Wednesday, April 24, 2024
Homeब्लॉगया स्वप्नाचे करायचे काय ?

या स्वप्नाचे करायचे काय ?

मला तर खर शिक्षक व्हायचे होते… पण करणार काय ? बारावीला चांगला जीव ओतून अभ्यास केला.चांगले मार्क मिळाले.त्या मार्कावरती ड़ॉक्टर होता आले असते…अभियंता होता आले असते..तसे तर त्या मार्कावरती कोणतीही पाऊलवाटेचा प्रवास सहज साध्य झाला असता, पण आर्थिक परीस्थिती फारशी चांगली नव्हती.

त्यामुळे कमी कालावधीची पदवी,त्यातही अधिक पैसा त्यात गुंतवावा लागणार नाही असा अभ्यासक्रम पूर्ण करून नोकरी मिळवायची आणि पुढचा जगण्याचा मार्ग सुकर करायचा असे काही निश्चित केले होते. पण शिकल्यानंतर परीस्थिती पूर्वी सारखी राहिली नव्हती.बाहेर आलो तेव्हा जीवघेणी स्पर्धा आणि त्यातही रिक्त जागाची संख्या तर हाताच्या बोटावर मोजावी इतकीच.

- Advertisement -

पर्याय नाही म्हणून पोलीस झालो..तलाठी झालो..ग्रांमसेवक झालो…त्या पलिकडे नोकरी मिळाली नाही म्हणून शेती करतो आहे. अजूनही बेकार आहे. बरेच काही व्हायचे होते ,स्वप्नही मोठे होते..पण शिक्षण घेऊनही शिक्षक होता आले नाही..मार्ग तर तोच निवडला होता..अशी कथा सांगणारी अनेक मुले आपल्या अवतीभोवती भेटतात..तेव्हा शिक्षकी पेशासाठी आवश्यक असणारी पदवी अथवा पदविका मिळविली तरी स्वप्न आता धुसर होत चालले आहे असे वाटून जाते आणि येणा-या काळात शिक्षक होण्याकडचा कल आपोआप आटत जाईल.मात्र त्यातून शिक्षणाचे भविष्य देखील अंधारमय असेल का ? असा प्रश्न मनात घर करतोच.

परवा पोलीस गणवेश धारण केलेली मुलगी स्वतःची कथा सांगत होती.शाळेत हुशार होते.शिक्षकांनी वर्गात विचारले तुला काय व्हायचे ? तर माझे उत्तर असायचे शिक्षक व्हायचे. वर्ग बदलले पण माझे उत्तर नाही बदलले.लहान वयातच शिक्षक होण्याचे मनात स्वप्न होते.त्या स्वप्नाची पाऊलवाट चालत राहिले.अभ्यास केला डी.एडची वाट धरली.चांगल्या मार्काने पासही झाले.मग शिक्षण शास्त्र पदविके सोबत पात्रता परीक्षा आली.ती देखील दिली आणि नियम अटीसह उत्तीर्ण झाले. आता नोकरी मिळेल…

जीवन किमान आर्थिक परिवर्तनाच्या वाटेने चालणे घडेल अशी प्रतिक्षा होती. पाच सहा वर्षात नोकरी मिळेल अशी मनिषा होती. जाहिरातीसाठी पेपर वाचले.कोठे जाहिरात दिसली की अर्ज केले.मुलाखती दिल्या.कोठे गुणवत्तेवर निवड झाली.मात्र वेतनाचा विषय निघाल्यावर तीन चार हजाराच्या पुढे कोणी जात नसायचे.कोणी पाच हजार देतो म्हणायचे.मग कोठे कोठे तर सरळ सरळ पैशाची भाषा व्हायची. गरीबी होती म्हणून डी.एड केले.पैसे असते तर अधिक चांगले अभ्यासक्रम पूर्ण केले असते. पण पैसा देईल त्याला नोकरी मिळेल अशी ती भाषा होती. आर्थिक परीस्थितीने तेही शक्य नव्हते.

मग काय मिळेल ती नोकरी करावी लागली.पण जगण तीन चार हजाराच्या पगारावर कस शक्य आहे. मग नोकरीची वाट बदलावी म्हणून स्पर्धा परीक्षांचा विचार केला.परीक्षा देता देता पास झाले आणि आता पोलीस म्हणून उभी आहे. कमी अधिक प्रमाणात अनेकांची हीच स्थिती आहे.राज्याच्या विविध सेवाक्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक कर्मचारी हे डी.एड पात्रता धारक आहे.पण ते आपल्या व्यावसायिक पात्रतेचे शिक्षण न करता वेगळेच काम करता आहेत.

या वाटा धुंडाळतांना मनात निराशेची छाया आहे. हे मात्र त्यांच्या बोलण्यात सातत्याने अधोरेखित होत होते.एकीकडे परीस्थिती नाही म्हणून शिकावे असे वाटते आणि दुसरीकडे मात्र बाहेरील परीस्थिती तर त्याहून वाईट आहे.बाहेर तर नितीमूल्याची भाषा वरवरची आहे.एकीकडे पैशाची भाषा आणि दुसरीकडे आर्थिक शोषन सुरू आहे.या परीस्थितीला सामोरे जातांना स्वप्न भंगली आणि केवळ सामोरे जाणे नशिबात आले.

राज्यात गेले काही वर्ष शिक्षण शास्त्र पदवी आणि पदविका घेतलेल्या तरूणाच्या पदरात निराशा येते आहे. आज सुशिक्षित बेकांराच्या संख्येत किमान सात ते आठ लाख बेकारी शिक्षणशास्त्र पदविका आणि पदवीधारक असावेत असा अंदाज आहे. खरेतर सन 2000 पर्यंत या क्षेत्राची परीस्थिती चांगली होती. अगदी मोजके अध्यापक विद्यालय, महाविद्यालय होती. राज्याची, जिल्हयाची गरज जेवढी होती. त्या प्रमाणात विद्यार्थी पदवी आणि पदविका धारकांची संख्या होती.

मर्यादा लक्षात घेता हे प्रमाण अधिक चांगले होते. त्यामुळे विद्यार्थी उत्तीर्ण झाला की निकाल लागल्यापूर्वी नोकरीसाठीचे पत्र त्याच्या हातात होती. त्यातून नोकरीचा अधिक सुकर प्रवास त्या मुलांच्या वाटयाला येत होता.फार काही मोठी स्वप्न त्यांना पडत नव्हती.जगण्या इतकी समृध्दतेचा विचार व्हायचा.मात्र जागतिकीकरणानंतर शिक्षण ही सेवा न राहाता तिचाही धंदा करण्याचा जणू विडा उचलला गेला.त्यासाठी नोकरी देणारी ही एकमेव पदविका आहे म्हटल्यावर अनेक संस्था चालकांनी या वाटेने जाण्याचा निर्णय घेतला,त्यातील काहींनी अत्यंत सामाजिक भान ठेवत निर्णय घेतला होता.

मात्र काहिंना यात आपला व्यवसाय दिसू लागला.नोकरी लगेच मिळते म्हटल्यावर समाजातील मध्यमवर्गीयांना देखील या पदविकेचे आकर्षण वाटू लागले.त्यातून पै पै साचविलेली रक्कम देणगी देऊन अनेकांनी प्रवेश घेतला.कधीकाळी या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा म्हणजे गुणवत्तेचा उंचावलेला आलेख असेल तरच शक्य आहे असे मानले जात होते.त्यात प्रवेश मिळावा म्हणून प्रचंड स्पर्धा होती. गुणाचा आलेख उंचावलेला नसेल तर व्यवस्थापन कोटा होता.त्या करीता चक्क पाच ते दहा लाख रूपये मोजले जात असल्याचे सांगण्यात येते.

व्यवस्थापन कोट्यांने अनेकांना लखोपती बनविले होते हे विसरता येणार नाही.मात्र त्यानंतर राज्यात दरवर्षी सुमारे लाखभर विद्यार्थी पदविका धारक तयार होऊ लागले.राज्यात सध्या शाळांची एकूण संख्या एक लाख सहा हजार इतकी आहे.आता शाळांमध्ये एकदा शिक्षक नियुक्त केला गेला तर तो किमान तीस वर्ष सेवा करतो.त्यामुळे इतकी मोठया प्रमाणात निर्माण होणारे शिक्षक कोठे नियुक्त करणार हा प्रश्न आहेच.त्यातच पदवी हातात असेल तर नोकरीची अपेक्षा काही चुकीची नाही.

पण नोकरीच उपलब्ध नसल्याने राज्यातील अनेक मुलामुलींची स्वप्न भंगले आहेत.यातून येत जाणारी निराशा देशाच्या शिक्षणासमोर प्रश्न निर्माण करतील.आज नोकरी नाही म्हणून अनेक गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे पाठ फिरवली आहे.कधीएकेकाळी राज्याच्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेत होती..आज सारेच चित्र पालटले आहे.विद्यार्थ्यांची शोधाशोध करावी लागत आहे आणि त्याचवेळी शिक्षकांचा पुरवठा करणारी अनेक विद्यालये,महाविद्यालये बंद होता आहेत.आज जे बंद होता आहेत त्यांना त्यावेळीच मान्यता दिली नसती तर या क्षेत्रातही बरेच काही आशेने पाहाता आले असते.

मात्र आज जरा चिंता करावी अशी स्थिती आहे.मात्र आज विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्यानंतर उद्यासाठी लागणारी चांगले शिक्षक परीस्थिती येत्या काही वर्षात सुधारेल पण उद्यासाठी लागणारी शिक्षक कोठून आणणार हा प्रश्न आहे.कदाचित येत्या काही वर्षात शिक्षणाचे खाजगीकरण वेगाने झालेले पाहावयास मिळेल.

शिक्षणात खाजगीकरणाची मक्तेदारी निर्माण होईलही..पण त्यांना लागणारे शिक्षक हवेतच..पण ते जर नाही मिळाले तर आपणास पुन्हा जुन्या वाटेने जावे लागेल…आपण पदवीधर शिक्षक नाही मिळाले म्हणून अप्रशिक्षित शिक्षक नेमावे लागले होते..उद्याच्या भविष्यात पुन्हा तसे तर घडणार नाही ना अशी शंका येते.किंबहूना तो धोका आहेच.त्यामुळे आज तरूणाईचे स्वप्न भंगली आहेत उद्या व्यवस्थेचे देखील स्वप्न भंगलेले पाहावे लागेल.

शिक्षण शास्त्र पदविका म्हणजे आर्थिक परीस्थितीतून सुटका करणे होते. यातील अनेक मुलांचे नोकरी हे स्वप्न होते.मात्र त्यातून बाहेर पडावे लागल्याने नवा मार्ग अनुसरला गेला आहे.त्यातून सध्याच्या मागणीपेक्षा अधिक पुरवठा होत गेल्याने शिक्षक उमेदवाराची परवड होतांना पाहावी लागत आहे.त्यामुळे अनेक संस्थाचालकांना कमी वेतनावर शिक्षक उपलब्ध होऊ लागले आहेत.त्यात एखादा शिक्षक सोडून गेला तरी अनेक जन रांगेत उभे आहेत. त्यामुळे पेशाची प्रतिष्ठा देखील गमवतांना पाहावी लागत आहे. शिक्षकांची होणारी परवड पाहिली तर डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहात नाही.

संस्थाचालकांनी आपल्या जागा भरून पदवी दिली आहे.त्या पदव्या देताना ती महाविद्यालये,विद्यालये म्हणजे काय तर अर्थ उत्पन्नाचे साधने आहेत.पैसे देऊन पदव्या देणारी ठिकाणे असल्याचे अध्यापक विद्यालयांच्या संदर्भाने नियुक्त समितीनेच त्यांच्या अहवाल नमूद केले आहे.त्यामुळे सरळ सरळ पदव्या विकणारी ही ठिकाणे बनली आहेत.

असे चित्र असेल तर मुलांच्या पदरी काय पडणार असा प्रश्न पडतोच.मात्र त्यांच्यापेक्षा या देशाच्या भविष्यात निर्माण होणा-या अंधाराचे काय हा प्रश्न अनुत्तरीत राहातो.शिक्षणाबाबत धोरण घेऊन अमलबजावणी बाबत गंभीर पावले उचचली नाही तर येणारा काळ आपणाला माफ करणार नाही..शेवटी समाजाच्या व राष्ट्राच्या विकासाचा मार्ग शिक्षणातूनच जातो हे लक्षात घ्यायला हवे..शिक्षण आणि तेथील मनुष्यबळच अंधारात असेल तर राष्ट्राच्या भविष्यात प्रकाशाची किरणे कशी येणार हा प्रश्न अनुत्तरीत राहातो.

_संदीप वाकचौरे

(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)

- Advertisment -

ताज्या बातम्या