वरचा आवाज असणे साहजिक आहे. सत्याला नेहमी दडपण्याचा प्रयत्न होत असला, तरी त्याचा आवाज जेव्हा येतो तेव्हा तो अधिक मोठा आणि धक्कादायक असतो. खताळ पाटील यांनी स्वतःच्या समग्र जीवन प्रवासात आतल्या आवाजाशिवाय कोणताही निर्णय घेतला नाही असे ते अनेक भेटीत सांगत होते.

त्यामुळे मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यावर सार्वजनिक वाहनाने घरची वाट धरणे आणि पुन्हा सामान्य माणसासारखे जगत राहाणे हे घडत गेले. मुळतः आपण माणूस आहोत आणि आपल्या अवतीभोवती जे काही दिसते आहे तो पदाचा बडेजाव आहे. त्या पदाचा तो झगमगाट असतो. ही ओळख होणे देखील महत्वाचे असते. त्यासाठीचे शहाणपण महत्वाचे असते. ते ज्यांना येते त्यांना मोहाचे आणि पदाचे काहीच वाटत नाही.

त्यामुळे तर माजी राष्ट्रपती अब्दूल कलाम यांनी राष्ट्रपती पदासाठी पुन्हा अर्ज भरावा अशी विनंती पंतप्रधानानी केल्यानंतर देखील त्यांनी ती नाकारली हे कशाचे लक्षण आहे ? तर निरपेक्षता आणि जीवनाचा अर्थ सापडल्याचे ते लक्षण आहे.

माणंस आज अधिक प्रवाह पतित होता आहेत. त्या प्रवाह पतित होण्याने चांगले काही निर्माण करण्याची असेलली क्षमता गमावून बसणे घडते आहे. त्यामुळे शिक्षणातून संवाद घडावा त्याप्रमाणे स्वतःची मते अधिक स्पष्टपणे मांडण्याची शक्ती देण्याची निंतात गरज आहे. दुस-याला मते असतात, भूमिका असतात त्याचा स्विकार करण्याची हिम्मत देखील शिक्षणाने देण्याची गरज आहे.

दुस-याच्या मताचा आदर ,सन्मान घडविणे देखील महत्वाचे असते.अनेकदा आपण ज्या पदावर असतो त्या पदाचा आवाज मोठा असतो असे वाटणे साहजिक असते. समाज त्या आवाजाचा मोठेपणा स्विकारतो पण याचा अर्थ तो आदर असतो असे नाही. सामान्य जनता वर्तमानात दुहेरी कात्रीत सापडली आहे.

जसे कोरोनामुळे गणेश विसर्जन न होता मूर्ती दान कराव्यात असे आवाहन करण्यात आले.असे करणे धार्मिक दृष्टया योग्य की अयोग्य ? असा प्रश्न त्यांच्यात मनातील धार्मिक पगडयाने कायम राहिला आणि दुसरीकरडे कायद्याचे पालनाचा प्रश्न. अशा दुहेरी अडचणीतील सामान्य माणूस पिचलेला असतो.

त्याच्या मानसिक प्रक्रियेच्या कात्रित तो त्याच्या विवेकाने निर्णय घेतो.त्यावेळी शिकलेल्या माणंसाने त्याला समजून घेण्याची गरज असते. पंडीत नेहरू म्हणाले होते ,की “ सरकारी व्यवस्थेत काम करणा-या प्रत्येकाने हे लक्षात घ्यावे , की सामान्य माणंसाच्या कल्यानाकरीता मी आहे. कायदे सामान्याच्या विकासाकरीता आहेत त्यांची अडवणूक करण्यासाठी नाहीत ”. परवा परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील म्हणाले की , “ प्रशासनाचे अधिकार असलेल्यां अधिका-यांनी सिंघम होण्याचा प्रयत्न करू नये ” हे देखील खरे आहे . आपल्या अधिकाराचा गैरवापर आपण करीत नाही ना याचा विचार करण्याची विवेकशीलता आपण शिक्षणातून कमवायला हवी.

शिक्षण घेतल्यानंतर आपण सामान्य माणूंस केंद्रस्थानी ठेऊन प्रवास सुरू ठेवणे महत्वाचे आहे. अधिकार मिळाल्यानंतर त्याचा गैरवापर हा देखील अशिक्षित पणा आहे. अधिकाराची मस्ती म्हणजे निरक्षरता आहे. हे ओळखणे देखील महत्वाचे आहे. अन्यथा अशी मस्ती उतरविण्यासाठी एका माणंसाचे सैन्य देखील पुरेसे ठरते हा इतिहास आहे.

ब्रिटीश साम्राज्याला धक्का देणारे महात्मा गांधी,तसेच स्वातंत्र्यानंतर दिल्ली जवळ पेटलेली दगंल शांत करतांना या एकटयाच माणंसाने शांततेचा प्रवास सुरू ठेवला होता. त्यामुळेच लॉर्ड मांऊटबेटेन यांनी गांधीजीचे “ एका माणंसाचे सैन्य ” असेच वर्णन केले होते. एका माणंसाला एवढी शक्ती येते कोठून ? तर शिक्षणाने पेरलेल्या विचाराचे ते फलित आहे. त्यामुळे शिक्षणाने आपल्या भवतालचा अंधार नष्ट करण्यासाठी शहाणपण पेरण्याची निंतात गरज आहे.

- संदीप वाकचौरे

( लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहेत)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com